नवीन लेखन...

युगांतर – भाग ८

संध्याकाळी सूर्यास्ताचा समय….. समुद्रावरून वारा प्रचंड वेगाने वहात होता. समुद्रावरचे काठ म्हणजेच सुरुचं बन अक्षरशः त्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हेलकावे खात होतं. थंडीचे दिवस असले तरी आभाळ भरून आलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रवींद्र वाडीत फेरफटका मारत होता. ताई आणि तिचे मिस्टर दुपारी काही कामा निमित्त श्रीवर्धन ला गेले होते. गाडी होती त्यांची बरोबर, त्यामूळे प्रवासाची चिंता नव्हती. रात्रीच्या जेवणात धरू नकोस असे सांगून ताई गेली होती. श्रीवर्धन ला एका आश्रमाला भेट द्यायला ते गेले होते. रविंद्रने त्यांना का? कशासाठी? वगैरे प्रश्न विचारायची तसदी घेतली नव्हतीच, त्याला बरच होतं की ते. त्याला जे कार्य तडीस न्यायचे होते त्यासाठी एकांत गरजेचा होताच त्यामुळे त्याने नुसतं ठीक आहे म्हणत विषय सम्पवला. मी कदाचित मित्राकडे जाईन जेवून झाल्यावर असे कानावर घालून ठेवले. आणि ताईकडे घराची एक किल्ली देऊन ठेवली.

रविंद्रने वाडीतून काढता पाय घेतला आणि रात्रीपरत इकडे यायचेच हा दृढनिश्चय करून त्याने माजघरात ला दिवा लावला. रवींद्र ची रोजची जेवायची वेळ म्हणजे ७:३० ची होती. आई आणि तो ८:०० च्या आत जेवण करून ९ पर्यंत झोपी जायचे. आजही त्याने तेच अमलात आणले पण आज जेवण म्हणून भात नाही तर त्याने केवळ गरम दूध घेतले. सकाळ पासूनच्या गोष्टी, त्याबद्दलचे विचार करून करून त्याचे डोके जड झाले होते. शारीरिक नाही तर मानसिक थकवा त्याला आला होता. आणि म्हणूनच थोडा वेळ शांत होण्यासाठी त्याने  झोपाळ्यावर अंग टेकले. एक झोका घेतला आणि तो वरच्या बाजूस बघत बघत विचार करू लागला. परत एकदा ते स्वप्न, ताईचे बोलणे, त्याचे गावा बाहेर गेल्यावर आजारी पडणं हे सगळं समोर येऊ लागलं आणि त्यातच त्याला झोप लागली.

थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्य बुडाला की लोकांच्या अंगावर घोंगडी, डोक्याला मफलर, कानटोपी, पायात धोतर किंवा पायजमा असा अवतार सर्वांचा असायचा. पण इतक्या थंडीत सुद्धा रस्त्यावरून चालणाऱ्या या इसमाच्या अंगावर केवळ धोतर आणि घोंगडी एवढेच होते. हातात एक उंच शिडशिडीत काठी आणि दुसऱ्या हातात काहीसं मुठीत घेतलेली एक वस्तू. ती व्यक्ती कोळेवाडी च्या अंधुक प्रकाशात लपलेल्या रस्त्यावरून सावकाश चालत होती. आजूबाजूला बरीचशी बंद असलेली घरं, कित्येक वर्षात घरच्या माणसांचे स्पर्श न झाल्यामुळे त्या घराच्या लाकडी बांध्याला लागलेली कीड त्या गारव्यात अजून त्या बुंध्यात शिरत होती. कित्येक घरांच्या समोर न सारवलेली अंगणे आता रान माजून ओबडधोबड दिसंत होती. त्या मुळे भागात अकल्पनिय अशी शांतता पसरली होती. त्यात त्या रस्त्यावरून ती व्यक्ती आजूबाजूला न बघता चालत होती. चालत चालत ती व्यक्ती एका घराच्या अंगणात शिरली. पुढून दरवाजा बंद होता, दिवे लागले नव्हते पण हे घर इतरांच्या घरा सारखं सदैव बंद नव्हतं कारण ते घर रवींद्र चं होतं. ती व्यक्ती घराची माहिती असल्या सारखी मागच्या बाजूस गेली आणि वाडीच्या कडे न जाता तिने माजघराच्या बाजूला आपला मोर्चा वळवला. तिने हातातली काठी मागील पडवीच्या जमीनीवर जोरात दोनदा आपटली तशी बाहेरच्या खोलीत झोपाळ्यावर आडव्या झालेल्या रवींद्र च्या खांद्याला कोणीतरी हलवून जागं करतय असा भास झाला. “रवींद्र उठ, मी आलोय, आता मागे फिरू नकोस, मी आलोय….. उठ रवींद्र….उठ” रवींद्र च्या डोक्यात तो आवाज घुमू लागला. त्याला कोणीतरी गदगदा हलवून उठवतय असे वाटायला लागले. त्याने झोपेतच “कोण आहेस तू? मला का सारखा बोलावतोस” विचारले. त्या व्यक्तीने अजून एक पाउल पुढे टाकले तशी माजघरातल्या दिव्याची तिरीप त्या लाकडी गजांमधून त्या व्यक्तीवर पडली आणि तिचा चेहरा उजेडात आला. तो चेहरा रवींद्र ला पहायला आपले डोळे लहान- मोठे करावे लागले पण जशी त्याची दृष्टी स्थिर झाली आणि त्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला तशी त्याची नजर त्या चेहऱ्यावर खिळली गेली आणि रवींद्र झोपेतून ताडकन जागा होऊन बसला. रविंद्रने त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला होता. ते अण्णा होते.

रवींद्रचा चेहरा भीतीने पांढरा फिकट झाला होता. त्याला परत स्वप्न पडलं होतं, पण या वेळी नेहमी पेक्षा वेगळं आणि विचित्र होतं. यावेळी दोन नवीन गोष्टी स्वप्नात घडल्या होत्या. पहिली म्हणजे ती व्यक्ती यावेळी गावाच्या मुख्य चौकातून आलेली होती आणि दुसरी म्हणजे त्या व्यक्ती चा चेहरा दिसला होता आणि तो चेहरा दुसऱ्या कोणाचा नसून अण्णांचा होता? हे काय नवीन गौडबंगाल आहे. रवींद्र आता उठून बसला होता. त्याला तो आवाज स्पष्ट ऐकायला आला होता मी आलोय रवींद्र उठ…. त्याने आजूबाजूला पाहिले आणि बाहेर मिट्ट काळोख झाल्याचे त्याच्या लक्षात आले. घड्याळात पाहिले तशी काटा 9 च्या पुढे झुकलेला होता म्हणजे त्याला तासभर तरी झोप लागली होती. पण ती मोडली कशाने हे तो अजिबात विसरणार नव्हता. त्याचं अंग परत घामाने भिजलं होतं. त्याने बाजूचा टॉवेल घेतला आणि उठून पूर्ण अंग पुसून काढलं तशी हवेतला गारवा त्याला जाणवला. त्याने बाहेरच्या खोलीतून हळूच माजघराच्या खिडकीकडे डोकावून पाहिलं. दिवा तसाच सुरू होता पण खिडकी पलीकडे त्याला काळोखा व्यतिरिक्त काही दिसलं नाही तशी त्याने जरा श्वास मोकळा केला.

