नवीन लेखन...

माणसं जोडणारा गणेशोत्सव

बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या.
बर्वे बाईंनी आणि मुलांनी श्री गणेशाची मुर्ती पसंत केली का असे विचारले असता बर्वे साहेबांनी त्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी दुकानात जी मुर्ती मिळेल ती घेऊन येऊ असं सुचवले.
परंतु आयत्या वेळी मनासारखी किंवा आपल्याला पसंत पडेल अशी मुर्ती शिल्लक नसली तर काय करायचे या प्रश्नावर बर्वे साहेब म्हणाले आपला देव आपल्याला नक्कीच मिळेल.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सात वाजताच बर्वे साहेब त्यांच्या पाच वर्षांच्या सोनियाला आणि अकरा वर्षांच्या संजीवला सोबत घेऊन गणपती आणायला बाहेर पडले.
गुलाल उधळीत गणपती बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात मिरवत मिरवत बरीचशी लोकं आपापल्या घरी घेऊन जात होते.
समोरून पाटावर बसलेली एक सुंदर अशी गणेशाची मुर्ती डोक्यावर घेऊन चालणाऱ्या एका तरुणाच्या पुढे त्याच्या घरातली लहान मुले गुलाल उधळीत, गणपती बाप्पाचा जयघोष करत नाचत नाचत निघाले होते, सोबत ढोल आणि ताशा होताच. ढोल आणि ताशा वाजवणारी पोरं गरीब घरातली दिसत होती. त्यांच्या ढोलावर सलीम ढोल पथक पिराची वाडी असे लिहिले होते. पंधरा सोळा वर्षांची ती पोरं त्यांच्या पेहरावा वरुन मुस्लिम वाटत होती, त्यांच्या डोक्यावर गोल पांढरी जाळीची टोपी सुद्धा होती. संजीव ने बर्वे साहेबांना तल्लीन होऊन आनंदाने ढोल वाजवणाऱ्या त्या मुलांकडे इशारा करून दाखवले आणि विचारले, बाबा हे तर मुस्लिम आहेत ना मग गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत एवढ्या आनंदाने का ढोल वाजवत आहेत.
बर्वे साहेबांनी संजीवला समजावले, संजीव अरे ते एका लहानशा खेड्यातून आलेले आहेत आता घरोघरी गणपती नेण्यासाठी त्यांना दोन चारशे रुपये देऊन लोकं वाजत गाजत उत्साहात नाचत. जातात. पुढे दीड व पाच दिवसांचे आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीत सुद्धा त्यांना बोलावले जाईल.
त्यांच्या परिस्थीती वरुन त्यांना गणेशोत्सवा दरम्यान थोडेफार पैसे मिळतात हेच त्यांच्या आनंदाने तल्लीन होऊ वाजवण्याचे कारण असू शकेल किंवा कदाचित आपण ज्या श्रध्देने आणि भावनेने आनंदात घरी गणपती घेऊन जातो त्या भावनेला आणि श्रद्धेला त्यांची मदत होते त्यांचा हातभार लागतो याचेही त्यांना समाधान मिळत असावे.
बर्वे साहेब मुलांसह महाराष्ट्र कला केंद्राच्या जवळ जाऊन पोहचले. तिथं गणपतीच्या मुर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. अगोदर बुकिंग केलेल्या पावत्या दाखवून लोकं मुर्त्या घेऊन जात होते. एकापेक्षा एक अशा सुबक आणि सरस मुर्त्या नेल्या जात होत्या.
सगळ्याच मुर्त्या अत्यंत देखण्या होत्या, प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यांची आखणी इतकी परफेक्ट होती की मुर्तीकडे कुठल्याही अँगल ने बघितले तरी गणपती बाप्पा आपल्याकडेच बघत आहेत असं वाटायचे.
गर्दी कधी कमी होईल आणि आपल्याला कधी मुर्ती मिळेल या विचारात असताना, अरे बर्वे साहब आपने यहाँ मुर्ती बुक की हैं क्या? असा आवाज आला. बर्वे साहेबांनी आणि त्यांच्या मुलांनी मागे वळून बघीतले. बर्वे साहेब बोलले अरे अस्लम तू इथे काय करतोस.
अस्लम बर्वे साहेबांच्या बँकेत कॅशीअर म्हणून कामाला होता. अस्लम याने बर्वे साहेबांना पुन्हा विचारले साहेब तुम्ही इथून मुर्ती बुक केली आहे का?
त्यावर बर्वे साहेब बोलले, अरे अस्लम मी या शहरात बदली होऊन आल्यापासून तू बघतो आहेस ना आपण एकाच बँकेत कामाला आहोत, मी तुझा ब्रांच मॅनेजर आहे पण कामाव्यतिरिक्त आपण एकमेकांशी कधी चार शब्द तरी नीट बोललो आहोत का. दिवसभर कामाचा व्याप आणि ताणामुळे मला गणपतीची मुर्ती बुक करायला वेळच मिळाला नाही. आज करू उद्या करू करता करता राहूनच गेले. मग शेवटी असं ठरवले की गणेश चतुर्थीच्याच दिवशी जी मिळेल ती मुर्ती घेऊन घरी जायचे.
