नवीन लेखन...

एखादी स्मित रेषा

 

माझ्या एका लेखाचा शेवट “ घरांत हसरे तारे असता…. मी पाहु कशाला नभाकडे “ ह्या भावगीताने झाला होता. गाभार्थ हा की सुखी आनंदी  हसत्या खेळत्या मुलांना कवी श्री द वि केसकर यांनी तार-यांची सार्थक उपमा दिली. “हसरे“ शब्दावरुन संजीवनी मराठे यांचे एक भावपूर्ण  गाणे आठवते ते म्हणजे –

“ हसतील मजला कबीर मीरा, हसतील तुलसीदास, ।
हरि तुझा लागे छंद मनास “. ॥

म्हणजे कबीर मीरा तुलसीदास तुम्ही इतके महान भक्त आहात की मी स्वत:ला भक्त म्हणुन घेतले तर तुम्ही मला हसाल. (याची मलाच लाज वाटते.) एकुण हसणे हे संदर्भावर अवलंबुन असते जसे आनंदी वातावरण, उत्कट भक्ती वगैरे.

तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या  चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्‍यावर  प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. कुणी विषेश कारण नसताना फसकन हासतो व स्वत: चेच हसे करुन घेतो, कुणी कुत्सितपणे, कुणी लाजत-बुजत लपवत छपवत, कुणी खिदळतो, कोणी मनातल्या मनांत खुदकन हसतो तर कुणी गडगडाट ( सातव्या मजल्यावर), मात्र सगळ्या हास्यात भावना तीच. विनोद बर-याच वेळा हास्याचा पाया असतो पण तो कुणाचा पाणउतारा करणारा नसावा, त्यांत क्रुर थट्टा नसावी. असे म्हणतात की अज्ञानी मनुष्य विनोद ऐकल्यावर दोन वेळा हसतो, एकदा समजला नाही तरी सगळे हासतात म्हणुन व दुसर्यांदा समजला म्हणुन. ज्ञानी मनुष्य मात्र तीनदा हासतो, दोनदा अज्ञानी माणसांसारखे व तिसर्यांदा हे आठवून की तेव्हा आपण कसे न समजतां हसलो म्हणुन ! अस्खलित विनोद  ऐकायचा तर तेथे पाहिजे जातीचे , पु. ल. देशपांडे यांचे सारखे.

हसणे किती महत्वाचे असते हे लहान मुलांना पुर्वापार सांगत आलेल्या “ न हसणारी राजकन्या “ या गोष्टी वरुन   दिसुन येते. असाच एक राजा असतो व त्याला एक सुंदर मुलगी असते . राजकन्या जसजशी मोठी होते तसतशी ती अधीक रूपवान व गुणी होते , परंतु राजा खुप दु:खी असतो कारण राजकन्या सदैव चुपचाप असते व कधीच हसत नाही. राजा खुप प्रयत्न करतो, इलाज पण करतो पण काही उपयोग होत नाही. शेवटी तो दवंडी पिटवतो की जो कोणी राजकन्येला हसवेल त्याला अर्धे राज्य दिल्या जाईल. वेगवेगळ्या राज्यातुन खुप लोक आले पण कोणी तिला हसवु शकले नाही. एक दिवस एक राजकुमार आला , त्याचे बरोबर त्यानी एक शेतकरी आणला. शेतकरी चार पाच बदकांना दोरीने बांधुन न्यायला लागला. ती गंमत बघुन राजकन्या खुदकन हसली. तिने राजकुमाराला विचारले की ह्यांना चालता येते तरी बांधुन कां नेताहेत ? राजकुमार म्हणाला तुला पण हसतां येते मग  तु पण कां हसत नाही ?राजकन्या निरूत्तर झाली व गालातल्या गालात हसु लागली. हे पाहुन राजा खुप आनंदी झाला व त्याने त्या राजकुमाराला अर्धे राज्य तर दिलेच व शिवाय त्याचेशी राजकन्येशी लग्न पण लावुन दिले.

