कार्यकाळ: २२ मे २००४ पासून…
जन्म: २६ सप्टेंबर १९३२
मृदभाषी, संयमी, प्रगल्भ आणि व्यासंगी असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताची वेगाने प्रगती झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग आदिंचे कामकाज सांभाळताना देशाच्या अर्थविकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
मृदुभाषी आणि व्यासंगी अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे तेरावे आणि विद्यमान पंतप्रधान! रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद अशा विविध पदांवरून काम करताना मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत झाली.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पश्चिम पंजाब (आता पाकिस्तानमध्ये) गाह येथे झाला. अर्थशास्त्रात पारंगत असलेले मनमोहनसिंग उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज, विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात कार्यरत असताना भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहन सिंग यांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
मनमोहन सिंग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून, राज्यसभेत सध्या आसामाचे प्रतिनिधित्व करतात. स्वच्छ प्रतिमेचा आणि मितभाषी पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताचे अमेरिकेसह जपान, जर्मनी, इराण तसेच परराष्ट्राशी असलेले संबंध अधिकच मजबूत बनले आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणाऱ्या मनमोहन सिंग यांचा भारतीय अर्थकारणात एक वेगळा ठसा उमटलेला आहे.


Leave a Reply