सेलफोन म्हणजे मोबाईलमध्ये तंत्रज्ञानाची जी स्थित्यंतरे आली त्यात थ्री-जी तंत्रज्ञान हे एक आहे. थ्री-जी याचा अर्थ थर्ड जनरेशन असा आहे. थोडक्यात मोबाईल ज्याच्या आधारे चालतो त्या तंत्रज्ञानाची तिसरी आवृत्ती सध्या भारतात वापरली जात आहे. त्याच्या अगोदर अॅनॅलॉग सेल्युलर तंत्रज्ञान ही पहिली आवृत्ती होती, त्यानंतर डिजिटल-पीसीएस ही तंत्रज्ञानाची दुसरी आवृत्ती होती. आताचे जे थ्री-जी तंत्रज्ञान आहे ते विशेष करून स्मार्टफोनसाठी उपयोगाचे आहे.
यात मोबाईल फोनचा उपयोग आणखी वेगळ्या कारणांसाठी करणे शक्य झाले आहे. पर्सनल डिजिटल असिस्टंटच्या रूपात तो सामोरा येत आहे. थ्री जी तंत्रज्ञानात आपल्याला तरंगलांबी वाढवलेली दिसते तसेच ट्रान्सफर रेट वाढल्याने वेब म्हणजे इंटरनेटशी संबंधित उपयोग वाढले आहेत. थ्री-जी तंत्रज्ञानामुळे फोनवर दृकश्राव्य फाईल्सचा वापर करता येतो व यात दृश्य आणि आवाज यांचा दर्जाही चांगला असतो.
सीडीएमए २०००, डब्ल्यूसीडीएमए, टीडी- एससीडीएमए अशा अनेक सेल्युलर ॲक्सेस तंत्रज्ञानाचा वापर यात केला जातो. थ्री-जी तंत्रज्ञानात डेटा ट्रान्सफरचा वेग जास्त म्हणजे सेकंदाला ३ मेगाबाईटपेक्षा अधिक असतो याचा अर्थ तीन मिनिटांचे एमपी-३ वरचे गाणे डाऊनलोड करण्यास १५ सेकंद लागतात. वेगवान अशा टू-जी तंत्रज्ञानात हा दर सेकंदाला १४४ किलोबाईट्स असतो त्यामुळे तीन मिनिटांचे गाणे डाऊनलोड करण्यास आठ मिनिटे लागतात. थ्री-जी मध्ये डाऊनलोडचा वेग सेकंदाला १४.४ मेगाबिट्स असतो, तर अपलोडिंगचा वेग ५.८ मेगाबिट्स असतो, प्रत्येक कंपनी नेटवर्कनुसार वेगात कमी जास्त फरक असू शकतो पण यात माहिती हस्तांतराचा वेग टू-जी तंत्रज्ञानापेक्षा जास्त असल्याने आपल्याला मल्टिमीडिया फाईल्स वेगाने पाठवता येतात किंवा डाऊनलोड करता येतात. थ्री-जी फोन हे मिनी लॅपटॉपचे काम करतात.
त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेटवरील स्ट्रिमिंग व्हिडिओ मिळवणे, इमेल डाऊनलोड करणे ही कामे फार वेगाने केली जातात. कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाणही खूपच कमी असते. व्यावसायिक वापरापूर्वी मे २००१ मध्ये जपानमधील एनटीटी डोकोमो या कंपनीने थ्री-जीचा पहिल्यांदा वापर केला. १ ऑक्टोबर २००१ मध्ये याच कंपनीने त्याचा पहिल्यांदा व्यावसायिक वापर सुरू केला. थ्री-जी सेवा ही तुलनेने महाग असते. त्यासाठी तुमचा मोबाईल सेटही थ्री-जी तंत्रज्ञानास अनुकूल असावा लागतो. थ्री-जी मोबाईल सेवेसाठी जो स्पेक्ट्रम लागतो तो वेगळा असतो. रेडिओ स्पेक्ट्रम याचा अर्थ रेडिओ सिग्नलच्या उपलब्ध असलेल्या विविध फ्रिक्वेन्सी होत. थ्री-जी सेवेसाठी १५ ते २० मेगाहर्ट्स इतकी फ्रिक्वेन्सी लागते. तुलनेने त्यांची तरंगलांबी जास्त असते. एकूण २५ देशात थ्री-जी सेवा असून त्यात साठ नेटवर्क आहेत. या सेवेत एकाचवेळी आवाज व इतर स्वरूपातील माहिती (इमेल-छायाचित्रे) एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. थ्री-जी स्मार्टफोनचा उपयोग हा दूरवैद्यक व शिक्षण प्रसारासाठी केला गेला पाहिजे.
Leave a Reply