पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या खनिजांचा वितळणबिंदू हा अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचं आढळलं. हा अपेक्षेपेक्षा अधिक असणारा वितळणबिंदू त्या काळात पृथ्वीचं तापमान अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचं दर्शवतो. या विशिष्ट काळात पृथ्वीवर अशनींचा प्रचंड प्रमाणात मारा झाल्याचं पूर्वीच सिद्ध झालं आहे. पृथ्वीनं झेललेला हा अशनींचा मारा त्यावेळच्या तात्पुरत्या तापमानवाढीला कारणीभूत ठरला असावा. या उलट, सुमारे पावणेदोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या खनिजांचे वितळणबिंदू हे, ती खनिजं काळानुसार अपेक्षित असणाऱ्या तापमानापेक्षा कमी तापमानाला निर्माण झाल्याचं दर्शवतात. या काळाचा काही भाग हा हिमयुगाचा काळ असल्याचं ज्ञात आहे. या काळात पृथ्वीवरचा बहुतांश भाग बर्फानं व्यापला असल्यानं, पृथ्वीवरचं तापमान काही काळापुरतं घटलेलं होतं. त्यामुळे या काळात निर्माण झालेली खनिजं ही कमी तापमानाला निर्माण झाली आहेत. या दोन उदाहरणांवरून, खनिजांचा वितळणबिंदू आणि पृथ्वीवरची परिस्थिती यांच्यातला संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे भविष्यात सापडणाऱ्या खनिजांचा वितळणबिंदू त्यांच्या सूत्रावरूनही काढता येईल व या वितळणबिंदूवरून पृथ्वीच्या इतिहासातला अधिक तपशील कळू शकेल.

पृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत. ही संयुगं मुख्यतः तीन मूलद्रव्यांपासून बनलेली असून, ती नायट्रोजनयुक्त (नायट्राइ़ड) वा कार्बनयुक्त (कार्बाइड) प्रकारची संयुगं आहेत. अशी संयुगं तयार करणं शक्य झाल्यास, उच्च तापमानाच्या परिस्थितीत त्यांचा उपयोग होऊ शकेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेलं हे संगणकीय प्रारूप वापरण्याच्या दृष्टीनंही अतिशय सोपं आहे. ज्या संयुगाचा वितळणबिंदू हवा असेल, त्या संयुगाचं फक्त रासायनिक सूत्र संगणकाला पुरवायचं. संगणक काही सेकंदातच त्या संयुगाचा वितळणबिंदू सांगू शकतो. जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं प्रारूप हे जास्तीत जास्त पाच मूलद्रव्यांपासून तयार झालेल्या संयुगांचे वितळणबिंदू काढण्यासाठी वापरलं असलं तरी, हे प्रारूप त्याहून अधिक मूलद्रव्यांपासून तयार झालेल्या संयुगांसाठीही वापरता येतं. फक्त त्याची अचूकता काहीशी कमी होत जाते. आता इतर काही तंत्रांशी सांगड घालून या प्रारूपाची अचूकता वाढवण्याचा प्रयत्नही ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला आहे. हा प्रयत्न यशस्वी होईल, याची खात्री या संशोधकांना वाटते आहे.