हसणे हे आनंद वा समाधानाच्या भावनेचे द्योतक असते व ते हसण्याच्या रुपात व्यक्त करता येणे ही देवाने मानवाला दिलेली विशेष देणगी होय कारण दुसर्या कुठल्याच प्रकारचे प्राणी वा पक्षी हसत नाहीत. रडणे मात्र प्राण्यांना येते जसे मांजर, कुत्रा दुखापत झाल्यावर किंवा मारल्यावर सुर काढुन रडतात.   कुणा दुसर्या प्राण्यांचे तर आपल्याला कळत नाही एवढेच. कुठलाच प्राणी बोलत पण नाही. मनुष्याचे मात्र सगळेच वेगळे असते, तो चेहर्याचे हावभाव, हातवारे करुन, गाणे वा नृत्य करुन व मुख्यत्वे बोलुन स्वत:ला व्यक्त करतो , ही झाली अभिव्यक्ती. कुणाकुणाचे नुसते डोळे  सुध्दा बरेच काही सांगुन जातात. तसेच न बोलता नुसते स्मित वा गोड हसुन पण आनंद व्यक्त करता येतो. बुध्दिच्या जोडीला एवढी सशक्त अभिव्यक्ती  हेच तर मानव जन्माचे महत्व व म्हणुन म्हणतात ह्या जन्मात शक्य तितके पुण्यकर्म करुन जन्म-पुनर्जन्म या फेर्यातुन सुटका (मोक्ष)करुन घ्यावी. दुसर्या कुठल्याच योनीत ते होणे नाही अन्यथा पुन्हा मानव जन्म चौर्यांशी लाख योनींच्या नंतरच संभवतो असे म्हणतात. (अधीक  भाष्य म्हणजे मुळ विषयापासुन भरकटणे व्हायचे . ) रडणे हे दु:ख्खद भावना दर्शवते. सर्वसाधारणपणे स्त्रिया चटकन रडतात( अश्रु अगदी तयार असतात ). त्यांची दु:ख वा ताण सहन करण्याची क्षमता खुप कमी असते त्यामुळे रडुन (अश्रु पाझरुन )ताण कमी होऊन जातो. गंमत म्हणजे रडणे आणी हसणे यांचा संदर्भ रसायन शास्रा मध्ये सापडतो. प्रयोगशाळेत ( व व्यावसायीक स्तरावर पण ) tear gas बनवतां येतो जो पोलीस जमावाला पांगापांग करायसाठी  उपयोग करतात व लोक अश्रुधुरा मुळे रडत रडत पळुन जातात. केमेस्ट्री प्रयोगशाळेत तर हसरा वायु ( laughing gas ) पण बनवतां येतो. रडण्याच्या बाबतीत मात्र पुरुषांची प्रतिक्रिया वेगळी असते , ते ताण येण्याची स्थिती येताच सहसा प्रयत्नपुर्वक विनोद करुन, हसून तो लांबवतात व परोक्षपणे कमी करतात. या व्यतिरीक्त दिलखुलास हसण्याच्या प्रक्रियेत गालांच्या स्नायुंना  स्ट्रेचींग मिळुन डोळ्याच्या व चेहर्याच्या नसांना व्यायाम होतो. रक्तसंचार चांगला होतो व एंडाॅर्फिन द्रव्य पाझरते जे ह्रृदयासाठी फायदेशीर ठरते . सकारात्मकता वाढुन मन आनंदी उल्हासित राहुन झोप चांगली येते व प्रतिकारशक्ती वाढते. हसण्याच्या क्रियेत प्रति मिनीट ८-१० कॅलरीज उर्जा खपुन आपण स्वस्थ होतो व पर्यायाने लठ्ठपणा कमी होतो. म्हणुन म्हणतात नं ‘हसा आणी हसवा. ’ पुर्वी हसणे म्हणजे आनंद, त्या अवस्थेत भरपुर खाणे व लठ्ठ होणे असे समिकरण होते म्हणुन म्हणायचे हसा आणी लठ्ठ व्हा ! हसण्याचे दोन गुणधर्म असतात, एक तर ते ब्रेक लावल्यासारखे एकदम थांबवता येत नाही व दुसरे जांभई सारखे ते पण वाहक असते म्हणजे एक हसला तर ते पाहुन समोरच्याला पण हसु येते ! कधी कधी तर हसुन हसुन पोट सुध्दा दुखते.

हसण्याचे महत्व खुप पुर्वी पासुन उमगले होते. पुर्वी करमणुकीचे एक साधन सर्कस होती. त्यात आग( विस्तव) शी खेळणे, उंच तंबुला लावलेल्या शिड्या व दोरांना लटकून झोके घेत घेत दुसर्या शिडीवर जाणे , वाघ हत्ती वगैरे यांना खेळवणे असे जोखमीचे प्रकार असत व क्षणभर ह्रृदयाचा टोला चुकायचा. अशा ताणातुन मोकळे (release ) करण्या करता विदुषक  असत जे गमती जमती करुन लोकांना खुप हसवायचे. सिनेमांमध्ये पण नायक नट-नट्या, खलनायक यांच्या जोडीला मेहमूद, जाॅनीवाॅकर सारखे विनोदी-नट असतात ज्यांचे काम मधुन मधुन प्रेक्षकांना हासवुन तणावाचे( tense) वातावरण सौम्य करणे हे असते. हसवुन ताण तणाव कमी करणे हाच आशय ‘हास्य मंडळांच्या ‘ संकल्पने मागे कारणीभुत आहे. ह्या अंतर्गत सकाळच्या वेळी खुल्या जागी योग व तत्सम व्यायामाबरोबर हसण्याचा सराव केल्या जातो व लोकांना त्याचा चांगला फायदा होतो असे आढळुन आले आहे. हसरा चेहरा कोणाला पण न कळत प्रसन्न करुन जातो. मुले जन्म होताच रडतात (नाही रडले तर त्यांना रडवतात )परंतु नंतर ती आपोआपच गोड हसतात . मुले मोठी झाल्यावर , दुखत खुपत नसेल  तर हसरीच असतात. खेळायच्या पत्त्याचा जोड असतो त्यात पण जोकर असतो जो कोणाच्याही पत्त्याच्या ऐवजी वापरल्या जातो . मुलांना त्यांचे मनातला पत्ता ओळखणे किंवा तत्सम जादु दाखवली तर बघा ते किती निरागस पणे हसतात.   तर हसणे इतके महत्वाचे म्हणुनच फोटो काढताना “ smile please “ म्हणतात कारण बरेच जण हसण्याच्या बाबतीत कंजुष असतात. ( कदाचित दांत दिसण्याची धास्ती असावी )

