नवीन लेखन...

युगांतर – भाग १०

 

त्या व्यक्तीचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे रवींद्रच्या कानात घुसले आणि त्याचा चेहरा पांढरा फिकट पडला.

“काय…….”, रवींद्र जोरात किंचाळला ” तो मी होतो……. म्हणजे …….. तो मी होतो की आहे?” रवींद्रने आता काही झालं तरी याच्या तळाशी जायचेच असा निर्धार केला होता.

ती व्यक्ती आता शांतपणे रवीकडे पहात होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात काही बदल घडला नव्हता जसं काही झालंच नाहीये अशा पद्धतीने ती व्यक्ती वागत होती.

“म…..मला…..मला सांगा सगळं, कोण आहे मी ? तुम्ही कोण आहात? आपला काय संबंध? का मला सारखं स्वप्न पडतं? हे पाणी, पुष्करणी, ते बाळ, ती व्यक्ती कोण आहेत, माझा या सगळ्यांशी काय संबंध? अहो मी एक साधा माणूस आहे हो, थोडीशी शेती करून, वाडीत कष्ट करून कसंबसं पोट भरणारा साधा माणूस. अत्ता अत्ता 5 दिवसांपूर्वी माझी आई गेली. एकटा आहे मी आता पूर्णपणे, तर हे नवीन काय आता? सुखाने जगू द्या की मला. सगळ्यांसाठी सगळं सोडलं मी, माझं मी पण सोडलं, आता आयुष्यही सोडू का? सांगा मला सांगा काय आहे नक्की हा प्रकार……..”, रवी आता पूर्णपणे भावनाविवश होऊन बोलत होता. त्याचा आवाज रडून खर्जात गेला होता.

ती व्यक्ती त्याच्या थोडी अजून जवळ आली अन तिने बोलायला सुरुवात केली , “रवींद्र अरे मला तुझं नाव माहिती कसं विचारतोस?, अरे तुझ्या वडिलांचा मी चांगला मित्र होतो रे, सगळं म्हणून माहिती मला. अरे तुला स्वप्न पडायची, पडतात कारण तुझा त्या गोष्टींशी संबंध आहे म्हणून. आणि स्वप्नात दिसणारा तो मुलगा तूच आहेस.” रवी त्याच्या प्रत्येक शब्दाला केवळ कानाने नव्हे तर शरीरातल्या प्रत्येक कणाने लक्ष देऊन ऐकत होता. ” तुला पाण्यातून मीच बाहेर काढलं मगाशी, अरे बुडत होतास तू, बुडत काय बुडलाच होतास तू. मी आलो म्हणून वेळेत काढला तुला नाहीतर खाली रुतून बसला असतास. आणि तुला पाण्यात बाकी काही सापडणं शक्यच नव्हतं रे कारण तूच तुला शोधत आला होतास इथे. तू पाण्यात उडी मारलीस आणि ते बाळ नाहीस झालं रे कारण ते विधिलिखितच आहे तुझं. तू पहिल्यांदा  जेव्हा सापडलास ना तेव्हा ही मीच तुला पाण्यातून बाहेर काढलं होतं” ती व्यक्ती काय बोलत होती ते रवीला समजायला जड जात होते.

” पहिल्यांदा म्हणजे???????…… मी तर आजच इथे आलो होतो, या आधी कधीच आलो नाहीये मी इथे पाण्यात?”, रविंद्रने अधीरतेने त्याला थांबवत प्रश्न केला.

“पोरा तुला जेव्हा मी पहिल्यांदा वाचवलं होतं ना तेव्हा तू काही दिवसांचा होतास रे, काही दिवसांचा….. मी मी बाहेर काढलं होत तेव्हा तुला, एवढासा होतास रे माझ्या हाता पेक्षाही लहान, तुला बाहेर काढलं आणि एका टोपलीत ठेवलं माझ्या अंगावरच्या कापडात गुंडाळून. आणि मग …….” ती व्यक्ती बोलायचं थांबली.

“मग?….. मग काय ? बोला ना? आणि मग काय अहो….. बोला ना असे गप्प का झालात?”, रवीने पुढे होऊन हाताने त्या व्यक्तीच्या मांडीला हलवले.

