नवीन लेखन...

जागतिक साडी दिवस

लग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सणसमारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो. साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते. असंख्य प्रकार, नेसायच्या पद्धती, अगणित रंगसंगती असलेले आणि कोणत्याही स्त्रीला शोभून दिसणारे साडी हे जगातील एकमेव वस्त्र असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत? तर उत्तर येते ‘साडी’! बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले, लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असेही हेच वस्त्र! आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच.. साडी! हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे, चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वसन. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे.

साडी हा वैश्विक व सनसंस्कृतीतला सगळ्यात जुना आणि अजूनही वापरत राहिलेला वस्त्रप्रकार आहे! साडी हे नाव संस्कृत ‘शाटी’ म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले आहे. त्याचेच प्राकृत रूप साडी. जुन्या जातक कथांमध्ये स्त्रीच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका या शब्दाचा उल्लेख येऊन गेलेला आढळतो.

बदलत्या वस्त्रविश्वाचा आढावा घेताना भारतीय स्त्रीच्या वस्त्रसंस्कृतीची कशी उत्क्रांती होत गेली, हे बघत आपण जाऊन पोहोचतो ते थेट सिंधू संस्कृतीत. तसे कापसापासून वस्त्र तयार करणे हे मेसापोटेमियन संस्कृतीत सुरू झाले होते. तिथूनच हे सिंधू संस्कृतीत प्रवेश करते झाले. त्यामुळे लंगोट नेसण्याच्या आत्ताच्या पद्धतीने त्या काळात असे वस्त्र नेसले जायचे. देहाच्या वरच्या भागात काही नेसायची पद्धत पुढेही अनेक वर्षे भारतात नव्हती. अगदी थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या कातडीने वरचे अंग झाकले जाई. त्यामुळे गळ्यात विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल असे. मुळात आपल्या देशातल्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रकारच्या तापमानाने फार कपडे घालणे ही कधीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे भारतीय वस्त्रसंस्कृतीत कपड्याचे महत्त्व हे जास्त सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रकारचे आहे.

नंतर आर्य लोक भारतात प्रवेशते झाले. त्यांच्याकडून संस्कृत शब्द मिळालाय ‘वस्त्र’. आणि अग्निपूजक आर्यांनी लाल रंगाचे महत्त्व वाढवले. लाल रंगाला प्रजोत्पादन, पावित्र्य याचे प्रतीक समजले जाई. त्यामुळेच अजूनही उत्तर भारतीय लग्न ही लाल साडीत लावली जातात! तर या काळातही, सर्वांगाला गुंडाळलेले एक कापड असाच स्त्रियांचा वेष दिसतो. यात परिधान म्हणजे अंतरीय म्हणजेच कमरेला नाडीसदृश धाग्याने (मेखलेने) धरून ठेवलेले वस्त्र, थंडीत प्रवर म्हणजे चेहरा झाकण्यासाठी आच्छादन आणि उत्तरीय जे शालीसारखे खांद्यावरून घेतले जाई. हे फक्त त्या काळातल्या श्रीमंताची चैन होती बरे! गरीब स्त्री-पुरुष लंगोटीतच वावरत होते.

यानंतरच्या काळात मात्र आताच्या साडीसारखे बदल हळूहळू दिसायला लागले ते मौर्यांच्या आणि संगाच्या काळात. म्हणजे सांचीचा प्रसिद्ध स्तूप बनल्याचा काळ. १८७-७८ ख्रि.पूर्व काळ हा. या काळात कमरेवरच्या कायाबंधाला वस्त्र खोचले जाऊन त्याच्या निर्यात आताच्या धोतरासारख्या खोचल्या जाऊ लागलेल्या त्या काळात सापडलेल्या चित्रांवरून आणि पुतळ्यांवरून दिसते.

