नवीन लेखन...

‘देवबाभळी’- व्यक्त /अव्यक्ताचा झगडा !

फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री -पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला , पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता.

पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते.

आवली -व्यक्त ! तिची आपली ओळख तशी पुरातन. तुकोबांइतकीच तीही आपल्या परिचयाची ! एक संसारी स्त्री -गांजलेली ,तोंडाळ, स्वतःच्या सवंतीला (विठूरायाला ) सतत पाण्यात पाहणारी, नवऱ्याचा अतीव अभिमान असलेली वगैरे वगैरे ! दुसरी रुक्मिणी -अव्यक्त. तिची “गाथा “फारशी माहीत नसलेली. अंगीभूत देवपणानें अवघडलेली, जास्त व्यक्त होउ न शकणारी ! एक माणूसपण मिरवणारी स्त्री तर दुसरी साक्षात देवपत्नी. एक देवबाभळीचा काटा त्या दोघींना (योजनापूर्वक ) एकत्र आणतो आणि मग नाटकभर दोघींच्या भळाळत्या जखमा ,त्यावरील फुंकरी ,आणि त्यातून व्यक्त होत जाणारे शाश्वत उलगडे- एक संपन्न नाट्यानुभव. दोघींच्या ओठी तोडीस तोड असणारे अभंग मग या जगण्याला सांगीतिक रूपात गहिरं करतात. आवाज, तयारी, शब्दफेक यामधून काव्य दमदारपणे भिडत राहातं.

मर्यादीत नेपथ्य, त्याला साजेसे  प्रकाशकिरण, आणि (तिसऱ्या) स्त्रीपात्राचे (इंद्रायणी नदीचे) झुळझूळणं सारं प्रभावित करून जातं. इंद्रायणीबरोबर आलेला यमुनेचा उल्लेख काळजावर हातोडा मारून जातो. नाटकातील संवाद अतिशय जबरदस्त आणि ठाव घेणारे आहेत. प्रत्येक अभंगानंतर प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. नाटक संपल्यावर “स्टँडींग ओव्हेशन “अध्याहृत ! खूप समृद्ध व्हायला झालं प्रेक्षागृहातून बाहेर पडताना.

अभिनय -दोघींचे तुल्यबळ ! खूप सुंदर कसरत लेखक -दिग्दर्शकाने साधली आहे, हे रोल बसविताना !डावं -उजवं प्रयत्नपूर्वकही जमत नाही. दोन स्त्रिया -एक मानवी तर दुसरी दैवी. पण दुःखाच्या ,सहन करण्याच्या पोतात फारसा फरक नाही. तुकोबांचे अभंग पार्श्वभूमीला ठेवत नाटकाने अधिकच उंची गाठली आहे.

” झगडा ‘ शब्द मी योजला कारण इथे रोजचे जगणे झगडण्यातच  संपते आणि हा झगडा स्वतःशी आणि फक्त स्वतःशी सतत चालू असतो. कधी जिंकवणारा पण बहुतांशीवेळी हरवून दमछाक करणारा पण अपरिहार्य !

हा मुळात ” त्या ” दोघींमधला झगडा नाहीच. फक्त कबुली आहे -संवाद आहे, एकमेकींचे युद्ध /जखमा /वार तपासून पाहणे आहे आणि ते तितकेच “खोलवर आहे.

सरतेशेवटी सरस कोण ठरतं -माणूस की देव ? कोणाचा प्याला अधिक भरलेला ?

सगळं समजून -उमजून निमूटपणे स्वीकारणारी स्त्री (म्हणूनंच की काय , देवबाभळीचा काटा निघून पाय बरा होतो ) की त्या मानवाच्या नित्य जगण्याच्या तत्वज्ञानातून, खाडकन डोळे उघडून चूक समजलेली देवी ?

हे सगळं सनातन आहे – बडबडी आवली तुकोबांच्या कानी -कपाळी तर रुसून दुरावलेली रुक्मिणी विठूरायाच्या संगतीला ! दोघांचेही संसार हे संचित घेउन वाटचाल करताहेत. मध्येच थोडं थबकून, काहीतरी आपल्या ओंजळीत टाकताहेत आणि नाटयगृहातून बाहेर पडताना आपल्या ओंजळी सुगंधित होताहेत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..