नवीन लेखन...

बालनाट्याचं देणं

The Focus  च्या जानेवारी 2022 अंकात प्रकाशित झालेला  राजू तुलालवार यांचा लेख.


भावी कलाकार घडवणं, एवढंच बालनाट्याचं उद्दिष्ट असतं का? बाल कलाकार मोठे होतात तेव्हा स्वतःचं करियर करताना, त्यांना बालनाट्याचा फायदा होतो का? व्यक्तिमत्व विकासाचं साधन म्हणून पालक बालकांना बालनाट्य शिबिरात पाठवतात. नाट्यशिबिर आणि बालनाट्य प्रयोग यांचा मुलांच्या जडण-घडणीत काही उपयोग होतो का? बालनाट्य मुलांना नेमकं काय देतं? बालनाट्य क्षेत्रात इतकी वर्ष कार्य करताना वरील सर्व प्रश्नांची उत्तरं मला मुलांकडूनच मिळाली. ती सर्व सकारात्मक होती. बालनाट्यात काम केलेले बाल कलाकार आज मोठे होऊन आपल्या बालनाट्य अनुभवाविषयी आपुलकीने बोलतात, तेव्हाच बालनाट्याचे महत्व आणि महती कळते. चैतन्य ताम्हाणे (कोर्ट आणि डीसाईपल या सिनेमाचा नामवंत दिग्दर्शक), राजू सावंत (रात्रीस खेळ चाले या आणि अशा अनेक मालिकांचा लोकप्रिय दिग्दर्शक), सचिन कुलकर्णी, धवल कुमार पोकळे, श्रद्धा पोखरणकर, श्रेयस राजे (अभिनेता), अमोघ फडके (प्रकाश योजनाकार), संतोष मिठबावकर आणि सचिन खामकर (कॅमेरामन), राजेंद्र नानोजकर (एडिटिंग) हे सारे आमच्या चिल्ड्रन्स थिएटर अकॅडमीचे बाल कलाकार. यांनी बालनाट्यातून स्फूर्ती घेत आपलं पुढील करिअर नाटक, मालिका आणि सिने क्षेत्रात घडवलं. हे सर्व आजही बालनाट्याचे ऋण मान्य करतात. बालनाट्याच्या प्रभावामुळे हे सर्व आज या क्षेत्रात आहेत.

मालिका-सिनेमांच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात गेलेल्या मुलांचं काय? त्यांना त्यांचे क्षेत्र निवडतांना आणि त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होताना बालनाट्याची मदत झाली का? करिअर करताना बालनाट्याचा अनुभव उपयोगी आला का? नक्कीच आला ! सानिका कुसुरकर ही सध्या In Marathi या वेबसाइटसाठी संपादिका म्हणून काम करत आहे. गेली आठ वर्ष ती पत्रकारिता क्षेत्रात आहे. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स अशा नामवंत मराठी वृत्तपत्रांसाठी तिने पत्रकारिता केली आहे. शाळा-कॉलेजात तिने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. पत्रकार म्हणून बोलण्याचे प्रसंग तिला अनेक येतात; यातले काही कडू-गोड, बरे-वाईट असतात. बोलण्याचे धाडस आणि बोलण्याची आवड बालनाट्यामुळे माझ्यात आली असं सानिका सांगते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलाखाती घेताना कधीच दडपण आलं नाही. कला क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखाती मी सहजपणे घेऊ शकते. अगदी लहान असताना आई वडिलांनी मला तुमच्या बालनाट्य शिबिरात पाठवलं, मला त्याचा फायदा झाला. लोकांसमोर उभे राहण्याचे धैर्य आणि बाळकडू मला तिथेच मिळालं. शाळा-कॉलेजात कथाकथन करताना, वक्तृत्व स्पर्धा गाजवताना मला बालनाट्य प्रयोगात मिळालेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला.

