नवीन लेखन...

आगरातला बळी राजा

देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे.

यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातील आमच्या रायगड व ठाणे जिल्ह्यात सुद्धा थैमान घातले आहे. जुलै 2005 च्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुरामध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आजपासून 14 वर्षांपूर्वी जेवढी लोकं या जिल्ह्यात शेती करायचे त्याचे प्रमाण रायगड मध्ये तेवढे नसले तरी ठाणे जिल्ह्यात मात्र जवळपास निम्म्यावर आले आहे. पाऊस पडल्यावर नांगरणी भाताची पेरणी मग युरिया व तत्सम खते. भाताचे आवण म्हणजे रोप लावण्यायोग्य झाले की शेतात चिखलणी करून भाताची लावणी करायची. हे आवण खणून म्हणजे उपटून त्याचे मूठ बांधायचे. मूठ एकत्र बांधून चिखल झालेल्या शेतात नेऊन लावायचे. लावणी झाल्यावर तण आणी गवत काढण्यासाठी बेनणी करावी लागते. एकदा का भाताचे दाण्याने भरलेले सोनेरी पिक आले की कापणी, कापल्या नंतर दोन दिवस उन्हात कापलेली भाताची कडबं वाळल्यावर त्याचा कवळ्या करून पंधरा वीस कवळ्या एकत्र करून भारे बांधायचे. एवढी मेहनत करून आणी चार महिने वाट पाहून भारे बांधले जातात. म्हणूनच आमच्या आगरी जातीत ” हो झे त्यानच पके भारे बांधल्यानं ” अशी म्हण प्रचलित झाली असावी असे वाटते. भारे बांधून पण काम संपत नाही. हे भारे डोक्यावर घेऊन शेतांच्या बांधावर चालून खळ्यात आणले जातात. खळ्यात मग हे भारे झोडले जातात. सगळे भारे झोडून झाल्यावर खळ्यात जमा झालेली भाताची रास म्हणजे आमच्या भाषेत मांद गोळा करून तिला वेताच्या सुपाने वारविले जाते. असे करत असताना इंग्रजी c अक्षरा प्रमाणे भात घमेलातुन ओतला जातो ज्याला कणा देणे असे सुद्धा बोलले जाते. या कण्यावर जोराने सुपाने वारा घातला जातो ज्याला हारपणे असे बोलले जाते. हे असे हारपणे सगळ्यांनाच जमते असे नाही कारण सुप हातात धरून विशिष्ट प्रकारे पाठीवर मागे नेऊन छातीसमोर जोरात आणावे लागते. कणा देऊन झाल्यावर मग भात एकदाचा पोत्यात भरला जातो. मग गरज असेल तेवढा भरडायला राइस मिल मध्ये नेला जातो.

उरलेला भात घरात वेताचा कणगा मांडून त्यात भरून ठेवला जातो. आमच्या आगरी लोकांची जमीन एक तर कमी त्यात हल्ली हिस्से झाले की एक किंवा दोन गुंठे भरतील एवढी पण शेतं असतात. आमच्याकडे 20 किंवा 25 गुंठा असलेले एक शेत म्हणजे खूपच मोठे असते. कुठे मुरमाड कुठे खडकाळ तर कुठे खाडीचे पाणी शेतात येणारी आमची चिखल होणारी जमीन. अशा जमिनीवर ट्रॅक्टर कसा चालणार पण पूर्वी सारखं बैल जोड्या ठेवायला कोणाला परवडत नसल्याने कस बस लहान पॉवर टीलर वापरून आमच्यासारखे काही शेतकरी अजूनही परवडत नसली तरी शेती करत आहेत. एखाद्या एकर ला लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारा नफा काढायला गेलो तर आम्हा आगरी शेतकऱ्यांना आता वेड्यात काढले जाईल. आमच्याकडे जाड दाण्याचा जया आणि रत्ना असे वाण असतील तरच भरघोस पिक येते. हल्ली या दोन भाताना पाचशे ते सातशे रुपये प्रति क्वीन्टल भाव मिळतो आणि तांदूळ करून विकले तर वीस रुपये प्रति किलो. एका एकर मध्ये पाऊस पाणी कितीही चांगले झाले तरी दीड टन पेक्षा जास्त भात आणि एक टन पेक्षा जास्त तांदूळ काही केल्या पिकत नाही. म्हणजेच वीस हजाराचा भात एवढी मेहनत घेऊन पीकवायचा. एका एकर मध्ये या वीस हजार रुपये भातासाठी खर्च बघा किती येतो.

बियाणे 2000
खते 1000
पॉवर टीलर 1500
आवणी मजुरी 9000
कापणी झोडणी 9000
भरडणे व वाहतूक 1000

मजुरांचा तीन टाइम जेवण आणि विडी काडी व दारूचा खर्च पकडून एकूण खर्च पंचवीस हजाराच्या पुढे जातो. तरी आता बैल नसल्याने पेंड्यांची मळणी हा प्रकार नाहीसा झालाय. म्हणजे चार महिन्यात पंचवीस हजार खर्च करून ढोर मेहनत करणारा एखादा आगरी शेतकरी पिक कितीही चांगले आले तरी तोटा सहन करतो. एकरी पंचवीस हजार खर्च होत असताना लावणी आवणी पर्यंत पंधरा हजार घालवलेल्या आमच्या आगरी शेतकऱ्याला यावर्षी पंचनामे करून शासन किती मोबदला देणार आहे ते बघायचे आहे. पंचनामे करून बँकेत पैसे येईपर्यंत मनाने व हिम्मतीने राजा असलेला आगरी शेतकरी मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक बोलून उरलेले दोन महिने तरी लावणी झालेली शेतं पावसानं बरबाद झालेली बघून फक्त हळवा होत राहील. ज्याला हिरव्या गार आवणाला शेतात लावून मोठं होता होता सोन्या सारखं डोलताना बघायाचे होते, एका दाण्याचे झालेले शेकडो दाणे बघायचे होते तो बळीराजा आता शून्य नजरेने होत्याचे नव्हते बघतो आहे.

जहाज जॉईन करायच्या दहा दिवस अगोदर आमच्या भाताच्या आवणाला खत मारल्यानंतर राबाचा गडद हिरवा रंग बघायला मिळाला होता. मजुर मिळाले नाही म्हणून मी जहाजावर गेल्यानंतर सुरु झालेली लावणी अर्धी झाली असताना मुसळधार पावसामुळे जी अर्धवट राहिली ती राहिलीच पण जी झाली होती ती पण पुराचे पाण्याखाली वाहून गेली उरलेली बुडून राहिल्याने कुजून गेली. भातशेती मध्ये बिजापासून अंकुरलेली हिरवाई जेव्हा पिवळी धम्मक होऊन सोनेरी होत नाही तोपर्यंत चैन पडत नसे. पण यावर्षी पावसामुळे भाताचे सोनेरी पीक बघण्याची हौस आणि आतुरता लावलेल्या शेतासारखी झोपवून टाकली.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 57 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..