नवीन लेखन...

संगीतावर प्रचंड विश्वास असलेले : अनिल विश्वास

एखादी घटना प्रत्यक्ष बघणे, वाचणे वा ऐकणे यातील अनुभवात बराच फरक पडू शकतो. चित्रपट आपण एकाचवेळी बघतही असतो आणि ऐकतही असतो म्हणून त्याचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच चित्रपट प्रदर्शीत होण्या आगोदर त्याची गाणी वा संवाद जाहिरातीसाठी वापरले जातात. ते ऐकून आपली उत्सुकता ताणली जाते व आपण चित्रपटगृहाकडे वळतो. १९४२ मधील ‘चले जाव’ चळवळी पासून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. चित्रपटसृष्टीतही अनेकजण या चळवळीकडे आकृष्ट होत होते. गुलामीची एक बोचरी सल नेहमी कलावंताच्या मनात आगोदर उमटत असते. साहित्यीकानां प्रेरीत करणाऱ्या घटना मग यातुन घडत जातात.

“बॉम्बे टॉकीज” ही त्याकाळातील एक मात्तब्बर चित्रपट निर्मिती संस्था. हिमांशू रॉय व देविका राणी हे जोडपे याचे मालक. १९४३ मध्ये या बॅनरचा “किस्मत” नावाचा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि चित्रपटसृष्टीत अनेक विक्रमांची नोंद झाली. तिकिट विंडोवर तर या चित्रपटाने कळसच गाठला. १९४३ मध्ये या चित्रपटाने एक कोटीचा नफा मिळवला म्हणजे आजचे जवळपास ६०-६५ कोटी.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

कोलकत्त्याच्या एकाच चित्रपटगृहात हा सिनेमा ३ वर्षे चालला हे रेकॉर्ड नंतर ‘शोले’ या चित्रपटाने मोडले. याच चित्रपटातुन सर्वप्रथम Anty hero ही संकल्पना सादर करण्यात आली. अशोक कुमारने यात पॉकेटमार चोराची भूमिका केली होती. याच चित्रपटात सर्व प्रथम डबल रोल ही आला. अशोक कुमारने डबल रोल केला होता. मेहमूदनेही बाल कलाकाराच्या रूपात याच चित्रपटातुन आपली कारकिर्द सुरू केली.इतकेच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपर स्टार (अशोक कुमार) याच चित्रपटाने दिला. याच चित्रपटात कुमारी माता ही संकल्पना सादर केली गेली. याच चित्रपटातुन Lost & Found हा फॉर्मूला सर्वप्रथम वापरण्यात आला जो आजतागायत चालू आहे. याच चित्रपटाने संगीतातील कोरस काय असतो हे अनुभवता आले. तर असा अशा किस्मतने जशी अनेकांची किस्मत फळफळली तशीच एका संगीतकाराची प्रतिभा देखिल याच चित्रपटामुळे जगाला दिसली.

या चित्रपटात एकूण ८ गाणी होती यातील एक गाणे होते “हिमालय की चोटीसे आज तुम्हे ललकारा है, दूर हटो ये दुनियावालो हिंदूस्तान हमारा है”कवी प्रदीप यांनी हे गीत लिहले आणि याला तशीच सळसळती चाल लावली ती अनिल विश्वास या प्रतिभावान संगीतकाराने. या गाण्याने त्या काळच्या तरूणात स्वातंत्र्या बद्दलची ज्वाला मनात निर्माण केली. भारतीय चित्रपटसृष्टीत अनिलदा यानां संगीतकाराचे पितामह म्हणून आजही स्मरले जाते. संगीताचे अफाट ज्ञान आणि तितकीच समर्पित वृत्ती त्यांच्यात होती. संगीतातील अत्यंत सुक्ष्म बारकावे त्यानां अवगत तर होतेच पण चित्रपटासाठी जे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते त्यातही ते कुशाग्र होते. आवाजातील चढ उताराचे अनेक बारकावे त्यांनी लता दीदीना शिकवले नूरजहॉ या गायीकेच्या प्रभावातून त्यानां बाहेर काढले आणि स्वतंत्र प्रतिभेची लता मंगेशकर जगाला मिळाली. अनिलदा लतादीदीना लतिके असे हाक मारत असत. मूकेश देखिल के.एल. सैगलच्या प्रभावाखली होते त्यानांही अनिलदाने बाहेर काढले.तलत मेहमूदचा आवाज अत्यंत तलम व कंपन असलेला. अनिलदांनी तो हेरला आणि हाच तुझा प्लस पाँईंट हे त्याला पटवून दिले. किशोरकुमार त्याच्या अजब गजब याडलिंगसाठी प्रसिद्ध होता. पण याडलिंग शिवाय तो किती छान गाऊ शकतो हे अनिलदाने ओळखले व असे एक निखळ सुंदर गाणे १९५३ मध्ये गाऊन घेतले. किशोरदाने पूढे अनेक गाणी याडलिंग शिवाय गायली. शास्त्रीय आणि लोक संगीत या दोन्हीचा अप्रतिम व्यासंग त्यांचा होता.

