नवीन लेखन...

अनुभव

पावसाळी सकाळ होती. माधवी घाईने बँकेत शिरली. कामाला भिडणार तेवढ्यात तिला साहेबांच बोलावणं आलं. शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी नॉमिनेशन नाही अशा अकाउंटस्ची एक मोठी लिस्ट तिच्या हातात ठेवली. नॉमिनेशन नसेल तर डेथ क्लेमसाठी ग्राहकांचा वेळ व पैसे खर्च होतात. त्यामुळे सर्व डिपॉझिटस्ना नॉमिनेशन असलं पाहिजे असा फतवा रिजनल ऑफिसने काढला होता. तिने लिस्टवरून नजर फिरवली. त्यात बुद्धीसागरांचे नाव दिसले. ते शाखेच्या जवळच राहतात. माधवीने त्यांना फोन करून नॉमिनेशन करण्याविषयी सांगितले. त्यांची दोन्ही मुलं अतिशय हुशार. दहावी व बारावीला बोर्डात आली होती. आता दोघेही अमेरिकेत आहेत, पण आई-वडिलांशी फारसा संपर्क ठेवून नाहीत असे ऐकले होते. बुद्धीसागर मॅडमनी सांगितले की, त्यांना नॉमिनेशन करायचं नाही.

माधवीने त्याना समजावण्याचा प्रयत्न केला की मुलांची नावे वारस म्हणून घालायचे नसतील तर भाऊ-बहीण किंवा कोणी नातलग यांची नावे तुम्ही वारस म्हणून घालू शकता. पण त्यांना ते पटलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्याना वारस नोंद करायची नाही. त्यांनी मुलांना खूप कष्ट घेऊन शिकवलं. त्यांची दोन्ही मुलं इंजिनीयर होऊन मास्टर्स करायला अमेरिकेत गेली आणि तिथेच स्थिरावली. श्री व सौ. बुद्धीसागर दोघेही अतिशय चांगले होते. त्यांच्याविषयी माधवीला खूप वाईट वाटलं.

माधवी नॉमिनेशनच्या यादीवर नजर टाकत होती. डोक्यात डिपॉझिट टार्गेटस्चे विचारही होते. तेवढ्यात कॅश केबीनजवळ विजयाचा जोरात बोलण्याचा आवाज आला. तिने चीफ कॅशियर पूजारीला फोन केला. तो म्हणाला, ‘मॅडम, विजयाला कॅश कमी आहे अस वाटतंय.’ तिला मी थोडा वेळ काउंटर बंद करून कॅश टॅली करून घ्यायला सांगितले आहे.’ माधवी म्हणाली, ‘ठीक आहे.’  एवढ्यात स्टार ग्रुपच्या मेहता सरांचा फोन आला. ते म्हणाले, ‘बँकेतून आमच्या ऑफिसला फोन आला होता. त्यांनी विजया असं नाव सांगितलं. त्यानी मला सांगितलं, तुम्ही आता भरलेल्या कॅशमध्ये दोन हजार रुपये कमी आहेत.’

मी त्यांना सांगितलं, ‘पुन्हा एकदा कॅश चेक करा. आमच्याकडे कॅश तीन वेळा मोजली जाते. मि. हेक्टर जे कॅश भरायला येतात ते आमच्याकडे वीस वर्षे नोकरी करतात. आमचे या ऑइल डेपोशिवाय आणखीही व्यवसाय आहेत. बँकेबरोबर वीस-पंचवीस वर्षांपासून आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही अनेक वेळा सकाळीच ऑइल डेपो/ पेट्रोल पंपाची 25-30 लाख रुपयांची कॅश भरतो. कॅश व स्लीप दोन्ही कॅशियरकडे देतो. तीनच्या सुमारास आमचा माणूस स्टॅम्प मारलेली स्लिप घेऊन जातो. आमचा बँकेवर पूर्ण विश्वास आहे. तसाच बँकेनेही आमच्यावर थोडा विश्वास टाकायला हरकत नाही.’

मी त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही पैसे परत मोजा व कमी असतील तर आम्ही भरू.’ पण त्यांनी मला पैसे ताबडतोब भरायला सांगितले. त्यांच्या बोलण्याचा सूर मला आवडला नाही. ‘आमचा माणूस आता पैसे घेऊन निघाला आहे.’

विजया एक नवीन मुलगी होती. जेव्हा कॅश जास्त असेल तेव्हा तिसरा कॅशियर म्हणून मदत करण्यासाठी तिला सांगितलं जायचं. विजया वीस-बावीस वर्षांची अत्यंत घायकुत्या स्वभावाची पण कष्टाळू मुलगी होती. कुठलंही काम करायला ती नेहमी तयार असे. घरची परिस्थिती अतिशय गरीब असलेल्या विजयाला वागण्याचा पोच कमी होता. मनात जे येईल ते तसेच बोलून ती मोकळी होई. हुशारीने बोलण्याची कला तिला अवगत झाली नव्हती. तिच्या फोनने मेहता चांगलेच रागावले होते.

माधवी त्यांना म्हणाली, ’विजया ही नवीन मुलगी आहे. अजून ती ग्राहकांना व्यवस्थित ओळखत नाही. तिच्या वतीने मी तुमची क्षमा मागते. स्टार ग्रुपवर बँकेचा पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे काहीही  अडचण आली तरी आपण चर्चा करून सोडवू शकतो. मला आत्ताच कॅशियर पुजारीने सांगितलं की, विजयाला कॅश कमी लागली आहे आणि ती आता काउंटर बंद ठेवून कॅश टॅली करतेय. मी अर्ध्या तासात तुम्हाला फोन करून काय झालं ते सांगते.’

