नवीन लेखन...

एक डोळ्याची दिव्यदृष्टी

गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवाशी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. पहिल्यांदा प्रवास करणारे मागे पडलेल्या मुंबई कडे बघून नाहीतर समोर दिसणारी मोठं मोठी जहाजे जसजशी जवळ येत होती तस तसे त्यांच्या प्रचंड आकारमानाकडे बघून अचंबित होत होती.

हजारो कंटेनर घेऊन जाणारे एक विशाल महाकाय जहाज जे एन पी टी मधुन निघून खोल समुद्राच्या दिशेने निघाले होते. लाँच ला आडवे जाणाऱ्या जहाजाला जाऊन देण्याकरिता लाँचचा स्पीड कमी करण्यासाठी लाँच च्या सारंगा ने खाली इंजिन रुम मध्ये बांधलेल्या घंटेची दोरी वाजवून खालच्या डेक वरील खलाशाला सूचना दिली. त्याने इंजिन चा आर पी एम कमी केला आणि लाँच काही वेळ पुढे न जाता जागेवर थांबली. माचीस बॉक्स एकावर एक ठेवले जावेत तसे हजारो कंटेनर एकमेकांवर लादून ते महाकाय जहाज एखाद्या ऐरावता प्रमाणे ऐटीत समुद्राला कापत पुढल्या सफरीला निघाले होते. जहाजाच्या पाठीमागे समुद्राच्या लाटांना कापून लघु कोनात निघून दोन लाटा एकमेकांपासून दूर जात होत्या. एक लाट लाँच च्या दिशेने आली आणि लाँच ला हेलकावून निघून गेली.

सारंग ने पुन्हा एकदा दोरी ओढून घंटा वाजवली आणि खलाशाने इंजिनच्या आर पी एम ला पूर्ववत करून लाँच चा स्पीड वाढवला.
सगळ्यांच्या नजरा कंटेनर घेऊन जाणाऱ्या त्या महाकाय जहाजाकडे लागल्या होत्या. काही वेळाने जसजशी मुंबई आणि मोठं मोठी जहाजे मागे गेली तसं प्रत्येकजण स्वस्थ पणे बसून समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत निवांत बसले.

लाँच मध्ये एक पंचविशीतील तरुण जोडपं बसले होते. त्यांचं नवीनच लग्न झालेलं असावं कारण त्यांच्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. जो तरुण त्याला फक्त एकच डोळा होता, त्याला दुसरा डोळाच नव्हता, खोबणीत डोळा नसल्याने खाच पडलेली होती. त्याच्या बायकोने गॉगल घातला होता आणि ती त्याला खेटूनच बसली होती. लाँच मधील जवळपास सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष जात होते. त्याला पण सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा दिसत होत्या. बऱ्याच जणांच्या मनात आले की ह्या तरुणाने त्याच्या बायकोने घातलाय तसा काळा चष्मा किंवा गॉगल का नाही लावला. त्याचा नसलेला डोळा निदान गॉगलच्या आड लपला तरी असता.
समोर बसलेल्या एका आठ नऊ वर्षांच्या लहान मुलाने तर त्याच्याकडे बघुन त्यांच्या आईला विचारत होती, आई त्या अंकलचा एक डोळा कुठे आहे. त्याच्या आईने त्याला सांगितले त्यांना एक डोळा नाहीये पण दुसरा तर आहे ना.

तेवढ्यात तो तरुण त्या मुलाला म्हणाला बाळा तुझे नांव काय, मुलाने त्याचे नांव आर्यन सांगितले. बरं आर्यन माझा एक डोळा ना मी तुझ्याएवढा असताना एका अपघातात गेला. मी खेळताना रस्त्याच्या कडेला जमिनीत उभ्या केलेल्या लोखंडी सळई वर पडलो. नशीब सळई डोळ्यातून आरपार जाऊन माझ्या डोक्याच्या आरपार नाही निघाली.

आर्यनने त्याला विचारले, मग अंकल तुम्हाला एका डोळ्याने सगळं दिसतं का? त्यावर तो म्हणाला आर्यन माझे नांव प्रसाद आहे, मला तु प्रसाद अंकल म्हणून हाक मार. मला एका डोळ्याने दिसतं पण एका डोळ्याने कसे दिसते ते बघायचे आहे का तुला? आर्यन ने उत्सुकतेने हो म्हटले. प्रसाद ने त्याला रुमाल आहे का विचारले, त्याने माझ्याकडे नाही पण आईचा आहे सांगितले आणि आईकडून रुमाल मागून प्रसाद कडे दिला. प्रसादने रुमालाची घडी घालून आर्यनच्या एका डोळ्यावर असा बांधला की आर्यनला त्याच्या उघड्या असलेल्या एकाच डोळ्यातून दिसत होते.

