नवीन लेखन...

बटाटा वड्याची पूजा

 

आख्यायिका अशी आहे की सर्वप्रथम पोर्तुगीजांनी बटाट्याला भारतात आणलं आणि मुंबईतील गिरणगावानी बटाटा आणि डाळीच्या पिठाच्या रीतसर संमतीने एकदम स्वस्तात पोट भरणा-या या बटाटेवड्याला जन्म दिला.

ते काहीका असेना, सगळ्यात स्वस्त व कमी वेळेत पोट भरणारा हा पदार्थ विकून रोडसाईडच्या घराच्या खिडकीचा वापर करत पुण्या मुंबईच्या कित्येक कुटुंबियांनी व्यवसायही चालू केला. याच खिडकीच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय थाटलेल्या कल्याणच्या वझे (हे नाव नीट वाचा नाहीतर ‘व’ चा ‘वा’ होईल आणि प्रकरण कोटीत किंवा कोर्टात जाईल) कुटुंबियांचा वडा “खिडकी वडा” नावानेच उदयास आला.

बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करू शकतो परंतु पाव, स्लाईस, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा ही मंडळी नवरदेवाच्या वरातीबरोबर मिरवण्यासाठी व्यावसायिकांनी घुसवली. लोकमान्यतेच्या अत्युच्य शिखरावर हा बटाटे वडा विराजमान असून हिरवी ओल्या खोब-याची चटणी, पुदिना चटणी, चिंगु चटणी, टोमॅटो सॉस वगैरे ऍडिशनल ऍक्सेसरीजच्या साथीत हा हा म्हणता दोन चार वड्यांचा सहज फडशा पडतो. पुण्यात काही ठिकाणी वड्याबरोबर सांबार देणंही चालू झालंय.

लोणावळ्यातल्या कामतने गोडसर चटणीमधे आवळ्याचा शिडकावा मारून यात भर घातली. पाच वर्षापूर्वी दोन वड्यांची एक प्लेट पन्नास रुपायला होती कामताकडे. त्याच्या बरोबर ही चटणी नैवेद्यासारख्या छोट्या वाटीत मिळायची; अजूनही मिळत असेल. नोटाबंदीनंतर माझं तिकडे जाणं झालं नाहीये – या वाक्याचा कामत वड्याशी सबंध नाहीये. असो.

‘छोटा’ म्हणजे बाबा वडा जो लग्नाच्या जेवणावळीत भज्यांऐवजीही वाढला जातो, ‘मध्यम’ म्हणजे पावाबरोबार स्टॉल किंवा हॉटेलमधे मिळणारा आणि ‘किंग’वडा जो आकाराने मध्यमच्या दीडपट असतो (ही तुलना झेपतीय का, तुमचं तुम्हीच ठरवा) याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे विठ्ठल कामत निर्मित “विठ्ठल वडा” जो गोडसर दही, शेव, फरसाण, मनुका, बेदाणे आणि कांदा कोथिंबिरीसह कामत रेस्टॉरंट्समधेच मिळतो.

पुणे मुंबई पुणे प्रवासात रेल्वे तिकिटाइतकाच आवश्यक समजला जाणारा ” कर्जतचा दिवाडकर वडा ” हा कर्जत बाहेरही त्याच नावाने अलिकडे विकला जातो

पुण्यात रमणबागेजवळ प्रभा विश्रांती गृह ( लिमिटेड स्नॅक, वेळेचं बंधन, पुणेरी शिस्त), टिळक रोडला बादशाही, केळकर म्युझियमजवळ बापट, दिनानाथजवळ वझे यांचा खडकी वडा आणि असे असंख्य व्यवसायिक चारी दिशा विखुरले असून आपापली विशिष्ठ चव राखून आहेत.

गोर गरिबांची अत्यल्प दरात भूक भागवणारा, लग्नाच्या जेवणावळीत हॉट फेवरिट ठरणारा आणि खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवणारा हरहुन्नरी बटाटेवडा मला खरोखरच पूजनीय वाटतो.

आकाशात ढग जमू लागले आणि पावसाची चाहुल लागली की जो तो या पेटपूजेसाठी या वड्याची पूजा बांधायच्या गडबडीत मग्न होतो.

आमच्याकडेही आज वड्याची पूजा आहे! अवश्य या!!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..