दहा मिनिटांतच विजया कॅशबरोबर आहे, माझी मोजण्यात काहीतरी चूक झाली होती असं सांगत आली. माधवीने तिला सौम्य शब्दात समज दिली. माधवीने मेहतांनाही फोन करून त्यांची परत माफी मागून त्यांना कॅश बरोबर असल्याचं सांगितलं आणि पुन्हा तिच्या कामाकडे वळली.

निशा तिला जेवायला येण्याविषयी खूण करत होती. माधवी तिला म्हणाली, ‘निशा, मला आज जेवायला उशीर होणार आहे. सगळी कामे बाकी राहिली आहेत. तुम्ही जेवून घ्या.’ असं सांगून माधवीने कामे उरकायला घेतली. काम करताना तिला सहा महिन्यांपूर्वीचा लॉकरचा डेथ क्लेम आठवला.

पारशी आजी-आजोबांचा बँकेत मोठा लॉकर होता व त्यांची बरीच फिक्स डिपॉझिटही होती. दोघेही लॉकर ऑपरेट करायला येत. आजोबा गेल्यानंतर आजी एकट्याच रहात होत्या. पारसी असूनही त्या चांगलं मराठी बोलत. बोलक्या स्वभावांच्या आजी आल्यावर थोड्या गप्पा मारूनच जात. कधीकधी सगळ्यांसाठी चॉकलेटचा डबाही घेऊन येत. त्यांच्या गप्पातून माधवीला समजलं की आजींना मूलबाळ नव्हते. आजी-आजोबा दोघेच रहात. त्यांच्याकडे एक बाई दिवसभर काम करत असे. आठ-दहा वर्ष झाले. आता गंगाबाई त्यांच्याकडेच राहत होती. ती घराची देखभाल करे, स्वयंपाक करे. गंगाबाई अतिशय विश्वासू होती. आजी-आजोबानी, तिच्या नावावर 25 लाख रुपये ठेवले होते. त्याचे व्याज तिला पगाराव्यतिरिक्त मिळे. आजी-आजोबा नसले तरी तिला काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी वृद्धाश्रमाला देणगी देऊन गंगासाठी जागा पक्की करून ठेवली होती.

पण वर्षापूर्वी तीही वारली. आता आजी एकट्याच राहतात. त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा यश आजीकडे रात्री राहायला येई. त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च आजींनी केला होता. यश नुकताच नोकरीला लागला होता. ड्रायव्हरच्या कुटुंबालाही त्या भरपूर मदत करीत. पण आजी म्हणाल्या, ‘माझा यशवर फारसा विश्वास नाही. त्याला माझ्या मोठ्या फ्लॅटची आशा आहे. पण खरं म्हणजे मी रजिस्टर वील करून फ्लॅट व लॉकर दोन्ही समाजासाठी काम करणाऱ्या पारसी ट्रस्टच्या नावे केला आहे. पण मी हे त्याला सांगितलं नाही. माझा ड्रायव्हर साधा आहे. त्याच्या नावे मी पंधरा लाखाची फिक्स डिपॉझिट रिसीट ठेवली आहे.’

माधवी म्हणाली, ‘तुम्ही काळजी घ्या. वीलची एक कॉपी बँकेला देऊन ठेवा.’

आजी म्हणाल्या, ‘लॉकरमध्ये माझे, माझ्या आईने व सासूबाईंनी मला दिलेले सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आहेत. त्याची अंदाजे किंमत एक करोड रुपये असेल.’ त्यानंतर वर्षभरातच त्या संस्थेचे ट्रस्टी आजीचा मृत्यू दाखला व मृत्युपत्र घेऊन आले. नंतर एक दिवस वेळ ठरवून रिजनल ऑफिसचे ऑफिसर, ब्रँच ऑफिसर, ट्रस्टी, दोघांचेही साक्षीदार आणि किंमत ठरवण्यासाठी सोनार यांच्यासमोर लॉकर उघडला. लॉकर मधले वेगवेगळ्या डिझाईनचे, लखलखते दागिने पाहून सगळ्यांचे डोळे दिपले. लॉकरमधल्या दागिन्यांच्या याद्या फुलस्केप पेपरवर बनवल्या. चार वाजता सुरू झालेलं काम साडेआठपर्यंत चालू होतं. काम चालू असताना माधवीला आजी आठवत होत्या. समाजाकडून आपल्याला मिळालेलं समाजाला परत केलं पाहिजे असे त्यांचे विचारसुद्धा आठवले. चांगल्या संस्थेला काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची त्यांची वृत्ती सगळ्यांनाच खूप शिकवून गेली. बुद्धिसागर मॅडमना हा विचार सांगितला पाहिजे अस माधवीने मनाशी ठरवलं.

माधवीचं काम आटपत आलं. आणखी एक व्यस्त दिवस संपला. पंचवीस वर्षाच्या नोकरीतल्या भल्याबुऱ्या अनुभवाने तिचे आयुष्य समृद्ध झाले आहे याची माधवीला जाणीव झाली.

-संध्या सिनकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

1 Comment on अनुभव

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..