नवीन लेखन...

हॅप्पी दिवाळी!!

(ही फक्त एक गंमत आहे. अजाणतेपणी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर क्षमस्व)

सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.

सोनू, ऊं ऽ ऊं ऽ नको करूस. उटणं नको असं नाही म्हणायचं. आपली पद्धत आहे ती. ते अगाला लावलं की अंग कसं स्वच्छ होतं, सुगंधी होतं. अगं, नुकतंच आपल्या महाराष्ट्रात विधानसभेचं विलेक्शन झालं की नाही? चुकलो, बाई, इलेक्शन! आमच्या राजकारणाच्या भाषेत तसं म्हणतात. तर इलेक्शन, आता ठीक आहे? तर, त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लढून सत्तेचे उटणं अंगाला लावून घ्यायला सारे आतर असतात. पण अनेकांसाठी ते उटणं नसतं, ते असतं आयुष्यातून उठणं. असो, फार गप्पा मारू नकोस, पटकन् तयार हो, चल बघू मुंबईला, आपल्याला सार्‍यांना हॅप्पी दिवाळी म्हणायचंय!

सोनू, ही सेंट्रल रेल्वे आहे. तिने प्रवास करून मुंबईला रोज जाणं व वेळेवर पोचणं, हे मोठं भाग्याचं असतं! कुठं ना कुठं, रोज, यांची कामं चालूच. छोटा ब्लॉक, मोठा ब्लॉक, मेगा ब्लॉक. अगं, ब्लॉक म्हणजे आपण राहतो, तो ब्लॉक नाही, ब्लॉक म्हणजे, कामे करण्यासाठी रेल्वेच्या थांबलेल्या वेळा. सोनू, असं नाही हं म्हणायचं की या सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेची नावे बदलून ब्लॉक रेल्वे ठेऊ या, “ममता”ळू बाईंना राग येईल आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वेच ब्लॉक करतील. आणि मग लालू हातात कंदील घेऊन सिग्नल देत बसतील, त्यात त्यांच्या हातातल्या कंदिलातलं रॉकेल संपलंय. तुझ्याकडेच ते रॉकेल मागतील, आणि ते देणं आपल्याला कसं परवडेल? चल चल लवकर, आपण इंजिन ड्रायव्हरला हॅप्पी दिवाली म्हणू, काळजी करू नकोस, तो मराठीच आहे, त्यामुळे महाराष्ट्रात तरी इंजिन थोडंसं धावेल! हॅप्पी दिवाली इंजिन ड्रायव्हर साहेब! हॅप्पी दिवाली!!

सोनू, ही मुंबई! चल आपण टॅक्सी करू या आणि वर्षावर जाऊ या. अगं, वर्षा म्हणजे, पाऊस असला तरी, हा वर्षा म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा बंगला! सर्वात पहिले त्यांना हॅप्पी दिवाली म्हणू या. तिथेच सत्तेचा पाऊस पडतो, फक्त हा पाऊस आकाशातून पडत नाही, तो दिल्लीतून पडतो. सध्या दिल्ली अशोकरावांवर प्रसन्न आहे बरं. उद्या त्या जागेवर आणखी कोणी तरी असेल. आकाशातल्या ढगांप्रमाणेच सत्तेचे ढगही एका जागेवर टिकून रहात नाहीत. ते तिथे आहेत तोवर त्यांना शुभेच्छा देऊ. ते बघ बाहेर आलेच, पत्रकारांना “बाइट” देतायत, अगं बाइट देतात, म्हणजे चावत नाहीत, त्यांना ते बातमी देतायत. ते सांगतायत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत हाय कमांड ठरवेल, तोपर्यंत मी मुंबई-दिल्ली प्रवास करत राहणार. खरं म्हणजे मी ममताबाईंना सांगितलंय, खास महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांसाठी मुंबई-दिल्ली विमानाचा मासिक, त्रैमासिक पास ठेवायला हवा. महाराष्ट्रातील पर्यटनविकासासाठी मुख्यमंत्री म्हणून मला एवढे तरी केलेच पाहिजे. सोनू, चल लवकर, ते तुझ्यासाठीच थांबलेत, त्यांना हॅप्पी दिवाली म्हणून टाक बघू, ते बघ त्यांच्या गाड्यांचा ताफा निघाला सांताक्रूज विमानतळाकडे!

चल बाई, थोडे पुढे चल. हां, हे बघ, हे प्रदेश काँग्रेसचं कार्यालय. इथं झाकलेलं “माणिक” बसतं. तसा हुशार माणूस आहे हां, पण तो काही “अवजड” माणसांच्या वजनाखाली दबलेला आहे, तशी प्रत्येक काँग्रेस अध्यक्षाची गोची असते ती सोनू, पद मोठं पण अधिकार छोटा! चल अशा मोठ्या अधिकारावरील माणसाचा वेळ न खाता (खरं, म्हणजे त्यांना वेळच वेळ आहे) आपण त्यांना हॅप्पी दिवाली म्हणू या, म्हणजे त्यांना बरं वाटेल!

सोनू, हा “दो हंसोंका जोडा” बरं का! तू शोले पिक्चर बघितलास का? त्यातलं ये दोस्ती हम नही तोडेंगे ह्या गाण्याची स्फूर्ती सलीम-जावेदना या दोघांवरून मिळाली असं ते मला कानात म्हणाले होते. यातला एक जण केंद्रात अवजड उद्योग करणारा मंत्री आहे तर दुसरा पॉवरफुल मंत्री, पण दोघांचही लक्ष महाराष्ट्रात बरं! आता या दोन हंसांची पिल्लं महाराष्ट्रात स्थिरस्थावर व्हावी म्हणून दोघं प्रयत्न करत आहेत. सोनू, तुझं बरोबर आहे, नवनवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमातील म्हण आता बदलायला हवी. “घार हिंडते आकाशी. . .ह्” या ऐवजी आता “हंस हिंडतो आकाशि चित्त त्याचे (स्वतःच्या) पिल्लांपाशी” अशी करायला हवी. चल, आता या सुशील विलासी हंसांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला हव्यात, हॅप्पी दिवाली मित्रांनो!

आणि हे राष्ट्रवादी काँग्रसचं कार्यालय बरं का सोनू. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सख्खे शेजारी. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले. पण प्रॉपर्टीसाठी सख्खे भाई कसे भांडतात आणि वरकरणी एक आहोत असे दाखवतात, तसे आहे यांचं! तर, सोनू, हे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबा. वेडी, आबा हा मंत्रीमंडळातून आत-बाहेर याचा शॉर्टफॉर्म नाही, त्यांना लोक प्रेमानं आबा म्हणतात. ते अशी गुळणी धरून का बसलेत असं विचारू नकोस. ती तंबाखूची गुळणी नाही काही, ती त्यांची स्टईल आहे. ते अलिकडे बडीशेप खातात व हिंदीचे क्लास शिकतात. पुन्हा आपल्यावर पुनर्वसनाची वेळ येऊ नये म्हणून. चल, आपण यंदा त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हॅप्पी  दिवाली म्हणू या!

सोनू, आबांच्या कार्यालयात एवढे कोण बसलेत म्हणून काय विचारतेस. हे सगळे दादा, भाऊ, ताई, बापू, माई उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार. खरं म्हणजे ते एकमेकांचे दावेदार! त्यांना सार्‍यांना त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून शुभेच्छा द्यायलाच हव्यात! म्हणजे महाराष्ट्र कसा सकल उपमुख्यमंत्रीसंपन्न होईल. चल हॅप्पी दिवाली म्हण म्हणजे उद्या आपली पंचाईत नको व्हायला.

