नवीन लेखन...

यम् मोठम् खोटम्



नवरा वयाने ‘मोठ्ठा‘च हवा, असा आग्रह आता कमी होत आहे. प्रगत पाश्चात्य देशांत तर वयाने लहान साथीदार निवडण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. मध्यंतरी एका वेबसाइटने केलेल्या पाहणीत हा बदल अधोरेखित करण्यात आला होता. आपल्याकडेही शहरी भागात, विशेषतः प्रेमविवाहांत हा ट्रेंड दिसू लागला आहे.

‘लग्न‘ हे आपल्या समाजात गृहस्थजीवनाची सुरुवात म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाते. एक आदर्श कुटुंब समाजाला लाभावे यासाठीचा तो सोपस्कार असतो. अशा कुटुंबातील दोन मूलभूत घटक म्हणजे नवरा व बायको. हे दोघे एकमेकांना अनुरूप असतील तर संसार सुखी होण्याची शक्यता अधिक. म्हणूनच या अनुरूपत्वासंबंधी परंपरेतून काही प्रथा निर्माण झाल्या. अर्थात बर्‍यापैकी पुरुषप्रधान असलेल्या आपल्या समाजात या प्रथाही पुरुषप्रधान नसत्या तरच नवल! नवरा मुलगा हा मुलीपेक्षा आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा सर्वच बाबतीत श्रेष्ठ असणे म्हणजेच ‘अनुरूप‘ असा एक संकेत बनला. याच संकेताप्रमाणे नवरा वयानेही पत्नीपेक्षा मोठा असावा, हेही गृहित धरले गेले. अगदी तीन-चार पिढ्या आधी तर १४ वर्षे वयाच्या मुलीचे लग्न ६० वर्षांच्या वृद्धाशी होणे हे सहज स्वीकारले जात होते. हा त्या मुलीवर किती अन्याय आहे हेदेखील फारच कमी जणांना जाणवत असे. आज इतके राहिले नसले तरीही नवरी मुलगी ही मुलापेक्षा किमान दोम-तीन वर्षे तरी लहान हवी, असा कटाक्ष दिसतोच.

ठरवून केलेल्या लग्नांमध्ये (Arranged Mariage) तर वय पाहिले जातेच, पण बहुधा प्रेम-विवाहांतदेखील मुलगा थोडा मोठा असल्याचेच बहुतेकदा बघायला मिळते. पण आता मात्र ‘बघायला मिळत होते‘, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल की काय असे वाटते. कारण ‘अब जमाना बदल रहा है।‘ नवरा वयाने ‘मोठ्ठा‘च हवा, असा आग्रह आता कमी होत आहे. उलट बायको काही महिन्यनी

किवा

वर्षांनी मोठी असल्याची उदाहरणे वाढत आहेत. नाही पटत? जरा आठवून पाहा! तुमच्या ओळखीत किमान दोन-तीन लग्ने तरी तुम्हाला अशी आठवतील की ज्यात बायको नवर्‍यापेक्षा मोठी आहे. अगदी जवळची नसतील तर ‘सेलिब्रिटीज‘पैकी सचिन-अंजली तेंडुलकर, शुभा मुद्गल-अनीश प्रधान, सैफ अली-अमृता सिग ही उदाहरणे तरी नक्कीच माहीत असतील!

या संथ पण स्वागतार्ह बदलाची कारणे काय असावीत, याचा विचार करताना स्वाभाविकपणे लक्षात येते ती आजची बदललेली स्त्री. ‘इकडच्या स्वारीं‘च्या आज्ञेबाहेर न जाणारी स्त्री आता दुर्मिळ होत आहे. कोणते शिक्षण घ्यायचे इथपासून लग्न कधी, कोणाशी करायचे याविषयी पूर्वीपेक्षा आजच्या स्त्रीमध्ये कितीतरी अधिक स्पष्ट विचार दिसतात. ‘लग्न ठरेपर्यंत वेळ घालवायचे साधन‘ म्हणून पदवीपर्यंत मुलीला शिकवणारे पालक आज दिसत नाहीत असे नाही, पण त्याचवेळी मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलीला तिच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणार्‍या पालकांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकपणे शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास व निर्भीडता, पालकांशी असलेला सुसंवाद, ‘को-एड‘ म्हणजेच मुला-मुलींनी एकत्र शिकण्याच्या वातावरणाचा प्रभाव यातून आपल्याला अनुरूप जोडीदार स्वतःच निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमविवाह किंवा स्वतःच्या निवडीतून विवाह हे अपवाद न राहता अगदी स्वाभाविक बनत चालले आहेत.

दुसरे म्हणजे आज मुली अनेक ‘पुरुषप्रधान‘ क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, संरक्षण दले, प्रशासकीय सेवा, खेळ अशा क्षेत्रांत अधिकाधिक संख्येने मुली जाऊ लागल्या आहेत. या क्षेत्रांत उच्चपदी जाण्यासाठी आवश्यक ते शिक्षण, परीक्षा अथवा प्रशिक्षण घेत असताना त्यांचे वयही वाढलेले असते. मात्र लग्न करण्याची घाई न करता चांगले करिअर घडावे यासाठी त्या परिश्रम घेतात. असे मनासारखे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मगच लग्नाचा विचार करताना वयाने मोठा मुलगा हवा, हा त्यांचा अट्टहास राहत नाही. उलट वयापेक्षा स्वभाव, आर्थिक स्थिती, शिक्षण, समजूतदारपणा, बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा निकषांवर जोडीदार निवडण्याकडे त्यांचा कल असतो. अशावेळी एक-दोन वर्षांनी लहान असलेला ‘ज्युनिअर‘ मित्रही जोडीदार म्हणून त्यांना योग्य वाटू शकतो, हे स्वाभाविकच म्हणावे लागेल.

