मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – ‘वेलस्ली’ आणि ‘क्विन व्हिक्टोरिया’

Statues in Mumbai - Welsley and Victoria

‘मार्क्विस आर्थर वेलस्ली’ आणि ‘क्विन व्हिक्टोरिया’ – हरवलेले पुतळे

मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग..या भागात मुंबईत पूर्वी असलेल्या परंतू स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या जागेवरून ‘हलवले’ल्या आणि आता ‘हरवले’ल्या दोन पुतळ्यांची माहिती आपण घेऊ..

p-29209-1

मागच्या तीसऱ्या भागात आपण हॉर्निमन सर्कल व त्यातील कारंजाच्या (एशियाटीक कडे पुढा करून उभं राहीलं असता) उजव्या बाजूस देवळीत स्थानापन्न असलेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची माहिती घेतली होती..या लेखाचा विषय असलेला ‘मार्क्विस ऑर्थर वेलस्ली’ याचा पुतळा हॉर्निमन सर्कल मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याच्या बरोबर समोर, म्हणजेच कारंजाच्या डाव्या बाजूस होता..ऑर्थर वेलस्ली सन १७९८ साली कलकत्ता येथे गव्हर्नर जनरलच्या पदावर होते.. कॉर्नवॉलिसप्रमाणे हे ही जबरी योद्धे होते..१८०३ साली मराठ्यांबरोबर आसे येथे झालेल्या लढाईत यांनी मराठ्यांवर विजय मिळवला होता व त्यांच्या या विजयाच्या सन्मानार्थ हा पुतळा येथे बसवण्यात आला होता.

हा पुतळा मोठा नमुनेदार होता. एका उंच चंबूतऱ्यावर वेलस्ली बसले होते. बाजूला खाली त्यांची मॅडम बसली आहे आणि दुसऱ्या बाजूस खाली एक देशी नागरिक उभा आहे. वेलस्ली त्या देशी नागरिकाला एक तोडा बक्षीस देत असून त्याची शेजारी खाली बसलेली मॅडम चबुतऱ्यावर असलेळ्या “Wisdom, Energy, Integrity” या शब्दांकडे बोट दाखवत आहे. पुतळ्याचा चबुतरा ज्या चौथऱ्यावर बसवलाय, त्या चौथऱ्याच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस सिंहाचा पुतळा आहे. वाघ हे भारताचे प्रतिक तर सिंह इंग्लंडचे..आसेच्या लढाईत सिंहाने वाघावर म्हणजे ब्रिटीशांनी मराठ्यांवर विजय मिळवला असे हे वाघ-सिंहाचे पुतळे सुचवत आहेत..हा पुतळाही स्वराज्यात हलवला गेला सध्या या पुतळ्यचा मुक्काम कुठे आहे याचा काहीच ठाव ठिकाणा कळत नाही..हा ‘हरवलेला’ पुतळा आहे. याचे एक जुने चित्र इंटर नेटवर मिळाले, ते सोबत जोडत आहे.

‘हरवलेला’ दुसरा पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा..!

p-29209-2

आपण सीएसटी स्टेशनच्या पश्चिम दिशेने बाहेर पडून डाव्या हाताला दहा-बारा पावलं चाललो की स्टेशनचं भव्य मेन गेट लागतं.. या मेन गेट समोर, समोरच्या कॅपिटल थेटराकडे पाठ करून उभं राहिलं की स्टेशनचा घुमटादार मुख्य मनोरा व त्याखालच्या महिरपीतलं भव्य घड्याळ दिसतं. या घड्याळाखाली एक उभट रिकामा कोनाडा दिसतो त्याकडे आपलं लक्ष गेलंय कधी? या रिकाम्या कोनाड्यात स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा सहा-साडेसहा फुटी उंच पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर इतर पुतळ्या प्रमाणे तो ही इथून ‘हलवला’ गेला परंतु तो सध्या ‘हरवलेला’ आहे. सध्या हा पुतळा नेमका कुठे आहे हे शोधूनही सापडले नाही. सोबत या ठिकाणी असलेल्या राणीच्या पुतळ्याचा जुना फोटो व सध्याचा रिकामा कोनाडा असलेला नविन फोटो पाठवीत आहे.

p-29209-3

‘व्ही.टी.’ स्टेशनचं नामकरण १९९६ साली ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं झालं. छत्रपती शिवाजी टर्मिनसचं अनधिकृतरीत्या ‘सीएसटी’ होऊनही बराच काल लोटला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या स्टेशनला दिलंय त्यांचं उठसूट नांव घेत राजकारण करणारी मंडळी समोरच काही फुटांवर असलेल्या महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष सत्तेवर असूनही स्टेशनच्या रिकाम्या कोनाड्यात राणीच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करावा असे कोणालाच का वाटत नाही? तसं केल्यानेच स्टेशनच्या नामकरणास अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं.

जाता जाता –

हॉर्निमन सर्कलमध्ये समोरासमोर असलेल्या कॉर्नवॉलिस आणि वेलस्ली या दोन पुतळ्यांनी त्याकाळी मोठी धमाल उडवली होती.. कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला आपले स्थानिक हिंदू लोक हळू हळू देव मानायला लागले होते..त्याची पूजाअर्चा करून त्यांना नवसही बोलू लागले होते.. कॉर्नवॉलिस याच्या पुतळ्यांच्या बाबतीत माडगावकर त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात लिहितात, “ या पुतळ्याला कित्येक हमाल, दुसरे गरीब गुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ, विडा, दक्षिणा ठेवून मानणूक करीत. परंतु अलीकडे सरकारने हे खूळ बंद करून टाकिले आहे. आमचे लोक काय विचारता ! सर्व गोष्टीत भोळे ! दगडात जरा काही आकृती दृष्टीस पडली की, नारळ घेऊन त्या पुढे हात जोडावयास धावले.विचार करायचे भरीस पडायचे नाहीत..” आता कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोर पोलीस ठेऊन गर्दी हटवली तर लोक वेलस्लीच्या पुतळ्याला भजायला लागले.. हा कोणीतरी नवा विलायती देव सरकारने आपल्यासाठी पाठवला आहे असा त्या काळच्या लोकांचा समज होऊन इथेही पुन्हा तोच प्रकार घडायला लागला. शेवटी या ठिकाणीही सरकारला पहारेकरी ठेवावे लागले होते असं माडगावकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

माडगावकरांचे पुस्तक १८६२ सालातले आहे..आज २०१६ सालातही आपली हिंदू मानसिकता तीच आहे हे नवसाला पावणारे देव, देवळे आणि बाबा-बुवा-बापूंच्या उदंड आलेल्या पिकावरून सिद्ध होते. ते निदान काही तरी आकाराचे पुतळे तरी होते, आता तर नुसत्या ‘दगडा’चे दर्शन घेण्यासाठी आंदोलने होतायत..शिक्षणाने शहाणपण येते असे अनेक ठिकाणी वाचायला मिळते मात्र अनुभवायला मिळत नाही.

— गणेश साळुंखे
९३२१८११०९१

मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले..(भाग ४ व शेवटचा )

संदर्भ – ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविंद माडगावकर, सन १८६२महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 278 लेख
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*