नवीन लेखन...

‘अस्तु’ – उत्तरायणाचे लामणदिवे !

काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे !

“अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं.

अशा एखाद्या भूमिकेसाठी, कथेसाठी भले भले जाळं टाकून बसले असतात, कारण पैसे /प्रसिद्धी यापेक्षाही काहीतरी उत्तुंग करणारे वाट्याला येते. मग तो “वेन्सडे ” मधला नासिर असो कीं “फिराक “मधला परेश असो आणि मराठीतल्या स्टार -मांदियाळी वाल्या “सिंहासन “मधला निळू फुले (दिगूभाऊ ) असो.

येथेही मोहन आगाशे ,इरावती आणि अमृता सुभाष छा जाते हैं ! सगळा चित्रपट मोहन आगाशेंच्या बुजुर्ग खांद्यावर हळुवार विसावतो. “जैत रे जैत ” पासून व्हाया “घाशीराम ” हा कलावंत कायम प्रगल्भ आणि दोन बोटे उंच वाटतो. “अस्तु “मधील अल्झायमर झालेल्या शास्त्री रूपात त्यांना बघणं हाच एक संपन्न अनुभव ! कानडी हेल काढून बोलणारी अमृता फक्त केवळ! इरावती – एका परीने हतबल, एका बाजूला कुटुंबवत्सल, आणि आपल्यापेक्षा वडिलांना आपली बहीण जास्त आवडते यांत गुरफटलेली !

म्हटलं तर दिवसभराची कथा पण नात्यांचे असंख्य पाश एकमेकात गुंतवणारी ! सगळे आपापल्यापरीने बरोबर, जागच्या जागी योग्य पण तरीही अपरिहार्य गुंता !

” आपली मुलं वाईट नाहीत गं , वाईट आहे ते आपलं म्हातारपण ! ” असं गणपतराव बेलवलकरांच्या तोंडून कुसुमाग्रज बोलून गेले त्याला चारहून अधिक दशके ओलांडून गेली. पण प्रश्न अजून तेथेच .

वाढते जीवनमान हा अलीकडील स्वागतार्ह बदल मानावा कां ? त्यामुळे गृहस्थाश्रमापेक्षा वानप्रस्थाश्रम अधिक प्रदीर्घ होत चाललाय.

वृद्ध वडील न सांगता कारमधून एकटे निघून गेले, त्यांत त्यांना अल्झायमर ! शोधायचे कुठे आणि किती ? भरीस भर म्हणून हव्या -नकोशा जुन्या आठवणी पायात घुटमळताहेत. इला -भाटेंच्या रूपाने एक छोटसं संशयकल्लोळ उमटून जातं आणि यथावकाश प्रवाह निर्मळ होतो.

त्यांत धाकटी बहीण , मुलीचे गॅदरिंग , वडिलांचा कोष , परिघावरील समजूतदार पती हा एक पट ! आणि हत्तीवाला , त्याची भाविक पत्नी , छोटी मुलगी आणि त्यांच्याबरोबरही “बाल्यासह “विरघळून गेलेले शास्त्रीबुवा असा दुसरा पदर !

भूक लागली म्हणून बालकासारखे अमृताकडे हट्ट धरतात , तिला अभावितपणे “आई “असे संबोधतात आणि हत्तीच्या कुशीत निरागसपणे झोपी जातात – हेही शास्त्रीबुवांचे रूप ! संस्कृत सहजपणे तोंडपाठ असलेले ज्ञानी पंडीत हे एरवीचे रूप  !

अशी मंडळी आत्ता आत्ता पर्यंत अस्तित्वात होती.

माझ्या वडिलांचे मामा – अमळनेरच्या शाळेतील संस्कृतचे प्रकांडपंडित ! भुसावळला आमच्या घरी आले की सगळे हबकून जायचे .आम्हा मुलांना जेवणाच्या ताटावर संस्कृत शब्द चालवून दाखवायला सांगायचे आणि उच्चारांबाबत महा काटेकोर !!

” अस्तु ” बघताना मला ते आठवले.

उत्तरायण अपरिहार्य पण मला वाटतं ते पूर्वायुष्यापेक्षाही अधिक खडतर पण पिकलेलं ! म्हणूनच उरलं -सुरलं , राहून गेलेलं शिकवणारं !

शास्त्रीबुवांची आई होणं अमृताला सहज जमलं – त्यांत तिची सोप्पी जडणघडण आणि पोटापलीकडे फारशा परीक्षा न पाहणारे जीवन तिच्या मदतीला आले असावे.

पण अमृताने लहान वयातही जीवन “पाहिले ” आहे. मुळातच ती एक प्रगल्भ व्यक्ती आहे.

वाढत्या वयाबरोबर समस्याही वाढत असतात आणि त्यांची उत्तरंही अवघड बनत जातात.

या चित्रपटाचे एक बरे आहे.

चित्रपटाच्या नावातच उत्तर आहे . “अस्तु “- असो !! सगळं बिनबोभाट स्वीकारायचं आणि अस्तु म्हणायचं – कागदावर कित्ती सोप्पं आहे नाही?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 142 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..