आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या
आज थोडे या जगाला विसरु या
हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे
आज ती हलक्या हातांनी रे पुसू या
घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे
आज अपुल्याही व्यथेला सावरु या
सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी
एकमेकांना तरी त्या दाखवू या
प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले
कोवळेपण जाईचे ते भोगू या
खूप जळलो पाहुनी तम भोवती
आज थोडे चांदणेही पांघरु या
वाट ही ना संपली अजुनी तरी
काढण्या काटे पढीचे थांबू या
आयुष्य जगला का कुणी प्रश्नांविना?
समजाऊनी हे एकमेकांना; हसू या !
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply