नवीन लेखन...

आपली इनिंग संपली, आता पॅव्हिलीअन!

निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। युक्तीच्या गोष्टी सांगेन मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतीपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. यासाठी नटसम्राट नाटकातील ‘समोरचे ताट द्यावे पण  बसायचा पाट देऊ नये.’ हा उपदेश अमलात आणावा.


क्रिकेटचा मी फॅन आहे. लहानपणापासून मी क्रिकेट खेळलो. पुढे मुंबईपर्यंत जाऊन टेस्ट मॅच, आयपीएल सामनेही पाहिले व अजूनही टीव्हीवर कोणतीही क्रिकेटची मॅच पहायचे चुकवत नाही. यामुळे आयुष्याकडेही मी क्रिकेटच्या दृष्टीतूनच बघतो व त्यामुळेच मी आणि बायको आता ज्येष्ठ होऊनही आनंदी आहोत.

आपण बॅटिंग करत असतो तेव्हा जसे खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. कोणता चेंडू सोडून द्यावा आणि कोणता बॉल सिक्सरच्या लायकीचा आहे याचा निर्णय आपण घेऊन तो अंमलातही आणत असतो. आपण तरुण वा मध्यम वयात असतो तेव्हा आपली क्षमता अशीच स्वयंपूर्ण असते. आपण नोकरी अगर व्यवसाय ताकदीने करून पैसे मिळवत असतो. त्या पैशातून कुटुंबासाठी किती व कसे खर्च करायचे, आपला विमा, मुलांचे शिक्षण, लग्न व आपले वृद्धत्व यासाठी किती शिल्लक टाकायचे आणि ती बचत कशी व कोठे गुंतवायची याचे सर्व निर्णय आपण आपल्या मनाने व बुद्धीने घेत असतो. अशा वेळी इतरांनी भले, आपले आईवडील, ज्येष्ठ नातेवाईक यांनी केलेला उपदेश, दिलेले सल्ले यांना आपण फार महत्त्व देत नाही आणि आपलीच मनमानी करीत राहातो.

हीच तुलना पुढे चालू ठेवायची तर बॅट्समन एखाद्या चेंडूवर चकतो आणि आऊट होऊन पॅव्हेलिअनमध्ये परततो. आपले पॅड्स सोडतो, ग्लोव्हज् काढतो आणि पुढे आपल्यानंतर बॅटिंगला गेलेल्या बॅट्समनची बॅटिंग बघत राहातो. तो त्या नवीन फलंदाजाला तेथे बसून सल्ले देण्याचे उद्योग करीत असतो. फारतर मनातल्या मनात ’असे कर, तसे करू नको’ असे म्हणत राहातो. अगदी हीच परिस्थिती निवृत्त झाल्यावर आपली असते. आपली मुले मोठी होऊन मिळवती झालेली असतात. त्यांचे निर्णय ती स्वत:च घेत असतात. अशा वेळी तुम्ही त्यांना टोकणे, त्यांना अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न केला तर वादाचे, संघर्षाचे प्रसंग येणारच! त्यामुळे ज्येष्ठांनी आधी आपली मनोभूमिका अशा तर्हेची करण्याचा प्रयत्न पन्नास पंचावन्नाव्या वयापासून सुरू करायला हवी. कारण 25-30 वर्षे सर्व बाबतीत ड्रायव्हिंग सीटमध्ये बसल्यावर तयार झालेला स्वभाव एकाएकी बदलणार नाही. त्यासाठी नेटाने प्रयत्न आणि तेही पाच-सात वर्षे केल्यावरच थोडेफार यश येण्याची शक्यता असते.

अधेमधे ड्रिंक्स ब्रेक, लंच ब्रेक, टी ब्रेक असतो. तेव्हा पॅव्हिलिअनमधून बॅट्समनला निरोप, सल्ला देण्याची सोय असते. तशी मुलांनी कमी उत्सुकता दाखवली तर तुम्ही सल्ले, मार्गदर्शन जरूर द्या. पण ते त्याने पूर्णपणे ऐकलेच पाहिजे अशी अपेक्षा मात्र बिलकुल करू नका. तुम्ही अनाहूत म्हणजे न विचारता सल्ले देत नाही हे एकदा मुलांच्या लक्षात आले की मग ते जेव्हा त्यांना हे करू का ते करू अशी द्विधा मन:स्थिती असेल तेव्हा नक्की तुम्हाला विचारायला येतील आणि अशा वेळी दिलेल्या सल्ल्याचा सन्मानही करतील.

कारण एक लक्षात घ्या की, तुमच्यापेक्षा पुढची पिढी जास्त प्रॅक्टिकल, जास्त बुद्धिमान आणि जास्त टॅक्नोसॅव्ही आहे. ‘गुगल’सारख्या साधनांनी त्यांचे माहितीचे क्षेत्र व ज्ञान विस्तारले आहे. सध्याच्या तीव्र स्पर्धा, बजबजपुरी, स्वार्थी जगाचा अनुभव त्यांना हरघडी घ्यावा लागत आहे. तुमचा काळ वेगळा होता, जास्त संथ, शांत व सज्जनपणाचा होता. मात्र आयुष्याचे अनेक उन्हाळे, पावसाळे, टक्केटोमणे याचा जो अनुभव तुमच्या गाठी आहे तो मात्र त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्या विशाल अनुभवांचे सार तुम्ही त्यांना अर्थात त्यांनी विचारल्यावरच सांगू शकता. त्यांच्या बुद्धीला अनुभवांची जोड देऊन जास्त परिपक्व करू शकता!

