तू दिलेल्या फुलांबरोबर
थोडे काटेही आले, म्हणून काय बिघडलं?
ते ‘तू’ दिलेले आहेत
हे सुख काय कमी आहे?
तसं मान्य केलंय मी
चालणं काट्यांवरुनही
बघ, ओठावरचं स्मित
पुरतं ढळलं नाहीए
डोळेही आहेत कोरडे
थोडं रक्त वाहतंच अटळपणे..
तिकडे लक्ष देऊ नकोस
माझी पावलं लोखंडाची नाहीत रे ।
अढळ विश्वास आहे तुझ्यावर
तितका देवावरही नाही
पण कसा देऊ भरवसा दैवाचा?
रक्त पुसणारा तुझा हातच
काट्यांनी भरणार नाही ना?
पहाटे कवितांना
होता प्राजक्त गंध
आज भळाळतेय
जखम काट्यांची
हे आवडलं नाही?
अरे, आताच तर पहिलं दर्शन झालंय
खऱ्या जगाचं ।
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply