नवीन लेखन...

अभंग:आत्म्याचे चिरंतन तत्त्व

‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते. तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या या दोन साक्षात्कारी संतांनी ‘अभंग’ रचनेला प्रथम सुरुवात केली आणि शाश्वत मराठी कवितेची ‘अभंग’वाणी अवकाशभर निनादू लागली. उन्हाचे चांदणे करणारे हे दोन अद्भुत महाकवी अभंग वाङ्मयाचे केवळ निर्माते नव्हते, तर अभिजात, तरल, भक्तीसारख्या विश्वाचे आद्यकवी होते. त्या दोघांच्या शांत-शीतल चांदणप्रकाशात अनेक संतकवी पुढील पाच शतके आपला ‘अभंग’ प्रवास करीत, मराठी काव्यसृष्टीत अमर झाले.

तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत हा मराठी शाश्वत कवितेचा शुद्ध आणि अत्यंत पवित्र गंगौघ सतत दुथडी भरून वाहत होता. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी हे पाच बलदंड संतकवी आणि महदाईसा, मुक्ताई, जनाई, बहिणाई आणि वेणाक्का या पाच संतकवयित्रींभोवती शेकडो संतकवी आपल्या अभंगांचे टाळ वाजवत अक्षरशः नाचत होते. एकतारीवर स्वमुखातून प्रगट झालेल्या शाश्वत अभंगांच्या नादात, श्रीविठ्ठलनामाच्या अपूर्व गजरात, अनेक जातिजमातीमधल्या संतकवींनी श्रीविठ्ठलाभोवती फेर धरला. अवघा वारकरी संप्रदाय, भक्तिगंगेत श्रीविठ्ठलाचे अखंड नाम घेत न्हात होता. सातशे वर्षं उलटून गेली. मराठी भाविक भक्तांच्या रंध्रारंध्रातून या संतकवींचे अभंग पाझरतच आहेत. पंढरपुरात अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला विठोबा, भीमेच्या भक्तीकाठावरचे, प्रेमरसात चिंत भिजलेले आणि वारकर्यांच्या ‘जय जय विठोबा रखुमाई’ या गजराने गजबजून गेलेले पंढरपूर, आषाढी-कार्तिकीची पायवारी आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे संतवैभवाचे दर्शन देणारी त्यांची अभंगरचना हे महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न संस्कृतीचे भूषण आहे.

या सर्व संतकवींची अभंगरचना आपण प्रत्यक्ष अनुभवल्यावर आपले भक्तहृदय अक्षरशः प्रेममयी भक्तीने उचंबळून येते. मन आश्चर्याने थक्क होते आणि त्याक्षणी एक विचार मनात येतो की, समग्र संतवाङ्मय हा विश्वातला फार मोठा अक्षरचमत्कारच तर आहेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे जगातले आठवे आश्चर्य आहे. आपल्या सर्व भक्तांची वाट पाहणारा हा पंढरपूरचा विठोबा, ज्ञानदेवादी सर्व संतांच्या विठ्ठलभक्तीने भारलेल्या आयुष्यात, टपो आणि अत्यंत सुगंधी मोगर्यासारखा अवतीर्ण झाला आणि ब्रह्मांडव्यापी अद्वैत तत्त्वज्ञान प्रगट करणारी गोडगोडुली अभंगरचना, त्या सर्व संतांच्या मुख्यातून या विठ्ठलानेच ही अभंगगंगा प्रगट केली.

दिसो परतत्त्व डोळां। पाहो सुखाचा सोहळा।
रिघो महाबोध सुकाळा। माजी विश्व॥

(ज्ञानेश्वरी 13ः1163)

त्रिगुणातीत परब्रह्माचे सगुण साकार दर्शन प्रत्येक साधक भक्ताला व्हावे आणि परमेश्वरी स्वरूप प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे, या परमसुखाचा दिव्य सोहळा रंध्रारंध्रांनी अनुभवावा आणि संपूर्ण मानवी भक्तिभारले विश्व महाबोध सुकाळाने न्हाऊन निघावे ही ज्ञानदेवांची उत्कट भावना सर्वच संतांनी आणि त्यांच्याच अभंग वाङ्मयविश्वाने सहजपणे सफल केली. ज्ञानदेवांच्या वाग्विलासाचा विस्तार पुढच्या पाच शतकात सर्वच संतांनी आपल्या अभंगांमधून दृष्टिगोचर केला. मानवी विश्वाच्या आत्मिक उन्नतीची विश्वप्रार्थना आपल्या पसायदानातून करणार्या ज्ञानदेवांनी, अभंगवाङ्मयाचा भक्कम पाया रचला आणि केवळ मानवी हित जपणार्या, त्यांचे कल्याण करणारा संतपुरुष निर्माण केला.