प्रसादने त्याला विचारले काय मग आर्यन दिसतं की नाही एका डोळ्याने? आर्यन म्हणाला प्रसाद अंकल दिसतंय पण दोन डोळ्यांनी जसं दिसतं तसे नाही दिसत. प्रसाद त्याला बोलला माझा अपघात झाल्यावर मलासुद्धा असेच वाटायचे पण हळूहळू सवय झाली. मला एकाच डोळ्यातून सगळं दिसतं आणि आता दोन डोळ्यांनी मला किती दिसायचे हे आठवत सुद्धा नाही. पण आर्यन तुला माहिती आहे का ही माझ्या बाजूला बसलीय ना माझी बायको तिला तर दोन्हीही डोळ्यांनी दिसत नाही. मला तर नऊ वर्षांचा होईपर्यंत दोन्हीही डोळ्यांनी दिसायचे आणि आता तर निदान एका डोळ्याने तरी दिसतेय पण हिला तर ती जन्मल्यापासून काहीच दिसत नाही.
प्रसाद जे सांगत होता ते ऐकून आर्यनच्या, त्याच्या आईच्या आणि आजूबाजूला बसलेल्या इतर सर्वांच्या मनात कालवा कालव झाली.
प्रसाद आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती निर्माण झाली.आर्यन च्या बालमनाला थोडं अचंबित होण्याव्यतिरिक्त काही प्रश्न निर्माण झाले नाहीत.

पण त्याच्या आईला आणि शेजारी बसलेल्या जाणत्या व्यक्तींना वाटले की, ह्याला एका डोळ्याने दिसत असूनही जन्मजात मुलीसोबत याने लग्न का बरं केले असावे? लाँच हेलकावे खात मांडवा जेट्टीपासून वीस पंचवीस मिनिटांवर आली होती. समुद्रातील सी गल पक्षी लाँच भोवती घिरट्या घालू लागले, लाँच मधील प्रवाशी त्यांना वेफर आणि कुरकुरे हवेत भिरकावून खायला देऊ लागले. सी गल पक्षी हेवेतल्या हवेत ते पकडत क्वचितच एखादा वेफर पाण्यात पडत असे.

आर्यन सुद्धा मजा बघत होता, कोणी व्हिडीओ काढत होते तर कोणी फोटो. सी गल पक्ष्यांना खायला देऊ नका, जंक फूड त्यांचा आहार नाही अशा सूचनांचे पोस्टर असूनही बरेच प्रवासी त्यांना खायला देण्यासाठी लाँच मधूनच कुरकुरे आणि वेफर खरेदी करत होते.
प्रसाद ने पलीकडे हाताने इशारा करुन, आई इकडे येऊन बस जागा झालीय. तशी पन्नाशी ओलांडलेली प्रसादची आई आली आणि आर्यनच्या आई शेजारी बसली.

प्रसादच्या आईच्या कपाळावर कुंकू नव्हते, एक साधी नऊवारी साडी असूनही तिच्यातील हसरं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व इतरांना जाणवत होतं. बसताना ती म्हणाली अरे प्रसाद जा की आरतीला घेऊन, तिचे फोटो काढून घे की मोबाईल मध्ये. प्रसाद ने आरतीच्या हाताला धरले आणि तो लाँचच्या मधल्या मोकळ्या जागेकडे जाऊ लागला.

उभं राहिल्यावर अंध आरतीच्या चेहऱ्यावर लाँच हेलकावत असल्याने जशी लाँच समुद्रात तरंगते तशी ती लाँच मध्ये नाही तर हवेत तरंगतेय असे भाव स्पष्ट पणे दिसायला लागले. डोळेच नाही तर, समुद्र काय आणि त्याच्यावर तरंगतय काय हे कोणी सांगून कसं कळणार पण कदाचित आरती आयुष्यात पहिल्यांदाच तरंगणे अनुभवता होती. प्रसाद तिला आपुलकीने मोकळ्या जागेत हाताला धरून उभा होता. त्याने आर्यनला बोलावून दोघांचे फोटो काढायला सांगितले. आर्यनने आनंदाने त्यांच्या दोघांचे खुप फोटो काढले.
प्रसाद आरतीला लाँच च्या रेलिंग जवळ घेऊन गेला, तिचे दोन्ही हात रेलिंगवर टेकवून तिला म्हणाला आता तूच अनुभव लाँचचे हेलकावणे. आरती समुद्राचा गार वारा आणि लाटांमधून बाहेर पडणारे अनंत तुषार अंगावर पडताना अनुभव होती.