रवींद्र ला एक कल्पना आली होती की इतके वेळा त्याला स्वप्न पडलं होतं त्यात तो एका बघ्याच्या भूमिकेत होता पण अत्ता त्याला जे दिसलं त्यात त्याला बोलावणं आलं होतं याचाच अर्थ, आज त्याने जो निश्चय केला होता तो योग्यचं होता. पण अण्णा कसे दिसले त्याला तेथे? हा एक मोठा प्रश्न मात्र त्याला सतावत होता. आता जास्त विचार करण्यापेक्षा त्यात आपण प्रत्यक्ष शिरलेले बरे असा ठराव मनात पास करून त्याने पाण्याने तोंडावर शिडकाव केला. घड्याळात पाहिले तशी 10 वाजत आले होते. माजघराच्या बाजूच्या खोलीतून त्याने एक काठी काढली आणि टॉर्च चा पर्याय न घेता कंदील घेतला. सुख सोयी जरी असल्या तरी काही गोष्टी या त्यांना बाजूला ठेवूनच केलेल्या चांगल्या असतात, आणि म्हणूनच रविंद्रने कंदील घेण्याचा निर्णय घेतला कारण टॉर्च घेतला असता तर त्याच्या प्रकाशाने कोणाला शंका येण्याची शक्यता जास्त होती. त्याने बाहेरच्या खोलीतला दिवा तसाच चालू ठेवला, माजघरातला दिवाही चालू ठेवला, माजघराच्या दरवाजाला आतून कडी घालून त्याने मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप घातले आणि तो त्या अवतारात वाडीच्या दिशेने चालू लागला. रात्रीचे दहा वाजून गेले होते, थंडी मी म्हणत होती, अंग कुडकुडत होतं पण मनात वेगळीच आग पेटली होती त्याच्या. वाडी म्हणजे दिवसा शांतपणे जगायची जागा, सुपारी, माड, जायफळ, अननस, मिरी, चिकू, केळी, रामफळ, आंबा, फणस अशा फळांची हक्काची होती तर जास्वंद, गुलाब, रातराणी, कर्दळी अशा फुलांची सुगंधित बाग होती. पण जशी संध्याकाळ सरायची मग मात्र वाडी म्हणजे केवळ काळोखाची देण आणि त्यावेळी तिकडे जाणं म्हणजे नको त्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे होते. हे सगळं सगळं रवी च्या मनात येत होतं पण अत्ता तो त्या सगळ्या विचारांना तिलांजली देऊन शरीरातल्या पहिल्या अणूला शेवटच्या अणू शी जोडून ती सगळी शक्ती आपल्या मनात एकत्रित करून तो त्या आव्हानाला पेलायला चालला होता. माणूस जेव्हा अकल्पित, अनाकलनीय, अद्भुत अशा स्थितीच्या परमोच्च क्षणाला असतो, तेव्हा तो कोणतेही आव्हान पेलायला मागेपुढे पहात नाही आणि त्याचंच रूप आज रविंद्रने घेतले होते.

त्याने वाडीतल्या पाटाचा पहिला बांध ओलांडून तो दोन विहिरींपाशी आला. रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र सुरूच होती पण ती अचानक वाढली असून आता आपण सुद्धा त्यांच्यातलेच एक आहोत अशी जाणीव त्याला होत होती. तो कंदिलाच्या प्रकाशात आजूबाजूला काही दिसते का ते डोळे मोठे करून पहायचा प्रयत्न करत होता. त्याने एकदा मागे घराकडच्या वाटेवरही पाहिले, पण तेथे कोणी नव्हते. वाटेवर असलेली किनाऱ्यावरची वाळू आता चांगलीच गार पडली होती आणि त्यावर पडलेली दिवसा भरातली वाळलेली पानं त्याच्या पडणाऱ्या पावलांखाली येऊन त्याचा चुरचुर चुरचुर आवाज होत होता. तो दोन्ही विहिरी ओलांडून पुढे आला, त्याने आता मुख्य वाट सोडून माडांच्या मधून जायला सुरुवात केली इतक्यात त्याला काही अंतरावर त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या माडाच्या बुंध्याशी कोणीतरी उभे आहे असा भास झाला. त्याने कंदील पुढे करून नीट पहायचा प्रयत्न केला पण अंतर जास्त असल्यामुळे त्याला नीट दिसले नाही. तो दोन पावले मागे सरकला आणि त्याने मागून उलट्या बाजूने जायचं ठरवलं. तो परत काही पावले मागे येऊन उजव्या बाजूस गेला आणि परत तो पुढे जाऊ लागला तशी त्याच्या समोर सुमारे २५ फुटांवर हवेत तिरक्या गेलेल्या माडाच्या खोडावर कोणीतरी बसले आहे असे त्याला जाणवले आणि तो तेथल्या तेथेच थांबला. त्याच्या पावलांखाली येत असलेली वाळकी पाने चुरचुरण थांबलं तशी त्या समोरच्या व्यक्तीला जाणवलं की रवी ने पावलं टाकणं थांबवलं आहे. रवीने नीट निरखून पहायचा प्रयत्न केला पण त्याला समोर कोण आहे हे दिसत नव्हते. स्वप्नात त्याला अण्णा दिसले होते त्यामुळे तो अण्णांचा चेहरा दिसतोय का ते अधीरतेने पहायचा प्रयत्न करत होता. पण त्याला कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात इतक्या लांबचे दिसले नाही आणि त्याने सगळी शक्ती एकत्र पणे आपल्या जबड्यात आणून तिचा वापर केला आणि त्याने विचारले, ” कोण आहे तिकडे? को….को….…कोण आ…आ….आहे तीकक्कक्ककडे…… मी…मी……विचारलं….कोण कोण आहे तिकडे”
समोरून काही उत्तर आले नाही तशी रवीने हातातली काठी समोर धरून परत विचारले, यावेळी मात्र आवाजात थोडा कणखर पणा आला होता, ” कोण आहे ते माडावर समोरच्या, कोण आहे कोण बसलेलं इतक्या रात्री? ऐकायला येत नाही का तुम्हाला? इतक्या रात्री इथे बसून काय करताय तुम्ही? काय हो, काय विचारले मी?”
रवींद्रने जरा आवाज मोठा करून विचारले.

