नवीन लेखन...

व्यक्ती, समाज – २ : बाजी प्रभू देशपांडे व पावनखिंड : कांहीं चर्चा

Baji Prabhu Deshpande and Pawankhind

• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल.

• सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं ठेवला. त्या वेढ्यातून सुटका करून घेण्यांसाठी शिवरायांनी एक धाडशी बेत आखला, आणि तो म्हणजे, जौहरला गाफील करून विशाळगडावर पलायन करायचें. शिवाजी राजांतर्फे जौहरशी तहाशी बोलणी केली गेली, आणि अमुक अमुक दिवशीं शिवराय जौहरच्या भेटीला जाणार असें ठरलें. जौहर व त्याची विजापुरी छावणी आनंदून गेली, वेढा कांहींसा ढिला पडला. ठरलेल्या त्या दिवसाच्या आदल्या रात्रींच शिवरायांनी मोजक्या लोकांसह जौहरच्या वेढ्यातून पलायन केलें, परंतु जौहरच्या माणसांना त्याचा पत्ता लागलाच. जौहरनें आपला जावई सिद्दी मसूद याला शिवबांच्या मागावर धाडलें. त्याला चकमा देण्यासाठी ‘शिवा काशीद’ याचा उपयोग करून शिवरायांनी अमूल्य वेळ प्राप्त करून घेतला.
( शिवा काशीद याच्यावरील माझा वेगळा, संशोधनात्मक, लेख, या वेबसाईटवर पहावा ).
जाणुनबुजून शिवरायांनी विशाळगडला जाण्यासाठी जंगलातला आडरस्ता धरला होता. हेतू हा की, आपला पाठलाग करणें जौहरच्या माणसांना कठीण जाईल, व तें सैन्य पाठीवर आलेंच, तर त्या जंगलच्या मुलुखात त्यांच्याशी चकमक करून पुढें पळणें आपल्याला सोपें जाईल. आषाढाचा पावसाळी महिना, सर्वत्र रपरप चिखल, जंगलच्या वाटा, रात्रीचा मिट्ट काळोख. शिवराय पालखीत होते, पण बरोबरचे मावळे पायीं होते, कारण जौहरच्या वेढ्यातून पायींच पळतां येणें शक्य होतें, घोड्यावरून नव्हे. वाटाडे भले वाट दाखवायला असतील, पण तो धावत-धावत-प्रवास तर सोबतीच्या ६०० मावळ्यांना पायींच करायचा होता. त्या दौडीत, पायीं दौडत असतांना, शिबरायांच्या संरक्षणाची जबाबदारी बांदलांवर होती. बाजी प्रभू देशपांडा हा पठ्ठ्या गडी बांदलांचा सरदार होता.
देशपांडे असा उल्लेख न होतां, त्या काळीं ‘देशपांडा’ असा उल्लेख होत असे. अशी इतर उदाहरणेंही पहातां येतील. जसें की, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा (नरसाळे) . खुद्द शिवाजी राजांचा उल्लेख ‘शिवाजी भोसला’ असा विजापुरी सरदार करत असल्यास, त्यात कांहीं नवल नव्हे. अशा तर्‍हेचा उल्लेख अगदी हल्लीहल्लीपर्यंत केला गेलेला मी स्वत: पाहिलेला आहे. खुद्द माझे सासरे ‘गडबोला आला होता’ अशा प्रकारचे उल्लेख करीत. ही २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि अशा एकेरी उल्लेखात (जसें, गोडबोले याच्या ऐवजी गडबोला) कुणाला कमी लेखायचें असा कांहींही प्रकार नसे, तर ती बोलायची पद्धतच होती.
शिवरायांसह मावळे जंगलवाटेनें पायीं दौडत होते, तर सिद्धी मसूद व त्याचे ३०००-५००० सैनिक हमरस्यानें घोड्यावरून दौडत होते.
पावसात चिखल तुडवत, पूर्ण रात्रभर पन्हाळगड ते विशाळगड-पायथ्यापर्यंत धावल्यानंतर, पहाट होण्याच्या सुमाराला, शत्रू जवळ आला असें पाहून, शिवराय ३०० मावळ्यांसह पुढे विशाळगडाकडे धावले; अन् बाजी प्रभू , घोडखिंडीत, फक्त ३०० मावळ्यांसह, सिद्दी जौहरच्या ३०००-५००० सैनिकांना तोंड द्यायला, अडवून धरायला थांबले. खिंडीत कां, तर तिथें शत्रूच्या अगदी थोड्याच माणसांना पुढें सरकतां येणार होते, आणि तेंही पायी, घोड्यांवरून नव्हे. त्यामुळे बाजींना , आपल्या दसपटीहून जास्त शत्रूसैन्याला, लहान लहान तुकड्यांशी लढत, थोपवून धरणें, कांहींसें सोपें होतें. अर्थात्, काम तसें सोपें नव्हतेंच. पन्हाळगडाहून, रात्रीं अंधार झाल्यावर, वेढ्यातील जौहरचे सैनिक झोपल्यानंतर, म्हणजे मध्यरात्रीच्या आगेमागे, ११-१२ च्या सुमारास, हे मावळे पळाले असतील. म्हणजे घोडखिंड येईतो, त्यांचें, ५-६ तास पळणें झालेलें होते. एवढें जंगलवाटेनें अंधारात व चिखलात पळणें, परत शत्रूच्या भीतीचें टेन्शन, या शारीरिक व मानसिक ताणानें, तोंवरच ही माणूसें थकून गेलेली असतील. आणि, खरी परीक्षा तर पुढेंच होती. किती तास असें लढायचें ?
त्यापुढील शिवरायांचेंही काम सोपें नव्हतेंच. केवळ ३०० मावळ्यांसह त्यांना विशाळगड नुसता चढायचा नव्हता, तर तेथील शत्रूशी लढत लढत त्यांना पुढे ज़ायचें होतें ; कारण विशाळगडालाही वेढा पडलेला होता , जौहरनें फास अगदी व्यवस्थित आवळलेला होता.
लढत लढत विशाळगडाभोवतीच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी मुसंडी मारली व ते गडावर धावले. गडावर पोचेपर्यंत मध्यान्ह झालेली होती. पहाटेपासून ते मध्यान्हीपर्यंत, म्हणजे किमान सातएक तास तरी, बाजींनी व त्यांच्या मावळ्यांनी शत्रूसैन्याला थोपवून धरले. कमाल आहे ! आधीचें ५-६ तास जंगलातून धावणें, आणि त्यानंतर, दसपट शत्रूला सातएक तास सक्सेसफुली थोपवून धरणें, हें ‘खायचें काम नव्हे’. त्यासाठी बाजींचेंच नव्हे, तर त्यांच्याबरोबरच्या सगळ्याच मावळ्यांच्या शारीरिक क्षमतेचें अन् प्रबळ इच्छाशक्तीचें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे ! राजे गडावर पोचून तोफांचे आवाज झाले, ते ऐकूं आल्यानंतरच बाजींनी प्राण सोडला, असें म्हटलें जातें. तें कितपत खरें आहे, कल्पना नाहीं. मात्र, इच्छाशक्तीनें आपला प्राण कांहीं काळ रोखून धरला, अशी साध्यासाध्या माणसांचीही उदाहरणें दिसून येतात, त्यामुळे, बाजींनी तसें केलें असल्यास नवल नव्हे. पण, बाजी स्वत: कधी पडले, व किती काळ त्यांनी प्राण रोखून धरला, याहीपेक्षा अधिक महत्वाची आहे त्यांची व त्याच्या अनामिक सहकार्‍यांची कामगिरी ! आपल्याला मृत्यू येणारच हें आधीपासूनच ठाऊक असूनही ते लढले; आणि आपल्याला मिळालेली कामगिरी त्यांनी फत्ते केली. अशा प्रसिद्ध-अप्रसिद्ध लोकांनी रचलेल्या पायावरच आज आपण सारे अभिमानानें उभे आहोत !

