नवीन लेखन...

आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

Vishwakarma of today's Generation of Art and Films

मराठी चरित्रवाड़्मयाला लाभलेले सौंदर्यलेणे – “आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई”

काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे…..

‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी.

आपल्याकडे चित्रपटविषयक लेखनाला दुय्यम मानण्याचा प्रघात आहे. वास्तविक पाहता चित्रपट ही विसाव्या शतकाने जगाला दिलेली पासष्टावी कला आहे. या कलेमध्ये साहित्य, नृत्य, चित्र, शिल्प, स्थापत्य व संगीत या सर्व ललितकला समाविष्ट तर आहेतच, पण उर्वरित सर्व उपयुक्त कलांचाही समावेश ही कला स्वत:च्या पोटात आवश्यकतेनुसार करून घेते. एकूणच ललितकलांची समीक्षा ही फारशी लिहिली जात नाही. त्यातही चित्रपटविषयक व तिच्या निर्मितीच्या विविध अंगांविषयी जाणकारीने लिहिले जात नाही. मराठी साहित्य व समीक्षेच्या क्षेत्रात तर परिस्थिती आणखी गंभीर. विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, अरुण खोपकर, शिरिष कणेकर, अंबरिश मिश्र, इसाक मुजावर, बाबुमोशाय, विजय पाडळकर, गणेश मतकरी हे काही सन्माननीय अपवाद!

या यादीत आता मंदार जोशी यांचे नाव घालावे लागेल, अशा प्रकारचे लेखन गेल्या काही वर्षांत त्यांनी केले आहे. आमिरखानच्या जीवनावरील एक संशोधनात्मक सुंदर असा चरित्रग्रंथ त्यांनी २००७ मध्ये लिहिला- ‘आमिर’ ; या ग्रंथाद्वारे चरित्रलेखनाची एक नवी शैली मंदार जोशी यांनी आणली आहे. आणि त्यानंतर दुसरे तितकेच महत्वाचे असे व्यक्तिमत्व घेऊन ते आले आहेत – नितीन चंद्रकांत देसाई. मराठी साहित्यामध्ये चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींच्या चरित्रांची छोटीशी परंपरा आहे, परंतु, त्याव्यतिरिक्त चित्रपटाच्या अन्य अंगांसंदर्भात काम करणार्‍या कलावंतांची नोंद घेतली गेली नाही. ही उणीव हे १७ प्रकरणांचे ३३४ पानांचे वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील पुस्तक भरून काढते.

मुळात हा चरित्रग्रंथ आहे का? चरित्रग्रंथाच्या सर्व कसोट्यांना तो उतरतो का? या उपसाहित्यप्रकाराची क्षितिजे तो रुंदावतो का? चरित्रग्रंथामध्ये चरित्रनायकाचे जीवनचरित्र तपशिलवारपणे, योग्य त्या पुराव्यांनिशी, स्वत:च्या पदरची कोणतीही भर न घालता, विशिष्ट अशा क्रमाने, चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्वाने भारून न जाता, त्रयस्थपणे लिहावयाचे असते. मंदार जोशी हे नितीन देसाई यांच्या अद्भूत व्यक्तिमत्वाने भारून गेले आहेत, तसे ते प्रस्तावनेत म्हणतातही, पण प्रत्यक्ष लेखनप्रक्रियेमध्ये मात्र हे भारवलेपण बाजूला ठेवून त्यांनी लेखन केले आहे. हा चरित्रग्रंथ लिहिताना मंदार जोशी यांनी सांगण्याची भूमिका न घेता, मांडण्याची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष नितीन देसाई यांच्याशी झालेल्या चर्चा, त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर नितीन देसाई यांना घडविणारी माणसे, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या प्रतिक्रिया, नितीन देसाई यांचे सहकारी, मित्र, त्यांच्या समवेत काम करणारे सहकलाकार, शिक्षक त्यांना गुरुस्थानी मानणारे कलाकार यांच्याबरोबर झालेल्या चर्चा सुसूत्रतेने लेखक मांडतात आणि इथेच या चरित्रग्रंथाचा वेगळा बाज सिद्ध होतो. मजकुराबरोबरच असणार्‍या भरपूर छायाचित्रांमुळे हा ग्रंथ फोटोबायोग्राफीच्या दर्जापर्यंतही पोहोचतो. असा एक वेगळाच चरित्रलेखनप्रकार साधण्यात लेखक यशस्वी होतात.

नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्‍या एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचार्‍्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कतुतहल शमविणारं हे पुस्तक आहे.

एक चित्रकार, एक छायाचित्रकार, एक सेटवर कोणत्याही प्रकारचं काम करून शिकण्याची उमेद असणारा तरुण, त्याची सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती, संशोधकी प्रवृत्ती, कामात सर्व काही शोधणारा प्रतिभावंत, स्वयंप्रज्ञेने मालिकेचे कलादिग्दर्शन करणारा कलावंत, कलादिग्दर्शनाला अभिनेत्यांचे ग्लॅमर मिळवून देणारा प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता, दिग्दर्शक, एका प्रचंड मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा सर्वेसर्वा, इव्हेण्ट मॅनेजमेण्ट करणारी सृजनशील व्यक्ती आणि या सर्वांपलिकडे जाऊन शिल्लक राहणारा कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल, जिव्हाळ्याचा माणूस अशा विविध स्तरांवरील सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व असणार्‍या नितीन चंद्रकांत देसाईंचे स्वरूप सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यात नितीन देसाई यशस्वी झाले आहेत.

बी.डी.डी. चाळीत जन्मलेल्या नितीनची पाचवलीसारख्या कोकणातील खेडेगावाच्या मातीशी जुळलेली नाळ, त्याच्या बाळपणीच्या कुठेही प्रसिद्ध न झालेल्या अस्पर्श आठवणी, त्याच्या घडत्या वयात त्याच्यावर प्रभाव पाडणार्‍या व्यक्ती व त्यांतून घडत गेलेले नितीन देसाईंचे व्यक्तित्व हा प्रवास लेखक मंदार जोशी यांनी वेधकपणे टिपला आहे. नितीन देसाई आईच्या गर्भात असताना तिला लागलेले लाल-हिरव्या मिरच्या खाण्याचे विचित्र डोहाळे व त्यामुळे गोर्‍यापान देसाई कुटुंबात सावळेपणा घेऊन नितीन देसाई जन्माला आला ही गंमतीदार आठवण आपणांस येथे वाचायला मिळते. आज असामान्यत्वाच्या पातळीवर पोचलेला नितीन बालपणी शाळेत जाताना आपल्यासारखाच रडत असे, तोही खोड्या करत असे हे कळतं; पण त्याचबरोबर गणिताच्या तासाला गणित न सोडवता शिवराज्याभिषेकाचे चित्र काढणारा नितीन त्या चित्रांतील रेषांनी आपल्या शिक्षकांना अवाक् करतो हेही कळतं. नितीन देसाईंच्या बालपणीचे किती तरी किस्से आपल्याला येथे रंजकपणे वाचावयास मिळतात, कारण हे किस्से त्या किश्श्यांत सहभागी असणारी माणसेच सांगतात.

आज नितीन देसाई घडण्याचे कारण म्हणजे, त्यांच्या मातापित्यांनी त्यांना करिअर निवडीचे दिलेले स्वातंत्र्य. सर्वसामान्य पालकांप्रमाणे त्यांनी नितीन देसाईंना डॉक्टर, इंजिनिअर बनायला न सांगता त्यांच्या आवडीप्रमाणे कलाक्षेत्रात जाण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांना रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ५ लाख रुपयांचे कर्ज काढून नवी कलर लॅब काढण्यासाठी पाठिंबा दिला. पुढे आयुष्यात धाडसी निर्णय घेणार्‍या नितीन देसाईंची मुळे येथे आहेत असे जाणवते. आपल्या मातापित्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा नितीन देसाई येथे आपणास दिसतो.

