नवीन लेखन...

युगांतर – भाग २

रवींद्र त्या सुर्यनारायणाला नमस्कार करून परत फिरला आणि काही मिनिटातच तो सूर्य अस्ताला गेला आणि सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं. घरात आता ताई, ताईचा नवरा आणि २ काका आणि एक मावसभाऊ एवढे जण होते. घरात आईचा फोटो ठेवला होता आणि त्या समोर दिवा तेवत होता. दुपारी असलेली गर्दी जाउन त्या ठिकाणी आता फक्त उपस्थित लोकांचे श्वास आणि झोपळ्याचा आवाज इतकंच राहिलं होतं. कोणी काहीच बोलत नव्हतं की कोणा कडे पहात नव्हतं. बहीण बराच वेळ शांत होती पण शेवटी घरात नुसतं बसून चालणार नव्हतं त्यामुळे तिने उठून रवींद्रला दूध आणायला सांगितले आणि चहा बनवायला घेतला. रात्री साठी पिठलं भात दोन घरे सोडून असलेल्या वर्तक काकू देणार होत्या.

रस्त्यावर परिस्थिती मुळे दिव्यांचे चेहरे सुद्धा पडले होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. काही दिवे लागत नव्हते, काही नीट होते तर काही अंधारात मिसळून जाण्याच्या वाटेवर होते. श्रीवर्धन पासून ६ किलोमीटर अंतरावर असलेलं हे कोळेवाडी हे गाव तसं प्रसिद्धी परांङमुख होतं. लहान लहान रस्ते, वळणावळणाचे छोटे चढ उतार असलेला घाट ओलांडला की हरेश्वर कडे जायचा फाटा लागायचा त्या फाट्याला डावीकडे वळले की पुढे ३ किलोमीटरवर वर नारळ, सुपारी, केळी, आंबा यांच्या बागांनी सजलेले हे कोळेवाडी आपले स्वागत करायचे. मुख्य रस्ता एका चौकात येऊन थांबायचा मग त्याच्या उजव्या बाजूला वरची पाखाडी तर डाव्या बाजूला खालची पाखाडी होती तर समोर मधोमध भैरोबाचं प्राचीन मंदिर होतं. वरच्या पाखाडी मध्ये रवींद्रचे घर होते. भैरोबा मंदिराच्या मागून एक रस्ता जात होता तो काही शे फुटांवर समुद्राला मिळत होता.

गावात आता थोडं थोडं पर्यटन सुरू झालं होतं. आता लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी झगडावं लागत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र निराशा करणारी घडत होती आणि ती म्हणजे पर्यटनामुळे सुरू झालेले गावातले दारूचे व्यसन. गावातली अर्धी घरं आता कुलूपबंद होती कारण जुनी पिढी लुप्त झाली होती तर नवी पिढी आयुष्य घडवायला शहरात shift झाली होती. कित्येक घरांपुढच्या अंगणात आता रान माजलं होत. कित्येक लोकांनी शहरात गेल्यावर आणि आपला बाप- आजा- काका-आजी जे कोणी होते ते गेल्यावर आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या घराची गरज नसून पैसा जास्त महत्वाचा आहे असे मनोमन ठरवले होते आणि आपल्या वाड्या, असंख्य खोल्यांचं घर, शेती हे इतर लोकांना विकून त्याचे मोबदले घेऊन ते शहरातल्या 2bhk, 3bhk सारख्या छोट्या घरात आपलं आयुष्य जगत होते. तर काही जण स्वतःच पुढाकार घेऊन वाडीत खोल्या बांधून, सुखसोयींची उपलब्धता करून त्यातून पैसा कमवायचे मार्ग आखीत होते. पण या सगळ्यात समुद्र ज्या गोष्टींनी इतकी युगं आपल्या सीमेवर राहात होता त्या सीमा मात्र विकासासाठी नष्ट केल्या जात होत्या. नारळ, सुपारीच्या बागा, सुरुची झाडं ही playing एरिया साठी तोडली जात होती आणि समुद्र त्या मुर्खपणाकडे स्मितहास्य करीत होता.

रवींद्रची आईच्या विरोधामुळे या विषयावर नेहमी चिडचिड होत असे. “गावात इतर लोकं चांगल्या प्रकारे जीवन जगतायत आणि आपण मात्र अजूनही २५ – ३० वर्ष आधीच्या काळात जगतोय असेच वाटतंय मला. त्या समोरच्या कर्व्यांचे बघ विकली त्यांनी वाडी आणि घर, २ कोटी रुपये मिळाले. आता म्हणे गोरेगाव ला बंगला आहे त्यांचा.”

