नवीन लेखन...

ब्रिज खालून

जहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले. पुढील दोन तीन महिने प्रमोशन चे नाव काढु नको असे सांगून पाठवले. पण पंधरा दिवसात जहाजवरील फोर्थ इंजिनीयर घरी जातोय अशी बातमी आली. वाटलं की आता नवीन फोर्थ इंजिनीयर येईल त्यामुळे या जहाजावर आता प्रमोशन बोंबललं. दुसरा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ज्युनिअर मध्येच काढावे लागणार. पण दुसऱ्या दिवशी फोर्थ इंजिनीयर थर्ड मेट सोबत गेला थर्ड मेटचा रिलिव्हर आदल्या रात्रीच आला होता पण फोर्थ इंजिनीयर विदाऊट रिलिव्हर गेला. सकाळी फोर्थ गेल्यावर रेडिओ ऑफीसर म्हणाला चलो भाई अभी पार्टी देना पडेगा. मला काही लक्षात येईना हा कसल्या पार्टीबद्दल बोलतोय . मला आता ज्युनियर इंजिनियर म्हणून फोर्थ इंजिनियरच काम करायला लागेल आणि कंपनीने सांगितल्या प्रमाणे दोन तीन महिन्यांनी मला ज्युनियर पासून फोर्थ इंजिनीयर बनवण्यात येईल अस मला वाटलं होतं. मग रेडिओ ऑफीसर पुढे सांगू लागला. आप का आज से हि प्रमोशन हो गया है. फोर्थ का रिलिव्हर ऑनबोर्ड मतलब आप खुद्द ही था इसलीये कल सिर्फ थर्ड मेट आया. माझ्यासाठी हा आनंदासह आश्चर्याचा धक्का होता. पण अजून मोठा धक्का संध्याकाळी बसला. फोर्थ इंजिनीयर म्हणून प्रमोशन मिल्यामुळे जुना कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊन नवीन कॉन्ट्रक्ट पेपर मिळाला होता ज्यामध्ये केवळ बढती न देता कंपनीने फोर्थ इंजिनियरचा पूर्ण पगार सुद्धा वाढवून दिला होता. पंधरा दिवस ज्युनियर म्हणून काम केल्यानंतर 15 दिवसांचा अप्रेजल रिपोर्ट आणि मागच्या जहाजावरील अप्रेजल रिपोर्टचा विचार करून लगेच प्रमोट केलं गेलं.
प्रमोशन आणि पगरवाढीचा आनंद होताच त्यामुळे संधी मिळाली रे मिळाली की जहाजाबाहेर पडून खरेदीला आणि फिरायला बाहेर पडायची इच्छा व्हायची.
इस्तंबूल जवळील तुझला शहरातील ड्राय डॉक मध्ये संध्याकाळी सुट्टी झाली की रोज डॉक च्या गेटबाहेर पडून शहरात जाण्यासाठी बस पकडायचो. लिरा हे तुर्की देशाचे चलन होते साधारण पणे एक लिरा म्हणजे आपले त्यावेळेसचे 30 ते 32 रुपये व्हायचे. जवळपास 100 अमेरिकन डॉलर्स लिरा मध्ये एक्सचेंज करून घेतले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच जहाजावर आल्यामुळे प्रियासाठी काहीतरी खरेदी करण्याकरिता ज्वेलरीच्या दुकानात गेलो तिथे एक हार्ट शेपची अंगठी विकत घेतली लिरा कमी असल्याने दुकानात अमेरिकन डॉलर्स मध्येच व्यवहार करावा लागला. दुसऱ्या देशात तिसऱ्या देशाचे चलन वापरताना आपल्या देशात किती रुपये होतात त्याप्रमाणे अंदाज लावला तर सोन्याची अंगठी फारशी महाग नव्हती. योगायोगाने जहाजावरील मुंबईत राहणारा थर्ड मेट घरी चालला होता. त्यावेळेस व्हाट्सएप वगैरे