देह – बाळपणीचा सुखावणारा
मातापित्यांना
घरच्यांना दारच्यांनाही
मऊ, रेशिमस्पर्शी
पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा..
देह – यौवनातला …सुखवणारा
इतरांना….स्वत:लाही
रेशिमस्पर्शी सुख देणारा
भोगणारा
भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा
गर्वोन्नत – टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा…
देह – मावळतीचा काहीच न सोसणारा
दुःखच नव्हे तर सुखही…
जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा..
मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना
देहावाचून अर्थ नाही
तरीही तुझ्या-माझ्यात असावं
देहापलिकडचं काही
हातात घेतलेले हात नि आलिंगन
ही असावी फक्त लिपी
पण भाषा असावी आत्म्याची..
तरच…
रिझू विझू डोळ्यांनी
एकमेकांकडे पाहताना
कडवट औषधांच्या गंधात
नि जीव वाचवणाऱ्या शस्त्रांच्या सोबतीत
जाणीव होईल
संगमरवरी सौंदर्याच्या आड
दडलेल्या रक्त-मांस-अस्थिच्याच फक्त अस्तित्वाची
तेव्हाही आपण गाऊ वसंतातली प्रीतीगीतं
त्याच उत्कटतेनं
जशी गाईली होती.
देहाला वसंताची पहिली पालवी फुटताना…..
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply