नवीन लेखन...

झापडं !

अमर्याद माहितीच्या ओझ्याखाली आपण गुदमरून जावे अशी सध्या अवस्था झालीय सर्वांचीच! आमच्या शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात माहिती (information) आणि ज्ञान (knowledge) यांच्यातील फरक भल्या भल्यांना कळत नाहीए. गूगल म्हणजे शिक्षण आणि त्यासाठी शिक्षक नामक मध्यस्थाची (फॅसिलिटेटर) फारशी गरज भासत नाहीए. कोरोनाने आमच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या मदतीने सगळं शिक्षण विश्वच उध्वस्त केलंय.

हे माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे.

ज्यादाची माहिती बरेचदा जास्त उत्पादक निर्णय घेण्यास मदत अवश्य करीत असते. विज्ञान,गणित, वैद्यकीय यासारख्या अनुभवाधिष्ठित क्षेत्रांमध्ये जितकी जास्त माहिती तितकी अचूकता वाढते. अमर्याद माहितीचा साठा खूप वेळा प्रगतीसाठी हातभार लावतो. माहिती बरोबरचे तंत्रज्ञान क्षेत्र प्रत्यही इतके विस्तारत आहे की कालचे ज्ञान आज कालबाह्य होत चालले आहे. आणि त्यामागे धावण्यात मानवाची दमछाक होऊ लागली आहे. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचे अपडेट सगळ्यांना तात्काळ हवे असते आणि त्यामुळे २४x ७ च्या वृत्तवाहिन्या सतत धावपळ करीत असतात आणि “पळा पळा कोण पुढे पळे तो ” या शर्यतीत स्वतःचीही दमछाक करून घेतात. त्या माहितीवर प्रक्रिया करून त्याचे ज्ञानात रूपांतर करण्यासही आपल्याला सवड देत नाहीत. मग हे धबधबे आणि दिवसभराचे तेच तेच बाईट्स आपल्याला ग्लानी आणतात.

माझ्या लहानपणी तर वृत्तपत्र नावाची चैन नव्हती आणि रेडिओ फक्त दिवसातील दोन वेळा बातम्या ऐकण्यासाठी (क्वचित क्रिकेट मॅच असेल तर न कळणारी, पण शाळेत सगळ्यांसमोर शान मारण्यासाठी कॉमेंटरी ऐकण्यासाठी) असायचा.

माझ्या माहितीनुसार हे बाबरी प्रकरणापासून सुरु झाले आणि विनोद दुआ/प्रणव रॉय यांच्या क्षणोक्षणीच्या निवडणूक निकालावरील भाष्यापासून फोफावले. मग भारतात आणि जगभर होणाऱ्या आतंकी हल्ल्यांच्या वृत्तांकनापासून कानावर सारखे आदळू लागले. त्यावर कडी म्हणजे व्हाट्सअँप विद्यापीठ आल्यापासून सकाळी उठणे ते रात्री झोपणे यादरम्यान सगळेच भ्रमणध्वनीवर असतात. याला नांव आहे- फोमो (Fear Of Missing Out). त्यामुळे कळों ना कळों, पण तज्ञ भाष्यकर्ते कट्ट्याकट्टयावर पैदा झाले. ज्याच्याकडे लेटेस्ट अपडेट तो श्रीमंत,हुशार,बुद्धिमान इत्यादी इत्यादी!

हा वर्षाव बरेचदा आपले अर्थपूर्ण,सौहार्द्रपूर्ण जीवन मुळापासून उखडत आहे. विशेषतः बातम्यांमधील आपल्या नियंत्रणाबाहेरील घटना (रशिया-युक्रेन युद्ध, महाराष्ट्रातील सरकारची पडझड, रस्त्यावरील वाहतूक मुरंबा इ) आपल्याला हळूहळू शोषून घेत असतात.

मध्यंतरी एका ब्लॉगरचा अनुभव वाचनात आला- दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रिटिश सरकारने बराच काळ चर्चिल म्युझियम मधून काम केले. यापैकी काही काळ परीक्षेचा होता- १९४० मध्ये जर्मनीने सुमारे ५७ दिवस सलग लंडनवर बॉम्ब हल्ले केले. लंडनवासी तग धरून राहू शकले ते एकाच आशेवर- सततच्या बॉम्ब वर्षावातही रोजची होणारी हानी तशी नगण्य असे,आणि म्हणूनच चित्र आशादायी भासे. त्यामुळे रोज सकाळी सुखरूप उठल्यावर त्यांची जिजीविषा तर प्रखर होत होतीच पण त्यांना जगण्याकडे उसळी मारून परतवत होती. हा काळ असह्य जरूर होता, पण ते टिकले.

आजच्या वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमे त्याकाळी असती तर कल्पनाही करवत नाहीए. लंडनवासी कोलमडून पडले असते. आपल्या २६/११ चे वृत्तांकन आठवा. श्री विलासराव देशमुखांचे अंत्यविधी किती बारीक सारीक अनावश्यक तपशिलांसह आपल्या पर्यंत आले होते आणि अलीकडचे गुवाहाटी वास्तव्यही!

म्हणूनच पुलं गेल्यावर सुनीताबाई त्यांच्या अंत्यदर्शनासाठी खोलीबाहेर आल्या नव्हत्या. सगळे वाहिन्यांचे कॅमेरे खोलीतून हाकलल्यावरच त्यांनी बाहेर येणे पसंत केले. स्वतःच्या वैयक्तिकपणाचे भांडवल/प्रदर्शन त्यांनी अखेरपर्यंत टाळले.

“टॉक ऑफ द टाऊन “होण्याचे अंतिम क्षणी देवानंदनेही जाणीवपूर्वक टाळले.

आमच्याकडच्या लग्नाच्या पंगतीत जेवणाच्या ताटाचे चित्रीकरण करण्याचा अट्टाहास असतो आणि ‘ जा मुली जा दिल्या घरी” क्षणीच्या नवरीच्या अश्रूंवर कॅमेऱ्याचे लेन्स टक लावून पाहात असते.

माध्यमं /जाहिराती आपल्या वतीने निर्णय घेताहेत- आपण काय खावं ,कोणता चित्रपट पाहावा,कोणत्या हॉटेलात जेवावे,कोणत्या रिसॉर्टमध्ये सुट्टी व्यतीत करावी हे सगळे निर्णय reviews घेताहेत. आपल्या डोळ्यांच्या बाजूला घोडयांसारख्या झापडी बांधल्या जाताहेत आणि आपण काय बघावं/काय ऐकावं हे इतरेजन ठरविताहेत.

आमच्या बालपिढीलाही या चमच्याने भरविण्याचे वेड लागले आहे आणि मैदानी खेळांचा कंटाळा आलेला आहे. त्यांना झापडी फार कमी वयात लागल्याने ती पिढीच structured जास्त पण ” स्वतंत्र ” (free) कमी अशी होत चाललीय.

आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची हळूहळू लागलेली ही सवय आपल्याला दिवसेंदिवस विकलांग, असहाय, दीनवाणी करत चाललीय.

वेळ निघून गेल्यावर विचार करू या म्हणे !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..