नवीन लेखन...

काळोखाचा डोह 

( हिंदुस्थान खंडित होताना ज्यांनी ज्यांनी म्हणून यातना भोगल्या , त्या सर्वांना ही कथा समर्पित ! )

– श्रीकृष्ण जोशी

–झेलमच्या पाण्याला वेग होता .
पुलावरून पाहताना गरगरल्या सारखं होत होतं .
चौऱ्याण्णव वर्षाच्या आशाराणीचे हात थरथरत होते आणि शरीराला कंप सुटला होता .
पुलाचा कठडा घट्ट धरून ती उभी होती .
काळाचे आघात झाल्यानं देह क्षीण झाला होता . जुना , जीर्ण पंजाबी घालून , अनेकांच्या नजरा चुकवून , भीक मागण्याचं सोंग करून , ती इथवर आली होती .

झेलमच्या पाण्याचं दर्शन घ्यायचं , गेल्या पंचाहत्तर वर्षातले साठवून ठेवलेले अश्रू तिला अर्पण करायचे , आई , दोघी बहिणी , आत्या आणि गल्लीतल्या कित्येक जणींना श्रद्धांजली अर्पण करायची , अशी कैक वर्षांची इच्छा होती तिची .

दरवर्षीच्या चौदा ऑगस्टला आशाराणी गप्पगप्प असायची . मौन असायचं तिचं. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेत नसे ती . छावणीत ती एकटीच बसून राहायची . आणि डोळ्यातून अश्रूंचा अविरत पूर वाहत असायचा .
झेलमच्या पुलावर जायची इच्छा तीव्र व्हायची . पण सिल केलेल्या सीमा तिला दिसायच्या आणि ती आतल्या आत आक्रंदत राहायची .
आयुष्यात एकदा तरी झेलमच्या पाण्याचं दर्शन व्हायलाच हवं , या एकमेव इच्छेनं ती जगत होती .
आणि आज ती पुलावर उभी होती .
झेलमच्या पाण्याचा वेग पाहून तिचा हात छातीवर गेला .
आणि आगीचा लोळ हातावर पडावा तसं तिला जाणवलं .
चिरडीला येऊन तिनं छाती खसाखसा पुसली .
त्वेषानं . रागानं.

स्वतःचीच किळस वाटली तिला .
गेली कैक वर्षं ती हेच करत होती .
रस्त्याच्या कडेला मिळालेला पॉलिश पेपर , खरखरीत दगड , जे मिळेल ते घेऊन ती सगळं अंग घासायची .
आणि हताश होऊन भिंतीवर डोकं आपटत रहायची .
वाटायचं तिला ,
तो एक क्षण आपण का चुकवला ?
का त्या वेळेला क्षणभर पाय थरथरले ?
कसलं भय वाटलं ?
पाण्याचं ? मृत्यूचं ?
की पुलाच्या उंचीचं ?

आपल्या बरोबरीच्या सगळ्यांनी अब्रू वाचवण्यासाठी झेलमच्या पाण्यात उड्या मारल्या , त्याक्षणी आपण का गांगरलो ?
अवघा एकच क्षण …

पुलाच्या एका बाजूनं तलवारी उंचावत ते पाकडे नराधम धावत येत होते .
त्यांच्या नजरेत क्रौर्य होतं .
वासनेचा महापूर होता .
तुटून पडण्यासाठी हपापलेले लांडगे दिसत होते .
ते बेभान झाले होते .
आई ओरडली . सगळ्याजणींना सावध केलं आणि पुलावरून झेलमच्या पाण्यात उडी मारण्याचा इशारा केला . बघता बघता सगळ्याजणींनी उड्या मारल्या आणि झेलमच्या वेगवान पाण्यात वाहून जाऊ लागल्या .
क्षणभर थरकाप झाला जीवाचा .
क्षणभरच .
पण त्या क्षणानं घात केला .
आणि पुलावरच नराधम तुटून पडले देहावर .
कळत नव्हतं वेदना कुठल्या अधिक …
पाठीला टोचणाऱ्या पुलाच्या खडीच्या वेदना अधिक की …

