नवीन लेखन...

एकेरी पालकत्वाचे आव्हान

The Challenge of Single Parenting

आजकाल एकेरी पालकत्वाचं समाजातलं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. विशेषतः एकेरी पालकत्व सांभाळणार्या स्त्रीला तर अनेक पातळ्यांवर झुंजावं लागतं. केवळ संबंधित कुटुंबच नाही, तर सर्व समाजाचंच यात काही उत्तरदायित्व आहे, हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेच्या भूमीवर पंचवीस वर्षांपूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा ‘सिंगल पेरंटिंग‘ (अर्थात् एकेरी पालकत्व) ही संज्ञा माहीतही नव्हती. आज मात्र भारतात क्वचितच कुणी या शब्दाशी अपरिचित असेल! किंबहुना प्रसारमाध्यमांनी दखल घेण्याइतपत एकेरी पालकत्वाची- त्यातही ‘सिंगल मदर्स‘ची संख्या शहरी भागातील विशिष्ट वर्गात वाढते आहे. आपल्याच काय, पण पाश्चिमात्य देशांतही ‘सिंगल मदर्स‘चे समाजातील स्थान आजही काहीसे भुवया उंचावणारे असले तरी त्याकडे आता केवळ टीका वा दुर्लक्ष करून किवा नकारात्मकदृष्ट्या बघून भागणार नाही. परदेशात व्यक्तिगत स्वातंत्र्याची आदराने जोपासना केली जाते, तर भारतात माणसाच्या वैयक्तिक जीवनावर समाजाचाच प्रभाव अधिक असतो. त्यामुळे एकेरी पालकत्व रुजून त्याचा स्वीकार होण्यास- कमीत कमी त्यांना संशयाची नि उपेक्षेची वागणूक न मिळण्यास- काही काळ जावा लागणार आहे.

काळाबरोबर गोष्टी बदलतात, हे आपण मान्य करत असलो तरी रूढी-परंपरांचा पगडा व सामाजिक सुधारणा यांचा प्रश्न येतो तेव्हा बदल मुंगीच्या गतीने होताना दिसतात. आपण तर बदलायला राजी नसतोच; पण जे बदलतात, त्यांनाही नावं ठेवत काहीसं वाळीत टाकण्याकडेच सामान्यतः प्रवृत्ती असते. बदलू इच्छिणार्‍या व्यक्तीचे ते प्रवाहाविरुद्ध पोहणे असते. परिणामी या झगडण्यात त्याची बरीचशी ताकद नाहक खर्ची पडते.

समाजातील अनेक परिवर्तनं ही परिस्थितीच्या रेट्यातून होत जातात. भारतासारख्या विकसनशील देशात, विशेषतः गेल्या दहा वर्षांत ‘सुपरसॉनिक‘ गतीने बदल होत असताना शांतपणे बसून विचार करण्याइतकीही फुरसत माणसाला राहिलेली नाही. त्यामुळे त्याचे पडसाद जाणवायला लागले ते परिणाम भोगायची वेळ आल्यावरच!

एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे, एकेरी मिळकतीकडून दुहेरी उत्पन्नाकडे, पुरुषसत्ताक समाजाकडून आत्मभान जागे होऊन या सत्तेला शह देऊ पाहणार्‍या स्त्री-समाजाकडे, दोन-तीन अपत्यांपासून एकुलत्या एक मुलाकडे, देशाकडून परदेशाकडे, गावाकडून शहराकडे, भारतीय संस्कृतीकडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे, गरजांकडून चंगळवादाकडे, साधेपणाकडून दिखाऊपणाकडे… असा अनेक बदलांचा प्रवास गेल्या काही वर्षांत इतक्या झपाट्याने झाला, की अंतरंग ढवळून काढत समाजाचे एक बदलते, नवे रूप बघता बघता पृष्ठभागावर दृश्यमान झाले. नव्हे, त्याचे तरंग घरा-घरांपर्यंत येऊन थडकले. एकेरी पालकत्व हे अशा बदलांचेच एक दृश्यरूप.