पण समोरून काही उत्तर नाही, पुढची २ मिनिटं एक भयाण शांतता वाडीत पसरली आणि मग ती बसलेली व्यक्ती त्या खोडावरून उठली आणि उभी राहीली, उभे राहताना त्या व्यक्तीने रवी कडे पाहिले तशी त्या कंदिलाच्या उजेडात डोळे चमकले आणि त्या चेहऱ्यावर असलेले तेज पाहून रवी अवाक झाला. चेहरा, त्यावरील दाढी, डोळे तसेच, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या तशाच जशा शेवटच्या काळात अण्णांच्या चेहऱ्यावर पडल्या होत्या. रवी समोर पहात असताना आपण काय पाहतोय हे विसरला होता. त्याच्या अंगाला घाम यायला लागला होता त्याच अंग थरथर कापत होतं, त्याचा कंदील पकडलेला हात लटपटायला लागला आणि कंदील हलू लागला. तो पूर्णपणे बिथरला होता, त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. “अण्णा…… तुम्ही ? तुम्ही आहात का ते , खरंच अण्णा ………. अण्णा खरंच तुम्ही आहात का?” त्याने घाबरत विचारले.

ती व्यक्ती काहीच न बोलता तेथून शेताच्या दिशेने चालू लागली. रवी ला काय करावं सुचत नव्हतं, त्याला खरंच अण्णांचा चेहराच दिसला होता की त्याला तसा भास होत होता? स्वप्नात तरी अण्णा त्याला स्पष्ट दिसले होते. पण अत्ता चेहरा अण्णांचा होता का? अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता. ४ वर्षांपूर्वी गेलेलं माणूस परत जिवंत कसं होईल? त्याला काहीच कळत नव्हतं, भुताटकी चा प्रकार तर नाही ना हा? हे सगळं खरं आहे की अजून एक मला पडलेलं स्वप्न? रवी पुरता गोंधळून गेला होता. ती व्यक्ती चालायला लागलेली पाहून तोही तिच्या मागे आपसूक चालू लागला. का चालतोय आपण? काय गरज आहे? कोणी सांगितलं मला मागे जायला याच्या? काही प्रश्नांची उत्तरं नसतात. त्याच्या मनावर कसला एवढा प्रभाव पडला होता की तो त्या व्यक्ती मागे ओढला जात होता. त्याला आजवर अनेकदा पडलेलं स्वप्न आता तर अगदी प्रत्यक्ष घडत होतं, तीच वाट, तीच व्यक्ती, तीच वाडी, तेच शेत, तोच समुद्राचा आवाज, सगळं काही तसंच स्वप्नात घडायचं तसंच. पुढची काही मिनिटं तो तसाच त्या व्यक्ती मागे चालत राहिला. अखेर ती व्यक्ती त्या पुष्करणी पाशी येऊन थांबली. ती पुष्करणी गावातल्या भैरोबा च्या मंदिरा मागची होती हा उलगडा रवींद्र ला आज झाला. तो सुद्धा काही अंतरावर येऊन थांबला. त्या व्यक्तीने आजूबाजूला पाहिले आणि अंगावरची घोंगडी काढून फेकून दिली तशी त्याच्या हातात रवी ला लहान बाळ दिसलं. आणि त्याला समजलं की आता पुढे काय होणारे. ती व्यक्ती त्या बाळाला घेऊन त्या पाण्यात उडी मारेल. कदाचित ते घडू नये