शेवटची वेदना जाणवली ती छातीवर धारदार चाकूने कुणीतरी काहीतरी लिहीत असल्याची .
आणि निर्वस्त्र करून ओढत नेतानाची .
शुद्ध नव्हतीच कसली .
वेदनांचा आगडोंब तेव्हा उसळला , जेव्हा शुद्ध आली .
अभवितपणे हात छातीवर गेला , तेव्हा जाणीव झाली कुणीतरी अंगावर वस्त्र टाकलंय .

“बहेनजी , आप ठीक तो है नं ? घाबराईये मत , हिंदुस्थान के सिपाहीयों के साथ आप सुरक्षित है . उस नराधम पाक फौजियोंको हमने मौत के घाट उतारा है .”

कुणीतरी बोलत होतं आणि पुन्हा शुद्ध हरपली होती .

शुध्द आली तेव्हा दिल्लीतल्या कुठल्यातरी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या छावणीत असल्याचं तिला जाणवलं .

तिनं अवतीभवती पाहिलं .
सगळीकडे आक्रोश होता .
कापून काढलेल्या अवयवांच्या खोलवर झालेल्या जखमा , त्यामुळं असह्य वेदनांनी तळमळणाऱ्या मुली . बायका . वृध्द स्त्रिया .
देहाचे हालहाल केल्यानं आलेला भेसुरपणा . रक्तबंबाळ शरीरं आणि घुसमटलेली मनं . भुकेल्या पोटाची आग .
आणि बेवारस जगणं.
कुठल्याही इमारतीत आसरा नाही .
चौकशी नाही . जेवण नाही की पाणी नाही .
भयंकर हालअपेष्टा .
सगळीकडे स्वातंत्र्याचा उत्सव चालला होता .
आणि दुसरीकडे विस्थापितांच्या नरक यातना सुरू होत्या …

आशाराणीची शुध्द पुन्हा पुन्हा हरपत होती .
सगळ्या यातना अंधार गिळून टाकत होता .

कुणीतरी ‘ त्यांचा ‘ सल्ला सांगत होता …
” …ते बलात्कार करत होते तेव्हा तुम्ही श्वास रोखून मरून जायला हवं होतं .’ ते ‘ थकून निघून गेले असते आणि तुम्ही नैतिक दृष्ट्या जिंकला असता . माणसाचा देह मरतो आणि आत्मा …”

— तिला सगळं आठवलं .
आणि उद्विग्नता आली .
तिनं पुलाखालच्या झेलमच्या पाण्याकडे पाहिलं .
आईला, बहिणीला भेटायला जायचं तर झेलमचा सहारा घ्यायला हवा .
तिच्या मनानं ठरवलं .
आणि कठड्यावर चढून उडी मारण्यासाठी ती उभी राहिली .

आणि कठड्यावरून खाली उतरली .

तिला वाटलं , ज्याक्षणी उडी मारायला हवी होती , तो क्षण चुकला .
मग आता उडी मारून काय उपयोग ? फाळणीच्या वेदना कुणाला कळणार ?
आपण सगळ्या क्षणांचे साक्षीदार आहोत आणि खूप भोगलं आहे .
त्या काळोखाच्या डोहातल्या विस्मृतीत गेलेल्या यातनाघरातील जखमा तरी दाखवू सगळ्यांना .
तीच आईला , बहिणीला श्रद्धांजली !

आशाराणीनं झेलमच्या पाण्याला नमस्कार केला.
तिच्या डोळ्यातील आसवं त्या पाण्यात सांडली .
तिनं पुन्हा झेलमकडे पाहिलं .
आणि पहातच राहिली .
पाण्यातला काळोखाचा डोह लख्ख दिसू लागला होता .

( सत्य घटनेवर आधारित )

श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

फाळणी वेदना दिनाच्या निमित्ताने लिहिलेली ही कथा…

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 117 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..