नवीन लेखन...

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग २

भाग २ – १८व्‍या शतकाचा मागोवा –

मराठी सत्ता भारतव्‍यापी झाली ती १८व्‍या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्‍लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्‍या दिल्‍लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्‍यापूर्वी आपण १८व्‍या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.

८ मे १७०७ रोजी शाहू मुघलांच्‍या कैदेतून पळाला, किंबहुना मुघलांनी त्‍याला तशी संधी दिली. तेव्‍हापासून ते १५ डिसेंबर १७४९ रोजी त्‍याच्‍या मृत्‍यूपर्यंत ४३ वर्षे मराठ्यांच्‍या राजकारणावर शाहूचा प्रभाव होता. वस्‍तुतः औरंगजेबाने शाहूला जिवंत ठेवले ते राजकारणातले एक प्‍यादे म्‍हणूनच. तो हेतू पुढे सफल झाला. औरंगजेबाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याचा मुलगा आज्‍जम याच्‍या ताब्‍यात शाहू होता. शाहूला सोडावे असा सल्‍ला आज्‍जमला झुल्फिकार खान व राजपूत सरदारांनी दिला होता. शाहू मुघलांशी मित्रत्‍वाने वागेल आणि त्‍याचबरोबर राज्‍याच्‍या अधिकारासाठी मराठ्यांमध्‍ये यादवी माजेल याची त्‍यांना खात्री होती. आणि झालेली तसेच. खरोखरच शाहू आयुष्‍यभर मुघलांच्‍या सरंजामदाराप्रमाणेच वागला. ( त्‍यामुळे अशी शंका येते की तसे वचन कैदेतून सुटण्‍यापूर्वी बेलभंडारा उचलून त्‍याने मुघलांना दिले असावे. ) मुघल सत्ता राखावी, बुडवू नये असा आदेश शाहूने पेशव्‍यांना दिला होता.

शाहू स्‍वतः मुघलांच्‍या कैदेतून सुटला तरी १७१९ पर्यंत पुरी १२ वर्षे शाहूची आई व कुटुंबीय दिल्‍लीला मुघलांच्‍या ताब्‍यात होते. त्‍याहून महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे लहानपणापासून १८ वर्षे शाहू मुघलांसमवेत राहात होता. ह्या संस्‍कारक्षम वयात त्‍याचे स्‍नेहसंबंध निर्माण झाले ते मुघलांशी, त्‍याला विलास-उपभोगांची आवड निर्माण झाली तीही मुघलांच्‍या सहवासामुळेच.

ज्‍या शाहूला मराठ्यांनी आपला छत्रपती म्‍हणून, आपला स्‍वामी म्‍हणून मान्‍यता दिली तो शाहू स्‍वतःला मुघलांचा सरंजामदारच मानत होता; ज्‍या मराठ्यांनी १८वे शतक गाजवले ते शाहूचे अथवा पेशव्‍यांचे सरदार होते आणि पेशवे स्‍वतःच छत्रपतींचे मंत्री होते, ही गोष्‍ट नजरेआड करून चालणार नाही. १८व्‍या शतकाचे विवेचन करतांना ध्‍यानात ठेवायला हवे की त्‍या काळातील मराठ्यांचे राजकारण व त्‍यांची मर्दुमकी ही सेवकांची होती, स्‍वामींची नव्‍हे.

बाजीराव 

२९ मार्च १७३८ रोजी बाजीरावाने दिल्‍लीला धडक दिली, त्‍यावेळची सैनिकी परिस्थिती काय होती? बाजीराव बुंदेलखंडातून उत्तरेस आग्र्याजवळ आला, तेव्‍हा मुघलांनी त्‍याचा सामना करण्‍यासाठी वझीर कमरउद्दीन व मीरबक्षी खाने दौरान यांच्‍या अधिपत्‍याखाली दोन सेना तयार केल्‍या. दिल्‍ली आग्र्यादरम्‍यान सैनिकी जमाव झालेला होता. ह्या सैन्‍याला इतरत्र वळवण्‍याच्‍या हेतूने बाजीरावाने मल्‍हारराव होळकराला यमुनापार दोआबात धाडले. परंतु अवधचा नबाब सादतखान याने त्‍याला परतून लावले. अशा प्रकारे बाजीरावाचा एक डाव फुकट गेला म्‍हणून त्‍याने एक युक्‍ती केली ( आणि इथे आपल्‍याला बाजीरावाचा शिवाजीसारखा चतुरपणा युद्धाच्‍या डावपेचांच्‍या बाबतीत दिसून येतो ). आग्र्यापासून थोडे मागे हटून त्‍याने आपल्‍या सैन्‍याबरोबरचे बरेचसे सामान बुंदेलखंडाकडे रवाना केले. त्‍यामुळे बाजीराव दक्षिणेस परत जात आहे असा मुघलांचा समज झाला. परंतु बाजीराव पश्चिमेकडून जाट व मेवाती मुलुखातून मुघल सैन्‍याला बगल देऊन दिल्‍लीवर जाऊन धडकला. आपण हे विसरता कामा नये की ह्या वेळी मुघलांच्‍या दोन सेना दिल्‍लीच्‍या जवळच होत्‍या. बाजीरावाचे सैन्‍य होते ५० हजार तर मुघली सेना होती १ लाख. दिल्‍लीत अधिक काळ राहणे सैनिकी दृष्‍ट्या धोक्‍याचे होते, आणि बाजीरावासारख कुशल सेनानी असा धोका कसा पत्‍करेल?