म्हणून मला ते दिसत असेल, मला त्या बाळाचा जीव वाचवायचा असेल म्हणून मला इथवर देवाने आणलं असेल, रवीने मनाशी विचार पक्का केला आणि ती व्यक्ती उडी मारायच्या आधी त्या बाळाला वाचवायचे असे त्याने ठरवले. त्या व्यक्तीने जणू माहीत असल्या सारखे मागे वळून रवी कडे पाहिले आणि एक हास्य केले. रवीला समजलं की हीच वेळ आहे त्याला रोखायची. त्याने विचार पक्का केला, कंदील बाजूला ठेवला आणि त्याने त्या व्यक्तीला आवाज दिला, ” थांब रे, त्या बाळाला पाण्यात टाकू नकोस, सोड त्याला सोड”, असे म्हणत त्याने त्या व्यक्तीकडे जोरात धाव घेतली पण, त्याव्यक्तीने पुन्हा एक हास्य करून धावत येणाऱ्या रवींद्र कडे पहात नकारार्थी मान हलवली आणि हातातल्या त्या बालकाला घेऊन त्याने पाण्यात उडी मारली. रवींद्र धावत येता येता ओरडला, ” अरे काय करतोयस तू, अरे ए ए ए ए ए….” तो पुष्करणी पाशी येऊन थांबला, तो अधीरतेने त्या पाण्याच्या उसळलेल्या लहरींकडे पहात होता. त्याचा चेहरा रडवेला झाला होता. त्याने दोन्हींहाताने डोकं धरून मान निराशेने हलवली. पण काही झालं तरी त्या बाळाचे प्राण आपण वाचवायचेच हे त्याने मनात ठरवले आणि त्याने कसलाही विचार न करता त्या पाण्यात उडी मारली.

पुष्करणी खोल होती आणि पाणी सुद्धा पूर्ण भरले असल्यामुळे रवींद्र ८ फूट तरी पाण्याखाली गेला होता. थंडीचे दिवस असल्याने पाणी प्रचंड गार होतं, तो वर आला आणि त्याने त्या व्यक्तीला आणि त्या बाळाला शोधायला सुरुवात केली. पण पाण्यात त्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीच हालचाल दिसली नाही. “कुठेयस तू, अरे ते बाळ कुठे आहे?” रवी हात मारता मारता ओरडत होता. त्याने परत पाण्यात सूर मारला आणि पाण्या खाली काही दिसतंय का ते पाहू लागला. श्वास जसा सुटू लागला तशी तो परत वर आला पण त्याला पाण्यात काहीच दिसत नव्हते. त्याला आता भीती वाटायला लागली. ती व्यक्ती आणि ते बाळ कुठे गेलं असेल याविषयी प्रचंड उत्सुकता आणि भय त्याच्या मनात निर्माण झाले होते तेवढ्यात, त्याला अचानक आपली शक्ती कमी होत्ये असं वाटायला लागलं. आपले हात पाय कोणितरी पकडून ठेवल्या सारखे त्याला वाटायला लागले, आपल्या मानेला कोणीतरी पकडून पाण्यात आत नेताय असे त्याला वाटू लागले. रवी पाण्यात बुडू लागला. त्याचा श्वास संपत आला होता, त्याच्या नाकात, तोंडात, कानात पाणी शिरले होते, त्याची हातापायांची हालचाल मंद झाली होती आणि तो पुष्करणी च्या तळाशी ओढला जात होता.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..