unभान गदक अथेति यां स्थितींचा भूलभुलैया

कवी महेशलिलापंडित यांचा १९९४ला सुरु झालेल्या काव्य प्रवासाचा पहिला थांबा “अ थे  ति” या काव्यसंग्रहाचा रसग्रहण

प्रसाद कुमठेकर


मी  लहानपणी भीती जावी म्हणून म्हणत असलेल्या रामरक्षेत आलेला “अथ”, अथ ध्यानम् ।। ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम्।  आन बुद्धी यावी म्हणून म्हणत असलेल्या गणपती स्तोत्रात आलेल्या “इति”,   इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम || या दोन शब्दाच्या साटेलोट्यानं किंवा युतीने साकारला गेलेला शब्द “अथेती.” अथ + इति.

“अ  थे  ति” पाहिलं अन त्यात पहिल्यांदा नजरेत भरली ती मराठी कवितेच्या पुस्तकात फारंच कमी वेळा दिसणारी “प्रोडक्शन व्हॅलू”. बरंच काही सांगू पाहणारं ऍबस्ट्रॅक्ट जडशीळ कव्हर,पुस्तकात दुर्मिळच दिसणारा पिवळा जाड कागद आणि टाइम घेऊन केलेली उत्कृष्ट बांधणी (बायडिंग). पाहिलं कव्हरला लागून असलेलं काळपान, दुसरं सुंदर आणि नजरेत भरतील अश्या फॉन्ट मध्ये लिहलेलं “अथेति/कविता”,

सुख दुःख

आशा निराशा

प्रेमतिरस्कार

यशअपयश

कोतुकउपहास आणि सारंकाही

घेऊन माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीमुळे

जेकाही रेन्डर झालंय

त्या (“द  रेन्डर्ड”) च्या सर्व शेअर होल्डर्सना समर्पित

समर्पण पत्रिकेमधून डोकावणारे शेअरहोल्डर्स, द रेन्डर्ड असले खतरनाक शब्द आणि त्याच्या खाली कवितेला कथा म्हणून लिहलेली आणखी एक खतरनाक कविता आणि आखिरला

“तुमच्या वाट्याला आलेल्या

कथां साठी

तुम्हीच जवाबदार”

अशी वॉर्निंग! येणारं कायतरी वजनीआय, गंभीराय. उगीच लोकांसाठी लोकांकरिता लोकांच्या संवेदना underestimate करत मजेदार टेम्पास म्हणून खरडल्यासारखं आम्ही काही केलं नाही हे वजनानं सांगणारी. आणि मग नंतरचं पाठमोरं पान ‘मनोगत’चं. त्यात आपल्याला कवी उलगडून सांगतो अथ पासून इतिपर्यंत सारं काही माहित व कळत असल्याचं इल्युजन. Unभान, गदक आणि अथेती स्टेजेसची  सतत  मरेपर्यंत होणारी आपली  स्विचिंग चालणारी  धप्पन धुप्पी.  आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रवास भाषावर्तनातून  प्रक्षेपित करण्याचा त्याचा प्रयोग “अथेती”. हो वाचताना आपल्याला सतत आपल्या डोक्यावरून सिनेमात उडतात तशी विमानं((रंग दे बसंतीतल्यासारखी) झुम्मकरून जात असल्याचा आभास होतो. वाचलेलं काही आपल्यात सांडतं काही मस्तपैकी विमानासारखं आपल्या डोक्याभोवती पिंगा घालतं. परत एकदा समजतंय ..समजलंय … समजेल बहुदा … नाही थोडं जड नाही थोडं जास्तच जड आहे पण समजलं तर मजा येईल आशा स्टेजेस मधून अथेती घेऊन जातं आपल्याला आपलाच सतरंगी उरूस दाखवत.

