नवीन लेखन...

बालपणीचा काळ सुखाचा

‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते. या आवर्तातून जेव्हा आपले बालपण जात असते, तेव्हा आपले पालक व वडीलधारी मंडळी सणावारांची, सोहळ्याची पूर्वतयारी करीत असतात. त्यातूनच वातावरण निर्माण होते त्या त्या सणाचे. प्रत्येक सणाचा माहोल वेगळा. बालपणापासून वर्षानुवर्षे ही वातावरण निर्मिती , प्रत्यक्ष सण व नंतरची किंचितशी मरगळ या चक्रातून जात जात आपण पालक-वडीलधारे बनतो. पूर्वतयारीची धुरा आपल्याला वाहावयाची असते. पूर्वसंस्कारातून आपण ही जबाबदारी पार पाडीत लहानग्यांवर संस्कार करीत असतो.

वर वर्णिलेली वातावरण निर्मिती ही कुटुंबाशी निगडित आहे. समाजाचं काय? त्याचाही परिणाम होत असतो की बालमनावर. आपल्या बालपणी, सुदैवाने म्हणा, सामाजिक वातावरण सणासुदीला समर्पक होते असे आपण म्हणू शकतो. पण आज आसपास घडणार्‍या घटना समाजावर कशा परिणाम करतात ते आपण बघतो. सणांचे सार्वजनिक स्वरूप बदलत आहे. हा बदल असा होतो आहे जो सणांच्या मूळ उद्दिष्टांशी फारकत घेतल्याचे दाखवत आहे. त्यामुळे मुलांच्या मनावर विपरित संस्कार घडत आहेत. रस्ते खणून मांडव उभारणे, हवा व ध्वनी प्रदूषण करणे या प्रथा अपेक्षित वातावरण निर्माण करतात का? हेच सणांचे खरे सार्वजनिक स्वरूप आहे असे नव्या पिढीला वाटले तर नवल नाही.

मुलांवर अप्रत्यक्षपणे संस्कार आणखीही एका स्तरावरून होत असतात. नोकरी-व्यवसाय करणार्‍या पालकांप्रमाणेच मुलांना खूप वेळ घराबाहेर काढावा लागतो. पाऊस, पूर या नैसर्गिक कारणांनी तसेच बंद, मोर्चे या अनैसर्गिक कारणांनी होणार्‍या गैरसोयी मुलं सोशीत असतात. अचानक होणारे उद्रेक जनजीवन विस्कळित करतात. घराबाहेर पडल्यावर मुलांवर आसपासच्या लोकांचा प्रभाव पडत असतो. वाहन चालविण्याच्या पालकांच्या सवयी मुले पहात असतात. वाहतुक नियमांविषयी आडाखे बांधत असतात, बरे-वाईट अनुभव घेत असतात. यातून भावी वाहन चालक घडतात. परवाना धारण करण्याचे वय नसलेली मुले जेव्हा वाहन चालवितात, तेव्हा त्याला पालक शंभर टक्के जबाबदार असतात. मग ते त्यांच्या मर्जीनुसार होत असो वा नसो. हल्ली नियम पाळायचे असतात याचे भान क्वचित कोणी ठेवतो. नियमभंग उघडकीस आल्यावर सुटकेचा मार्ग चोखाळण्याची व्यवस्था कशी करायची यात बहुतेक जण तज्ञ असतात. हे सर्व काही मुलांना रोज दिसत असते. याचा परिणाम त्यांच्यावर होतो. एखाद्या नेत्याच्या आगमनाआधी केलेली मारहाण, तोडफोड, रस्ते खणणे अशा घटना प्रसारमाध्यमांवर ‘वातावरण निर्मिती’ अशा शब्दात येतात. परीक्षेआधी कॉपीचे सेटिंग करणे व पेपरफुटीची प्रतीक्षा करणे ही विद्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीची ‘वातावरण निर्मिती’? या सगळ्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल असे वाटते? चांगला परिणाम होत नाही असेच म्हणावे लागते.

आपले पालक आपल्याला वेळ देऊ शकत होते. घरातील सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची सवय आपल्याला झाली. आपल्यावर झालेले हे संस्कार, आता कुटुंब व्यवस्था बदलली असल्याने मुलांवर होणार नाहीत. याची भरपाई कशी होणार? घरात संभाळ करणारे कोणी नसल्याने डे—केअर चा आधार घ्यावा लागतो. नोकरी-व्यवसाय करणार्‍या पालकांना मुलांशी संवाद साधण्यास वेळ मिळत नाही. नव्या तंत्रज्ञानात मुलांना गुंतवून ठेवताना त्यांना एकाकीपणाचे धडे मिळत जातात. मिळण्या-मिसळण्यासाठी वेळ काढू शकणारी दोन कुटुंबे तरी असावी लागतात, नात्यातली किंवा परिचयातली. हे अशक्य वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे. आपल्याहून वडीलधारे यांच्याशी फार संबंध येत नसल्याने समवयस्कांशी संवाद हीच काय ती बालकांना अनुभवांची देवाण-घेवाण कारण्याची संधी. सुट्टीत एकमेकांकडे राहण्यासाठी जाणारी मुले कमी आहेत. कारण, त्यांना मोकळेपणा बहाल करणारी सुट्टी मिळत नाही, अडकवून टाकणारी सुट्टी मिळते. सुट्टी शाळेला असते, मुलांना नाही. मुलांच्या भविष्याच्या काळजीने ग्रासलेले पालक मुलांना कशात ना कशात गुंतवून ठेवतात. आपला रोजचा परिसर, रोजचे गेम व गॅझेट्स यापासून काही काळ दूर राहण्यासाठी मुले कितपत तयार असतात हाही प्रश्नच आहे. अशा तयारीत असलेल्या दोन मुलांना एकमेकांच्या घरी राहण्यासाठी जाणे जमू शकेल, अर्थात त्यांचे पालक तयार असतील तर. हे अपवादात्मक वाटावे अशी स्थिती आहे. काही काळासाठी रूटीनपासून लांब राहण्याची तयारी असणे किती महत्वाचे आहे हे मुलांना कसे समजून येणार? दुसर्‍या कुटुंबात राहण्याने आपल्या आवडीनिवडी काही काळ बाजूला ठेवण्याचे शिक्षण मुलांना मिळणार कोठून? घरी आई-बाबा सारखे आठवण करून देत असणार्‍या गोष्टी आपण स्वतःहून करू शकतो हा आत्मविश्वास मुलांना कधी अनुभवता येणार? माझ्यात जसे काही गुण आहेत तसा दुसराही गुणी असू शकतो, हे दुसर्‍याच्या घरी राहिल्याशिवाय मुलांना कसे कळणार? ‘आम्ही मुलांना सर्व सुखसोयी देतो, आणखी काय करायचे?’ असा प्रश्न विचारून पालक हा विषय संपवू शकतात. आपल्या पाल्याची परिपक्वतेकडे वाटचाल होते आहे का हे पालकांनी तपासणे आवशयक आहे.

आजचे बालक घडविणे ही जबाबदारी सर्वांची आहे, कुटुंबाची व सामाजाची. जेव्हा ‘वातावरण निर्मिती’ करण्यात सूज्ञपणे वागणारा समाज असेल तेव्हा चांगल्या कार्याची बीजे रोवली जातील. तेव्हा मुलांवर चांगला परिणाम होत आहे असे म्हणता येईल आणि ही मुले त्यांच्या मोठेपणी, ‘बालपणीचा काळ सुखाचा’ म्हणू शकतील. अन्यथा या ओळी फक्त कवितेत राहतील.

— रविंद्रनाथ गांगल 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..