रवींद्र म्हणतो, ” मेला तो कर्वे, त्याच मला काय सांगतोयस, आयुष्यभर दात कोरून दिवस काढले हो त्याने, कधी उजव्या हातचं डाव्या हातास मिळू दिलं नाही. तो काय करणार होता शेती आणि वाडी. कधी घरात केर काढला नाही त्याने आणि मला सांगतोयस बंगल्यात राहतोय ते. अरे विना कष्टाचा पैसा किती पुरणार रे माणसाला.” आईचे त्यावर याला २ शब्द.
” पैसा पुरत नाही कोणास हे काय मला कळत नाही का, पण पैसा जवळ येतो तरी अश्या लोकांच्या, नाहीतर आम्ही बघा, नशीबच फुटके आमचे, एवढे कष्ट केले तरी जवळ पैसा काही येत नाही की अजून काही, दिवस नुसते राबण्यात आणि इतरांची शहाळी सोलण्यात चाललेत.” नाक्यात दूध आणायला चाललेल्या रवींद्र च्या डोक्यात आठवणींनी रान माजवलं होतं.

संध्याकाळचे 7.30 वाजले होते, चहा झाला होता पण अजूनही तशी शांतताच होती घरात, बाहेर रातकिडे आता मुक्त कंठाने आवाज करायला लागले होते. वर्तक काकूंनी पिठलं भात आणून दिला. रवींद्र स्वयंपाकघरात ताटल्या आणायला गेला तशी ताई सुद्धा त्याच्या मागे आत गेली. रवी जणू कोणी दुसरे बाजूला नाहीच अशा समजुतीत स्वतःशीच बोलायला लागला, “चला रवी शेट म्हातारी गेली, आता तुमचं काय ते बघा. इतकी वर्ष तिची आणि अण्णांची सेवा करण्यात घालवली, घालवावीच लागली त्याशिवाय पर्याय होताच कुठे रे तुला. आजूबाजूला कोणी नाही, गाव हळूहळू बदलून गेलं, एवढं निसर्ग देतोय झाडांवर पण विकत घ्यायला कोण नाही. साला माझा नशीबच गांडू हो, शहाळी सोलून हातांची लाकडं झाली, कित्येकदा सालं निघून परत नवीन सालं आली पण सालं माझं नशीब काही बदललं नाही. आता रोजचा भात निदान कमी लागेल, सरपण कमी लागेल, गॅस कमी लागेल, पाणी कमी लागेल, तेल- दूध- चहा पावडर- साखर, सगळंच कमी लागेल, आता तरी आयुष्य बदलेल का कुणास ठाऊक.”

ताई स्वयंपाक घराच्या दारात उभी राहून हे ऐकत होती हे रवींद्र च्या लक्षात नाही आलं.

रवी चे मन परत एकदा स्वतःशीच मोठ्या आवाजात बोलायला लागले, तशी सवयच होती म्हणा त्याला, घरात बोलायला कोणी नाही, आई शी बोलायचं म्हणजे काही न काही गोष्टीवरून वाद आलाच म्हणून तेही कमी व्हायचं. मन हे रितं झालं की चांगलं असतं नाहीतर मनाला काबूत ठेवणं कठीण हे रवी ला पक्के ठाऊक असल्यामुळे गेले कित्येक वर्ष त्याला स्वतःशी बोलायची सवय लागली होती. ” माणूस गेल्यावर माणसाला भेटायला खूप लोकं येतात, अगदी गर्दी करून येतात पण जेव्हा हीच माणसं जिवंत असतात तेव्हा मात्र एक माणूस फिरकत नाही त्याच्याकडे, की बाबा कसा आहेस, काय हवंय का तुला, काही लागलं तर सांग, हो हो असे सांगतात हो पण जेव्हा काही खरंच लागतं तेव्हा मात्र यांचे फोन बंद, वेळ नाही, अत्ता अडचण आहे अशी उत्तरं ठरलेली. आम्ही गावात राहणारे काय मूर्ख वाटलो का यांना, आता अगदी काळीज हेलकावलं असेल यांचं, बरोबर आहे, आता रवी एकटा काय करणार आता घर वाडी विकायला तयार होईल आरामात, जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, आयता पैसा मिळेल, इतकी वर्षे काही खर्च करावा लागला नाही आता पैसा मिळेल तेव्हा आता चांगलं वागणं असणारच नाही माझ्या नशिबी. साला जेव्हा साथ हवी होती तेव्हा ढुंकून ही पाहिलं नाही आणि आता ? ”

हाताने ताटली आपटली गेली आणि त्या आवाजाने स्वयंपाक घरातील शांतता भंग झाली आणि रवींद्र ओट्यावरच्या काढलेल्या ताटल्या घेऊन बाहेर जायला वळला. तशी समोर दाराला खेटून उभी असलेली, त्याचं बोलणं ऐकताना पाण्याने डोळे डबडबलेली, पदराने आपलं तोंड रडताना आवाज ऐकू येऊ नये म्हणून दाबून उभी असलेली त्याची ताई त्याला दिसली आणि तो एकदम भानावर आला. ताईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता हुंदका आणू पहात होते पण तिला तसे पाहून आणि झालेला प्रकार लक्षात येऊन रवींद्र च्या डोळ्यात अचानक भावनांनी भरलेले थेंब जमा झाले आणि त्याने आपली मान दुसऱ्या बाजूला वळवली. त्या क्षणी ते घर एकाच युगाच्या दोन टोकांवर रेलून उभे होते.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 94 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..