नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद्गीता : अ. २ श्लोक १३

Bhagwadgeeta From the Perspective of Science - Adhyay 2, Shlok 13

देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||

देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे

स्थानांतर, धीर :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.

श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्‍या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही.

प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. या बदलांमुळेच, ते शरीर बालकावस्थेत, नंतर तारुण्यावस्थेत आणि वृध्दावस्थेत बदलते तरी त्यातील जीवात्मा तोच असतो. एका शरीराच्या मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्‍या शरीरात स्थानांतरीत होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये अध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे. आणि यासाठीच भीष्म, द्रोण वगैरे ज्येष्ठांबद्दल आस्था असणार्‍या अर्जुनाला, ज्येष्ठांना मारण्याने शोकाकुल होण्याचे काहीच कारण नसावे. उलट त्यांना मारण्याने, त्यांच्या म्हातार्‍या शरीरातील आत्मा दुसर्‍या नवीन शरीरात प्रवेश करून त्यांना नवतारुण्य मिळणार असल्यामुळे अर्जुनाने धन्य व्हायला पाहिजे होते. ज्या माणसाला जीवाची मूळ स्थिती, परमात्मा आणि अध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्याला ‘धीर’ किंवा ‘ज्ञानी’ असे म्हणतात. असा मनुष्य, शरीरातील स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही.

श्रीस्वामी रामसुखदासजी यांचे विवेचन : ‘शरीर धारण करणार्‍याच्या शरीरामध्ये’ असे म्हणण्याने सिध्द होते की शरीर वेगळे आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा…आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयाने तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.

श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक I परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक I हे प्रत्यक्षचि देख I प्रमाण तू II एथ कौमारत्व दिसे I मग तारुण्यी ते भ्रंशे I परी देहचि हा न नाशे I एकेकासवे II तैसी चैतन्याच्या ठायी I इये शरीरांतरे होती जाती पाही I ऐसे जाणे तया नाही I व्यामोहदु:ख II

विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचे शरीर निर्माण होऊ शकत नाही. पुरुषाचा (नराचा) शुक्राणू आणि स्त्रीचे (मादीचे) पक्व बीजांड यांचा संयोग झाला म्हणजे गर्भाचा पिंड निर्माण होतो. ही एक सजीव पेशी असते आणि तिच्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असते. १९५३ साली, फ्रॅन्सिस क्रीक आणि जेम्स वॉटसन या शास्त्रज्ञांनी, आनुवंशिक तत्वाच्या डीएनए या घटकाची रचना शोधली आणि मानवी जनुकीय नकाशा काढण्याचा मार्ग दाखविला. जनुकशास्त्रातली ही फार महत्वपूर्ण घटना आहे.

शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच), अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रे, आणि ३० हजार ते १ लाख जनुके (पूर्ण संच) असतात आणि तेच, सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचे विभाजन होऊन दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीने वाढ होऊन ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेली सर्व अवयवे आणि इंद्रिये असलेले मानवाचे बालक जन्माला येते. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते, अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असे मानले जाते. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणे सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तके आणि संगणकीय महाजालावर ती उपलब्ध आहे, अवश्य वाचावी.

खरे म्हणजे सजीवांच्या शरीराच्या तीन नव्हे चार अवस्था असतात.1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य…आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रे तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेलेी नसते. पाट्या कोर्‍याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचे पोषण, दुसर्‍या शरीराने, म्हणजे मातेच्या शरीराने घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असले तरी त्यातून अन्न घेतले न जाता ते नाळेतूनच घेतले जाऊन पोषण होते. माता हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.

2. बाल्यावस्था : म्हणजे प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था. या अवस्थेत जननेन्द्रिये विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू…प्रजनन साध्य होऊ शकत नाही.

3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, शुक्राणू आणि बीजांडे तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून

अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होतो.

4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहिशी झालेली अवस्था.अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुले होत राहतात. अशा रीतीने आनुवंशिक तत्व एका जिवंत शरीरातून दुसर्‍या जिवंत शरीरात प्रवेश करते. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.