याबाबतीत मला एक किस्सा आठवतोय, एका अतिशय यशस्वी अशा 88 वर्षांच्या उद्योगपतीशी माझी भेट झाली. त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणाले, ’माझ्या दोन्ही कंपन्यांची खूप भरभराट व प्रगती चालू आहे. मी चेअरमन असलो तरी सर्व दैनंदिन कारभार दोन्ही मुले स्वतंत्रपणे बघतात. मी लक्ष घालत नाही. मात्र कधी त्यांनी एखादा निर्णय विचारला तर तो मी आवर्जून देतो. तेव्हा ती तो मान्य करतात. कारण, ते जास्त हुशार आहेत. पण माझ्याएवढा अनुभव त्यांच्याजवळ कोठे आहे? आणि हे तीही मान्य करतात.’ किती खरं आहे ना हे!

मात्र एक करायला हवे की ही निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। गोष्टी सांगेन युक्तीच्या मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतिपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. यासाठी नटसम्राट नाटकातील ’समोरचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये.’ हा उपदेश अंमलात आणावा.

म्हणजे पुरेशी आर्थिक गुंतवणूक आपल्या व पत्नीच्या नावावर अखेरपर्यंत ठेवावी. तसे राहाते घर अगर फ्लॅट आपल्या अगर पत्नीच्या नावावरच ठेवावा. पहिल्या गोष्टीमुळे येणार व्याज, पेन्शन किंवा डिव्हीडंडमुळे आर्थिक स्वायत्तता लाभेल आणि दुसर्या गोष्टीमुळे शेवटच्या श्वासापर्यंत डोक्यावर छप्पर राहील. शिवाय मृत्युपत्र करून ठेवणेही गरजेचे आहे आणि त्यामध्ये आपल्या मृत्युनंतर ती सर्व संपत्ती पत्नीच्या मालकीची होऊन तिच्या पश्चात ती ज्याला पाहिजे त्याला मिळेल अशी तरतूद न विसरता करावी. कारण आपल्या पश्चात पत्नीला कोणाच्या भले मुलामुलींच्या मेहेरबानीवर अवलंबून रहावे लागू नये.

सुदैवाने माझ्या पत्नीनेही हा ‘पॅव्हेलिअन फॉर्म्युला’ मनापासून स्वीकारला आहे. तिचे मुख्य कार्यक्षेत्र स्वयंपाकघर. एवढी वर्षे त्याच्यावर अनभिषिक्त सत्ता तिने गाजवली होती. सकाळच्या चहा, नाश्त्यापासून, मुलांचे खाणे, जेवण, आलागेला, पैपाहुणा, लग्नकार्यातील केळवणे, देणे-घेणे, आहेर हे सर्व ती करत आली होती. आता वय झाल्यावर हे सर्व सुनेकडे सोपवणे आवश्यक आणि अपरिर्ह आहे हे सत्य तिने ओळखले. त्याप्रमाणे माझ्या सेवानिवृत्तीनंतर तिनेही या ‘कर्त्या’ भूमिकेतून स्वखुशीने निवृत्ती घेतली. सुदैवाने एव्हाना सून घरात येऊन 10-15 वर्षे झाली होती. सासूच्या बरोबर खरं म्हणजे दुय्यम भूमिकेत, हाताखाली काम करून तिलाही पैपाहुणा, आमचे संबंध, सवयी, घराचे कुलधर्म, परंपरा यांची माहिती झाली होतीच. त्यामुळे एके दिवशी पत्नीने तो सर्व ‘चार्ज’ आनंदाने तिच्याकडे सोपवला. त्यामुळे अगदी मंडई, आज कोणती भाजी करायची येथपासून कोणाला लग्नाआधी केळवणाला बोलवायचे, काय देणे घेणे करायचे हे सर्व निर्णय सूनबाई घेतात. सासूबाईंच्या कानावर घालून व त्यांची मान्यता (ती असतेच) अमलात आणतात. त्यामुळे त्या दोघींचेही गूळपीठ चांगले जमून एकूणच घरातील वातावरण कायम सुसंवादाचे राहाते.

आणखी एक आर्थिक शिस्त मी पाळली आहे. पूर्वी मी मिळवत होतो तेव्हा मीच सर्व घरखर्च करीत असे व मुलगा मिळवता असल्याने तो मला दरमहा ठराविक पैसे देत असे, निवृत्त झाल्यावर आम्ही उलट केले आहे.आता तो सर्व खर्चाचे पाहातो व मी दरमहा ठराविक रक्कम त्याच्याकडे आमच्या दोघांच्या खर्चासाठीचा माझा सहभाग म्हणून न चुकता एक तारखेला देतो. शिल्लक रकमेचे काय करतोय हे मी त्याला पूर्वी विचारत नसे हल्ली तो मला विचारत नाही. या आर्थिक स्वायत्ततेमुळे आम्ही दोघेही सुखात आहोत.

माझ्या व पत्नीच्या या वागण्यामागे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला विचार आहे. ते म्हणतात, ’वृद्धत्व आल्यावर माणसाने घराच्या शेजारी असणार्या वृक्षाप्रमाणे वागावे. त्याला घरातले सगळे दिसते, पण तो काही बोलत नाही. आपले मत मांडत नाही.’

आम्ही फक्त वृक्षाऐवजी पॅव्हिलिअनमध्ये बसून तसे वागण्याचा प्रयत्न करतो व त्यामुळे आमचे वृद्धत्वही आनंददायी रीतीने चालू आहे. आता एकच इच्छा आम्हा दोघांची ही आहे की, असेच चालता बोलता, परावलंबित्व न येता ही जीवनयात्रा संपावी आणि शेवटचा दिवसही गोड व्हावा!!

–अरुण गोडबोले

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..