आर्यन आईकडे येऊन बोलला की, आई प्रसाद अंकल ने एवढे फोटो काढले पण बिचारी आरती आंटी ते बघूच नाही ना शकणार.
बाजूला बसलेल्या प्रसादच्या आईने हे ऐकले. ती म्हणाली बाळा, आरती पण बघू शकेल फोटो म्हणून तर मी प्रसादला सांगितले न की फोटो काढ म्हणून. आम्ही पुन्हा समुद्रात फिरायला येऊ किंवा नाही पण इथल्या आठवणी तर राहिल्या पाहिजेत की नाही.
आर्यनच्या आईने प्रसादच्या आईकडे बघून विचारले, काकी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?? प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते.

तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल. आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली. ताई, मी एका गरीब शेतमजुराची मुलगी आहे, माझ्या आई बापाने घरची थोडीफार शेती असलेल्या घरात माझे लग्न लावून दिले होते. घरची शेती काही फार जास्त नव्हती ,पण खाऊन पिऊन सुखी होतो एवढंच. लग्नानंतर चार महिन्यांनी शेजारच्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावरून भांडण उकरून काढले. भांडण एव्हढे विकोपाला गेले की शेजाऱ्यांनी रागात प्रसादच्या बाबांच्या डोळ्यात विषारी कीटक नाशक ओतले.

खुप दवाखाने केले डॉक्टर केले पण त्यांचे डोळे गेले ते कायमचेच. आर्यनच्या आईच्या तोंडातून आई ग , कीती निर्दयी आणि अमानुष असे उद्गार निघाले. आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते, प्रसादच्या बाबांचे डोळे जाऊन आणि त्यांचा ईलाज करण्यात दोन महिने गेले होते. लग्नानंतर सहाव्या महिन्यात मला पाळी आली तेव्हा, प्रसादचे बाबा बोलले, माझं आयुष्य तर आता अंधारात जाईल, आपल्याला मूलबाळ झालं नाही. तुला मी काडीमोड देतो, तुझे दुसरे लग्न झाले तर तू तरी सुखी राहशील. कशाला माझ्या आंधळ्या सोबत आयुष्याची नासाडी करते मला सांभाळत राहून.

त्यावेळी मी ठाम राहिले त्यांनी माझ्या सुखासाठी मनापासून घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटला आणि मी त्यांचा निर्णय नाकारला. घरातल्या शेतीची सगळी सूत्र मी हाती घेऊन संसार करू लागले. एक वर्षाने आम्हाला प्रसाद झाला पण वयाच्या नवव्या वर्षी त्याचा एक डोळा गेला. त्यावेळी खुप खचायला झाले पण प्रसाद च्या आंधळ्या बाबांनी धीर दिला. माझे दोन डोळे गेलेत त्याचा एक तरी आहे ना, माझ्यावेळी हार नहीं मानली मग आता का खचून जातेय.

प्रसाद अभ्यासात हुशार होता, अभ्यास आणि शेती करता करता तो बँकांच्या आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत होता.
दीव्यांग कोट्यातून त्याला बँकेत चांगली नोकरी लागली. आता वर्षभरापूर्वी प्रसाद चे बाबा वारले. वर्षभरात त्याचे लग्न करायचे म्हणून त्याच्यासाठी मुली बघायला लागलो. प्रसादला एक डोळा नाही म्हणून कधी मुलगी तर कधी मुलीचा बाप नकार देऊ लागला. कोणी कोणी तर मुलीच दाखवत नव्हते. जवळपास वीस एक ठिकाणी नकार आला होता.

आर्यनच्या आईने विचारले, मग आरती सोबत कसं काय लग्न जुळलं? ही माझी सून आहे ना आरती ती आमच्याच गावातली. प्रसादच्या बाबांच्या डोळयात विषारी औषध ज्या माणसाने टाकले होते, त्याच माणसाची पोरगी आहे ही आरती. आरतीचा बाप जेल मधुन सुटून आल्यावर प्रसादच्या मागे चार वर्षांनी झाली होती त्यांना. जेव्हा त्याला कळले की त्यांची पोरगी जन्मजात आंधळी आहे तेव्हा तो रडत रडत प्रसादच्या बाबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला आला. दादा मी चुकलो देवाच्या काठीला आवाज नसतो मला माफ करा, देवानेच मला शिक्षा केली.