‘मी ’ पण, ‘माझे ’ पण आणि शरीराची ‘जाणीव ’ :: ‘मी‘ पण आणि ‘माझे‘ पण हे फक्त शरीरालाच असते. याचे कारण म्हणजे मेंदूत असलेली जाणीव…..कॉन्शसनेस. शरीरासंबंधीचे अनुभव, मेंदूच्या स्मृतिकेन्द्रात साठविलेले असतात. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि म्हातारपण या अवस्थात, शरीराचा मेंदू तोच असतो आणि स्मृतिकेन्द्रात साठविलेली माहितीही तीच असते म्हणून या तिनही अवस्थातील व्यक्ती ‘मी‘ च आहे आणि या काळातील शरीरासंबंधीच्या घटना आणि भौतिक वस्तू ‘माझ्या ‘ च आहेत, त्यावर माझा मालकी हक्क आहे ही जाणीव असते. मी हे केले, मी ते केले, हे माझे घर आहे, हे माझे कुटुंब आहे, हा माझा पैसा आहे वगैरे. पण स्मृतिभ्रंश झाला म्हणजे हे ‘मी ‘ आणि ‘माझे ‘ पण नाहीसे होते. गर्भावस्थेत, मेंदूच्या स्मृतिकेन्द्रात कोणतीही माहिती साठविलेली नसल्यामुळे, त्या अवस्थेतील मी आणि माझे पण जाणवत नाही. ती अवस्था वास्तव असली तरी तिची जाणीव नसते.

‘मी ‘ असतो कुठे? :: हे माझे ते माझे असे आपण आयुष्यभर म्हणत असतो, तो ‘मी ‘ असतो कुठे? तो मी म्हणजे आत्मा, जीव, जीवात्मा वगैरे कुणी नसून हे भौतिक शरीरच असते. मोटारीचा ढाचा म्हणजे मोटार नव्हे, मोटारीचे इंजिन म्हणजे मोटार नव्हे, मोटारीचे सुकाणूचक्र आणि ब्रेक म्हणजे मोटार नव्हे, मोटारीची चार चाके म्हणजे मोटार नव्हे….तर या सगळ्यांची जोडणी करून जी वस्तू निर्माण होते ती …मोटार. आणि ती पळण्यासाठी आवश्यक आहे ते उर्जासाधन…म्हणजे पेट्रोल आणि एक नियंत्रक म्हणजे चालक.

तसेच हाडांचा सांगाडा म्हणजे मी नव्हे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजनन संस्था, ह्रदय, मूत्रपिंडे, जठर वगैरे म्हणजे मी नव्हे. तर या सगळ्यांची झालेली जोडणी…म्हणजे हे शरीर म्हणजे ‘मी ‘. आणि त्याचे कार्य चालण्यासाठी लागणारी चेतना म्हणजे आत्मा…आनुवंशिक तत्व. आणि चालक?…तो म्हणजे आनुवंशिक तत्वामुळे घडलेला आणि शरीरातच असलेला मेंदू. आत्मा किंवा आनुवंशिक तत्वाला ‘मी ‘ आणि ‘माझे ‘ पण नसते.

आत्म्याच्या आनुवंशिक सिद्धांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असल्यामुळे, प्रजननाचे वेळीच आत्मा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो, शरीर जीर्ण होऊन ते अचेतन झाल्यावर नाही. सजीवांचे शरीर, त्यातील आत्मा त्याला सोडून गेल्यानंतर अचेतन होते आणि तोच आत्मा दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो हे गृहीतक, आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतास मान्य नाही. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करते. आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा…शरीरी. आनुवंशिक तत्व, त्याच्या आनुवंशिक आज्ञावल्या, गेल्या कोट्यवधी वर्षांपासून जनक पिढीकडून अपत्य पिढीत संक्रमित होते आहे आणि ही क्रिया, जोपर्यंत या पृथ्वीवर सजीव जन्माला येत राहणार आहेत आणि ते जगण्यासाठीची अनुकूल परिस्थिती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत चालू राहणार आहे.

श्लोकाचा अध्यात्मिक विचार आणि विज्ञान :: या श्लोकाच्या अध्यात्मिक संदेशात, विज्ञान कसे सामावलेले आहे ते आता पाहू या.

