
सोफिया कुरेशी
व्योमिका सिंग
प्रेरणा देवस्थळी
ही तीन नावे आठवतात ?
नाही ?
मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ?
अजूनही आठवत नसेल तर , काल संपन्न झालेल्या पंधरा ऑगस्टच्या कौन बनेगा करोडपती हा विशेष भाग बघा .
नक्की आठवतील ही नावे .
अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वासह .
मी पाहिला तो खास विशेष भाग .
अमिताभ बच्चन यांचे धीरगंभीर आवाजातील निवेदन .
त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकणाऱ्या , सैन्यदलांच्या कर्तृत्वाच्या व्हिडिओतील काही प्रसंग .
आणि नमवी पहा या भूमी चालताना या उक्तीची प्रचिती देणाऱ्या सोफिया , व्योमिका आणि प्रेरणा या आदिशक्तीच्या तीन रूपांचे कौन बनेगा करोडपतीच्या रंगमंचावर आगमन .
त्याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या आबालवृद्धांच्या आणि तरुणाईच्या , वंदे मातरम् , भारतमाता की जय च्या गगनभेदी घोषणा …
पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची उत्कंठा वाढवणारा , अंगावर रोमांच उभे करणारा तो प्रसंग .
आणि प्रत्येक क्षण जिवंत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या निवेदनातून साकार होत असलेले अनोखे विश्व .
डोळ्यांचे पारणे फेडणारा ,
देशभक्तीची भावना जागृत करणारा ,
गोपनीयतेची मर्यादा आणि भान ठेवून अनोखे भावविश्व , कर्तृत्व उलगडून सांगणारा कार्यक्रम मी पाहिला .
आणि वाटलं हे तुमच्या पर्यंत पोहोचवायला हवं .
अशा कार्यक्रमात पाहुण्यांना बोलकं करण्यासाठी किंवा तणाव , अस्वस्थता कमी करण्यासाठी अमिताभ खूप वेगवेगळे प्रयोग करतात . हे आपण पाहिलं असेल .
पण या कार्यक्रमाची जातकुळीच मुळी वेगळी होती .
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य होतं.
समोर विलक्षण कर्तृत्ववान आणि राष्ट्र सर्वप्रथम मानणाऱ्या धीरोदात्त आदिशक्ती होत्या .
त्यांच्या पराक्रमाने धन्य झालेले त्या आदिशक्तींचे कुटुंबीय होते .
आणि त्या सर्वांपासून प्रेरणा घेणारी तरुणाई आजूबाजूला बसली होती .
त्यामुळे अमिताभ बच्चन यांची कसोटी होती .
कसोटी होतीच .
कारण स्वतःबद्दल बोलताना अत्यंत कमी शब्द वापरणाऱ्या आदिशक्तीना बोलकं करणं सोपं नव्हतं .
पण ते शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं .
प्रत्येकीच्या घरात सैन्यदलाची परंपरा तरी होती किंवा तशी स्वप्ने होती , किंवा जोडीदार सुद्धा सैन्य दलातील होता .
सोफिया यांची पणजी तर राणी लक्ष्मीबाई यांची सावली बनून त्यांच्या बरोबरीने स्वातंत्र्यसंग्रामात लढली होती .
आपण निवडलेल्या सैन्य दलात आपण कोणत्या पदावर आहोत , काय कर्तृत्व गाजवले हे सांगताना नम्रपणाची दुर्मिळ भावना सारखी जाणवत होती .
चेहऱ्यावरचा करारीपणा , ठाम आश्वासक देहबोली ,भावनाविवश करणारे प्रसंग सांगताना मनातले भाव चेहऱ्यावर न आणण्याची कर्तव्यकठोरता …
सगळं सगळं जाणवत होतं.
अधूनमधून अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक योग्य उत्तरे दिल्यानंतर मिळालेल्या रकमेबद्दल संयमित आनंद व्यक्त करताना त्या जाणवत होत्या .
बक्षिसाची मिळणारी रक्कम त्या तिघी आपापल्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरणार होत्या .
जिवावर बेतलेले प्रसंग , लढाईसाठी सदैव सज्ज राहण्याची सवय हे ऐकताना भारावल्यासारखे झाले होते .
राष्ट्र सर्वप्रथम .
नागरिकांनी पाळावयाचे नियम , शिस्त .
मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन .
हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतेच पण त्यापेक्षा मला जास्त भावलेला भाग म्हणजे त्या तिघी चांगल्या वाचक आहेत . आणि वाचलेले पुस्तक हे आचरणासाठी विचार देणारे असावे आणि तशी वर्तणूक आपल्याकडून घडली पाहिजे , याचे त्यांनी आग्रहाने केलेले प्रतिपादन .
अशा अनेक गोष्टीतून त्या तिघींचे व्यक्तिमत्व उलगडले .
अर्थात सगळे शब्दबद्ध करता येणे अशक्य आहे .
तुम्ही तो खास एपिसोड बघाच .
मी त्या तिघींना आदिशक्ती असे का म्हटले हे लक्षात येईल .
सर्व तरुणाईला बोध घेण्यासारखे त्यांचे आयुष्य आहे .
विशेषतः तरुण मुलीसुद्धा राष्ट्र संरक्षण करण्यात मागे नाहीत हा संदेश या भागातून मिळतो .
आजच्या व्यसनाधीन होणाऱ्या , बहकत जाणाऱ्या , केवळ एन्जॉयमेंट म्हणजे आयुष्य असे समजणाऱ्या , कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांच्या दावणीला आपले आयुष्य बांधून बरबाद होणाऱ्या नव्या पिढीने हा एपिसोड पहायलाच हवा .
प्रत्येक घरातील मातृपितृशक्तीने आपल्या घरातील सर्वांना आदिशक्तीची ही नवी रूपे , नवे विचार , नवे अवकाश दाखवायला हवे ,
यासाठी हा लेखनप्रपंच !
त्या आदिशक्तीसह सैन्यदलातील सर्वांना प्रणाम !
————
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६


Leave a Reply