ज्ञानदेवांची अभंग परंपरा श्रीविठ्ठलभक्तीतून, अतीव श्रद्धेतून उमलून आली आणि हे हजार पाकळ्यांचे ब्रह्मकमळ अवघ्या संतवाङ्मयातून अभंगांच्या शाश्वत मार्गाने सतत, अखंडपणे उमलून आले. या ब्रह्मकमळाला केवळ उमलण्याचा परमेश्वरी वर लाभला आणि हे सत्य वाङ्मयी अभंग ब्रह्मकमळ, कोमेजण्याच्या शापापासून मुक्त झाले.

तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात अवतारी जन्म धारण करणार्या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांभोवती निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, गोरा कुंभार, बंका महार, सावतामाळी, चोखामेळा, कर्ममेळा, जनाई आणि स्वतः भक्तश्रेष्ठ संत नामदेव रिंगण धरून नाचत होते. नामदेवांचे तर संबंध कुटुंब अभंगरचनेत दंग झाले होते. ज्ञानमयी परमभक्तीचा परमोच्च क्षण या तेराव्या शतकातल्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या कितीतरी संतकवींनी आपल्या अभंगांमधून अधोरेखित केला. ज्ञानदेव म्हणतात,

रूप पाहतां लोचनीं। सुख जाले वो साजणी॥
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा॥
बहुतां सुकृताची जोडी। म्हणुनी श्रीविठ्ठली आवडी॥
सर्व सुखाचें आगर। बाप रखुमादेवीवर॥

विटेवर आपल्या सर्व भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा पंढरीतला श्रीविठ्ठल हीच आमच्या सर्वोत्तम सुखाची, अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे लाभलेली ठेव आहे. आम्हांला विठ्ठल दर्शनाचे अक्षरशः वेड लागलेले आहे. हे तर आमचे परमभाग्य आहे की, या आमच्या प्राणप्रिय दैवताने आमचा हात घट्ट धरला आहे. त्याच्याच सहवासात आम्हांला वैकुंठीच्या घंटांचा सुमधुर नाद नित्य ऐकता येतो. या वैकुंठीच्या घंटांचा नाद प्रत्यक्ष श्रवणपथावर अनुभवता येणे हेच मानवी आयुष्यातले सर्वोत्तम सुख आहे. ऐहिक जीवनाच्या पलिकडचे पारमार्थिक जीवन, ते विठ्ठलविश्वच सत्य आहे आणि तेच आम्हांला हाकारते आहे.

नामसंचय महत्त्वाचा, पुण्यसंचय नाही, याची अनुभूती सर्वच संतांच्या या शाश्वत अशा अभंगवाङ्मयाने दिली. अभंग हा एक छंद आहे, जसा ओवी हा सुद्धा एक छंदच आहे. प्राचीन काव्याने अभंग आणि ओवी या दोन्ही प्रकारांत केवळ तत्त्वज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले. एका पांडुरंगातच आपले अवघे भक्तीभारले ज्ञानमयी आयुष्य सर्वार्थाने गुंतले की, आपले जगणे सुसह्य तर होतेच, त्याहूनही अधिक ते निर्धास्त होते. निर्भय होते. वैकुंठापलिकडचा हे विठ्ठलसंचित सर्व वारकरी संतांनी आपल्या अमर अभंगांमधून आपल्या अनुभवाचा विषय केला. संपूर्ण अभंगवाङ्मयाचा आपण कसून अभ्यास केला, त्यातून प्रगट झालेल्या तत्त्वज्ञानाचा जर आपण अंगीकार केला तर मोक्षाचा दरवाजा आपल्यासाठी परमेश्वर निश्चितपणे उघडतो.

अवघेचि त्रैलोक्य आनंदाचें आतां।
चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ।
अनाथांचा नाथ जनार्दन॥
एका जनार्दनी एकपणे उभा।
चैतन्याचा गाभा शोभतसे॥

भागवतोत्तम संत श्रीएकनाथ महाराज आपल्या अनुभवसिद्ध अभंगभाषेत म्हणतात की, श्रीविठ्ठलाच्या पवित्र चरणी एकदा का आपण आपला भक्ति माथा टेकवला, आपल्या चित्तवृत्ती प्राणपणाने एकवटल्या की मगच या श्रीविठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन सर्वत्र अनुभवता येते. परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे याची प्रचिती आपल्याला येते. आपल्या हृदयगाभार्यात तो वास्तव्य करून आहे याचे आपोआप भान येते. जो परमभक्त आपला प्रत्येक श्वास परमेश्वरी नामातच ओवतो, त्याला जगत असलेल्या आयुष्यात केवळ समाधान आणि तृप्तीचाच लाभ होतो. एकदा का या जगन्नाथाच्या चरणी आपले चित्त एकवटले की अवघे त्रैलोक्य त्याच्याच प्रसन्न अस्तित्वाने संपूर्णपणे भारलेले आहे हे आपल्या ज्ञानभरल्या दृष्टीने पाहता येते. त्या दिव्य क्षणी आपल्या लक्षात येते की, आपले खरे मायबाप म्हणजे हा जगन्नाथच आहे. तोच आपला पिता, तीच आपली माता. आपण अनाथ नाही; तर सनाथ आहोत. तो जगन्नाथ, जगन्नियंता सर्व अनाथांचा नाथ आहे ही खूणगाठ आपल्याला पटते. एकदा का विठोबाचा हात आपण घट्ट धरला की, केवळ सुखच आहे. त्याच्याच चैतन्यात संपूर्ण विश्व उजळून आले आहे आणि विटेवरच्या विठ्ठलामुळेच तर संपूर्ण विश्व सनाथ झाले आहे, हे लक्षात येते.