गर्भधारणा होते त्यावेळी गर्भपिंडात आलेल्या गुणसूत्रांचा आणि जनुकांचा संच, मरेपर्यंत कायम असतो.प्रत्येक क्षणी अब्जावधी पेशींचा नाश होत असतो आणि अब्जावधी नवीन पेशीही निर्माण होत असतात. तरीपण प्रत्येक पेशीतील गुणसूत्रांचा संच तोच असतो. म्हणूनच ‘मी’ बदलत नाही.यामुळेच शरीरात बदल झाले तरी आनुवंशिक तत्व बदलत नाही म्हणजे जीवात्मा बदलत नाही. गर्भधारणा जेव्हा होते, त्यावेळी मातापित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांतून आलेले आनुवंशिक तत्व आणि त्याच्या आनुवंशिक आज्ञावल्या, पित्याचा शुक्राणू आणि मातेचे बीजांड यातून गर्भपिंडात येते आणि तेच गर्भाचे नवे शरीर धारण करते. म्हणजे जीवात्म्याचे, दुसर्‍या शरीरात संक्रमण, अपत्याच्या जिवंत शरीरात होते. याच आनुवंशिक तत्वाचा निराळा संच, अपत्याच्या पुढील पिढीत संक्रमित होतो. म्हणूनच अपत्ये, आईवडिलांपेक्षा वेगळी असतात.

प्रत्येक शुक्राणू आणि प्रत्येक बीजांड यातील आनुवंशिक तत्वाचा संच थोडा वेगळा असतो. म्हणूनच एकाच जोडप्याला मुले आणि मुली होतात आणि प्रत्येक अपत्य, मातापित्यापेक्षा वेगळे असते. अगदी एकसारख्या दोन व्यक्ती असणे अशक्य आहे. प्रत्येक व्यक्ती निराळी असण्याचे खरे कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील आनुवंशिक तत्वाचे निराळेपण हे आहे.

प्रत्येक मानवी व्यक्ती निराळी असते हे निरीक्षण रुशीमुनींनी आणि आपल्या पूर्वजांनी अगदी बरोबर केले. आई आणि वडील भिन्न कुलातील असल्यामुळे ते सर्वार्थाने भिन्न असणे सहाजिकच होते. पण त्यांची अपत्येही थोड्याफार प्रमाणात भिन्न असतात हा सर्वांचा अनुभव आहे. एकाच जोडप्याला काही मुलगे होतात तर काही मुली होतात. एखादे अपत्य हुशार निघते, तर एखादे मतिमंद असते. एखादे अपत्य सुंदर देखणे असते तर एखादे कुरूप असते. कित्येक उदाहरणे अशी आहेत की सामान्य जोडप्याचे पोटी असामान्य मूल जन्माला येते तर काही असामान्य जोडप्याच्या पोटी अगदी भिन्न गुणावगुण आणि रूप असलेले मूल जन्माला येते. अशा प्रकारच्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण देणेही अपरिहार्य होते. यासाठीच अध्यात्मात, पूर्वजन्म आणि त्या जन्मातील बरीवाईट कर्मे कारणीभूत असतात ही संकल्पना रूढ झाली. वास्तविक, गर्भधारणेच्या वेळीच गर्भात आलेल्या आनुवंशिक तत्वातील गुणदोषामुळेच अपत्याचे, शारीरिक, स्वाभाविक आणि बौध्दिक गुणावगुण ठरतात.

गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्‍या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.

दुसर्‍या पिढीचा जन्म ही अत्यंत आनंददायी, अत्यंत सुखदायक, परम स्वागतार्ह घटना असते. ही क्रिया गेली कोट्यवधी पृथ्वीवर्षांपासून अखंडपणे चालू आहे आणि या पृथ्वीवर, जोपर्यंत सजीवांचे अस्तित्व असणे शक्य आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. ही क्रिया केवळ आनुवंशिक तत्व आणि त्याच्या आनुवंशिक आज्ञावल्या यामुळेच शक्य होते आहे. धैर्यवान तर सोडाच पण सामान्य माणसानेही या सत्याचा स्वीकार केला पाहिजे.

— गजानन वामनाचार्य

रविवार २९ एप्रिल २०१२

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..