मी काय कथू जे साहियले ते तुजला?
डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
तुजवाचून सारी मैफल रंगविताना
अश्रूत भिजवल्या मी कंठातिल ताना
ऐश्वर्य लेऊनी महाल होता धुंद
अंगणी ढवळे रातराणीचा गंध
झुंबरी पेटले दीप, उजळली रात
वर चंद्रकलेची अमृतमय बरसात
छेडिली तार मी … ओठी आली तान
पायात नूपुरे हरपून गेली भान
मी ताल सूरांचे धुंद गुंफिले शेले
परि तुला शोधण्या सुर दिशातून फिरले
वेदनेवरी त्या रागदारीची शाल
लेऊन सजविले वादळ हृदयातील
स्वर भिजून गेला तुला तिथे स्मरताना
रसिकांनी हासुन डोलविल्या पण माना
मी काय कथू त्या मुक्या यातना तुजला?
डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
तुजवाचुन सारी मैफल रंगविताना
अश्रूत भिजविल्या मी कंठातील ताना !
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply