दिवाळी अंक आणि मराठी माणूस : एक अतूट समीकरण
मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील. दिवाळी अंक मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला. त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी आणि दिवाळी अंक या नात्यांमधली वीण अजून घट्ट आहे. तसेच मराठी माणूस आणि दिवाळी अंक यांचेही अतूट नाते निर्माण झाले आहे. मराठी माणसांची दिवाळी, दिवाळी अंकांशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. या अंकांमधून वाचकांना मराठी भाषेची ओळख झाली. मराठी वाङ्मयाचे विविध प्रकार समजले. वाचकांची लेखकांशी ओळख झाली. दिवाळी अंकांमधून लेखक-साहित्यिक नावारूपास आले. मराठी साहित्याचा बराचसा इतिहास १०६ वर्षांच्या कालखंडातील दिवाळी अंकांमध्ये दडलेला आहे.
‘व्यास क्रिएशन्स्’ने २०१५ मध्ये हा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला. आजवर प्रसिद्ध झालेल्या दिवाळी अंकांतील साहित्यातून निवडक, उत्कृष्ट व लक्षवेधक साहित्य या अंकात पुनर्मुद्रित केले आहे. जुने, दुर्मीळ दिवाळी अंक मिळविणे, ते हाताळणे, पाहणे, वाचणे आणि त्यातील निवडक उत्कृष्ट साहित्याची निवड हे काम जिकिरीचे होते.
१९०९ ते २०१४ या कालखंडातील साहित्याचे निवडक संकलन ही कल्पना विलक्षण होती. आज जुने सर्व काही अत्यंत वेगाने विस्मृतीत जात आहे. पुरातन वाङ्मय जतन करण्याची सवय नाही. प्रसिद्ध, आवडत्या व नामांकित लेखक-साहित्यिकांचे दुर्मीळ साहित्य वाचनासाठी सहज उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर ‘व्यास क्रिएशन्स्’चा हा प्रकल्प ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया साहित्यिक व वाचक वर्तुळातून उमटली. अनेक वृत्तपत्रांनी प्रकल्पाला पूर्वप्रसिद्धी देऊन उत्साह वाढवला. ज्येष्ठ साहित्यिक व अ. भा. म. सा. संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी व बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी ही या प्रकल्पाची जमेची बाजू ठरली. ठाण्याचे श्रीराम बोरकर, शशिकांत कोनकर, राजश्री कणीकर, पुण्याचे प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र गुर्जर, भारत सासणे, डोंबिवलीचे रविप्रकाश कुलकर्णी, नाशिकचे डॉ. नागेश कांबळे या मान्यवर साहित्यिकांच्या चमूने केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे.
सुमारे १० हजार दिवाळी अंक पाहिले, वाचले. अंकांचा खूप मोह झाला. कितीतरी साहित्यिकांचे योगदान सर्वश्रेष्ठ आहे.
असे असताना निवड समितीने कौशल्य पणाला लावले. स्वातंत्र्यपूर्ण कालखंड, साठ ते ऐंशीचे दशक आणि त्यानंतर २०१४ पर्यंतच्या दिवाळी अंकांचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. कालानुक्रम, महत्त्वाचे दिवाळी अंक, मान्यवर लेखक, वाङ्मयाचे सर्व प्रकार, वाचकांची पसंती, माहीत नसलेले दिवाळी अंक, प्रादेशिकता आदी विविध विषयांच्या आधारावर संतुलन साधून १०६ साहित्यकृतींची केलेली प्रातिनिधिक निवड सर्वजण गोड मानून घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.
मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचं योगदान फार मोठं आहे. लेखकांच्या दृष्टीने ती घडणीची शाळा आहे. तर वाचकांच्या दृष्टीने ते मनाची भूक भागविणारे ज्ञान आहे. प्रतिभा दिवाळी अंक २०१५ हे केवळ संकलन नाही त्याला संदर्भमूल्य आहे. तो अंक संग्रही ठेवण्याजोगा आहे. दिवाळीचं स्वरूप बाजारपेठेवर ठरवले जात आहे. आता कंदिलालाही ‘चिनीस्पर्श’ झालेला आहे. बाकीच्या तपशीलात जात नाही. या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकांचा शाहीथाट आजही मनाला भुरळ पाडतो. ‘व्यास क्रिएशन्स्’ची ही साहित्य दिवाळी ज्ञान-प्रकाशाचा आनंद देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
रसिक वाचक, जिज्ञासू, शासकीय ग्रंथालये, देश-विदेशातील महाराष्ट्र मंडळे, अभ्यासक, लहान-मोठी खाजगी वाचनालये या सर्वांना हा दिवाळी अंक समर्पित करतो. सर्वजण अंकाचे स्वागत करतील, अशी आशा आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा मोकळा वेळ काढून या अंकाचा मौल्यवान आनंद यंदा दिवाळीत लुटूया. कारण त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येणार नाही!
संपादक : श्री. वा. नेर्लेकर
व्यास प्रतिभा दिवाळी २०१५ मधून.
या अंकातील लेख क्रमश: मराठीसृष्टीवर प्रकाशित होणार आहेत.


Leave a Reply