ज्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतो रट्टेबाज पठडीत चालणाऱ्या शिक्षणाने झालेला, सरांनी केलेला आपल्यातलाच शंकाकुशंकांनी गाभण झालेला बैल आणि येऊ लागतात चिरंजीवीभवलेल्या कळा. ज्या मग अथेती  वाचून संपल्यानंतरसुद्धा सतत जाणवत राहतात आणि मग तुम्ही परत एकदा फिरून अथेती हातात घेता. त्यात शेष असलेल्या, सुटलेल्या कळा अनुभवायला आणि हा अथ ते इतिचा अनसंपेबल लूप  राहतो.

unभान करणाऱ्या दहा कविता ज्यात भेटतो ऐन एकोणिशीत तारुण्य मेलेल्या आणि त्याचं आजपरेंत श्राद्ध घालणारा शेंदूरवासाचा कॉन्सन्ट्रेटेड आत्मा आणि तुम्ही अनुभवू लागता मग तो नाकातले केस जाळल्यासारखा कवितेचा खऊर वास जो डायरेक्ट तुमच्या डोक्यात जाऊन गरागर फिरवायला लागतो ३६०अंशाच्या कोनात दाखवून आणतो ती फेज कवितेतली, जेव्हां तुमच्या बाथरूममधल्या हेरॉईनच्या फोटो निरर्थक झालेल्या, येडझवी नितीमत्ता, गंडूपणाची लपाछपी. स्क्लप्चर कवितेला काढण्या, ठेवण्या, लादण्याचा हिसकावण्याच्या खेळाने होणारा “माझा” वो ब ड  धो ब ड दगड आपल्या.. खुदिच्या लॉजिकने केलेला मिळवलेला… त्यात अभिप्रेत असलेला नव्हे. आणि मग तीच ती दुःखी दगड कि आत्मकथा. सगळंच अस्वस्थ unभान करणारं.

अत्यंत प्रयोगशील, अतिशय वेगळी धाटणी, वास्तवाचं भान असलेली इत्यादी इत्यादी घासून पुळचट झालेले शब्द आधी पुष्कळांच्या कवितेसाठी वापरले गेले आहेत. पण नियमांच्या ‘जु’ ने बांधलेल्या कविता कवी महेशलिलापंडित  यांनी  अक्षरशः कवितेच्या मानेवरचा ‘जू’ मोडून मुक्त केल्यात. आणि त्यांच्या  या कविता आता कानात वारं शिरल्यासारखं वाचकांच्या डोळ्यातुन त्यांच्या मनात घुसू घुसू ढुश्या देतात आणि आपलं चारचौघांसारखं असलेलं

तृतीय श्रेणी

पगारावलेलं

महिनावलेलं जीवन…

त्यांच्या या ढुसण्यानं आतून बाहेरून हलल्याचा आभास होऊ शकतो. त्यांच्या  कवितेतले शब्द नेहमीच्या शब्दासारखे २D नाहीत तर त्याला अगणित डायमेन्शन्स/ मिती आहेत जसे ‘श्रेणी’ या त्याच्या कवितेत वापरले  गेलेले रवीईईईवार शनीईईईवार हे शब्द, विस्तृत समरी आणि विद्यापीठ मधला “आतला आनंद बुडबुडा प्रतिसाद”. होत नाही धाडस या कवितेतल्या “वांगेभरीत डोळ्यांचं,  कुल्ले चिम्टावलेले, डोळ्यात त्तोलानिक थैमान,विरोधाभासाच्या चौथऱ्यावर ” अशे एक नाही कितीतरी शब्द याच्या हर एक कवितेच्या चप्प्या चप्प्यावर डायनामाईट -लँडमाईनसारखे पेरले गेलेत. फक्त नज़रेचं  वजन पडूद्यात  तुम्ही उडालातंच आभाळात बुम.

ओरिजिनल  ओफिसला जमा

जगतोय फक्त अट्टेस्टेड लाईफ

डोकं ब्लास्ट जगण्याच्या चिंधड्या चिंधड्या  राई राई एवढ्या…

“सेयिंगवर चढचढचढून शाऊटिंग”

“सोडून सगळे इझम्स गेलेत

स्कॉलरशिप दाखवण्यासाठी”

“ड्रॉयडन पॉप श्याडवेल पेक्षा

आम्ही टोकाला जातो”

कधी कधी आपण म्हणतो वेडा कवी हा अक्षरशः येडाय कारण शहाणी कवी माणसं हाथ राखून लिहतात पण महेशालिलापंडित अक्षरशः नागडे होतात   आपल्यासमोर आणि आपल्याला कवितेत व्यक्त होणारी यांची ती इमेज आरशासारखी दिसते मग इच्छा असो वा नसो मग तसंच पाहणं आलंच स्वतःकड.

