नवीन लेखन...

विंडो सीट

परवा फेसबुकवर एक लेख वाचण्यात आला. त्यामध्ये लेखकानं विमानातील ‘विंडो सीट’ बद्दल लिहिलं होतं.. जमिनीवरील प्रवासात ‘विंडो सीट’ मिळाली तर आपल्याला दिसणारी दृष्य मोठी व आपण लहान वाटतो.. आणि विमानातील ‘विंडो सीट’ मधून उंचावरुन दिसणारं, जग लहान व आपणच मोठ्ठे वाटतो…

लहानापासून तो मोठ्यांपर्यंत ‘विंडो सीट’ कुणाला नकोशी वाटेल? सर्वांनाच ती हवीहवीशी वाटते.. कारण प्रवासात आपण बाहेरचा निसर्ग पाहू शकतो.. छान हवेची झुळूक अनुभवता येते. पाऊस पडत असेल तर खिडकीतून काही थेंबांचा अंगावर शिडकावा होतो.. थंडी असेल तर उन्हाचा शेक घेता येतो.. हिवाळ्यात काचा लावून उब मिळविण्याचा प्रयत्न केला जातो..

लहानपणी पुण्याहून सातारला जाताना, शिरवळ आलं की निर्माण प्रवास पूर्ण झाल्याचं समजलं जायचं. मग एसटीच्या खिडकीजवळून काकडी, उसाचा रस, वडापाव वाले, गोळ्या बिस्कीटवाले येरझाऱ्या घालायचे. उन्हाळ्यात ठंडा पाणी, कोल्ड्रींकवाले गिऱ्हाईक शोधायचे. त्यात एखाद्यानं वस्तू घेऊन पैसे देईपर्यंत गाडी सुरु झाली तर त्यांची पळापळ व्हायची.. खाली जर चहाला जायचं असेल तर आपल्या ‘विंडो सीट’वर रुमाल ठेवला जाई..

बसमधली ‘विंडो सीट’ मिळण्यासाठी, बुकींग करणाऱ्याला विनंती करावी लागते. दोन सीटच्या बाकड्यावर विंडो सीट मिळाल्यावर आधीच खिडकीशी बसलेल्या प्रवाशाला आपला सीट नंबर दाखवून उठवावे लागते.. तो नाराजीनेच उठतो व आपल्याला बसू देतो. तिथे जर स्त्री बसलेली असेल तर स्त्री दाक्षिण्य म्हणून, आपण विंडो सीटचा आग्रह सोडून देतो..

मला स्वतःला ड्रायव्हरच्या मागची ‘विंडो सीट’ आवडते. एकतर आपल्यासमोर कोणीही नसतं. शेजारी कुणीही येऊन बसलं तरी खिडकीतून बाहेरचं जग बघत बघत, प्रवास छान होतो.. रात्रीचा प्रवास असेल तर मस्त झोप काढता येते.

मी माझ्या तरुणपणात अनेकदा ट्रकने प्रवास केलेला आहे. अशा प्रवासात त्या केबिनमधील मिळेल ती जागा स्वीकारावी लागते. कधी ड्रायव्हरच्या मागे तर कधी क्लिनरजवळ.. तर कधी गरम चटके देणाऱ्या, इंजिनच्या झाकणावर.

एकेकाळी मुंबईला जाताना एशियाडने खूप वेळा, मी प्रवास केलेला आहे. या गाड्या सकाळी आठ वाजता पुणे स्टेशनवरून निघायच्या व दुपारी दादरला पोहोचायच्या. वाटेत लोणावळ्याला अर्धा तास गाडी थांबत असे. तेवढ्या वेळेत एशियाडच्या कॅन्टीनमधून ‘अप्पू’ची कुपनं घेऊन, काहीतरी पोटात ढकललं जात असे.. या प्रवासात मात्र मी पुढे मागे कुठेही असलो तरी ‘विंडो सीट’च पकडत असे..

रेल्वे प्रवासात विंडो सीट भाग्यवंतालाच मिळते. लोकलमधला प्रवास हा कमी वेळाच्या असल्याने, अनेकदा उभं राहूनच केलेला आहे. लोकलमध्ये चढणं व हव्या त्या बाजूला उतरणं हे मला कधीच जमलेलं नाही.. अशावेळी आपण फक्त उभं रहायचं.. आत जाणं व बाहेर पडण्याचं काम हे आपल्याला ढकलणारे स्वतःहून आनंदाने व इमानेइतबारे पार पाडतात..

रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी, विंडो सीट मिळायलाच हवी. ती नसेल तर प्रवास नीरस होतो.. दिल्लीच्या प्रवासात मला ‘विंडो सीट’ मिळूनही, मधल्या स्टेशनवरील गर्दी करणारे प्रवासी छोट्या प्रवासासाठी आपल्या मांडीवर बसायलाही कचरत नाहीत..

आता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

८-५-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..