नसल्याने काही वस्तू घेण्याअगोदर फोटो काढून ते सेंड करून हे घेऊ का असे विचारायची सोय नसल्याने. अंगठी गिफ्ट पॅक करून घेतली अंगठी सोबत तुर्की मधील चॉकलेट्सची काही पाकीट पार्सल करून पाठवून दिली. सात दिवसानी वस्तू घरी पोचल्या प्रियाला अंगठी खूप आवडली होती. अंगठी थोडी सैल असल्याने ती अंगठी घातल्यावर त्याच बोटात अजून एक अंगठी घालायची सवय प्रियाने अजूनपर्यंत सोडली नाही. आपल्याकडे अशा हार्ट शेपच्या अंगठ्या नाही मिळत असे सांगून तिने माझ्या खरेदीला त्यावेळी चांगलीच पोचपावती दिली होती. तुर्की देशातील एका लहानशा शहरात फिरताना सगळ्यात मोठी अडचण होत होती ती म्हणजे भाषेची. त्यांची तुर्कीश भाषा आणि आमची तुटकी फुटकी इंग्लिश. फक्त बस नंबर लक्षात ठेवून जहाजापर्यंत जाता येत होत आणि शहरात एका ठिकाणी उतरल्यावर पुन्हा त्याच बस स्टॉप येईपर्यंत पायी पायी चालत फिरून यायचं. शहर लहान असल्याने मार्केट लहान आणि दुकाने थोडिफारच होती. मार्केट मध्ये छोट्या छोट्या हॉटेल बाहेर रस्त्यात टेबल मांडलेली असायची त्यावर दोघे तिघे तुर्कीश लोक गप्पा मारत चहा किंवा कॉफी पित बसलेली असायची. बऱ्याचशा टेबल वर काहीजण चेस सारखा खेळ खेळताना दिसायची. फळे आणि सुका मेव्याची दुकाने ताज्या फळांनी आणि सुकमेव्याने भरलेली दिसायची. भाषेची खूपच अडचण होत होती. लिरा या चलनाची भारतीय रुपयात किती किंमत होते ते माहित असल्याने ब्राझील मध्ये खरेदी साठी जी पद्धत अवलंबली होती तीच तुर्की मध्ये पण अवलंबत होतो. ब्राझीलची पोर्तुगीज राष्ट्रभाषा असल्याने तिथे सुद्धा माझ्या तुटक्या फुटक्या इंग्रजीचा फायदा नव्हता त्यामुळे तिकडे दुकानात किंवा मॉल मध्ये गेल्यावर किती पैसे झाले हे एकतर दुकानातील कॅलक्युलेटरवर किंवा मोबाईलवर आकडे दाबून दाखवले जायचे. चॉकोलेट आणि इतर सटरफटर खाण्याच्या वस्तू अशा प्रकारे खरेदी करायच्या किंवा मग आपल्या जवळ असलेल्या सगळ्या नोटा किंवा चिल्लर दुकानदारांच्या समोर धरायच्या मग ते त्यांना हवे तेवढे घेऊन सुट्टे पैसे परत करायचे. जहाजावरील काम संपत आल होतं. संपूर्ण जहाजाला बाहेरून रंग लावून झाला होता. पाच वर्षे जुने जहाज आतून अजूनही नवकोरं वाटायचं पण बाहेरून रंग लावल्यावर आतून आणि बाहेरूनसुद्धा नवकोरं दिसायला लागल होतं. जहाज पाण्यात उतरवण्यासाठी जहाज ज्या फ्लोटिंग डॉक वर उभं होत त्याच्या लोखंडी टाक्यांमध्ये पाणी भरायला सुरवात केली संपूर्ण फ्लोटिंग डॉक जहाजसकट पाण्याखाली जाऊ लागलं होतं. जेव्हा जहाज पूर्णपणे पाण्यावर तरंगायला लागलं तसं समोरून एक शक्तीशाली टग बोट च्या सहय्याने फ्लोटिंग डॉक च्या बाहेर ओढून बाजूच्या एका जेट्टीवर बांधून ठेवले. आणखी 4 दिवस जहाज जेट्टीवर थांबलं आणि पुढच्या समुद्रसफरीसाठी रवाना झाले.