काही शतकांनंतर गुप्तांच्या काळात शिवलेले कपडे दिसायला लागतात. याच काळात घागरासदृश वस्त्र नेसायला सुरुवात झालेली दिसते. तसेच शिवलेल्या चोळ्याही चित्रांमध्ये दिसू लागतात. याआधीच्या काळात कंचुकी म्हणजेच वस्त्राचा एक पट्टा छाती झाकायला वापरलेला दिसतो. संस्कृत साहित्यात त्याचे उल्लेख येऊन गेलेले आढळतात.पर्शियन लोक शिवण्याची कला आपल्यासोबत घेऊन आले आणि भारतीय स्त्रियांच्या वस्त्रसंस्कृतीत बदल होऊ लागले. याच काळात अजंठ्यामधील चित्रांमध्ये शर्टासारखे जॅकेट ब्लाउझ म्हणून वापरायला सुरुवात झालेली दिसते. तरीही त्या काळातल्या उच्चवर्णीय स्त्रिया चोळी घालत नसत. नोकरवर्गात चोळी आधी वापरली जाऊ लागलेली दिसते. मुळात या बदलाचे कारणही बाहेरून आलेल्या या लोकांची वस्त्र होती. त्यांच्याप्रमाणेच आपणही वरचे अंग झाकूनही त्याचे सौष्ठव दाखवता येईल, हे दिसून आल्यावर चोळीसदृश कपडे वापरणे वाढले असावे. तसेच बौद्ध ,जैन धर्मांच्या प्रभावामुळेही आकर्षक प्रलोभक दिसू नये, म्हणून वरचे अंग झाकणे आवश्यक समजले जाऊ लागले. कालौघात या जॅकेटचे स्वरूप बदलत ते आखूड आणि फक्त छातीवर तंग बसणारे असे वस्त्र – म्हणजेच चोळी म्हणून वापरले जाऊ लागले. संत ज्ञानेश्वरांच्या काव्यात तेराव्या शतकात ‘चंदनाची चोळी’ शब्द येऊन गेलेला आढळतो. या चोळीवर वस्त्राचा ओढून घेतलेला भाग म्हणजेच पदर. हा पदर मात्र आपण रोमन संस्कृतीतून घेतला आहे! रोमन लोकांमध्ये वस्त्राचा एक भाग पुढे ओढून तो डाव्या खांद्यावर टाकलेला असे. ही झाली साडीची ओरिजिनल स्टाईल! असेच दोन पायांच्यामधून वस्त्र नेऊन मागे खोचले जाई आणि पुढे पदर ही झाली नऊवारी पद्धतीने साडी नेसायची सुरुवात!

गुप्तकाळात मात्र अशा काष्टा पद्धतीने साडी नेसणे हळूहळू मागे पडत अंतरीय लुंगीसारखे गुंडाळले जाऊ लागले. सकच्छ साडी महाराष्ट्र आणि दक्षिणेपुरतीच नेसली जाऊ लागली. त्यामुळे उत्तर भारतीय साडी नेसणे हे गुंडाळून आणि आपले नऊवारी नेसणे हे निर्याक मागे नेऊन खोचणे असा फरक तयार झाला. अशा प्रकारे आपल्या खंडप्राय देशात निरनिराळे समाज या साडी नेसण्यात थोडेसे फरक करत आपले वेगळेपण टिकवू शकले आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीवर साडीचा पडलेला हा लक्षणीय प्रभाव आहे.

मुघलकाळात भारतीय वस्त्रांमध्ये उपयुक्ततेच्या पुढे जाऊन सौंदर्यीकरण होऊ लागले. तलम कापड, नक्षीकाम, कलमकारी, जरीचा वापर, कुंदनचा वापर, सिल्क मार्गाने येणारे उत्कृष्ट सिल्क अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव वस्त्र सजवण्यामध्ये होऊ लागला. मुघल सम्राटांच्या दरबारी कसलेले कारागीर जरीकाम, शिवणकाम करीत असत. मुघल जे ब्रोकेडचे कापड वापरत असत, ते त्यांच्या प्रभावामुळे जगभर ‘किन्खापी’ म्हणजेच ‘किन ख्वाब’ अर्थात ‘सोनेरी स्वप्न’ अशा नावाने अजूनही ओळखले जाते. चेहरे झाकण्याची पद्धत सुरू झाल्याने पदराची लांबी वाढली. सलवार-कमीझसारखी वस्त्रप्रावरणे थंड प्रदेशात लोकप्रिय होऊ लगली. याच काळात साडी घागरा पद्धतीने नेसताना पारदर्शक वस्त्रामागे अवयव झाकण्यासाठी मध्ये घागरा घातला जाऊ लागला. त्यावर घ्यायचा दुपट्टा ही साडीची वेगळी स्टाईलही लोकप्रिय होऊ लागली.

मुघलांच्या कापडशौकाचा परिणाम म्हणून निरनिराळ्या गावांत विणल्या जाणार्या वस्त्रांमुळे त्या गावांची महती वाढली. बनारसी, बांधणी, पटोला, चंदेरी, महेश्वरी….. किती नावे घ्यावी! या सर्व ठिकाणांच्या साड्या आपण आजही हौशीने वापरतो!

