नवीन लेखन...

टिळक सुटले १६ जून आनंदाचा क्षण

 

टिळक सुटले.

१६ जून १९१४ मध्यरात्री पुणे शहरातील एकही घर झोपले नव्हते, कारणचं तसं होतं, लोकमान्य टिळक सहा वर्षांची कठिण शिक्षा भोगून परत आले होते.

साधारणपणे मे महिन्याच्या शेवटाला जेलरने टिळकांना सामानाची बांधाबांध करावयास सांगितले. टिळकांच्या शिक्षेचे काही दिवस बाकी होते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्याला येथून हलवणार व दुसऱ्या तुरूंगात ठेवणार असं टिळकांना वाटत होतं. मंडाले तुरूंग, मंडाले किल्ल्याच्या आत आहे. मंडाले किल्ल्यापर्यंत एक रेल्वे लाईन इंग्रज सरकारने टाकली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात अतिशय गुप्तता पाळून तुरूंगातूनच एक इंजिन व एक डब्याच्या बंद गाडीतून टिळकांना बंदरावर आणले गेले. लगोलग त्यांना बंद बोटीत बसवले गेले. ८ दिवसांचा प्रवास झाल्यावर टिळकांचे पाय मातृभूमीला लागले. (तो क्षण त्यांचेसाठी अवर्णनीय असेल) मद्रास (चेन्नई) इथल्या गोदीतून पुन्हा दोन डब्यांची बंद गाडी पुण्याच्या दिशेने निघाली.

१६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली.

टिळकांनी वाड्याच्या बंद दरवाजाची कडी वाजवली. देवडीवर झोपलेल्या भैय्याने विचारले

“ कौन हो? “

“ मी आहे. या वाड्याचा मालक.”

त्याने दिंडी दरवाजा उघडला, समोर कोणीतरी माणूस बघून पुन्हा बंद केला व घाईघाईने धोंडोपंतांना(टिळकांचे भाचे) उठवायला गेला. कंदीलाच्या प्रकाशात त्यांनी दार उघडले. साक्षात दादा. संशयाची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली.
सहा वर्षांनंतर टिळक स्वत:च्या घरात पाऊल टाकत होते. लगोलग जवळपासच्या मंडळींना निरोप पाठवले गेले. हा हा म्हणतां ही बातमी पुण्यात वाऱ्यासरशी पसरली . लोक रस्त्यावर आले. झुंडीच्या झुंडी गायकवाडवाड्याकडे धावू लागल्या . लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कोतवाल चावडीवर असलेल्या काका हलवाई मिठाईवाले यांनी दुकान उघडून मिठाई वाटण्यास सुरवात केली. पलिकडचे दगडूशेठ हलवाईंनी गर्दीवर बत्तासे ऊधळले. गर्दीचा उत्साह पाहुन पोलिसांना देखील काय करावे ते समजेना.

लोक टिळकांच्या दर्शनास येऊ लागले. त्यांना डोळे भरून पाहू लागले . हा सगळा प्रकार पहाटेपर्यंत चालला. शेवटी टिळकांना घरात नेले तरीही लोक रांगा लावून बसले होते. पुढचे दोन तीन दिवस दर्शन देणे हाच एक कार्यक्रम होऊन बसला. पत्रे व तारांचा खच केसरीच्या कार्यालयात पडला. संपादक मंडळाची उत्तरे देताना धावपळ होऊ लागली. जेवढी अभिनंदनाची पत्रे होती तेवढीच त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करणारी पत्रे होती. हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानात ही वार्ता पसरली. मरगळलेल्या जनतेला पुन्हा उभारी आली.

विस्मृतीत गेलेले हे क्षण पुन्हा वाचकांसमोर आणले इतकेच.

— मुक्ता टिळक.

संकलन: संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4147 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..