चला सोनूबाई आपण वांद्रे येथे जायला निघू. बा आदब बा मुलाहिजा होशियार. येथे गडकोटातील राज्यकर्ते असतात. अगं, हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण आता भाऊबंदकीनं खिळखिळा झाला आहे. एकछत्री अंमलाचा हा किल्ला आता सेनापतींच्या वृद्धत्वामुळे आणि गृहकलहामुळे दुबळा झाला आहे. स्वतःच्या हातानं स्वतःचं राज्य उभारणार्‍या छत्रपतींचं दुःख सेनापतींना पहावं लागतं आहे, हे दुर्दैव. चल, त्यांचा किल्ला पुन्हा उभा रहावा म्हणून आपण त्यांना आणि त्यांच्या खर्‍या वारसदारांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ या! ते बघ त्यांचे सर, ते हट्ट धरून आहेत, सध्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाची कार्यालये कशी दिल्लीला आहेत, त्यांना कसे दिल्लीतून आदेश येतात, पण आपल्याला मात्र मुंबईतून तेही एका छोट्याशा बांद्रा नामक भागतून. म्हणून त्यांना दिल्लीत कार्यालय हवे आहे, नाही तर आपण कोहिनूरची तरी शाखा काढू असा त्यांचा हट्ट आहे. चल सोनू, त्यांचा तो हट्ट पूर्ण व्हावा म्हणून त्याना आपण हॅप्पी दिवाली म्हणू या.

सोनू, हे दादर. इथे शिवाजी पार्क आहे, पण त्याला आता उद्यान म्हणायचे. असं का असं विचारायचं नाही, कानाखाली आवाज काढीन (बघ माझ्यावर परिसराचा कसा परिणाम झाला ते.). अगं, इथं मराठी अस्मिता राहते. (या अस्मितेची मुलं मराठीला ग्लोबल करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळे शिकतात, याकडे दुर्लक्ष करायचं, कारण हा अपवाद आहे, अपवाद हे नियम सिद्ध करण्यासाठी असतात हे विसरू नकोस.) सोनू, मग आम्ही बांधलेला मातोश्री मनोरा नसला तरी चालतो. तसे विचारण्याचा कोणालाही हक्क नाही, नाही तर कानाखाली . . . (तू कानावर हात ठेऊ नकोस, तुझ्या नाही! तू अपवाद.) सोनू कारण हा मुंबईतला राजगड आहे. येथे तुला मराठीतील दणदणीत वजनदार शब्द मिळतील हाणा, मारा, ठोका, सुपारी इ. चल आपण राजगडच्या राजांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ- हॅप्पी दिवाली मालक, चुकलो, दिवाळिचे शुभचिंतन!

सोनू, ही गढी आता अशी शांत शांत का? असा प्रश्न तुला पडेल. पण काळजी करू नकोस. या जागेला अनेक “अटल” प्रश्न आहेत, त्यातून “प्रमोद” निघून गेल्यानंतरचे! सारा काही “विनोद” आहे येथे. पण त्या विनोदाची प्रकृती गंभीर आहे. आणि या गोकुळातील गोपींना अनाथ करीत त्यांचा नाथ दिल्लीत गेला आहे. त्याचा पावा आता ऐकायला मिळणार नाही म्हणून अनेकींनी गवळण गाणं सोडून दिलं आहे. या नव्या पुरातन गढीचा “गडकरी” आता उदास आहे. या गढीला पुनःश्च शक्ती प्राप्त व्हावी, आसिंधू-सिंधू त्यांची सत्ता पुन्हा येण्याचे भाग्य त्यांना लाभो म्हणून आपण त्यांना हॅप्पी दिवाळी म्हणू या.

चला, सोनू ही झाली आपल्या मुंबईकरांना शुभेच्छा. पण अजून दिल्ली बाकी है! पुढच्या वेळी मी तुला दिल्लीला नेईन अगदी प्रफुल्लित विमानाने!, काळजी करू नकोस.

सोनू, आता महाराष्ट्राचं विलेक्शन झालं. यापुढच्या दिवाळ्या महाराष्ट्राचं दिवाळं न वाजवणार्‍या होवोत म्हणून सार्‍यांना शुभेच्छा देऊ या, म्हण बघू पुन्हा एकदा:

हॅप्पी दिवाळी मालक, हॅप्पी दिवाळी!!!

— नीतिन दत्तात्रेय आरेकर
कर्जत-रायगड

(ही फक्त एक गंमत आहे. अजाणतेपणी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर क्षमस्व)

 

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..