नवीन लेखन...

विनायका हो सिद्ध गणेशा

तमाशातील गण गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ हे सगळ्यांना परिचित असून यात गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे. ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरातील गणेशाचे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे लोकप्रिय आहे . हे गीत अशोकजी परांजपे यांचे असून संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते म्हणून कामत परिचित आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचया अध्यक्षपदाचाही बहुमान त्यांना मिळाला होता. कामत म्हटले की, ‘मयुरा रे फुलवित ये रे पिसारा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे’ अशी अनेक गाणी रसिकांच्या पटकन ओठावर येतात. या गाण्यांप्रमाणेच कामत यांच्या स्वरामुळे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे खूप लोकप्रिय आहे. परांजपे यांची लिहिलेली अनेक गाणीही रसिकांच्या स्मरणात असून त्यात ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ या गाण्यासह ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर’, ‘नाविका रे वारा वाहे रे’ आदी गाण्यांचा समावेश आहे.

संगीतकार मोरे यांनी संगीत दिलेले ‘गोंधळात गोंधळ’, ‘मायमाऊली’, ‘भालू’ आदी चित्रपटांतील ‘हा सागरी किनारा’, ‘सावध हरिणी सावध ग’, गंध फुलांचा गेला सांगून’ आणि इतर अनेक गाणी गाजली आहेत.

‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारे असून मोरे यांचे वेगळ्या धाटणीचे संगीत, कामत यांचा दमदार आवाज आणि परांजपे यांची सुगम शब्दरचना यामुळे हे गीत लक्षात रहाते. गण गौळण, वग, तमाशाच्या प्रारंभी गणेशाचे नमन आणि गुणगान केले जाते.

या गाण्यालाही गणपतीला रंगसभेसाठी आमंत्रण दिले असून त्याचा आशीर्वाद मागितला आहे. हा गणपती कसा आहे तर तो लंबोदर असला तरी नृत्यविशारद असून त्याच्या हातात परशू आहे. कमरेला नाग बांधलेला असून अशा या गणेशाने रंगसभेला, कार्यक्रमाला यावे, असे आवाहन कवीने केले आहे. ‘अपराधाला घाली पोटी’ अशी विनंतीही कवीने केली आहे.

गणेशोत्सवाप्रमाणेच गाणे अनेकदा आकाशवाणीवरून प्रसारित होत असते. रामदास कामत यांचा स्वर, विश्वनाथ मोरे यांचे संगीत आणि अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या शब्दातून हे गाणे शांतपणे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर जणू ती रंगसभा आणि साक्षात गणपती उभा रहातो हेच या गाण्याचे यश आहे.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे-
विनायका हो सिद्ध गणेशा
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरट्यामधून
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या-१

नृत्यविशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशू तोमर
नाग कटिला बांधून या-२

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटी गाठी
काव्यसुधा ही प्राशुनी ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या-३

आम्ही बालक त गुणगायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊनी या – ४

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..