ज्युनियर इंजिनीयर म्हणजे शिकाऊ त्यामुळे कोणतीही जवाबदारी नसते.फोर्थ इंजिनीयर बनवल्यामुळे आता दिवसा व रात्री या दोन्ही 8 ते 12 या चार तासांच्या वॉच मध्ये संपूर्ण इंजिन रूम ची जवाबदारी अंगावर पडली होती. खोल समुद्रात किंवा नांगर टाकून उभे असलो की सगळे जण 8 ते 5 या वेळेत काम करून संध्याकाळी 5 नंतर सुट्टी करायचे. हे जहाजसुद्धा UMS क्लास होत. म्हणजेचं अनअटेंडेड मशीनरी मोड मध्ये टाकल्यावर फक्त अलार्म वाजल्यावर ते रिसेट करायला जावं लागायचं. जेव्हा लोंडिंग,डीसचार्जिंग असेल आणि जहाज बंदरात येताना किंवा निघताना पुन्हा वॉच सिस्टिम चालू व्हायची.
फोर्थ चा 8 ते 12 मग थर्ड चा 12 ते 4 आणि सेकंड इंजिनियरचा 4 ते 8 असे दिवसातून दोन वेळा प्रत्येक इंजिनियरला चार चार तासांचे वॉच करायला लागतात. फोर्थ इंजिनीयर म्हणजे सर्वात कमी अनुभव असलेला म्हणून त्याचा वॉच 8 ते 12 असा असतो कारण चीफ इंजिनीयर या वेळेत जागा असल्याने काही गडबड झाली तर तो लगेच सांभाळून घेऊ शकतो. मुळात 8 ते 12 वॉच म्हणजे सगळ्यात चांगला वॉच दुपारी आणि रात्री व्यवस्थित झोपायला मिळत म्हणून.
जहाजावर पहिल्यांदाच जवाबदारी पडल्याने थोडसं दडपण होत. शिवाय जॉईन करून महिना सुद्धा झाला नव्हता त्यामुळे सगळ्या मशिनरी आणि सिस्टीम बद्दल पूर्ण माहिती सुद्धा नव्हती. जॉईन झाल्यापासून कंपनीतील सर्वात अनुभवी चीफ इंजिनीयर असल्याने आणि त्याचा स्वभाव गमतीदार तसेच सांभाळून घेणाऱ्यातला असल्याने जवाबदारीचे दडपण हळू हळू कमी होत गेले.
भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र त्यांना जोडणारी सामुद्रधुनी हे सगळं शाळेत भूगोलाच्या अभ्यासक्रमात होऊन गेल होतं. काळा समुद्र कुठे आहे भूमध्य समुद्र कुठे आहे त्यांना कशाप्रकारे एकमेकांशी जोडले गेले आहे पण आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे हे विचार भूगोल शिकताना यायचे. प्रत्यक्ष भूमध्य समुद्रात आलो आणि काळ्या समुद्राकडे चाललो तेव्हा या दोन्ही समुद्राच्या संगमावर वसलेलं ऐतिहासिक इस्तंबूल शहर पाहिलं. दोन्ही समुद्र त्यांना जोडणारी इस्तंबूल मधील बोसफोरसची सामुद्रधुनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या सर्वांना इतिहास आणि भूगोलात का एवढं महत्व दिलय हे कळून चुकलं.
आशिया खंड आणि युरोप खंड या दोघांना इस्तंबूल शहरातील बोसफोरस या सामुद्रधुनीने विभागले आहे. भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात जाताना इस्तंबुल शहराजवळ येताच सगळ्यात पहिले चांद सितारा असलेला लाल भडक रंगाचा सतत फडकणारा तुर्कीचा झेंडा लक्ष वेधून घेतो. इस्तंबूल किल्ला स्पष्ट पणे दिसतो, ब्लू मॉस्क सह इतर मशिदी आणि त्यांचे घुमट दिसतात. इस्तंबूल विमानतळावर उतरणारी अनेक विमाने खाली उतरताना दिसतात. जहाज जस जसे काळ्यासमुद्राकडे जाते तसं तसं लहान मोठ्या पॅसेंजर बोटी इस्तंबूल शहराच्या एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्याकडे येताना जाताना दिसतात. जहाज जवळ आले कि पहिले जहाजाला जाऊन देण्यासाठी ह्या लहान पॅसेंजर बोटी त्यांचा वेग कमी करून एका बाजूला होत जातात. त्यावेळेला एखादा हत्ती जसा रस्त्याने जात असतो त्यावेळेस त्याला पुढे जाऊ देण्याकरिता जसे सगळे बाजूला होतात तसं काहीसं इस्तंबूल मधील पॅसेंजर बोटी आणि आमचं जहाज यांच्यामध्ये घडत असल्याचा भास होतो. त्यामुळे आपण जहाजावर नसून हत्तीवर स्वार झाल्यासारखं वाटतं.