दिलीप यादव आता ट्यूलिप हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड चा डायरेक्टर आहे. पूर्वी केसरीत होता. ट्रॅव्हल कंपन्यात बालनाट्य क्षेत्रातील अनुभवाचा फार फायदा होतो. त्याचं खरंही आहे. इंद्रजीत देशमुख, पुनम होंबाळी, सुखदा बर्वे यासारखे आमचे बालकलाकार वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यात नोकरी मिळवून यशस्वी झाले. सुखदा बर्वे तर आता यशस्वी प्रायमरी टीचर आहे. टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीत ग्राहकांशी बोलताना त्यांना गाईड करावं लागतं लीड करावं लागतं. नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना हे सहज जमतं. म्हणूनच बहुधा बालनाट्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ट्रॅव्हल कंपनीत नोकरीसाठी पसंती मिळते. दिलीप यादवने हे सांगताना मला त्याच्या….

आयुष्यात घडलेला एक अविस्मरणीय प्रसंग सांगितला. नव्वदीच्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे साम्राज्य असताना एकदा त्यांची बस दहशतवाद्यांनी अडवली आणि घेरली. सर्वांना घाम फुटला. यावेळेस प्रसंगावधान राखून दिलीप शांतपणे बसमधून उतरला. अतिरेक्यांशी बोलला. त्यावेळेस त्याने नाटक केलं आणि त्यांना सांगितलं की, ही बस अमुक एका स्थानिक राजकारण्याच्या लग्नाच्या वरातीची बस आहे. दहशतवाद्यांनी मग ती बस जाऊ दिली आणि एक मोठे संकट टळलं. दिलीप सांगतो, त्या दिवशी मी बालनाट्याचे मनातल्या मनात आभार मानले.

मानस कुमठेकर हा १९८९ साली आमच्या बालनाट्य शिबिरात होता. आज तो दुबईमधील एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर आहे. अनेक देशांच्या प्रतिनिधींचे तो नेतृत्व करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. हा मानस म्हणतो, ‘मी अभ्यासात हुशार नव्हतो. नाही. पण मी बोलण्यात हुशार आहे. बोलण्यातून मी हुशार असल्याचा आव चांगला निर्माण करू शकतो. बोलणं माझं अमोघ शस्त्र आहे. बोलण्याच्या चातुर्याने मी कंपनीत अल्पावधीत वरच्या पदाला पोहोचलो. बोलण्याची आवड, बोलण्याचं कसब, माझ्यात आलं त्या बालनाट्याचा मी ऋणी आहे. मानसने हे ऋण मान्य करताना आणखीन एक महत्त्वाची कृती केली. २०१४ साली त्याने आमच्या बालनाट्याचा एक प्रयोग दुबईमध्ये आयोजित केला. मराठी बालनाट्याची जादू तेथील स्थानिक भारतीयांना कळावी, म्हणून त्याने हे आयोजन केलं आणि आत्ताच्या बाल कलाकारांना दुबई वारी घडवली.

श्रुती देसाई ही सध्या psychologist म्हणून कार्यरत आहे. तिच्या पेशात बोलणं महत्त्वाचं. त्याहीपेक्षा ऐकणं महत्त्वाचं. ‘दुसऱ्यांचं ऐकून घेणं ही क्रिया मला बालनाट्यातून कळली’ असं ती आवर्जून सांगते. ‘व्हॉइस कल्चर, संभाषण चातुर्य, मला बालनाट्यातून कळलं, उमजलं. Pauses चा उपयोग आणि महत्व मला बालनाट्यातून तेव्हाच कळलं होतं, जेव्हा माझ्या एका शब्दाला नाट्यगृहात हशा आणि टाळ्या मिळायच्या. सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करताना संवाद खूप महत्त्वाचा. समोरच्याला बोलतं करण्यासाठी आधी माझ्याविषयी त्याच्या मनात विश्वास संपादन होणं महत्त्वाचं. बोलण्यातून हे साधावं लागतं. आज मी नेमकं बोलू शकते. बोलून समोरच्याच्या मनातलं नेमकं बाहेर काढू शकते. बालनाट्य केल्यामुळे हे घडलं आणि शक्य झालं.” अशी पुस्ती ती जोडते.