एकेरी पालकत्व म्हटलं की त्यात एकेरी मातृत्व आणि एकेरी पितृत्व असं दोन्ही अध्याहृत आहे. आजार, अपघाताने अकाली मृत्यू होतो तेव्हा पालकत्वाची जबाबदारी स्वाभाविकपणे मागे राहणार्‍या पालकावर येऊन पडते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या पुनर्विवाहाचे प्रमाण अनेक कारणांनी कमी आहे. मात्र, मुलं पौगंडावस्थेच्या जवळपासची असतील तर अनेक ‘बाबा‘ही पुनर्विवाहाचा विचार करत नाहीत. शाळांमधील मुख्याध्यापकांच्या मते, असा आघात झाल्यावर सुरुवातीला कुटुंब अनेक पातळ्यांवर कोलमडतं. परंतु पालकांनी पुनर्विवाह न केल्यास मुलं चटकन् सावरतात व खूप समजूतदार होतात. पुरुषांना भावनिकदृष्ट्या मोठी पोकळी जाणवते, तर स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक आघाडीवरचा लढा अधिक अवघड असतो. स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करायला लागल्यापासून त्यांचा समाजातील वावर वाढू लागल्यामुळे त्या बर्‍याच आत्मविश्वासाने अशा परिस्थितीला सामोर्‍या जातात. तरीही त्यांना कामाच्या वा अन्य ठिकाणी अनेक बोचर्‍या नजरांना, लैंगिक संकेतांना सामोरे जावे लागते; जे अधिक त्रासदायक होते. एकट्या पुरुषांना असा त्रास क्वचितच होतो. म्हणून अशा स्त्रियांनी पुनर्विवाह करण्याविषयी त्यांचे पालक, नातेवाईक सहसा आग्रही असतात. परंतु पालकांचे दुसरे लग्न, विशेषतः अपत्य असलेल्या दोन्ही पालकांनी असं एकत्र येणं- दोघांचीही मुलं सहजी स्वीकारत नाहीत. प्रेम, माया, वैयक्तिक लक्ष, सुरक्षितता यांपासून ती वंचित होतात, असं त्यांना वाटतं. दोन्ही पालक नोकरी करणारे असतील तर कुटुंब अधिकच विस्कळीत होतं. अशावेळी घरातील वडीलधार्‍यांचा आधार फार महत्त्वाचा असतो. एका मुख्याध्यापिकेने त्यांच्या शाळेतील अशा पाच केसेस नमूद केल्या. अशा परिस्थितीत एकेरी पालकत्व जितके अवघड बनते, तितकेच नव्याने संसाराची घडी बसविणेही सोपे नाही. थोडक्यात- विधवा वा विधुर पालकांची सारी सत्त्वपरीक्षाच ठरते.

१९९९ साली माझ्या मुलीच्या शाळेतील पालकसभेला शिक्षकांनी एक धक्कादायक आकडेवारी मांडल्याचे अजून स्मरते आहे. ‘वायटूके‘ ची लाट शिगेला पोचलेल्या त्या वर्षात त्या शाळेतील चाळीस टक्के वडील विविध करारांवर परदेशात कामाला गेलेले होते आणि आया मागे राहून मुलांचे एकेरी पालकत्व सांभाळत होत्या. आता ती लाट ओसरली असली तरी आजही अनेक घरांतून अधिकतर वडील (काही ठिकाणी आयासुद्धा) बाहेरगावी कुटुंबापासून दूर कार्यरत आहेत. भौगोलिक अंतरानुसार ते आठवड्यातून ते वर्षातून एकदा घरी येतात. जागतिकीकरण, परदेशी कंपन्यांचे जगभर पसरणारे जाळे, पदोन्नती वा प्रगतीच्या संधी, अधिकाधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवण्याची वा चंगळवादाची ओढ, करिअरला प्राधान्य आणि अनेकदा निव्वळ नाइलाज (जसं जोडीदाराची स्थानिक नोकरी, मुलांचं शिक्षण, वृद्ध पालक, इ.) या सर्वांचा सामायिक परिणाम म्हणजे असं परिस्थितीवश स्वीकारावं लागणारं एकेरी पालकत्व! अनेक घरांतून हा हल्लीच्या कुटुंबाचा स्वाभाविक असा अविभाज्य घटकच बनला आहे. एकेरी पालकत्वाचा जबरदस्त भार अधिकतर स्त्रियांवर पडताना दिसतो आहे. मुळात पालकत्व म्हटलं की ते दुहेरीच अपेक्षित आहे. त्यामुळे एकेरी पालकत्वात झगडा ओघाने येतोच. बाहेरच्या परिस्थितीशी लढाई नि दुप्पट जबाबदारी- जी नकळत एक तर्‍हेची कुचंबणाच असते. थकवणारा, दमछाक करणारा त्यागही असतो.

केवळ आर्थिक पालकत्व सांभाळणहेर्‍या नवर्‍याच्या गैरहजेरीत बाहेरची कामं, घरातली कामं, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध सांभाळणे, मुलांच्या शाळा, अभ्यास, अनेकविध उपक्रम, पौगंडावस्थेतून जाणार्‍या मुलांचे प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर स्त्रियांना लढावे लागते. घरात वयोवृद्ध मंडळी असतील तर ती आणखी वाढीव जबाबदारी. शहरातून तर बहुसंख्य स्त्रिया नोकरी-व्यवसाय सांभाळून ही थकवणारी लढाई लढताना दिसतात. वाढत्या वयाबरोबर हा ‘सुपर वुमन‘ रोल निभावणं त्यांना अधिकाधिक अवघड बनत जातं. त्यात चाळिशीचे प्रश्न भर घालतात. वेळेअभावी महत्त्वाच्या असलेल्या वैयक्तिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशी हेळसांड बर्‍याचदा महाग पडू शकते. प्राप्त परिस्थितीशी टक्कर देण्याचे अनेक ताणतणाव, त्यात ऋतुनिवृत्तीमुळे होणारे हार्मोनल बदल, त्याचे शरीराबरोबरच मनावर होणारे परिणाम, त्यातच नवर्‍याच्या सहवासाची, मानसिक/ भावनिक आधाराची उणीव प्रकर्षाने जाणवणं… असा तो अनेकांगी ऑक्टोपसचा विळखा असतो.

घरातील पौगंडावस्थेतून जाणार्‍या मुलांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. साधारणतः वयात येणार्‍या मुलींना आई जवळची वाटायला लागते, तर मुलांना बाबांचा सहवास हवासा वाटू लागतो. त्या अभावी मुली अंतर्मुख बनतात, तर मुलगे समवयस्क किवा थोड्या मोठ्या मुलांची सोबत शोधतात. आपली उत्सुकता शमविणारी माहिती त्यांच्याकडून मिळवतात. पुरेशा परिपक्वतेअभावी अशा नाजूक मनोवस्थेत चुकीची संगत लागू शकते. याच काळात वाईट सवयी लागण्याची शक्यता असते. काळजी वाटून आईने शिस्त किवा नियमांचा बडगा उपसला तर ते बंडखोर बनतात. याच काळात (आठवी ते दहावी) अभ्यासाचा ताण वाढतो. पुढे काय करायचे, याविषयी गोंधळलेली अवस्था असते. अशावेळी वडील आपल्याबरोबर असणे त्यांना फार गरजेचे वाटते. तसे न झाल्यास मुळातच लांब असल्यामुळे वडिलांविषयी असलेला दुरावा अधिकच वाढतो. आईकडे जास्त ओढ राहते. वैचारिक प्रभावही आईचा अधिक असतो. वडील पाहुणे बनतात. त्यांना डावलल्यासारखे वाटून त्यांचा अहंकार दुखावला जातो. ते कुटुंबासाठीच सारं काही करत असले तरीही ही किंमत त्यांना मोजावी लागते. याचे ताण परस्परांतील नात्यांवर येतात. पण एरवी बाहेर असलेले वडील या महत्त्वाच्या काळात घरी परतले तर या वयातील मुलामुलींची कामगिरी सुधारते, असे निरीक्षण काही शिक्षकांनी नोंदवले. ती अधिक निर्मितीक्षम बनतात, त्यांच्या मनातील अनेक नवीन कल्पनांना मूर्त रूप येतं. या वयात दोन्ही पालकांची त्यांना भावनिक गरज असते. घरात खुले, आश्वासक वातावरण असणे- ही सर्वांच्याच मनःस्वास्थ्याची प्राथमिक गरज असते.