व्यवहारात हास्य जर इतकी सकारात्मकता आणते तर कंप्युटर मोबाईल  सारख्या महत्वाच्या क्षेत्रात  “हास्य” नसणे कसे शक्य आहे? मानवाला मिळालेल्या व्यक्त होण्याच्या अभिव्यक्तिची परिणीती हळुहळु  गद्य व पद्य लिहिण्याच्या पाठोपाठ आधुनिकरणाच्या टप्प्यात शनै शनै टंकन, टेलिग्राफी, टेलीफोन अशा विविध संचार(communication ) माध्यमांत व तद्पश्चात कम्प्युटर , मोबाईल या संयंत्रांपर्यंत पोचले आहे. आज ही दोन्ही सशक्त माध्यमे समाजात इतकी रूजली आहेत की त्यांचेशिवाय राहणे जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसले आहे. आज वर्षभरापासुन धुमश्चक्री घालणार्या कोरोनाच्या परिद्रृषात घराबाहेर पडता येत नसल्याने जर गुगल-पे, पे-टीएम , इंटरनेट सारख्या व्यवस्था नसत्या तर दैनंदिन जीवन कठीणच नाही तर अशक्य झाले असते. आता मोबाईल म्हटला की मेसेजींग आलेच. सद्यस्थितीत वेळेची कमी म्हणुन कमीत कमी वेळेत, कमीत कमी टाईप करुन कसे व्यक्त होता येईल हा यक्षप्रश्न ठाकतो. प्रश्न जितका कठीण वाटला त्याच्या विपरीत तितकेच सोपे त्याचे उत्तर समोर आले “ईमोजी” च्या रुपात.

ईमोजी ( emoji ) :

कंप्युटर व मोबाईल च्या अनुपयोगात अक्षर ( letters )व अंक ( numerical )टाईप करताना कमी वेळेचा व जास्त परिणामी असा एक दर्शनीय( visual ) पर्याय म्हणुन गेल्या शतकात नव्वदी मध्ये , डाकोमा कंपनीच्या मोबाईल उपयोजनेसाठी जपानी आर्टिस्ट कुरिटा यांनी १९९९ साली सर्वप्रथम  ” ईमोजी “ ( emoji ) icon बनवला . जपानीज मध्ये ‘e’ म्हणजे चित्र ( picture) व ‘ moji ‘ म्हणजे ‘charecter’ असा अर्थपुर्ण शब्द बनुन हळुहळु असे १७६ ईमोजी अस्तित्वात आले. जपानी व चायनीज भाषा बर्याचशा प्रमाणात चित्रस्वरूप (pictorial) असल्याने characters चा सोपा पर्याय म्हणुन अनेक ईमोजी वापरल्या जायला लागल्या. तद्पश्चात जागतीक ( global ) स्तरावर इतर सर्वच कंपन्यांनी emojis चा सर्रास उपयोग सुरु केला. इकडे स्वतंत्रपणे पाश्चिमात्य देशांत पण भावना दर्शवणारे emotional icon( emoticon ) इमोटिकॉनस चा प्रयत्न सुरु होताच.

ईमोजी ज वेगवेगळ्या गतिविधींना दर्शवणार्या असतात जसे सहमती 👍🏻, 👆दिशा👉, 👁अवयव👂, असमर्थता👨‍🦽, कपडे👚, प्राणी🐄, फुल🌺, हवामान🌧, फळ🥭, वाढदिवस🧁, शर्यत🚴‍♀️, वाहन🛺, मनोरंजन📻, वेळा🕗, झेंडा🇭🇺, प्रेम❤️, प्रेझेंट🎁, पुस्तके📚, व असेच खुप काही.

