नवीन लेखन...

पर्यटनातही स्वयंपूर्णतेकडे

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला जयश्री देसाई यांचा लेख


भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

एक’क लोकप्रिय हिंदी चित्रपटगीत आपणा सगळ्यांनाही आठवत असेल…

‘ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार

‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटातलं, शब्दप्रभू भरत व्यास यांनी लिहिलेलं आणि मुकेश यांनी गायलेलं हे सदाबहार गीत…

आपल्या या पवित्र सुंदर मातृभूचं अतिशय सुरेख वर्णन यात आपल्याला ऐकायला मिळतं…

ही हिरवा शालू नेसलेली वसुंधरा, असंख्य विविधरंगी फुलांचा त्यावरील शृंगार, क्षितिजापर्यंत पसरलेलं सुंदर निळं आकाश, त्यात वारा वाहून नेत असलेली ढगांची पालखी, ध्यानमग्न तपस्व्यासारखी येथील हिमशिखरं… सापासारखं वेटोळं घालून बसलेल्या इथल्या खोल दऱ्या, नागमोडी रस्ते, फेसाळ धबधबे… .एकीकडे बर्फाळ पर्वत तर दुसरीकडे रेताड वाळवंट…. अथांग सागर.…….एकीकडे शानदार महाल तर दुसरीकडे अद्भुत मंदिरं, प्राचीन चर्चेस, मशिदी आयुष्य कमी पडेल इतकं काही आपल्या भारतातच बघण्यासारखं आहे… त्याशिवाय इथली खाद्य संस्कृती, लोक संस्कृती, इथल्या कणाकणात रुजलेलं इथलं संगीत, नृत्य, शिल्पकला, हस्तकला थोडक्यात काय तर असं काहीच नाही जे भारतात नाही. इथे नैसर्गिक सौंदर्य आहे, मानवनिर्मित आश्चर्य आहेत, अनेक कलांचा, शास्त्रांचा उगम इथे आहे आणि त्यामुळेच सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी ही भूमी ही अपार संधींसह कायमच स्वागतासाठी सिद्ध राहिलेली आहे. ऐतिहासिक पर्यटन असो, धार्मिक पर्यटन असो, पुरातत्त्वीय पर्यटन असो, साहसी पर्यटन असो, गिर्यारोहण असो, वा अगदी वैद्यकीय पर्यटन असो. या भूमीने कायमच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित केलं आहे!

उदाहरणच घ्यायचं झालं तर साहसी पर्यटन किंवा अॅडव्हेंचर टुरिझम हा भारतातील पर्यटनाचं एक प्रमुख आकर्षण. देशातील साहसप्रेमींसाठी आणि विदेशातल्या सुद्धा. यात गिर्यारोहण, स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, माऊंटेन बायकिंग, राफ्टींग, कयाकिंग, सँड बोर्डिंग, केव्ह एक्स्प्लोरेशन यासारखे अनेक साहस प्रकार येतात. भारतात हिमालय आहे तशीच वाळवंटसुद्धा आहेत. सह्याद्रीसारख्या पर्वतराजी व दऱ्या-खोऱ्या जशा आहेत, तसाच अथांग सागरही आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये गुलमर्गला विंटर स्पोर्ट्स, ऋषिकेशसकट अनेक ठिकाणी रिव्हर राफ्टींग, मेघालयातील गुहांमध्ये केव्ह एक्स्प्लोरेशन, केरळमध्ये कयाकिंग, जैसलमेरला सँड बोर्डिंग असे विविध ठिकाणचे विविध साहस प्रकार साहसवेड्यांना साद घालतात.

‘वेलनेस टुरिझम’ हा जगातील पर्यटकांना भारताकडे आकर्षित करणारा आणखी एक प्रकार भारत ही योग, आयुर्वेद यांची जननी आहे. या देशाला अध्यात्माचा एक पाया आहे. अनेक धर्मांची प्रमुख प्रार्थनास्थळं इथे आहेत. येथील विविध आश्रमांमध्ये आजही साधकांची साधना चालते. त्यामुळेच मानसिक शांती, आध्यात्मिक ओढ या कारणांनी देश-विदेशातील लोक अशा ठिकाणी येतात. उत्तराखंड, केरळ, गोवा आणि कर्नाटक ही त्या दृष्टीने पर्यटनाच्या रडारवर असलेली राज्यं आहेत. या व्यतिरिक्त आधुनिक शस्त्रक्रिया करण्याचे आपल्या डॉक्टरांचे कसब आणि त्याला जगाच्या तुलनेत लागणारा कमी खर्च यादृष्टीने तशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्याही खूप जास्त आहे. धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन हेही भारताचे एक प्रमुख आकर्षण मानले जाते. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशन’ने केलेल्या व्याख्येनुसार सांस्कृतिक पर्यटन म्हणजे एखादा उत्सव, कार्निवल बघण्यासाठी केलेलं पर्यटन भारत इतका रंगीबेरंगी आहे आणि आपण वर्षभर विविध ऋतूंनुसार इतके उत्सव, सोहळे साजरे करत असतो की, ते बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. तर धार्मिक पर्यटन म्हणजे, आपल्या आराध्य दैवतांचे, तीर्थस्थानांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, नवस वगैरे फेडण्यासाठी केलेलं पर्यटन. आज आपण त्याला ‘धार्मिक पर्यटन’ असं गोंडस नाव दिलेलं असलं तरी हा पर्यटनाचा बहुतेक सर्वात आदिम प्रकार असावा. पूर्वीही लोक तीर्थयात्रा करत होतेच की! तेव्हा तर वाहतुकीची साधनं नसतानाही लोक चालत अशा स्वरूपाचं पर्यटन करत होते.