नोकरी-व्यवसायानिमित्त अधिक काळ घरापासून दूर राहणार्‍या स्त्रियांचे प्रमाण अजून तुलनेने खूप कमी आहे. तथापि आगामी काळात ते वाढत जाईल असे संकेत आहेत. त्यावेळी घरामध्ये वडिलांना वर दिलेल्या परिस्थितीशी सामना करावा लागेल. संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिवसभराची कामवाली बाई हा अक्सीर इलाज वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यातले गुंतेही कमी नाहीत! तरी आजकाल अनेक घरांतून बाबा मुलांचे मोठ्या प्रेमाने व जबाबदारीने पालनपोषण करत असल्याचे आशादायी चित्र हळुहळू दिसू लागले आहे. अनेकजण ते ‘काम‘ याऐवजी त्याकडे मुलांबरोबर वेळ घालवण्याच्या संधीचा आनंददायी भाग यादृष्टीने बघू लागले आहेत. मुलांबरोबर वडिलांचे एक ‘बाँडिग‘ तयार होते आहे. त्यामुळे आयांना निर्धास्तपणे कामानिमित्त परदेशी वा अन्यत्र जाणे शक्य होते आहे.

एकेरी पालकत्व परिस्थितीच्या नाइलाजातून असो वा प्रगतीच्या ध्यासातून- एकेरी मातृत्व करणार्‍या/ कराव्या लागणार्‍या स्त्रीला यात अनेकदा गृहीत धरलेले दिसते. तिच्या कष्टांचे, धडपडीचे उचित मूल्यमापन होतेच असे नाही. ‘मी क्वचित घरी येतो तेव्हा माझी व्यवस्थित दखल घेतली जावी,‘ अशी अनेक पुरुषांची अपेक्षा असते. पण पत्नीचाही तेवढाच दिवस सुट्टीचा असतो. अशावेळी परस्परांना बदल आणि विश्रांती मिळावी याची उभयपक्षी काळजी घेणे गरजेचे असते. यासाठीचा मनाचा मोठेपणा क्वचितच आढळतो. पत्नीचे कौतुक, श्रेय हा तर फारच पुढचा विचार! अशी स्त्री अधिकाधिक खंतावत जाते.

या परिस्थितीतून आज इतरही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नवर्‍याच्या सोबतीला पारखी झालेली, मन समजून न घेतली गेलेली, कौतुकाचा अभाव वाट्याला आलेली, कधी तर केवळ उपेक्षेची धनी झालेली अशी स्त्री मग बाहेर आकर्षित होताना दिसते. ऋतुसमाप्तीच्या अतिशय हळव्या, संवेदनशील प्रवासात मानसिक आधाराची, भावनिक सोबतीची, शारीरिक बदलांची दखल घेणार्‍या काळजीची, प्रेमाची तिला नितांत गरज असते. परिस्थितीचा रेटा, नोकरीतील टोकाचे ताणतणाव, प्रवासाचा थकवा, जोडीला स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा अनुदार आणि असंवेदनशील दृष्टिकोन या पार्श्वभूमीवर बाहेरच्या जगात तिला समजून घेणार्‍या, आस्थेने चौकशी करणार्‍या, तिच्यातील बदल टिपून त्याविषयी काळजी व्यक्त करणार्‍या, तिच्याविषयी आत्मीयता दाखवणार्‍या एखाद्या पुरुषाकडे ती ओढली जाण्याची शक्यता असते. यात शारीरिक ओढीपेक्षा मानसिक आधाराची गरज प्रबळ असते. क्वचित् प्रसंगी याची परिणती विवाहबाह्य संबंधात होऊ शकते. घरापासून दूर एकट्या राहणार्‍या पुरुषांनाही ते खुणावतात.

मात्र, अशा एकेरी पालकत्वाच्या काही सकारात्मक बाजूही आहेत. या अनुभवातून जाताना स्त्रिया अधिक धीट, निर्णयक्षम बनतात. आव्हान स्वीकारून आत्मविश्वासाने काम करतात. कोणतेही काम पुरुषांच्या अखत्यारीतील असे उरत नाही. परिस्थितीतून मार्ग काढताना, चुकत-माकत, अडचणींवर मात करीत, त्या शिकत, घडत जातात. ही लवचिकता व आत्मविश्वास जीवनाच्या वाटचालीत स्वयंनिर्णयाची जबाबदारी पेलण्यास त्यांना सक्षम बनवतो. आईने मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची वेळोवेळी जाणीव करून दिल्यास, त्यांना योग्य ती शिस्त लावल्यास (खरं तर हे आई-बाबा दोघांनीही करणं अपेक्षित आहे!) मुलं स्वावलंबी बनून घराचा एकखांबी तंबू सावरून धरण्यात हातभार लावतात.