• या अनुषंगानें, मला बाजी प्रभूंवर कविवर्य कुसुमाग्रज यांची, ‘संपेल कधी रण प्रभो तरी । मी कुठवर साहूं घाव शिरीं ।’ ही अत्युत्कृष्ट व सुप्रसिद्ध कविता आठवते. लता मंगेशकरांनी ती गाइलीही आहे अशा उत्कटतेनें, की ती ऐकून आपण विव्हल होऊन जातो. तोफांचे आवाज येईतों बाजी लढले, व आवाज आल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला, या आख्यायिकेवरच ही कविता आधारलेली आहे.
मात्र, कुसुमाग्रजांबद्दल पूर्ण आदर बाळगूनही, त्यांनी या कवितेत रंगवलेला बाजी प्रभूंचा मनोव्यापार मला पटायला कठीण जातो. ‘लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो’ असें ठामपणें म्हणून त्यांनी शिवरायांना पुढे गडावर जाण्यासाठी प्रवृत्त केले, व नंतरच्या लढाईत ते स्वत: अतिशय घायाळ होऊनही, अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहिले. असे बाजी प्रभू , एक तर , ‘संपेल कधी रण ?’ असा आकुल विचार करतील कां ; आणि दुसरें म्हणजे, हातघाईच्या लढाईच्या धुमश्चक्रीत, त्यांना, तलवार-ढालीव्यतिरिक्त, ‘संपेल कधी रण’ हाच काय पण कुठलाही अन्य विचार करायला निमिषाचीही फुर्सत तरी मिळूं शकली असेल काय ? हां, ‘तोफांचे आवाज येईतों लढत रहा, शत्रूला रोखून धरा, जीव गेला तरी बेहत्तर’ असा संदेश त्यांनी जोशानें लढाईपूर्वी आपल्या साथीदारांना ज़रूर दिला असेल.
पावनखिंडीतल्या लढाईचें विस्तृत वर्णन आपल्यापुढे नाहीं, पण एक अन्य लडाईचें तर निश्चितच आहे. ती म्हणजे जानेवारी १७६१ ची, ( म्हणजे पावनखिंडीच्या १०० वर्षें नंतर झालेली ) , मराठे व अब्दाली यांच्यात झालेली पनिपतची तिसरी लढाई. तिचें वर्णन मराठी बखरीमध्ये आहेच, पण तें किती विश्वसनीय आहे, त्याबद्दल शंका आहे. मात्र, फारसी साधनांमध्येही त्या घटनांचें वर्णन आहे. काशीराज या, लखनौच्या शुजाच्या पदरीं असलेल्या मराठी माणसानें फारसीत लिहिलेलें पुस्तक कदाचित् जास्त विश्वसनीय आहे. तें असो-नसो. पण त्या लढाईत सदाशिवराव भाऊ व पेशव्यांची हुजरात हे लोक गिलच्यांशी लढता असतांना काय झालें, तें विचारणीय आहे. कापाकापी सुरूं होती. एका वीर पुरुषाला चार-पांच गिलच्यांनी घेरले होतें तो दात आवळून त्यांच्याशी लढत होता, ते अर्थातच त्याला ओळखत नव्हते, पण त्याचे उंची कपडे पाहून, हा कुणीतरी मोठा सरदार असावा, असें त्यांना वाटलें. याला जिवंत पकडलें तर आपल्याला बक्षिशी मिळेल, असें त्यांना नक्कीच वाटलें असणार. ‘तुम कौन हो’ असें ते लढतांनाच विचारत राहिले, पण त्यानें उत्तर दिलें नाहीं, तो लढतच राहिला. अखेरीस लढता लढताच त्याचा अंत झाला. फार नंतर समजलें की तो सदाशिवराव भाऊ होता.
वीर पुरुष तलवार-ढाल, तलवार-ढाल असे करत करत लढतच असतात, त्यांना शत्रूला उत्तर द्यायला किंवा तोफांच्या आवाजाची वाट पहात, ‘संपेल कधी रण’ असा व्याकुळ विचार करायला फुर्सतही नसते, आणि तशी त्यांची मनोधारणाही नसते.

• अर्थात्, या चर्चेमुळे, कुसुमाग्रजांच्या कवितेचें, एक साहित्यकृती म्हणून मूल्य अजिबात कमी होत नाहीं.
तसेंच, त्या कवितेत वर्णलेले विचार खरोखर बाजी प्रभूंच्या मनात आले असोत वा नसोत, त्यामुळें त्यांच्या कार्याचें महत्व तिळमात्र कमी होत नाहीं. त्यांच्यापासून स्फूर्ती घेणें, एवढें तर आपल्याला नक्कीच शक्य आहे, आणि तें आपण केलेंच पाहिजे .

– – –
१३.०७.२०१६
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..