अनुप पुरोहित हा बडबड्या मुलगा बालनाट्य शिबिरात दाखल झाला, तेव्हा कुमार वयातून नुकताच बाहेर पडला होता. कोणतं करियर करावं याबद्दल त्याचा निर्णय होत नव्हता. बालनाट्यात त्याच्या बडबड्या स्वभावाला वळण मिळालं. बालनाट्यातून त्याने बोलण्याचं कसब प्राप्त केलं. सोबत प्रेक्षकांसमोर बोलण्याची आवड त्याने जोपासली. त्याचं वाक्चातुर्य आणि संभाषण कला त्याला पुढे आयुर्विमा क्षेत्रात घेऊन गेली. अल्पावधीत तो पायऱ्या चढत अधिकारी पदापर्यंत पोहोचला. एके काळी सायकलने शिबिरात येणारा अनुप आज स्वतःची गाडी घेऊन फिरतो तेव्हा अभिमान वाटतो. आजही बोलण्याची प्रचंड आवड असलेला अनुप सांगतो, “आज मी माझ्या मुलीला अभिनय करत दररोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. घरातच मुलीला नाटकाचे प्राथमिक धडे देतो आणि सोबत माझीही नाटकाची उरलेली हौस भागवून घेतो. ती माझी प्रेक्षक असते आणि माझ्यावर प्रचंड खुश असते. अजून काय हवं असतं आयुष्यात?” अशी बरीच उदाहरणे देता येतील. मात्र प्रमोशन करणं हा या लेखमागील उद्देश नसून बालनाट्य आणि बालवयात त्यामुळे मुलांवर होणारे संस्कार याचा फायदा फक्त नाटक करण्यासाठीच होतो असं नाही, तर त्यातून विकसित होणारं संभाषण कौशल्य, धीटपणा, परखडपणा, भावनिक बंध यांचा पुढील आयुष्यात, कोणत्याही क्षेत्रात कसा उपयोग होतो हे दाखवण्यासाठी ही उदाहरणं आहेत.

या डिजिटल मासिकाची संपादिका तपस्या नेवे हे देखील ठळक उदाहरण ठरावे. बालकलाकार तपस्या अभिनयात उत्तम होतीच. आज ती उत्तम निवेदिका, संवादिका, साहित्यिक, ग्रंथपाल आणि निष्ठावान रंगकर्मी देखील आहे. ती सांगते, “मराठी रंगभूमीशी माझी नाळ जोडली गेली ती बालनाट्याने. तुमच्याकडे शिकताना याच क्षेत्रात आपण काहीतरी करू शकतो हे मनाने पक्कं ठरवलं होतं. सुरवातीला खूप अबोल असणारी मी बालनाट्य करता करता फुलत गेले. आज ग्रंथपाल म्हणून काम करताना अनेक लोकांशी संपर्क येतो, त्यांना समजून घेऊन संवाद साधावा लागतो. या संवादकलेचे मूळ माझ्यात रुजले ते बालरंगभूमीवरच. माझं आयुष्य बदललं, त्याला एक दिशा मिळाली.”

आजवर आमच्या बालनाट्य संस्थेमधून बालकलाकारांच्या तीन पिढ्या बाहेर पडल्या. मोठे झालेले हे बालकलाकार आजही आवर्जून इंटरनेट आणि समाज माध्यमांवर भेटतात. बालनाट्याच्या जुन्या आठवणी जागवतात आणि आपल्या आयुष्यात बालनाट्य कसं उपयोगी पडलं ते सांगतात. मला वाटतं इतरही बालनाट्य करणाऱ्या संस्थांचाही हाच अनुभव असणार.

अनुजा गोखले ही उच्चशिक्षित, तरीही फोटोग्राफीचा छंद जोपासणारी, अमेरिकेत स्थायिक झालेली बाल कलाकार आहे. आजही बालनाट्याचे उपकार मान्य करणारी आहे. नुकताच तिने व्हाट्सअपवर मला पाठवलेला मेसेज मी येथे शेयर करतो आणि या लेखाचा समारोप करतो.

ती काय म्हणते पहा….

Just to create a better world, memorizing formulas, equations, poems is not enough. It is important to understand what our world is about and it is essential to be creative, self-confident and have empathy. Moreover effective communication and collaboration, problem solving and to be aware of social issues is crucial. I had to privilege to be trained at Theatre Academy under the guidance of my Guru Raju Tulalwar. Learning drama has encouraged me to think, act and behave creatively in all areas of learning as well as life. Thank you for sharing your gift of teaching. You made me realize that I can still include theatre in my life as much as possible. (ANUJA GOKHALE)

— राजू तुलालवार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..