आजी-आजोबा घरात असतील तर मात्र मुलांचे (विशेषतः मुलगे!) अवाजवी कौतुक व लाड होतात, असे शाळेतील शिक्षकांचे म्हणणे. अशी लाडावलेली मुले आक्रमक बनतात व इतरांना त्रासदायक होतात. घरातही याचे पडसाद उमटतात. त्यांनी पुढे अशीही पुस्ती जोडली की, वडील दूरदेशी आणि आई करिअरमध्ये गुंतलेली असेल तर मुलं पाळणाघरात वाढत असोत वा आजी-आजोबांजवळ – त्यांचं व्यक्तिमत्त्व समतोल राहात नाही. सुजाण पालकत्वाअभावी क्षमता असूनही अशी मुले मागे पडू शकतात.

बाबांकडून आईचा छळ होत असेल, कधी त्यांच्या स्वार्थी आचरणामुळे, तर कधी व्यसनाधीनतेमुळे आईला सतत त्रास, कधी मारहाणही सोसावी लागत असेल, तर मात्र कोवळ्या वयातच मुलं पोक्त बनतात. अंतर्मुख, अबोल होतात. त्यांच्या मनात वडिलांबद्दल चीड, तिरस्कार, तर आईविषयी सहानुभूती निर्माण होते. तेच तिला वडिलांपासून वेगळे राहण्यास प्रवृत्त करतात. तिला प्रेम, सुरक्षितता पुरवतात. अशा एकट्या आयांना मुलांचा खंबीर आधार मिळतो.

आधीच वंचना, उपेक्षा, अपमान सोसलेले, घटस्फोटामुळे मनात कमालीची अपराधी भावना, लग्न फसल्याचं दुःख, सर्व जबाबदार्‍यांचं ओझं येऊन पडलेलं, मन विद्ध करणारी एकटेपणाची जाणीव, समाजाकडून निर्भर्त्सना, टीका-टिप्पणी… अशा क्लेशकारी शारीरिक व मानसिक अवस्थेत मुलांनीही समजून घेतलं नाही तर परिस्थिती अधिकच बिकट बनते. क्वचित वडिलांनाही या दिव्यातून जावं लागण्याच्या घटना आहेतच. पण अधिकतर स्त्रियाच यात भरडल्या जाताना दिसतात.

कौटुंबिक आघाडीवर काहीही असले तरी आपला (समाजाचा) दृष्टिकोन अधिक क्षमाशील, उदार नि सर्वंकष असण्याची गरज आहे. अंतिमतः घटस्फोटाचे नेमके कारण केवळ ते पती-पत्नीच जाणतात. इतरांना ही गुंतागुंत कळणे अशक्य. एखादा पुरुष किवा स्त्री इतर नात्यात बरे-वाईट कसेही असले तरी पती-पत्नी संबंधात हे चित्र पूर्णतः वेगळे असू शकते. त्यामुळे त्रयस्थांनी अशा घटस्फोटाविषयी, त्यातून निर्माण होणार्‍या एकेरी पालकत्वाविषयी कोणतीही मते न बनवणेच शहाणपणाचे.नवरा किवा बायको याहूनही प्रथम ती दोघेही ‘माणसं‘ आहेत आणि त्या नात्याबाहेर ती आत्यंतिक चांगली असू शकतात, हे स्वीकारून या घटनेकडे मोकळ्या व पूर्वग्रहविरहित स्वच्छ दृष्टीने बघणे योग्य वाटते. जसे या प्रश्नात विचारल्याशिवाय शिरू नये, तसेच त्या व्यक्तीचे इतर नातेसंबंधही या वैयक्तिक घटनेमुळे बिघडू नयेत. यामुळे त्यांना एकेरी पालकत्वाचा पर्याय नाइलाजाने स्वीकारायला लागला असला तरी ताकदीने निभावून नेता येईल.

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का?