बरं आता तू सांग कोणासोबत इथे आला आहेस. अस्लम बर्वे साहेबांना म्हणाला, साहेब मी इथे कोणासोबत नाही आलो, मी इथे मुर्तींच्या डोळ्यांची आखणी करण्यास मदत करायला येतो. बँकेत नोकरी लागण्या पुर्वी मी इथेच काम करायचो, मुर्ती साच्यातून काढून , बनवण्यापासून ते रंग लावणे आणि डोळ्यांची आखणी करणे मीच करायचो. परंतु माझी ही कला मला टिकवायची आहे त्यामुळे नोकरी करता करता जसे शक्य होईल तशी मी इथे येऊन मदत करत असतो. माझे वडील मला आता फक्त डोळ्यांची आखणीच करायला सांगतात.
खरं सांगायचे तर मुर्ती बनवण्याची ही कार्यशाळा आमचीच आहे. हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. आम्ही मुर्तीकार आहोत. गौरी गणपती आणि नवरात्रीत दुर्गा मातेच्या अशा सर्व प्रकारच्या मुर्त्या आम्ही बनवतो. माझे चुलत भाऊ सुद्धा आम्हाला मदत करतात ते सुद्धा इथेच काम करतात.
फार पुर्वी कधीतरी मुघल सरदार आपल्या शहरात आले होते आणि त्यांनी शहराला लुटून जाता जाता तलवारीच्या जोरावर आमचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले होते असे सांगितले जाते.
स्वातंत्र्यपुर्व काळापासून आम्ही देवी देवतांच्या मुर्त्या बनवत आहोत. आमची कला आम्हाला धर्म आणि जातींची बंधने नाही पाळू देत.
जी भावना आणि श्रद्धा इथून मुर्ती घेऊन जाणाऱ्यांच्या मनात असते त्याच श्रध्देने आणि भावनेने आम्ही पुर्वी हिंदु होतो की आता मुस्लिम आहोत याचा विचार न करता धर्माच्या पलीकडे जाऊन आमची कला आम्ही जोपासतो आहोत.
चला मी तुम्हाला शिल्लक असलेल्या काही मुर्ती दाखवतो असं म्हणून अस्लम बर्वे साहेबांना गर्दीतून वाट काढत आत घेऊन गेला.
पिवळा पितांबर आणि लोडाला टेकून बसलेली श्री गणरायाची एक अत्यंत आकर्षक मुर्ती एका कोपऱ्यात ठेवलेली होती, बर्वे साहेबांनी अस्लमला ती मुर्ती मिळू शकेल का विचारले. अस्लम ने त्याच्या वडिलांना जवळ बोलावून घेतले ,त्यांची आणि बर्वे साहेबांशी ओळख करून दिली व ती मुर्ती कोणाला दिलेली तर नाही ना असे विचारून घेतले.
अस्लम बर्वे साहेबांकडून मुर्तीचे पैसे स्वीकारायला तयार नव्हता पण बर्वे साहेबांनी एकवीसशे रुपये घेतल्या शिवाय मुर्ती नेणार नाही असा पवित्रा घेतला, अस्लम ने नाराजीने पैसै घेतले आणि मनोभावे मुर्ती बर्वे साहेबांना सुपुर्द केली.
तोपर्यंत मघाशी येताना ज्या मुर्ती सोबत सलीम ढोल पथकाची पोरं गेली होती त्या मुर्तीला पोचवून घाईघाईने दुसरी मुर्ती घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र कला केंद्रासमोर परतली होती.
बर्वे साहेबांनी त्यांना आमच्या सोबत येता का असे विचारले. ते तयार झाले, बर्वे साहेबांनी घरी बाई साहेबांना फोन करून काहीतरी सांगितले.
ढोल ताशाच्या गजरात बर्वे साहेब गणरायाची मुर्ती त्यांच्या घरापाशी घेऊन पोचले, बाई साहेबांनी बर्वे साहेबांच्या पायावर पाणी घालून पाय धुवून घेतले. गणरायाच्या मुर्तीच्या पायाला पाणी लावले आणि मुर्तीसह बर्वे साहेबांना घरात यायला सांगितले.
मुर्ती घरात ठेऊन बर्वे साहेब आणि त्यांच्या बाई बाहेर आल्या. बाई साहेबांनी मोठ्या ट्रे मध्ये गरमा गरम कांदे पोहे आणि चहा आणला होता. सलीम ढोल पथकातील चौघा जणांना त्यांनी पोह्यांचा डिश आणि चहाचे कप दीले.
त्यांचे पोहे खाऊन झाल्यावर दुपारी घरी जायच्या पहिले पुन्हा इथेच या आणि जेवून जा असं सांगितले. त्या चारही पोरांचा चेहरा आनंदाने खुलला.
बर्वे साहेबांनी त्या चौघांना किती पैसे देऊ तुम्हाला असे विचारल्यावर, काका पैसे राहू द्या, आम्हाला इतका गरमा गरम आणि चविष्ट नाश्ता मिळालाय आणि शिवाय दुपारी जेवायला सुद्धा येणार आहोत आम्ही. तुमच्याकडून कसे पैसे घेऊ आम्ही. आम्हाला खूप बरं वाटलं.
तरीही बर्वे साहेबांनी त्या चौघांचा म्होरक्या वाटणाऱ्या पोराच्या खिशात एक पाचशेची नोट कोंबलीच.
संजीव आणि सोनिया सकाळपासून दिसणाऱ्या घटना , गणरायाचे आगमनाने आणि धर्माच्या भिंती पलीकडील श्रद्धा आणि भावना बघुन भारावून गेले होते.
–प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E. (mech), DIM, DME.
कोन , भिवंडी,ठाणे

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..