“सांगतो पोरा सांगतो…… तुला मी बाहेर काढलं, पुसलं आणि टोपलीत ठेवलं आणि मग अण्णा प्रदक्षिणेला गेले तेव्हा त्यांना तू दिसलास.” त्या व्यक्तीने रवीच्या डोळ्यात आपली नजर रोखून धरली. रवीचे डोळे काहीतरी सापडले की काही निसटून गेलंय अशा द्विधा मनस्थितीत गटांगळ्या खाणाऱ्या जीवासारखे गोंधळून गेले होते. त्याला काही बोलवत नव्हते की काही जाणवत नव्हते. त्याचे मन बर्फाच्या लादिवर पडलेल्या निपचित देहासारखे गार पडले होते. त्याच्या मनातल्या संवेदना आता वेदना बनून त्याच्याच हृदयाशी भांडत होत्या. त्याच्या शरीरातल्या शिरा आता जलद गतीने रक्त प्रवाह चालवत होत्या. कधीही त्याची कानावरची नस फुटेल आणि इथे रक्तपात होईल की काय अशी त्याची स्थिती झाली होती. आपण काय ऐकलं यावर त्याचा विश्वास बसायला त्याचं मन परवानगीच देत नव्हतं. काही क्षण, मिनिटं अशाच गूढ शांततेत गेली.

“म्हणजे….. मी अण्णांचा खरा मुलगा नाही? की नव्हतो? की होऊच शकलो नाही….. “, रवीचा आवाज अतिशय थंड झाला होता.

“रवींद्र तू अण्णांचाच मुलगा आहेस, पण त्यांच्या पोटचा नाहीस मात्र. तुला अण्णांनी याच जागेवरून उचललं होतं त्या दिवशी म्हणजे सुमारे ५० वर्षांपूर्वी. तेव्हा पासून तू अण्णांचा मुलगा झालास आणि त्यांनी सुद्धा कधीही तुला परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. परिस्थिती नसताना ही तुला कधी काही कमी पडू दिलं नाही त्यांनी”, त्या व्यक्तीने रवीला धीर देत म्हटले.

“अण्णा अण्णा, तुम्ही ग्रेट आहात हो खरंच, कसं काय माझ्या सारख्या एका बेवारस मुलाला पोटात घेतलेत आणि…… खरंच धन्य आहात तुम्ही अण्णा….. वा वाह हे भगवंता काय दिवस दाखवलास रे मला तू. काय माझं नशीब थोर म्हणून अण्णां सारखा बाप लाभला आणि आई सुद्धा, खरंच पुण्यवान या जगात तो मीच”, रवींद्र च्या आवाजाला डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची अविरत साथ मिळत होती. त्याचं बोलणं येत असलेल्या हुंदक्यांमुळे मधे मधे तुटत होतं पण त्याला काय म्हणायचं आहे हे त्या व्यक्तीला कळत होतं.

त्याने हाताने आपले डोळे पुसले आणि त्या व्यक्तीकडे पहात विचारले, ” पण तुम्ही कोण आहात? आणि मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कसे दिसलात? अण्णांचे मित्र म्हणता तुम्ही स्वतःला, मला ५० वर्षांपूर्वी तुम्ही या पाण्यातून बुडताना वाचवलं म्हणता मग इतके वर्षात मला कधी सांगितलंत का नाही? आत्ताच का बरं हे सगळं मला समजलं. आणि तेही असं इतक्या भयानक पणे? कोण आहात कोण तुम्ही? आणि अजून एक” रविंद्रने काहीतरी लक्षात आल्या सारखं एकदम त्याच्याकडे पाहिलं. तो आता बराचसा सावरला होता. त्यामुळे त्याला प्रश्न श्वासागणिक पडत होते.

“तुम्ही मगाशी जेव्हा बोलत होता माझ्याशी तेव्हा तुमची भाषा वेगळी होती गावातल्या माणसासारखी, आणि अत्ता जेव्हा मला हे सांगितलंत तेव्हा तुमची भाषा स्वच्छ आणि शुद्ध झाल्ये. मला सांगा नक्की तुम्ही कोण आहात नाहीतर मी जोरजोरात ओरडायला सुरुवात करेन.” रवीने अतिशय प्रसंगावधान राखत त्याला विचारले.

रवीच्या या प्रश्नावर मात्र ती व्यक्ती हसली आणि त्या व्यक्तीने इतका वेळ बाजूला असलेला कंदील उचलून त्या दोघांच्या मधे ठेवला. रवीला खऱ्या अर्थाने अत्ता त्या व्यक्तीचा चेहरा, शरीर दिसायला लागलं. अंगात पांढरा सदरा, खाली नीट नसलेले पांढरे धोतर, हातात सोन्याचं कडं. चेहरा काळा तरी त्यावरचं तेज कोणालाही लाजवेल असेच होते. मिशा गालांवर आल्या होत्या. डोळे तपकिरी लाल रंगाचे आणि त्यातली ती भेदक नजर त्याच्याकडेच पहात होती. रवी त्याचं रूप पाहून जरासा धास्तावला. ” नक्की कोण आहात तुम्ही?” रवीने दबक्या आवाजात विचारलं.