‘अमर्यादा केल्‍यास राजकारणाचा दोरा तुटतो’ असे दिल्‍लीबाबत बाजीरावाने चिमाजीला लिहिले आहे. ते शाहूने आखून दिलेल्‍या धोरणामुळे म्‍हटले आहे, हे उघड आहे. ‘दिल्‍लीचा पातशहा होण्‍याची शाहूची इच्‍छा नाही’ असे शब्‍द आपल्‍या मे १७३९ च्‍या पत्रात बाजीरावाने वापरलेले आहेतच. ज्‍या शाहूने इतर सरदारांचा विरोध असतांनाही बाजीरावाला पेशवा बनवले, त्‍या आपल्‍या स्‍वामीच्‍या इच्‍छेचा अनादर करणे बाजीरावाला शक्‍यच नव्‍हते.

पुढे जाण्‍याआधी मी आणखी एक मुद्दा सुचवून ठेवतो. आपण ज्‍या पत्रांच्‍या आधारे आपली मते बनवतो, ती पत्रे राजकारणी पुरुषांची होती, हे लक्षात घ्‍यायला हवे. ती पत्रे साधारणतः लेखनिकांकरवी लिहून घेतलेली असत म्‍हणजे १००% गुप्‍ततेची अपेक्षा धरता येत नाही. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे त्‍या धामधुमीच्‍या काळात जेव्‍हा दळणवळण फारच कठीण होते, जासुदाद्वारे पाठविलेला खलिता शत्रूच्‍या हातात पडण्‍याची शक्‍यताही ध्‍यानात घ्‍यावी लागे. ( पनिपतावर असे मराठ्यांचे खलिते अब्दालीच्या हातीं सापडलेच की). अशा परिस्थितीत समजा एखाद्या सरदाराचे मत आपल्‍या स्‍वामीच्‍या एखाद्या धोरणाविरुद्ध असलेच तरी त्‍याचा लेखी उल्‍लेख करण्‍याचा धोका तो कितपत स्‍वीकारेल? आजही कुणाला अगदी खाजगी, गुप्‍त असे काही दुसर्‍याला कळवायचे असले, तर तो शक्‍यतो पत्रात लिहून कळवतोच असे नाही, प्रत्‍यक्ष भेटून बोलतो. बाजीरावाला या विषयावर आपले शाहूच्‍या-धोरणाहून-वेगळे असे काही मत व्‍यक्‍त करायचे असते, तर त्‍याने चिमाजी आप्‍पाला खलबतखान्‍यात नेऊन त्‍याबद्दल गुप्‍त चर्चा केली असती. युद्धभूमीवरून पाठवलेल्‍या पत्रात खचितच हा उल्‍लेख केला नसता.

बाजीरावाने दिल्‍लीतील सत्ता न काबीज करण्‍याचे कारण ‘मराठी परंपरा’ असे नक्‍कीच नव्‍हते. दिल्‍लीला धडक देण्‍याची परंपराच मुळी बाजीरावापासून सुरू झाली. दिल्‍ली त्‍याने काबीज न करण्‍याचे कारण सैनिकी होते व दुसरे राजकीय होते. बाजीरावाच्‍या कर्तृत्‍वाला मर्यादा पडली होती ती मराठी संस्‍कृतीची नव्‍हे तर त्‍याच्‍या स्‍वामीने आखून दिलेल्‍या लक्ष्‍मणरेषेची होती.

खरे तर, आपल्‍याला मुख्‍यत्वे १७५० ते १७६० या दशकाचाच विचार करायला हवा. मराठ्यांच्‍या दृष्‍टीने आणि तत्‍कालीन भारताच्‍या दृष्‍टीनेही, त्‍या शतकातील सर्वाधिक महत्त्वाचे दशक हेच होय. प्लासाची लढाई याच दशकात झाली (१७५७ च्या मध्यावर ) आणि पानिपतची लढाईही हे दशक संपल्‍यावर केवळ १४ दिवसांनी झाली.

१७४९च्‍या डिसेंबरमध्‍ये शाहूचा मृत्‍यू झालेला होता. १७५०च्‍या सांगोल्‍याच्‍या करारानंतर छत्रपती नाममात्र उरला होता व नानासाहेब पेशव्‍याकडे मराठेशाहीचा सर्वाधिकार आलेला होता. मराठ्यांचा डंका भारतभर गाजत होता. ऑगस्‍ट १७५० मध्‍ये भाऊने दिल्‍ली काबीजही केली होती. अशा परिस्थितीत दिल्‍लीपती व्‍हायला मराठ्यांना काय हरकत होती? असा प्रश्न कोणालाही पडेल. त्‍याचे उत्तर शोधण्‍यासाठी आपल्‍याला मागील काही वर्षांची पार्श्वभूमी पाहायला हवी तरच आपण सदाशिवराव भाऊच्‍या ऑगस्‍ट १७६० मधील दिल्‍लीभेटीचे विश्र्लेषण करू शकू. घटनांचा क्रम समजून घेतल्‍याशिवाय व त्‍यांचे विविध अंगांनी विश्र्लेषण केल्‍याशिवाय, इतिहासाचा अन्‍वयार्थ लावता येत नाही.

(पुढें चालू )

— सुभाष स नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..