त्या काळात नरेन्द्र शर्मा, कवि प्रदीप, गोपालसिंह नेपाली, इंदीवर, डी.एन. मधोक या सारखे गीतकार आणि  नौशाद, रोशन, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सज्जाद, ग़ुलाम हैदर, वसंत देसाई, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, खय्याम या सारख्या प्रतिभावान संगीतकारांच्या मेळ्यात अनिलदा एखाद्या कमळा सारखे दिसत. स्पर्धा अतिशय निरोगी होती त्यामुळे रसिकानां संगीताची मेजवानी मिळत असे. सर्वजण ऐकमेकांचा आदर करत आणि ऐकमेकांच्या प्रतिभेला मन:पूर्वक दादही देत. सी.रामचंद्र सारखे संगीतकार विनम्रपणे अनिलदानां गुरूस्थानी मानत असत. पूर्व बंगाल मध्ये जन्म झालेल्या अनिलदांचा संगीतमय प्रवास कोलकोत्ता ते मुंबई असा सुरू झाला. त्यांची कारिकर्द ३० वर्षांची. मला त्यांची भावलेली गाणी- ये दिल मुझे ऐसी जगह ले चल(तलत मेहमूद), सीने मे सुलगते है अरमान(लता-तलत), दिल जलता है तो जलने दे(मुकेश), आ माहब्बतों की बस्ती बसाएगें हम(किशर-लता…यातला किशोरचा आवाज एकदम वेगळा वाटेल), दूर हटो ये दुनियावाले हिंदुस्ता हमारा है(अमीरबाई कर्नाटकी),जा मै तोसे नाही बोलू (लताबाईचे सुंदर क्लासिकल गाणे),नैन मिले नैन हुए बावरे (तलत -लता),धीरे धीरे आरे बादल…मेरा बुलबुल सो रहा है(लता- आजही हे गाणे तितकेच फ्रेश वाटते), घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डामाडोल….बुद्धम् सरणम् गच्छामी…(मन्नाडे), राही मतवाले.. (तलत-ता), नाच रे मयूरा(मन्नाडे),अब तेरे से कौन मेरा (अमीरबाई कर्नाटकी),आ मोहब्बत की बस्ती बसाँएगे (किशोर-लता)…त्यांच्या गाण्याची यादी खूप मोठी आहे. ती यादी चाळली तर एक गोष्ट लक्षात येते की असा एकही गायक वा गायीका नाही ज्यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतले नाही.

आजच्या पिढीला त्यांची गाणी वा संगीतातले योगदान कदाचित् लक्षात येणार नाही त्यासाठी त्या काळात जाऊनच अनिलदाचे महत्व समजता येईल. ते फक्त चाली लावणारे संगीतकार नाही तर संगीताच्या सर्व शक्यता पडताळून त्याचा पूढील पिढीसाठी कसा ठेवा जपता येईल याचा ते नेहमी विचार करीत आणि हेच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी मेहरून्नीसा भगत उर्फ आशालता ज्यांनी काही चित्रपटात पार्श्व गायन केले तर गायीका मीना कपूर या दुसऱ्या पत्नी. गायीका पारूल घोष ही त्यांची बहीण आणि सुप्रसिद्ध बासरी वादक पन्नालाल घोष यांच्या पत्नी. अमिताभचा “शहेनशहा” आठवत असेल त्या सिनेमाची संगीतकार जोडी अमर-उत्पल. या संगीत जोडीतला उत्पल हा त्यांचा मुलगा. अनिलदा १९६५ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होते मात्र नंतर बदलत्या काळानुसार ते हळूहळू या क्षेत्रापासुन लांब होत गेले. १९७५ नंतर मात्र ते विस्मृतीच्या पडद्याआड जात राहिले ते थेट मृत्यू पर्यंत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना सुमनाजंली वाहिली होती.

-दासू भगत (०७ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..