इस्तंबूल शहरातून काळ्या समुद्रात जाईपर्यंत किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला तुर्कीचे उंचावर असलेले मोठे मोठे झेंडे दिसतात. हे फडकणारे झेंडे रात्री अंधारात सुद्धा दिसावे म्हणून सगळ्याच झेंड्यांवर प्रकाशझोत सोडलेलं असतात. दोन्ही बाजूला हिरवेगार आणि अप्रतिम निसर्गाने नटलेले डोंगर आणि टेकड्या दिसतात. त्यांच्यावर असलेले सुबक देखणे आणि टुमदार बंगले खूपच आकर्षक दिसतात. काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्रात पाणी खाली उतरत असते प्रवाहाला खूप वेगसुद्धा असतो. कधी कधी डॉल्फिन सुद्धा दिसतात डुबक्या मारताना. किनाऱ्याजवळ अनेक हॉटेल आणि लहान मोठे घर आणि बंगले बघत बघत तासाभराचा वेळ कधी संपतो ते कळत नाही. इस्तंबूल वरून जात येताना एकदा तरी प्रोविजन घेण्यासाठी तसेच क्रु चेंज साठी जहाज थांबतच. त्यामुळे इस्तंबूलचा जगप्रसिद्ध बकलावा खायला मिळायचा. बकलावा म्हणजे आक्रोड पिस्ता वापरून साखरेच्या पाकात बनवलेला मिठाईचा प्रकार. बकलावाचे एक किंवा दोन तुकडे दुपारी जेवल्यानंतर खाल्ले कि 2 तास झोपल्याशिवाय सुस्ती उडतच नाही. ब युरोप आणि आशिया खंड तसेच इस्तंबूल शहर समुद्रधुनीने विभागल्यामुळे त्यांना जोडण्यासाठी सामुद्रधुनीवर मोठे मोठे झुलते ब्रिज बांधले गेले. हे दोन्ही ब्रिज एवढे उंचावर आहेत की मोठी मोठी जहाज त्याच्याखालून आरामात ये जा करतात. जहाजाच्या नेव्हिगेशनल ब्रिजवर उभं राहून इस्तंबुलच्या ब्रिजच्या खालून जाताना एक वेगळाच अनुभव येतो. जहाज चालू असताना खालून वर पाहिलं की जहाजाचा मास्ट किंवा चिमणी ब्रिजला धडकते कि काय अस वाटत राहतं. बऱ्याच वेळा रात्री पण इस्तंबूल ट्रांझीट करायला मिळालं. रात्रीच्या वेळेस या पुलांवर केलेली रोषणाई खूपच सुंदर दिसते. डीम होत जाणारी रंगीबिरंगी लाईट डोळ्यांचे पारणे फिटवते. पहाटेच्या वेळी किनाऱ्यालागतच्या मशिदींमधून बाहेर पडणारे अल्लाह हो अकबर चे सूर दोन्ही बाजूंकडून एकामागोमाग एकसाथ ऐकायला मिळतात. मोठी जहाज एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे ठरवलेल्या वेळेतच एका पाठोपाठ काढली जातात. इस्तंबूल शहराचा एक भाग युरोप खंडात आणि एक भाग आशिया खंडात आणि या दोन खंडांना जोडणाऱ्या इस्तंबूलच्या ब्रिज खालून जहाज जाताना कामातून नेहमी सुट्टी असावी असं वाटतं राहायचं.

©प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 57 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..