स्मायली ( smiley ) :

ईमोजीचेच एक स्वरूप “स्मायली”( smiley)परंतु आस्तित्वाच्या इतिहासाच्या दृष्टीने इमोजीपेक्षा जुने होय. प्रथम स्मायली तर ५० वर्षांपुर्वीच पिवळ्या रंगात गोल चेहरा दोन टिंब डोळे व हसणारे तोंड म्हणुन वर्तुळाची कंसाक्रृती लाईन ( 🙂 ) अशी बनवल्या गेली  होती. ती बनवणारा होता ग्राफिक डिझायनर हार्वे बाल (Harvey Ball ) ज्याला एका इंन्शुअरंस कंपनीने त्यांच्या कर्मचार्यांचे मनोबल वाढवण्याकरता “ सुखाचे चिन्ह ( all well symbol ) “ बनवण्याकरता बोलावले होते. सध्या लाखो डाॅलरस चा व्यवसाय असलेल्या ‘स्मायली’ बनवण्याकरता त्याला ४५ डाॅलर चे मानधन दिले गेले. वर्तमानात उपयोगात येणारे हसणारे , विविध हावभाव असणारे स्मायलीज चे जनक ( १९८२ मधील )म्हणुन मात्र प्रो. फाहलमन  ( Dr Fahlman) यांना श्रेय जाते. नंतर स्मायली चा वाढता उपयोग व ‘भाव’ बघुन मोठमोठ्या कंपन्या मालकी हक्क (काॅपीराईट )मिळवण्याकरता चढाओढीत सामील झाल्या, तो इतिहासाचा भाग झाला , परंतु एवढे मात्र खरे की स्मायली ने व्यवसायात खुप जणांच्या चेहर्यावर हसु आणले. सगळ्यात सुंदर हास्य असलेली म्हणुन मोना लिसा ओळखली गेली तरी “स्मायली” च्या हास्याला पण तोड नाही. असे हजारो स्मायली ज नी जसे 😌, 😝, 🙄, 🤠 व बरेच काही, कंप्युटर जगताला भुरळ घातली आहे. सगळ्या स्मायली ज मध्ये पिवळा रंग स्क्रीनच्या हलक्या निळ्या रंगावर उठुन दिसतो व पिवळ्या रंगाच्या चेहर्यावर हावभाव स्पष्ट दिसतात म्हणुन वापरल्या गेला . वेगवेगळ्या क्रृती( actions )🏃‍♀️ ⛹️‍♂️ 🏋️‍♀️ 🏄‍♂️ 🚣 🏊‍♀️ 🚴‍♂️ व नेहमी वापरात येणारे प्रिमिटिव्ह गद्याला( text ) ✝️, 🆘, 🚭, 🚷, 🆒, 🚾, 🔙, सुटसुटीत पर्याय असे हजारो अतिरिक्त स्मायलीज आज प्रचलनात आहेत. आम्ही लहान असताना “ मास्तरनी सांगितले १०, कानाने ऐकले ६, मास्तर च तोंड पहा “असे म्हणुन असेच चेहरे काढायचो, पण दुर्दैवाने आम्हाला कोणीच महत्व दिले नाही. 😛.

एक गंभीर बाब म्हणजे, अनावश्यक हसण्याचे वा जिवघेणे हसण्याने कधी कधी खुप नुकसान होते. सीतेच्या स्वयंवराच्या वेळी रावण शिवधनुष्याला प्रत्यंचा( दोरी ) लावणे तर दुर पण साधा हलवु पण शकला नाही हे बघुन सितेला हसु आले. नंतर श्रीराम व सिता वनवासात असताना रावणाने बदल्याच्या भावनेने, कपटाने सितेला पळवून नेले व नंतर राम रावणाचे घनघोर युध्द झाले , हे विसरून चालणार नाही.   तसेच द्रौपदी एकदा दुर्योधन मयसभेत  घसरून पडतो तेंव्हा मिस्कीलपणे हसते व दुर्योधन खुपच दुखावल्या जातो त्यामुळे नंतर जे महाभारत घडले ते सर्वविदित आहे.

हास्यावरचे इतके भाष्य वाचुन तुम्हाला नक्कीच मनातल्या मनांत तरी हसायला आले असणार ! हो नं ?आले असेल तर मोठ्याने हसा की, त्यात कंजुषी कशाला? हसणार नसाल तर किमान एखादी तरी स्मित रेषा ?😀.

— सतीश परांजपे 

( Emojis & Smileys :  courtesy- google. com )

1 Comment on एखादी स्मित रेषा

  1. सुंदर लेख.जितका माहितीपूर्ण तितकाच मनोरंजक.लेख वाचताना सुद्धा चेह-यावर हसू उमटले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..