उच्च शिक्षणासह सर्व क्षेत्रांत स्त्रिया उत्तरोत्तर चमकू लागल्यावर हीच प्रगती काहींच्या डोळ्यांत सलू लागली. सर्व बाबतीत नवराच वरचढ असावा, असे मानणार्‍यासमाजात हे ‘जड‘ मोती अनेकांना सोसवेनात. मग अशा अनेकींची लग्ने लांबली, कित्येकींची होऊच शकली नाहीत. काहींनी आसपासचे अनुभव, कौटुंबिक जबाबदार्‍या, लग्नानंतर अनेक रुजलेल्या आवडी, छंद इ. सोडावे लागण्याची वा तडजोडी करण्याची अनिच्छा, करिअर प्राधान्यामुळे कुटुंबावर अन्याय होण्याच्या शक्यतेची भीती किवा मनासारखा जोडीदार मिळण्यातील अपयश- अशा कारणांनी लग्न न करण्याचे ठरवले. पत्नी बनता आले नाही तरी मातृत्वाची आस अतृप्त राहावी, असे मात्र त्यातील काहींना वाटले नाही आणि त्यांनी आई बनण्याचा निर्णय घेतला. वर उल्लेख केलेल्या पुस्तकात अशा काही आई-मूल जोड्यांबद्दल सविस्तर विवेचन आहे. यात स्वित्झर्लंड तर आघाडीवर आहेच, पण जपानही मागे नाही. अगदी चीनपर्यंत हे लोण पसरले आहे. बहुतांशी स्त्रिया असे एकेरी मातृत्व उत्तमपणे पार पाडत आहेत. आर्थिकदृष्ट्या तर त्या सक्षम आहेतच, पण एकेरी पालकत्वाच्या स्वयंनिर्णयालाही त्या अधिक जागरूक व सुजाणपणे जागत आहेत. किंबहुना वडिलांची उणीव कमीत कमी जाणवावी यासाठी धडपडताना आपल्या सार्‍या क्षमता पणाला लावून ही जबाबदारी आनंदाने व मोठ्या कसदारपणे पेलत आहेत. (मूल दत्तक घेऊन एकेरी पितृत्व करणारे पुरुष कदाचित असतीलही, पण त्यांची काही माहिती मिळू शकली नाही.)

असे एकेरी मातृत्व योग्य की अयोग्य, अशा एकट्या आयांच्या मुलांना समाजात भेडसावणारे प्रश्न, होणारा त्रास, त्यांचे भविष्य, त्यांनी नाव कुणाचे लावायचे- याबद्दलची कायदेशीर संदिग्धता अशा मुद्द्यांवर निव्वळ चर्चा वा टीका-टिप्पणी करीत बसण्यापेक्षा अशा परिस्थितीचा उगम का व कशातून झाला, याचा विचार करणे अधिक योग्य ठरेल. समाजाचे, कुटुंब-घटकांचे असे आत्मपरीक्षण स्वतःपासून सुरू झाले तर काही गोष्टी, चुका आपण समजू शकू. त्या मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवलाच तर पुढची पायरी आहे बदलाची! तो स्वतःपासून सुरू करण्याची नि दुसर्‍याचा मान्य करण्याची, स्वीकारण्याची, विचारांच्या पातळीवर सुरू झालेले हे बदल प्रत्यक्ष कृतीत आणणे ही त्यापुढची एक पायरी. आपण काळाबरोबर बदलण्याचा असा प्रयत्न करायला पाहिजे, असे तुम्हालाही वाटते ना? तरच कालबाह्य, विसंगत होत चाललेल्या आपल्या पारंपरिक चौकटींचा पुनर्विचार करायला आपण तयार होऊ, नाही का? या चौकटीतून बाहेर येऊ शकलो नाही तर परिस्थितीचा रेटा त्या चौकटी तोडल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस आपल्याच घरात हे घडले तर मग आपण दोष तरी कुणाला देणार? दुसर्याच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे, भूमिकेचा आदर करणे, ‘माणूस‘ म्हणून सर्वांना समानतेची वागणूक मिळणे, कुणाचीही गळचेपी, अवहेलना, उपेक्षा न होणे- थोडक्यात, समतेच्या पक्क्या पायावर कुटुंबाची इमारत उभी राहणे, ही काळाची गरज बनली आहे. त्या गरजेची पूर्तता एकेरी पालकत्व अर्थपूर्ण बनविणार आहे.

— भालचंद्र हादगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..