माझ्या आयुष्यात या कविता संग्रहाइतके इतके कॉन्ट्रडीक्ट करणारे  टायटल्स मी कोठेही वाचले नसतील.

कॉन्फिडन्ट हेलकावे

सुलभ लेबर

तरंगती ग्र्यविटी

अनरिअल सत्य

फ्रेंडली शत्रुत्व

वाचताना हसू येतं आणि मग नीट वाचताना काय काय होतं, कसं कसं वाटतं, का का वाटतं हा मूलभूत क्वेशन मार्क आहे

विचारांचा पंचायती मार

वर्तमानाने सुतला जात

अनपरवडेबल अनविभाजनेबल रॅशनयालीटी

अथेती मध्ये कविताक्रम ज्या पद्धतीने लावलाय त्या पद्धतीनं वाचत गेल्यावर आपल्याला लक्षात येतं  हे एक ट्रेनिंग सेशन सारखाय.  महेशालीलापंडित   पहिल्यांदा आपल्याला  सांगतात  unभान कसं  होतं  मग तो आपल्याला  गदक स्थितीत आणतात म्हणजे  ज्या स्थितीत आपल्याला आपल्या जगण्यातलं  उघडं  पितळ कळून आलेलं असतं.  या गदक स्थितीत होतो जगण्याचा पेन इन विचार

समजदार पणा

खूप विचार

भोगतोय

अश्वत्थामाच्या जखमेसारखा

ना दिन को सुकू है शाकीर

आणि नंतरच्या कुठल्यातरी नंबरच्या ओळीत येणारं

फक्त जखमेभोवती

जग फिरवणं

समजदारीचा टेम्भा

मिरवणं

जर कुणाला अथेतीमध्ये व्याकरणात चुका दिसल्या, जर का शब्दांच्या मांडणीत चुका दिसल्या, जर का एकाच शब्द तिसरी दुसरीकडं लिहलाय असे दिसले (आणि ते दिसतातंच.) तर कवींच्या विद्वत्तेवर शंका नं  घेता त्यांनी असं का केलं असेल असं एकदा स्वतःला विचारावं अन त्या चुका आहेत तश्या वाचाव्यात लक्ष्यात येईल हा प्रयोग आहे जो आपल्याला एका टोकाच्या अनुभव विश्वात नेतो. शब्दमांडणीतून निर्माण केलेली हि अशी अनुभूती अद्यापि तरी माझ्या वाचनात आली नाही. एकंदरीत कविता संग्रह वाचताना तुम्हाला गुदगुल्या होतात,टाचण्या टोचतात, चिमटे काढले जातात, मग तुम्हाला मोठ्या धबधब्यासारखं गडगडाटी हसू येतं मधेच  तुमचं नाक चिमटीत धरून तोंड दाबल्यासारखं वाटतं, पोळतं, थंडगार वाटतं, सबकुछ शून्य झूठ मिथ्या वाटतं, शिट्ट्या मारावासं वाटतं सतत काही ना काही वाटतं थोडक्यात इट्स लाईक टोट्टल इन्सानिटी.

अथ उवाचलो आता इति गणेश वसईकरांच्या म्हणण्याला अनुमोदन देत

महेशालीलापंडितांची कविता भाषिक उलाढाल ,भाषिक राजकारण , वैचारिक, आर्थिक व आयुष्यातील अभावाची, भीतीची नाकर्तेपणाची सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर नोंद घेत असल्याने तिचं वाचन करण्याआधी  आपल्याला आकलनाच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवणे गरजेचे राहील.

अ थे ती

महेशालिलापंडित

पार प्रकाशन

मूल्य १६० रुपये

लेखकाचे नाव :
prasad Kumthekar
लेखकाचा ई-मेल :
shrutikakumthekar@gmail.com


About Guest Author 507 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…