त्यावर भेदक नजर तशीच ठेऊन त्या व्यक्तीने एक स्मित केलं आणि म्हणाला, ” पोरा मी कोण कुठला जाणून काय करणार आहेस तू? त्यापेक्षा जास्त महत्वाचं तू का इथे आहेस अत्ता हे जाणून घेतलंस तर जास्त बरं नाही का? तुला या भैरोबाने आपलसं केलं होतं बघ, जेव्हा तू सापडलास ना तेव्हाच. अण्णा हे एक धागा होते तू अन भैरोबा मधला. अण्णा पुजारी होते या मंदिराचे, मनाने- स्वभावाने- वागणुकीने- चारित्राने अगदी म्हणजे अगदी निर्मळ, साधे आणि स्वच्छ त्यामुळे भैरोबाला त्यांच्यात तुझ्या पित्याची कर्तव्ये दिसायला लागली. म्हणून त्याने तुला अण्णांच्या पदरी टाकले आणि त्यात अण्णा नेहमीच यशस्वी होत राहिले. पण तू भैरोबाचा लाडका होतास, तुझ्यात त्याचंच रूप आहे ,बघ आठव…. गावात कोणावर काही संकट आले तर अण्णा नेहमी धावत जायचे आणि तू नेहमी त्यांच्या संगतीने जायचास. ते संकट दूर करायला तू पूर्ण प्रयत्न करायचास. तू लहान असल्यामुळे कोणाच्या ते लक्षातही यायचे नाही. पण जसजसा मोठा होत गेलास आणि मग कर्तव्य, प्रपंच, नातीगोती, रागलोभ या सगळ्यात तू अडकायला लागलास तेव्हा त्याने ठरवलं की तुला या पासून दूर ठेवायचं आणि म्हणूनच तू गावा बाहेर गेलास की आजारी पडायचास. कारण तू या गावचा तारणहार होतास. तू या गावाचा पिता होतास नेहमीच पण ते तुला कळण्यासाठी योग्य वेळ यायला इतकी वर्षे गेली. तू अण्णां बरोबर भिक्षुकी ही शिकलास पण तुझा शेती वाडी करताना बाकी वेळ या मंदिरात जायचा. तू अण्णा नसताना पुजारीपद उत्तम रित्या सांभाळायचास, तेच तर हवे होते देवाला. त्याला सतत तुझी काळजी लागून राहायची. म्हणून त्याने तुला कधी लांब जाऊ दिलं नाही. तू या गावचा राखणदार आहेस कारण तुझी निवड या भैरोबाने केल्ये. आणि आता तू जबाबदारीतून मुक्त झाला आहेस म्हणून तुला पुढची दिशा दाखवण्यासाठी देवाने हे सगळं घडवून आणले. मी अण्णांना बघितलंय तुझ्यावर प्रेम करताना, तुला मोठं करताना म्हणूनच मी निश्चीन्त होतो इतकी वर्षे, पण आता तुला जाणीव झाल्ये तुझ्या खऱ्या कर्तव्याची, खऱ्या रूपाची, तुला आता ओळख पटल्ये तुझ्या आयुष्याची.”

“पण तुम्हाला हे सगळं कसं माहिती? मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही गावात, अगदी कधीच नाही, ना गावात ना मंदिरात ना कुठेच. तुम्ही नक्की कोण आहात? आणि हे सगळं नक्की खरं आहे? कसा विश्वास ठेऊ मी तुमच्यावर?”, रवीने सुन्न डोकं ठिकाणावर आणत त्या व्यक्तीला शंकेच्या सुरात विचारले.

“विश्वास ? हाहा हाहा हाहा, खरं बोललास रवींद्र तू, माझ्यावर का विश्वास ठेवायचास तू? मी तुला कधी दिसलो नाही की भेटलो नाही, कसा ठेवणार तू माझ्या बोलण्यावर विश्वास, ठीके आता तुझ्या साठी हेही करायलाच हवे”, असे म्हणून ती व्यक्ती बसल्याजागी अचानक उठून उभी राहिली आणि पुढे जे घडलं ते पाहून रवी ला दिव्यदृष्टी मिळाली की काय असे वाटून गेलं.