सर्व संतांनी मानवी समुदायाला एकच अभंग विचार आपल्या साक्षात्कारी अभंगांमधून दिला की, सुखाचे परमोच्च शिखर जर गाठायचे असेल तर केवळ संतसंगतीतच राहा. सद्विचारातच प्रत्येक क्षण वेचा. आत्मसुखाच्या खुणा आपल्याला त्या संतसहवासातच प्रत्यक्ष अनुभवता येतील. त्यासाठी फार काही शास्त्रग्रंथांचे वाचन करायला नको की पूजाविधींमध्ये गुंतून पडायला नको. केवळ संतांच्या मुखातून प्रगट झालेल्या साक्षात्कारी अभंगांमधून या मानवी आयुष्याच्या परमपवित्र सुखभारल्या आयुष्याचा महामार्ग सापडेल. तुकाराम महाराज म्हणतात,

वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा।
आणिक मी देवा काही नेणें॥
गाये नाचे उडें आपुलिया छंदें।
मनाच्या आनंदें आवडीनें॥
लाज भय शंका दुराविला मान।
न कळे साधन यापरते॥
तुका म्हणे आतां आपुल्या सायासें।
आम्हां जगदीशें सांभाळावे॥

संतसज्जनांच्या संगतीतच विठ्ठलभेटीचा आनंद आपल्याला लाभतो, हा अत्यंत महत्त्वाचा विचार तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला आहे. आपल्या मुखात अष्टौप्रहर जर एका पांडुरंगाचेच नाम असेल तर सुखाला केवळ भरतीच येते. संतसज्जनांच्याच संगतीत हा विचार आपल्याला साक्षात्कारी अनुभव देतो. महाराज म्हणतात की, याहून अधिक शास्त्रज्ञान मला नाही. कारण अष्टौप्रहर प्रत्येक क्षण आनंदाने गात कसा घालवावा, नृत्य करीत आनंद कसा वेचावा, आपल्याच विठ्ठलनामाच्या छंदात जगावे हे संतसंगतीतच कळते. लाज, भय, शंका, मान या गोष्टींपासून आपण नकळतपणे दूर होतो आणि आनंदाचा नवा प्रदेश अनुभवायला लागतो. या विठोबाने आमचा सांभाळ करावा एवढेच मागणे तुकोबा त्या पांडुरंगाकडे मागतात.

मराठी शाश्वत कवितेची पहाटच मुळी ओवी आणि अभंगांनी झाली. गेली साडेसातशे वर्षे अभंग वाङ्मयाची गारूड-मोहिनी आपल्या रसिक मनावर गडद पसरलेली आहे. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव-पासष्टी आणि अमृतानुभव तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगटले. नामदेव महाराजांचे अभंग आणि ज्ञानदेवांचे अभंग त्याच काळात शाश्वत अक्षरवाङ्मयाचे अमृतकुंभ झाले. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात या आपल्या एकूणच काव्यनिर्मितीबद्दल आपले भाव प्रगट करताना म्हटले की,

जैसें बिंब तरी बचकें एवढें।
परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें।

अनुभवावी॥ (ज्ञानेश्वरी 4ः215)
‘या अपूर्व अशा ओव्या-अभंगांमधून विलक्षण असा शांतरस असा काही शाश्वत तत्त्वज्ञानाच्या अंगाने प्रगट होईल की, समुद्राहूनही खोल असा अर्थ व्यक्त करणारे मराठी बोल झंकारत उठतील. आकाशातले सूर्यबिंब दिसायला बचक्याएवढे, परंतु त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्यभर पसरतो. माझ्या मुखातून जे अमृतभारले शब्द आता प्रगट होतील त्यातून प्रकाशणारे अर्थाचे व्यापकपण या बचक्याएवढ्या सूर्यबिंबासारखे विश्वव्यापी होतील. त्याचा अनुभव घ्या…’

तेराव्या शतकात ज्ञानदेवांच्या प्रगल्भ,ज्ञानभारल्या अभंग वाङ्मयाने प्रथम अवकाश व्यापले आणि पुढे सर्वच संतांच्या अभंगांच्या अर्थभारल्या तत्त्वज्ञानाने अवघे ब्रह्मांड व्यापून गेले. अभिजात मराठी काव्यविश्वाची सुरुवात ज्ञानदेव-नामदेवादी अनेक संतांनी केली, हे सत्य सूर्यप्रकाशासारखे लख्ख आहे. जे भंग पावत नाही ते अभंग… अवघं मराठी काव्यविश्व अभंग आहे, हे मात्र निश्चित…

-वामन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..