नवीन लेखन...

पहिले घोडेस्वार?

घोड्यानं माणसाला आपल्या पाठीवर चढू देणं, हा एका दृष्टीनं घोड्याच्या उत्क्रांतीचाच भाग आहे; तसंच तो मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. काही संशोधकांच्या मते घोडा माणसाळला गेल्यानंतर काही काळातच त्याने, माणसाला आपल्या पाठीचा उपयोग करू दिला असावा. परंतु याबद्दलचा निश्चित स्वरूपाचा पुरावा उपलब्ध नाही. घोड्यावर स्वार होण्यासाठी खरं तर कोणत्याही साधनाची गरज नसल्यानं, सुरुवातीच्या काळातील माणूस खोगीर, रिकीब, असं कोणतंही साधन न वापरता घोड्यावर बसत होता. त्यामुळे अशा पुराव्यांच्या अभावी घोड्यावर माणूस केव्हा स्वार झाला असावा, हे कळणं अवघड ठरलं होतं. परंतु आता फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठातील मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनाद्वारे, माणसाच्या घोडेस्वारीच्या उगमाचा काळ व उगमाचा प्रदेश शोधून काढण्याच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकलं आहे. आणि त्यांनी ते शोधून काढलं आहे ते घोड्यांच्या मदतीनं नव्हे… तर चक्क मानवी शरीर रचनेवरून! मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.

पूर्व आणि आग्नेय युरोपातील रोमानिआ-बल्गेरिआपासून ते हंगेरी-सर्बिआपर्यंतच्या देशांत प्राचीन काळातले, छोट्या टेकड्यांसारखे दिसणारे, मातीचे हजारो ढिगारे आढळतात. ‘कुर्गान’ या नावे ओळखले जाणारे हे ढिगारे, साधारणपणे साडेपाच हजार ते चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातले आहेत. हे कुर्गान म्हणजे प्रत्यक्षात त्या काळात तिथे राहणाऱ्या माणसांची थडगी आहेत. ही थडगी म्हणजे एक छोटा खड्डा असायचा. या खड्ड्यात मृताचं शव ठेवून तो खड्डा लाकडी फळीनं झाकला जायचा व त्यावर मोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात माती गोळा करून ठेवली जायची. या परिसरातले बहुतांश कुर्गान हे याम्नाया या एका विशिष्ट संस्कृतीतील लोकांचे आहेत. ही याम्नाया संस्कृती सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यानंतर ती जवळपास एक-दीड हजार वर्षं टिकली असावी. या जमातीचा वावर मुख्यतः आजच्या पूर्व युरोपात आणि रशियाच्या पश्चिम भागात होता. या संस्कृतीतील लोक हे पशुपालन करणारे भटके लोक होते. हे लोक कॅस्पिअन समुद्र आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील गवताळ प्रदेशातून या भागात जनावरांच्या चाऱ्याच्या शोधात आले असावेत. इथे आढळणारे कुर्गान हे त्यांनीच बांधले असावेत. मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं संशोधन यांच कुर्गानवर केलं आहे.

सन २०१९ ते २०२२ या काळात या कुर्गानवर पुरातत्त्वतज्ज्ञांकडून बरंच उत्खनन केलं गेलं. पूर्व युरोपातल्या ३९ वेगवेगळ्या ठिकाणच्या कुर्गानवरील उत्खननात सापडलेल्या, अशा एकूण २१७ सांगाड्यांवर मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढचं संशोधन केलं. या संशोधनात त्यांनी या सर्व सागांड्यांचा तपशीलवार अभ्यास केला. या अभ्यासात या संशोधकांनी सांगाड्यांतील कार्बनच्या समस्थानिकांच्या एकमेकांसापेक्ष प्रमाणावरून, तसंच इतर परिस्थितीजन्य पुराव्यांवरून प्रत्येक सांगाड्याचा काळ जाणून घेतला. त्याचबरोबर या सर्व सांगाड्यांच्या रचनेचा आणि त्यांच्या दातांचा, हाडांचा, हाडांवरील जखमांच्या व इतर खुणांचा, अभ्यास केला. यासाठी त्यांनी या हाडांची उच्च दर्जाची छायाचित्रं घेतली, तसंच हाडांच्या अंतर्भागाची रचना तपासण्यासाठी त्यांनी या सांगाड्यांच्या क्ष-किरणांद्वारे प्रतिमा घेतल्या. आवश्यक तेव्हा त्यांनी या हाडांचं सीटी-स्कॅनही केलं. या सर्व अभ्यासावरून या संशोधकांना हे सांगाडे ज्या व्यक्तींचे आहेत, त्यांची वयं, लिंगं व इतर तपशील समजू शकला. या तपशीलाबरोबरच त्यांना या व्यक्तींच्या शरीररचनेची वैशिष्ट्यंही समजू शकली. या संशोधकांनी त्यानंतर या मृत व्यक्तींच्या शरीररचनेतील वैशिष्ट्यांचं सर्व दृष्टींनी विश्लेषण केलं. या विश्लेषणातूनच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली – ती म्हणजे या व्यक्तींपैकी अनेकजण हे घोड्यावर बसत होते!