गेल्या महिन्यात प्रसादला मुलगी बघायला आम्ही ज्या बस ने तालुक्याच्या गावात चाललो होतो त्या बस मध्ये आरती पण होती. आरतीचे देखणे आणि सुंदर रूप बघून बसमधील बाया, बाई ग,एव्हढी देखणी पोरं पण दिसत नाही तिला, कसं हीचं लग्न व्हायचं हिला पण कोणीतरी आंधळाच मिळणार अस एकमेकींशी पुटपुटत होत्या. तालुक्याच्या गावी ज्या मुलीला बघितलं तिने तिथेच नकार दिला, मी बिन लग्नाची राहीन पण या एक डोळ्याशी लग्न नाही करणार. तेव्हापासून प्रसाद ने डोळ्यावर चष्मा लावायचे सोडून दिले. बस मधील बायकांची कुजबुज त्याने पण ऐकली होती. घरी आल्यावर त्याने मला विचारले ,आई आरती ला तुझी सून केली तर चालेल का. मी त्याला बोलले माझा संसार झाला करून तुझे तू ठरव मी तुझ्यासोबत आहे. आरतीच्या बापाला निरोप पाठवल्यावर तो पुन्हा घरी आला आणि आधीच मेलेल्याला अजून मारू नका म्हणू लागला. पण त्याला प्रसादने समजावले. तुमची परिस्थिती नव्हती तशी आमची सुद्धा परिस्थीती नव्हती म्हणून माझ्या बाबांना आणि तुमच्या आरतीला बघता आले नाही. पण आता मला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या परिस्थीती सुधारेल. खुप लोकं नेत्रदान करतात ,आपण आरती साठी बघू या कोणा दुसऱ्याचे डोळे मिळतात का. मला दोन डोळे असते तर माझाच एक तिला दिला असता. मीच कशाला माझ्या आईने देखील बाबांना दिला असता पण जग एवढं पुढे गेले हे माहितीही नव्हतं आणि माहिती असून ऐपत सुद्धा नव्हती.

आता दोन दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले. आम्ही गावाकडून मुंबईतल्या मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की आरतीला बघता येणार आहे. दुपार पर्यंत दवाखान्यातले सगळं आटोपले म्हणून या लहानशा बोटीतून मांडवा की काय तिथं जाऊन पुन्हा याच बोटीने परत मुंबईला फिरणार. पुन्हा कधी समुद्र बघायला मिळेल की नाही म्हणून आजच साधली संधी.
हे सर्व ऐकताना आर्यनची आई अवाक झाली होती. न राहवून तिने प्रसादच्या आईला विचारले , पण काकी आरती साठी नेत्रदान कोण करणार आहे , तिला कोणाचे डोळे लावणार आहेत. अवयव दान ही खुप खुप गुंतागुंतीची, खर्चिक आणि कायदेशीर पद्धतीने करायची प्रक्रिया आहे ना.

प्रसादची आई म्हणाली, लग्न ठरल्या ठरल्या प्रसाद ने सगळी माहिती काढली होती, कोणी मृत्यूपूर्वी नेत्रदान केले असेल तर मिळतील असं काहीबाही तो सांगायचा. मी म्हटलं जिवंत असताना कोणी नाही का नेत्रदान करू शकत. मी माझा एक डोळा दिला तर नाही का चालणार सुरवातीला तो नाही बोलत होता पण नंतर त्याला आणि मला डॉक्टरांनी तुम्ही म्हणताय तसे समजावले, कोणाचाही अवयव कोणालाही सहजपणे नाही देता येत , रक्तगट , तो अवयव ज्याला द्यायचा आहे त्याचे शरीर ते स्वीकारू शकते का. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य आणी वय हे अवयव दान करण्यासाठी योग्य आहे का.

आरतीचे बाबा पण डॉक्टर सांगत होते ते सगळं ऐकत होते. त्यांनी स्वतः हून पुढे होऊन सांगितले माझा आणि आरतीचा रक्तगट एकच आहे, तुम्हाला लागतील त्या सगळ्या चाचण्या करा पण माझाच डोळा माझ्या लेकीला द्या. माझ्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याचे समाधान तरी मला लाभेल. डॉक्टरांनी आरतीच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि तशा चाचण्या करायला सांगितले. ते म्हणाले मी हॉस्पिटल मध्ये थांबतो तुम्ही आलाच आहात तर फिरून या कुठेतरी. या बोटीत बसण्यापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की चाचण्या पाहिजे तशा आलेल्या आहेत. डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रियांची तयारी करायला सांगितले आहे.

आर्यनची आई हे सर्व ऐकून निःशब्द झाली. तिला काय बोलावे हेच बराच वेळ सुचत नव्हते. क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे वागणारी आरतीच्या बापासारखी माणसं ज्यांना नंतर पश्र्चाताप सुद्धा होतो, अशा माणसांना मोठ्या मनाने माफ करणारी प्रसाद चे आई बाबा , प्रसाद सारखा उच्च विचारसरणी असलेला तरुण. राहणीमानाने साधारण आणि भोळे असलेले पण मनाने सधन असणारे शेतकरी जमिनीत बियाणे रुजवून नुसते अन्नधान्यच पिकवत नाहीत तर लाखमोलाचे विचार सुद्धा समाजात रुजवतात.

-प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E. (mech),DIM, DME.
कोन,भिवंडी ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..