यानंतरचा काळ म्हणजे भारतातले ब्रिटिश राज्य. तो युरोपातला स्त्रीने डोक्यापासून पायापर्यंत सर्व झाकलेले असण्याचा व्हिक्टोरियन कालखंड. याही काळात भारतात केरळ-बंगाल यासारख्या प्रांतांत चोळी घालायची पद्धत नव्हतीच.

१८६०च्या आसपास रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्रनाथ हे पहिले आयसीएस अधिकारी असल्याने, त्यांना गव्हर्नरकडे पार्टीचे सपत्निक निमंत्रण असे. अशाच एका पार्टीला चोळी न घालता बंगाली पद्धतीने साडी नेसलेल्या ज्ञाननंदिनीदेवींना प्रवेश नाकारला गेला. आणि मग टागोर घराण्यातल्या स्त्रिया पाश्चात्त्य पद्धतीचे ‘ब्लाउझ’ घालून साडी नेसू लागल्या! जे सोयीचे आहे ती पद्धत आपोआप रुळत जाते, या नियमाला याही वेळी अपवाद न होता सर्वच प्रांतांत लज्जारक्षणासाठी ब्लाउझ घातलेच जाऊ लागले! अर्थातच या ब्लाउझांवर पाश्चात्त्य प्रभाव जास्त होता.

महाराष्ट्रात याच काळात नऊवारी साडी काष्टा पद्धतीने नेसली जात होती. झाशीच्या राणीच्या चित्रात काष्टा पद्धतीची साडी नेसलेली घोड्यावर आरूढ राणी आपण बघितलीच आहे. राजा रविवर्म्यालादेखील मराठी पद्धतीची साडी हा पोषाख अगदी त्याच्या देवदेवतांच्या चित्रांमध्येही वापरावासा वाटला आहे. या प्रकारच्या साडीत स्त्रीचे सौंदर्य आणि सौष्ठव खूलून दिसते, असे त्याचे मत होते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला बालगंधर्व नावाचे स्वप्न पडले आणि नऊवारी साडीतली मूर्तिमंत शालीनता तमाम मराठी स्त्रियांवर गारूड करून गेली. त्या काळात स्त्रियांची साडी नेसायची पद्धत चक्क एका पुरुषाने बदलली! दोन्ही खांद्यांवर पदर आणि पाय उघडे न दिसणारी नऊवारी पैठणी नेसलेली संगीत शाकुंतलमधली शकुंतला बनून आलेल्या बालगंधर्वांनी मराठी साडीचे एक युग अक्षरशः गाजवले. त्यांच्या नाटकात नेसल्या गेलेल्या प्रकारांच्या पैठण्या शालूंनी मराठी घरातली कपाटे भरू लागली! यानंतरच्या काळात साडीवर जसा इतिहास-भूगोलाचा प्रभाव पडत गेलाय, तसाच चित्रपटसृष्टीचाही मोठा प्रभाव पडत गेलाय. १९३७ सालात आलेल्या त्या काळातल्या सुपरहिट ‘कुंकू’ चित्रपटात शांता आपट्यांनी नेसली तशी साडी माझी आजी नेसत असे! सध्या सुरू असलेली फुग्याच्या बाह्यांच्या ब्लउझची फॅशनही तेव्हाचीच!

१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत. तरी साडी नेसायची पद्धत अगदी साधीसुधी असे. पदर बहुधा एकत्र पकडून पिन लावणे इतपतच साडी नेसणे असे!

अंगप्रत्यंग दाखवणारी चोपून बसवलेली साडी नेसायची अगदी नवी पद्धत आणली १९७५  च्या आसपास मुमताजने. अजूनही लग्नांमध्ये हौसेने अशी साडी स्वागत समारंभांमध्ये नेसताना दिसतात.

नव्वदच्या दशकात यश चोप्रांच्या सिनेमातल्या नायिका साडीमध्ये विलक्षण देखण्या दिसत. त्या साड्यांमुळे पेस्टल रंगाच्या, शिफॉनच्या प्लेन साड्या लोकप्रिय झाल्या. यश चोप्रांची चांदनी कोण विसरेल!

आत्ताच्या काळातल्या नायिकासुद्धा स्टाइल स्टेटमेंट म्हणून साडी हिरिरीने वापरताना दिसतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी साडी नेसताना दिसतात. भले आता घोडा गेला, बुलेट आली! पण परंपरा म्हणून साडी हवीच आहे.

२१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.

— संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट, मिसळपाव

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..