घोड्यावर सतत बसणाऱ्याच्या शरीररचनेत काही विशिष्ट बदल घडून येतात. खोगीर आणि रिकीबीशिवाय घोड्यावर बसणाऱ्या घोडेस्वाराला तर, तोल सांभाळण्यासाठी घोड्यावर विशिष्ट प्रकारे बसावं लागतं. त्यामुळे खोगीर व रिकीबीचा वापर सुरू होण्यापूर्वीच्या काळातील घोडेस्वारांच्या शरीरातील बदल हे लक्षवेधी असतात. सतत घोड्यावर बसणाऱ्या या घोडेस्वारांच्या कमरेखालचे स्नायू अधिक मजबूत झालेले असतात. त्यामुळे हे स्नायू जिथे कमरेखालच्या हाडांना – श्रोणीला – आणि मांडीच्या हाडांना जोडलेले असतात, त्या जोडणीत बदल घडून आलेला असतो. या घोडेस्वारांच्या श्रोणीला जिथे मांडीचं हाड जोडलेलं असतं, त्या खुब्याच्या सांध्याच्या आकारातही बदल झालेला असतो. त्याचबरोबर मांडीच्या हाडाच्या वरच्या भागातही लक्षात येईल असा फरक दिसून येतो. याशिवाय, मांडीच्या या हाडाची जाडी वाढलेली असते आणि त्याचा आकारही बदललेला असतो. सतत होणाऱ्या वरखाली हालचालींमुळे या घोडेस्वारांच्या पाठीच्या कण्याची झीज अधिक प्रमाणात झालेली असते. घोड्यावरून पडल्यामुळे, घोड्यांच्या लाथांमुळे किंवा घोड्यांनी घेतलेल्या चाव्यांमुळे या घोडेस्वारांच्या शरीरावर अनेकवेळा जखमांच्या खुणा आढळतात. ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, या सांगाड्यांवरील इतर अभ्यासाबरोबरच हे बदल आणि खुणाही अभ्यासल्या. त्यांनी अभ्यासलेल्या सांगांड्यांपैकी १५६ सांगाडे प्रौढ व्यक्तींचे होते. या प्रौढांच्या सांगाड्यांपैकी पाचजण हे नियमित घोडेस्वारी करीत असल्याचं त्यांच्या शरीररचनेतील बदलावरून स्पष्टपणे दिसून येत होतं, तर चोवीसजणांच्या बाबतीत ते घोडेस्वारी करीत असल्याची मोठी शक्यता दिसून येत होती! उर्वरित व्यक्तीही घोडेस्वारी करीत असल्याची शक्यता असली तरी, त्यांच्या बाबतीत निश्चित स्वरूपाचा निष्कर्ष काढण्याइतका सबळ पुरावा दिसून येत नव्हता.

घोड्याचा माणसाशी थेट संबंध आला तो सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी. त्याचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाला असावा तो सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी. मधल्या सुमारे दीड हजार वर्षांच्या काळातला, घोड्यांसंबंधीचा अशा प्रकारचा कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे माणूस घोड्यावर केव्हापासून बसू लागला, याचे काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. आतापर्यंतच्या पुरातन काळातली, घोड्यावर बसलेल्या माणसांची काही चित्रं उपलब्ध आहेत. त्यांतील सुमारे चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातली मेसोपोटेमिआतली (आताचा इराक) चित्रं सर्वांत जुनी म्हणता येतील. परंतु मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढलेले पुरावे हे पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत – म्हणजे मेसोपोटेमिआतल्या चित्रांच्याही अगोदरच्या काळातले. मार्टिन ट्राऊटमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधलेले हे पुरावे पाहता, माणसाच्या घोडेस्वारीला सुरुवात झाली असावी ती किमान पाच हजार वर्षांपूर्वी आणि तीही काळ्या समुद्राच्या परिसरात – या याम्नाया लोकांद्वारे!

(छायाचित्र सौजन्य pxhere.com / Wolfgang Haak / Michał Podsiadło)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..