या व्यतिरिक्त इको टुरिझम, रुरल टुरिझम, बिझिनेस टुरिझम, स्पोर्ट्स टुरिझम असेही पर्यटनाचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत, ज्यांनी भारताला आजवर भरपूर महसूल मिळवून दिला आहे. मात्र कोरोना पश्चात ही स्थिती बदलली आणि या उद्योगाला सर्वात मोठा फटका सहन करावा लागला. यातून हा उद्योग सावरायला कदाचित आणखी एक वर्ष लागेल. ते होऊ नये, लवकरात लवकर हा व्यवसाय पुन्हा एकदा तेजीत यावा, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा अग्रदूत बनवा यासाठी भारत सरकारने बरंच काही योजलं आहे.

त्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या यंदाच्या १५ ऑगस्टच्या भाषणातून केले आहे. भारताला पर्यटनाचे वैश्विक केंद्र बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आणि या उद्दिष्टपूर्तीचा भाग म्हणून प्रत्येक भारतीयाने २०२२ पर्यंत देशातील किमान २२ पर्यटन स्थळांना भेट द्यावी असे आवाहनही केले आहे.

अर्थव्यवस्था सावरण्याच्या दृष्टीने सुद्धा हे आवश्यक आहे. कारण आज कोरोना आणि त्यामुळे आलेला प्रदीर्घ लॉकडाऊन याच्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. पर्यटन क्षेत्र आणि हॉटेल उद्योगाने आत्तापर्यंत तब्बल ४२ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. तीच स्थिती परत आणण्याचीच नव्हे तर त्यात वाढ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आता भारत सरकारने आखली आहे. ते सहज शक्य आहे आणि गरजेचंही आहे कारण भारताचे सरासरी वय आहे २९ आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ७२% लोक हे ३२ वर्षे वयाच्या आतील आहेत. रोजगार हा त्यांच्यापुढचा एक प्रमुख प्रश्न आहे. पर्यटन त्यासाठी सर्वात उपयुक्त ठरू शकणारा उद्योग आहे.

या पर्यटनाच्या दृष्टीने देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख वर आला आहे. त्या व्यतिरिक्त आणखी २ गोष्टींचा आवर्जून उल्लेख आवश्यक आहे. एक म्हणजे जागतिक वारसा स्थळातील तब्बल ३८ स्थळं… ज्यांना ‘वर्ल्ड हेरीटेज साईटस’ असं म्हटलं जातं, ती भारतात आहेत आणि दुसरं म्हणजे भारतात ‘व्याघ्र बचाव’ मोहीम ही अत्यंत तळमळीने राबवली गेल्याने आज जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतातच पाहायला मिळतात. त्यामुळे वन्यजीव प्रेमींना भारताला भेट दिल्याशिवाय पर्याय नाही. भारतातील एकूण सर्वच अभयारण्ये ही जैवसंपदेत इतकी समृद्ध आहेत की पर्यटकांना त्यांची ओढ लागल्याशिवाय राहत नाही.

सरकारने पारंपरिक पर्यटन प्रकारांव्यतिरिक्त पोलो टुरिझम, गोल्फ टुरिझम अशाही काही वेगळ्या, नाविन्यपूर्ण योजना आखल्या आहेत, तर अंदमान – निकोबार आणि लक्षद्वीप या बेट समूहांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी जो ‘होलिस्टिक आयलंड डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार केला आहे तोही अत्यंत महत्त्वाकांक्षी, अनोखा म्हणता येईल असा आहे.

या व्यतिरिक्त, दोन-तीन शहरांमध्ये विमानतळे सुरू करणे, रस्त्यांचे जाळे वाढवणे यासारख्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना मोदी सरकारने राबवल्या, त्यांचाही फायदा पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने होईल हे नक्की.

आता गरज आहे ती कोरोनाचे संकट संपताच आपण आपल्या पायाला चक्र लावून भटकंतीला बाहेर पडण्याची. काय पडणार ना?

-जयश्री देसाई

( मराठी लेखिका आणि अनुवादक. १९८० पासून पूर्णवेळ तसेच मुक्तहस्त पत्रकार. लोकप्रभा आणि चित्रलेखा मधून पत्रकारितेला सुरुवात. मैत्रीण आणि भटकंती या दोन मासिकांच्या संपादिका. आत्तापर्यंत १२ हून अधिक पुस्तके प्रकाशित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती विशेष गाजल्या.)

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..