ती व्यक्ती उठून उभी राहिल्यावर तिने आपल्या समोरचा कंदील उचलुन जोरात आपटला तशी त्यातून ज्वाला बाहेर येऊ लागल्या, त्या ज्वालांचे अचानक मोठ्या अग्नीत रूपांतर झाले आणि तो लाल पिवळा अग्नी निळ्या रंगाचा होऊ लागला आणि त्यातून ती व्यक्ती हळूहळू मोठी होत्ये की काय असा भास रवींद्र ला होऊ लागला पण भास? छे ते तर सत्य होते. ती व्यक्ती आकाराने वाढू लागली तिचे हात, पाय, डोकं, चेहरा सगळंच अवाढव्य होत गेलं आणि शेवटी त्यातून निळ्या प्रकाशाचा एक प्रखर स्फोट होऊन रवींद्र च्या समोर साक्षात भैरोबा प्रकट झाले.

काळा रंग असलेलं ते रूप तेजस्वी होतं, चार हात असलेलं ते रूप भयानक होतं. कपाळ आणि छाती लाल रंगाने माखली होती. डोळे क्रोधाने ओथंबून वहात होते. ओठ लाल रंगाने भरले होते. डोक्यावर सोन्याचा मुकुट असून त्याला हिरे रत्ने लावली होती. उजव्या पुढच्या हातात पिवळ्या रंगाचा त्रिशूळ होता, मागच्या हातात तलवार होती, डाव्या पुढच्या हातात एका राक्षचाच मुंडकं होतं तर मागच्या हातात ढाल होती. भैरोबाने साक्षात रवीला दर्शन दिले होते. भैरोबाचं ते महाकाय रूप पाहून रवींद्र पाच पावले मागे सरकला. त्याचे डोळे दिपून गेले होते. त्याच्या डोक्यात डमरूचा नाद घुमत होता. हाता पायाला झिणझिण्या आल्या होत्या. एक प्रखर प्रकाश उत्पन्न झाला आणि रवीने डोळे घट्ट बंद केले अन त्याची शुद्ध हरपली.

तोंडावर पाणी पडल्याची जाणीव झाल्याने रवी ने डोळे उघडले तशी समोर ताई आणि तिचे मिस्टर आणि अजून दोघेजण उभे होते. बराच वेळ झोपून उठल्यावर जसे होते तसेच त्याचे झाले होते. डोळे जड तर डोकं सुन्न. कसाबसा तो उठून बसला आणि डोळे मिचकावत नक्की आपण कुठे आहोत याची त्याने खात्री करून घेतली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता उजाडलं होतं.

“भैरोबाच्या मंदिरा मागच्या पुष्करणी पाशी काय करतोयस? आणि असा झोपला का होतास इथे तेही अंगावर काही न घेता? एकटाच ? वेड लागलं की काय तुला? किती शोधलं अरे तुला आम्ही. रात्री उशीर झाला आम्हाला यायला, पण आलो तर बघितलं की कुलूप, तू मित्राकडे जाशील म्हणाला होतास म्हणून आम्ही निर्धास्त होतो. पण पहाटे तू ५ ला उठतोस हे मला माहित्ये, तरी तू आला नाहीस म्हणून मग मीच तुझ्या मित्राला फोन केले तर तू कोणाकडेच नाहीस असे समजले. मग झाली आमची पंचाईत. टेन्शन सुरू, मग शोधाशोध सुरू केली. २ तास शोधतोय तुला तेव्हा सापडलास या म्हाद्या ला. काय झालं काय नक्की? इथे काय करतोयस आणि?” ताईने अक्षरशः रवी ला फाडून खाल्ले.

त्यावर काहीही न बोलता रवी शांतपणे उठला आणि घराकडे चालू लागला ते मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊनच.


दशक्रिया विधी करणाऱ्या गुरुजींनी रवींद्र ला हाक मारली. रविंद्रने जाऊन पिंडा समोर हात जोडले आणि मनापासून नमस्कार केला. काही क्षणांतच आईच्या पिंडाला कावळा शिवला आणि साऱ्यांना हुश्श झालं. ताईला वाटतं होतं तिने नमस्कार करते वेळी रवींद्रचे लग्न करून देईन असे वचन आईला दिले होते म्हणून कावळा लगेच शिवला. पण खरंतर आयुष्यभर पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केलेल्या आपल्या मुलाला त्याची खरी ओळख पटावी हीच शेवटची इच्छा असणाऱ्या माऊलीची ती इच्छा पूर्ण झाली होती आणि ती माऊली आणि भैरोबा दोघेही समाधानी झाले होते.

समाप्त

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..