प्रेमात पडताना डोळसपणे निर्णय घेणारी मुले-मुली आज दिसतात. शिक्षण, नोकरी-व्यवसाय, घरची परिस्थिती, स्वभाव अशा सर्वांगांनी जोडीदाराबाबत विचार करून निर्णय घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. मग बाकी सारे अनुरूप असताना केवळ मुलाचे वय मुलीहून कमी आहे, म्हणून नकार देणे अयोग्य नाही का?

हा बदल खूप आश्वासक आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये असे विवाह सर्रास होत असले तरी भारतात हा ट्रेंड त्या मानाने नवीनच म्हणायला हवा. कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना उठणारी वादळे अशा विवाहांतही दिसतात. त्यात सर्वात पहिली प्रतिक्रिया असते घरच्यांची. होऊ घातलेला जावई आपल्या मुलीहून वयाने लहान आहे किवा सून म्हणून येणारी मुलगी आपल्या मुलापेक्षा वयाने मोठी आहे, हे स्वीकारणे बहुतांश पालकांना जड जाते. त्यामुळे ते सुरुवातीला विरोध करतात. मुलांचा निर्णय ठाम असेल, तर नाइलाजाने लग्न लावून देतात. पण वयाची बाब मनातून जात नसते. त्यामुळे शक्यतो वयांचा उल्लेख न करण्याकडे आणि प्रसंग आलाच तर दोघेही ‘सारख्याच‘ वयाचे आहेत, असे मोघम उत्तर देण्याकडे त्यांचा कल दिसतो. मात्र नंतर लग्नाला एक-दोन वर्षे होऊन गेली व वय वगळता इतर सर्व बाबतींत सून-मुलगा किवा जावई-मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत, हे पटल्यावर त्यांच्या मनातील वयाबाबतचा विनाकारण असलेला गंड कमी होत जातो.

तारुण्यात प्रवेश झाल्यावर आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराची किंवा राजकुमारीची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात फुलत जाते. स्पष्टपणे नसले तरी ‘तो‘ वयाने मोठा व ‘ती‘ वयाने लहान

असणे, हे परंपरेच्या पगड्याने गृहीत धरलेले असते. अगदी ज्या

जोडप्यांमध्ये बायको मोठी आहे, त्यांच्याही मनात बहुधा असेच असते. असे असूनही वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडल्यावर मात्र परंपरेचा पगडा दूर ढकलण्याचे धाडस काही जण दाखवतात. असा विवाह केलेल्या जोडप्यांना त्याचे जाणवलेले गुण-दोष समजून घेणेही खूप रंजक आहे. जवळपास सर्वांच्या मते बायको वयाने मोठी असल्याचे किंवा नवरा लहान असल्याचे काहीही तोटे जाणवत नाहीत. उलट दोघांमध्ये जास्त समजूतदारपणा दिसून येतो. पूर्वीच्या काळी वयातील अंतराच्या धाकामुळे अनेक बाबतीत नवर्‍याचा निर्णय स्वीकारण्याशिवाय काहीही पर्याय नसे. पण यांच्या बाबतीत तसे होत नाही. सर्व निर्णय दोघांचेही मत विचारात घेऊनच होतात. मूल कधी व्हावे, घरासाठी काय खरेदी करायची, गुंतवणूक कुठे करायची आदी विविध विषयांसंबंधी परस्पर सामंजस्याने निर्णय घेणे सहजपणे होते.

अशा काही जोडप्यांच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या सुरुवातीच्या काळात कधीकधी असे प्रसंग आले की, जेव्हा नवरा वयाने मोठा, अनुभवी असता तर आपण निर्धास्तपणे त्याच्यावर विसंबलो असतो, असे काही जणींना वाटले. पण लगेच सावरून दोघांनीही प्रयत्न करून आलेल्या प्रसंगातून नीट वाट काढली. याचा भरपूर फायदा पुढच्या आयुष्यात त्यांना होत आहे. चुका करत, शिकत, एकमेकांना आधार व धीर देत खंबीरपणे पुढे चालणे त्यांना शक्य होत आहे.

अशा या विवाहांमध्ये आणखी एक विशेष आढळतो, तो म्हणजे यातील बरेचसे विवाह हे आंतरजातीय किवा आंतरप्रांतीय प्रेमविवाह आहेत. म्हणजे समाजपरिवर्तनाकडे जाणारे हे अजून एक पाऊलच म्हणावे लागेल.

हे सर्व पाहता असे वाटते की, नवरा लहान की बायको लहान याला खरोखरीच काही अर्थ नाही. नवरा-बायको एकमेकांचा व्यक्ती म्हणून किती आदर करतात, यावर विवाह यशस्वी हणे अवलंबून असते. नवरा वयाने मोठा आहे, पण बायकोला काडीचीही किंमत देत नसेल किवा बायको नवर्‍याला विचारत नसेल तर त्या नात्याला काही अर्थ असतो का? याउलट एकमेकांचा सन्मान करणे, परस्परांना समजून घेणे यामुळेच लग्न यशस्वी होतात. मग नवरा वयाने लहान असला तर काय बिघडते? स्त्री-पुरुष समानतेकडे टाकलेले एक पाऊल म्हणून अशा विवाहांकडे पाहणे अधिक अनुरूप ठरेल.

— भालचंद्र हाडगे, परुले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..