नवीन लेखन...

आठवणींचे जीर्णोद्धार – “धूप आने दो” (गुलज़ार)

दोन आठवड्यांपूर्वी एकाच रविवारी चक्क “सकाळ” आणि “लोकसत्ता” ने “धूप आने दो ” ची तारीफ केली आणि मी तातडीने पुस्तक विकत घेतलं. गुलज़ार ने लिहिलेलं एकही पुस्तक माझ्या घरी नाहीए. अरुण शेवतेंच्या “ऋतुरंग “दिवाळी अंकात १९९३ पासून गुलज़ार आजतागायत दरवर्षी असतात. समहाऊ माझ्या वाचनात एखाद-दुसरा अंक सोडला तर काहीच ऐवज आला नव्हता.तोही बॅकलॉग भरून काढायचा होता.

जुन्या,विस्मृत होत चाललेल्या अधाशीपणे मी ती २३४ पाने दिवसभरात वाचून संपविली आणि गेले काही दिवस रवंथ करीत बसलो. २५-२६ लेखांपैकी मला दोनच लेख जिवलग वाटले- एक ” मीनादीदी ” तर दुसरा “साहिर आणि जादू ” !

बहुधा हे दोन्ही लेख कवींबद्दल असल्याने अधिक उत्कट उतरले आहेत. दोन्ही ठिकाणी ओरिजिनल गुलज़ार तितक्याच ताकदीने मराठीत अवतरले. त्यांच्या भाषेचा,भावनांचा अलवारपणा दोन्ही अनुवादकांनी पेलला आहे. पण बाकीचे लेख तितकेसे सरस न वाटल्याने भावले नाही. अर्थात यासाठी अनुवादकाला मी जबाबदार धरीन.

इतकी वर्षे चित्रसृष्टी ज्या माणसाने विविध रूपांमध्ये अनुभवली, चितारली ती फक्त विविध लेखांमधून आपल्या वाट्याला येणे यासारखे भाग्य नाही. ते सगळे अनुभव एका ठिकाणी आणणे हे शेवतेंचे क्रेडिट ! २५-२६ लेखांनी भलं थोरलं कालावधीचं अवकाश पेलणं हे स्तुत्य पण थोडे असमाधान मागे उरतेच. कदाचित हे सारे लेख “मूळ “भाषेत वाचायला मिळाले असते तर —- अधिक भव्य वाटेल आणि अधिक शांत वाटेल आणि माझं आकलन वाढेल.

लेखक,दिग्दर्शक,कवी/गीतकार अशी रूपे धारण करणे ज्याने १९९९ ला (“हुतूतू “नंतर) अधिकृतपणे सोडले आणि दस्तुरखुद्द एका मुलाखतीमध्ये धाडसाने सांगितले- ” सध्याच्या पिढीचे मला फारसे समजत नाही आणि त्यांना आवडणारे चित्रपट बनविणे मला जमेल असं वाटत नाही तेव्हा थांबलेलं बरं ! ” अशा उत्तरार्धाचा हा माणूस वाचायला मिळणे आणि त्याच्याद्वारे अनोळखी खिडक्या उघडणे हा हातातील बहुविध ठेवा जास्त महत्वाचा!

आपल्या पत्नीचा अदबीने, आदराने उल्लेख करणारा आणि माझ्या वाचनात आलेला हा दुसरा “रुपेरी “माणूस ! पहिला- सुनील दत्त, जो कायम पत्नी नर्गिसचा आदरार्थी उल्लेख करायचा.

मुलीवर आणि आता नातवावर जीवापाड प्रेम करताना आणि त्यांच्यावर कविता करताना हा पिता/आजोबा खूप संवेदनशील होऊन जातो आणि व्यक्त ही होतो तेव्हा नकळत चौकटी ओलांडतो. गुलज़ारला मराठीशी जोडणारे अमृता सुभाष,किशोर कदम,कुसुमाग्रज,शेवते असे सगळे त्याच्यामध्ये डोकावतात आणि तरीही तो थोडा काठावर असतो.

काही दिवसांपूर्वी किशोर कदमने एका कवीबद्दल एक लेख लिहिला होता आणि गुलज़ार त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कॅसेट मधून त्याच्यापर्यंत पोहोचला होता हा ताजा संदर्भ माझ्या डोळ्यांपुढे तरळून गेला.

आज सकाळी मी आणि पत्नी एका हॉटेलात ब्रेकफास्ट करीत असताना एक ललना उत्कटतेने तिच्या सहकाऱ्यांना म्हणत होती- ” ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहावासा वाटतोय. पाहून खूप गॅप पडलीय. एकेकाळी कसे उसासून बघायचो आपण. जुनं सगळं आठवतंय- चोरी चोरी वगैरे ! ”

महोदय गुलज़ार, आपण सगळेच असे आठवणींच्या जीर्णोध्दारामध्ये व्यस्त असतो. ते ढिगारे सभोवती मांडून आपण त्याचे कधी लेख करतो, कधी रसरसत्या कविता आणि बरेचदा स्मरणरंजनाच्या गप्पा !

खूप दिवसांनी तुमचे आभार मानायची संधी मिळाली आहे. थँक्यू !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..