नवीन लेखन...

व्हेअर ईगल्स डेअर चित्रपट

व्हेअर ईगल्स डेअर या चित्रपटाचे लेखक म्हणजे ॲ‍लिस्टर मॅक्लिन. त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.

या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते. या ठिकाणी फक्त केबल कारनेच किंवा हेलिकॉप्टरने जाता येते. जर्मन सैनिकांनी पकडलेल्या एका अमेरिकन ब्रिगेडियर जनरलला या किल्ल्यात बंदी ठेवलेले आहे. त्याला नॉर्मंडीत दोस्त सैन्य उतरवण्याची योजना माहीत असल्याने जर्मनांनी त्याला बोलते करण्यापूर्वी त्याची सुटका करण्याची कामगिरी ब्रिटिश मेजर जॉन स्मिथ (रिचर्ड बर्टन), अमेरिकेच्या रेंजरचा लेफ्टनंट मॉरिस शॅफर (क्लिंट इस्टवूड) आणि इतर पाच कमांडोंकडे दिली जाते. जर्मन सैन्याच्या गणवेशात त्यांनी पॅराशूटने विमानातून त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात उतरायचे आणि किल्ल्यात जाऊन त्या अमेरिकन ब्रिगेडियर जनरलची सुटका करायची अशी योजना असते. एमआय ६ या गुप्तहेर संघटनेतील अडमिरल रोलँड आणि ब्रिटिश सैन्यातील कर्नल टर्नर त्यांना सर्व माहिती देतात.

त्या सात जणांपैकी एक पॅराशूनटने उतरताना मरतो. परंतु त्याला कोणीतरी मारले असल्याचा संशय स्मिथला येतो. दुसरा एक जण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जर्मन सैन्याच्या भागात मारला जातो. या मोहिमेत स्मिथला मेरी एलिसन आणि जर्मन सैन्याच्या स्थानिक बारमध्ये वेट्रेस असलेली हाईदी मदत करत असतात. हाईदीने मेरीला किल्ल्यात सेक्रेटरी म्हणून नोकरी मिळवून दिलेली असते. किल्ल्याकडे जाणाऱ्या केबल कारच्या टपावर उडी मारून स्मिथ आणि शॅफर त्या टपावरून किल्ल्याकडे जातात. तेथून एका कड्यावरून दोरीच्या साहाय्याने मेरीच्या खोलीत प्रवेश करून तेथून किल्ल्यात शिरतात. अमेरिकन ब्रिगेडियर जनरलची चौकशी सुरू असते तेथे ते पोचतात. त्यांच्या तीन सहकाऱ्यांना जर्मन सैन्याने पकडलेले असते त्यांनाही तेथे आणले जाते.

तिथे स्मिथ एक वेगळाच खेळ खेळतो. शॅफरालाही त्याचे शस्त्र बाजूला ठेवायला सांगून त्या सर्वांबरोबर बसायला सांगतो आणि गोंधळात टाकतो. पकडलेला अमेरिकन ब्रिगेडियर जनरल हा खरा नसून तो जर्मनांना फसवण्याकरता पाठवलेला एक साधा सार्जंट असल्याचे तो सांगतो. आपण स्वतःही खरे तर जर्मन एजंट असल्याचे तो जर्मन अधिकाऱ्यांना सांगतो आणि ते सिद्ध करायला ब्रिटिश लष्करात असलेल्या पण खरे तर जर्मन एजंट असलेल्या उच्च अधिकाऱ्याचे नाव एका चिठ्ठीवर लिहितो आणि तेथे हजर असलेल्या जर्मन कर्नलला दाखवतो. तो ते बरोबर असल्याचे सांगतो. आपल्याबरोबर या मोहिमेत आलेले ब्रिटिश सहकारीही खरे तर जर्मन एजंट असल्याचेही तो सांगतो आणि ते सिद्ध करण्याकरता त्या तिघांना तो ब्रिटिश सैन्यात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या पण प्रत्यक्षात जर्मन एजंट असलेल्या सहकाऱ्यांची नावे लिहायला सांगते. तितक्यात मेरीशी मैत्री करू इच्छिणाऱ्या दुसऱ्या एका जर्मन मेजरला तिने सांगितलेल्या स्वतःविषयीच्या माहितीत काहीतरी गफलत जाणवते व शंका येते. तो तेथे येतो आणि स्मिथचा डाव थोडक्यात उधळणार इतक्यात तो मेजर बेसावध झाल्याच्या एका क्षणी स्मिथ व शॅफर गोळीबार करत सर्व जर्मन अधिकाऱ्यांना मारतात. जर्मन एजंट म्हणून उघड झालेल्या तीन सहकाऱ्यांना अटक करून, त्यांच्यासह जर्मनांनी पकडलेला व यांनी आता सोडवलेला अमेरिकन अधिकारी, मेरी, स्मिथ व शॅफर तेथून पळतात. तेथून सुरू होतो त्यांचा पाठलाग. मधेच ते तीन जर्मन एजंट केबल कारने पळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मारून ते किल्ल्याच्या पायथ्याशी येतात आणि पाठलाग करणाऱ्या सर्व जर्मन सैन्याला हुलकावणी देऊन आपल्या विमानात येतात. तेथे स्मिथ टर्नर हाच जर्मन हेर असल्याचे त्याला व रोलँडला सांगतो. तो त्या जर्मन अधिकाऱ्याला स्वतः जर्मन हेर असल्याचे सिद्ध करायला चिठ्ठीत लिहून नाव दाखवतो ते रोलँडचे असते व ते खरे असल्याचे त्या जर्मन अधिकाऱ्याने सांगितलेले असते. कोर्टमार्शल टाळण्याकरता तो टर्नरला विमानातून पॅराशूट न घेता उडी मारायला सांगतो. या संपूर्ण कामगिरीचा एक भाग ब्रिटिश सैन्यातील जर्मन हेरांची नावे शोधणे हाही असतो व ती कामगिरी रोलँडने गुपचूप स्मिथला दिलेली असते हे शेवटी लक्षात येते.

काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. स्मिथ व उघड झालेले जर्मन एजंट म्हणून ब्रिटिश सैन्यातील दोन अधिकारी (एक आधीच मरतो) यांच्यातील केबल कारवरील झटापट, शॅफरचे केबल कार स्थानकाच्या बर्फ साठलेल्या छतावरून घसरणे आणि स्मिथने त्याला हात देऊन कसेतरी वर खेचून घेणे, शेवटचा बर्फाने भरलेल्या रस्त्यावरील स्मिथ, मेरी व शॅफर यांच्या बसचा जर्मन सैन्याने केलेला पाठलाग आणि त्यांच्यातील गोळीबार, किल्ल्याच्या कड्यावरून दोरीने किल्ल्यात चढणे व उतरणे किंवा केबल कारच्या टपावरून केलेले स्मिथ व शॅफर यांचे प्रवास असे अनेक चित्तथरारक व उत्कंठावर्धक प्रसंग चित्रपटात दिग्दर्शक ब्रायन हट्टन यांने जिवंत केले आहेत. ऐन थंडीतील बर्फाळ पर्वतरीशींची पार्श्वभूमी आणि लांबून दिसणाऱ्या किल्ल्याची दृश्ये खूपच आकर्षक दिसतात.

दुसरे महायुद्ध अखेर दोस्त देशांनी जिंकल्याने व जर्मनीचा दारुण पराभव झाल्याने हॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटात बहुतांशी एकांगी व असमतोल असे चित्रण केले जाते. जर्मन अधिकारी व सैन्य काहीसे बावळट, मूर्ख, दोस्त देशांचे अधिकारी व सैन्य जर्मन सैन्याला अगदी सहज फसवून त्यांच्या भागात जाऊन कामगिरी पार पाडून सहज परत येऊ शकतात असे कायम दाखवले जाते. याही चित्रपटात हा दोष आहे. त्यामुळे काही गोष्टींना तर्काचा आधार नाही. परंतु जेव्हा एकूणच चित्रपट एक चांगला अनुभव देतो तेव्हा मग अशा तर्कांचा आधार नसलेले प्रसंग दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य (डिरेक्टर्स फ्रीडम) म्हणून सोडून दिले जातात. तेच इथेही करावे लागते कारण युद्धातील एक्साइटमेंटचा एक अतिशय सुंदर अनुभव घेऊन प्रेक्षक बाहेर पडत असतो. ही एक्साइटमेंट तयार केली आहे ती गुंतागुंतीचे कथानक, उत्कंठावर्धक दृश्ये आणि चित्तथराराक प्रसंग यांनी. त्यामुळेच व्हेअर ईगल्स डेअर हा ग्रेट चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला आहे.

व्हेअर ईगल्स डेअर.

दिग्दर्शक – ब्रायन हट्टन निर्माते – एलीऑट कास्टनर) कथा, पटकथा – अॅलिस्टर मॅकिलन

छायाचित्रण-आर्थर इब्बेटसन कलाकार. रिचर्ड बर्टन, विलंट ईस्टवूड, मेरी ऊर, पॅट्रीक वायमार, इन्ग्रिड पिट्ट.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..