त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा नितीश रॉय यांच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा; ‘तमस’च्या सेटवर बेभानपणे सलग तेरा दिवस काम करण्याचे बेभान क्षण; ‘टूडी’ चित्र ‘थ्रीडी’ मध्ये परिवर्तित होण्याचे थरारक क्षण; ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘चाणक्य’, ‘करीब’ यासारख्या मालिकांतून कलादिग्दर्शक म्हणून होत गेलेली घडण; मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’साठी केलेल काम; ‘परिंदा’, ‘भूकंप’ यासारखे पहिले चित्रपट; खरीखुरी ओळख निर्माण करून देणारा ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’सारखा चित्रपट व नंतरच्या १०० चित्रपटांची घडण; ‘कौन बनेगा करोडपती’, ‘खुल जा सिमसिम’, ‘बिग बॉस’ सारख्या टी. व्ही. वरील गेम शोजचे सेट्स; त्यातून अमिताभ बच्चनसारख्या ज्येष्ठ कलावंताचं मिळालेलं प्रेम; ‘माँ आशापुरा देवी’, ‘बालगंधर्व’ अशा चित्रपटांची, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराणी पद्मिनी’, ‘श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशा महामालिकांची निर्मिती व त्यांच्या जन्मकथा; एन्. डी. स्टुडिओसारख्या जगविख्यात स्टुडिओची उभारणी या पुस्तकातील ३३४ पानांमध्ये सामावली गेली आहे.

आपल्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीदरम्यान नितीन चंद्रकांत देसाई ही व्यक्ती अनेक दिग्गजांच्या सहवासात आली. अमिताभ बच्चन ते शाहरुख खान ते हृतिक रोशन, गुलजार ते विधु विनोद चोप्रा ते मधुर भांडारकर, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार ते राज ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे ते ना. धों. महानोर अशा भारतातल्या दिग्गजांच्या सहवासात आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने नितीन देसाई आले. या प्रत्येकाबरोबरचे त्यांचे स्नेह, मैत्र कसे आहे, त्यांचे अनुभव कसे मनोज्ञ आहेत याचे अत्यंत प्रत्ययकारी व प्रवाही असे चित्रण मंदार जोशी करतात.

नितीन देसाई हा एक ध्येयवेडा माणूस नेमका कसा आहे याचा हे पुस्तक शोध घेते. चित्रपटांसाठी, मालिकांसाठी ते लोकेशन्स कशी शोधतात, त्यासाठी ते स्क्रिप्टचा अभ्यास कसा करतात हे वाचणे म्हणजे नव्या कलादिग्दर्शकांसाठी एक वस्तुपाठ आहे. हा वस्तुपाठ देता देता विश्वरूप होणारा हा आधुनिक युगाचा विश्वकर्मा महाराष्ट्राच्या मातीशी कसा एकरूप आहे हे मंदार जोशी समर्थपणे मांडतात.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाला नितीन देसाई कसे दिसले यापेक्षा चित्रपटसृष्टीतील कलावंतांना, प्रतिभावंतांना, साहित्यिकांना, त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्‍्यांना, कुटुंबियांना, मित्रांना हा माणूस कसा दिसला हे मंदार जोशी यांनी मांडले आहे.

‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई’ या पुस्तकाचे सर्वात महत्वाचे आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठीचे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे यातील शेकडो छायाचित्रे, विविध सेट्सची प्रकाशचित्रे, ज्या सेट्सनी भारतीयच नव्हे तर जागतिक कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपली नोंद करून ठेवली आहे अशा सेट्सची प्राथमिक रेखाचित्रे, त्यांची इंजिनिअरिंग ड्रॉइंग्ज या ग्रंथात समाविष्ट आहेत. हा एक फार मोठा असा ऐतिहासिक दस्तऐवज मंदार जोशी यांनी वाचकांच्या हाती ठेवला आहे. आजवर अशा प्रकारचा प्रयत्न मराठीमध्ये झाल्याचे ऐकिवात नाही. त्याचबरोबर नितीन देसाई यांची फिल्मोग्राफीही मंदार जोशी यांनी परिश्रमपूर्वक तयार केली आहे.

या चरित्रग्रंथाची निर्मितीही चरित्रनायकाप्रमाणेच वैभवशाली झालेली आहे. हार्ड बाऊंड काळ्याशार मुखपृष्ठावर नितीन देसाई यांचा वैशिष्ट्यपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट फोटो व चंदेरी अक्षरात उमटलेली अक्षरं आतील मजकुराविषयीची उत्सुकता चाळवतात. १०० जी. एस्. एम्. च्या आर्ट पेपरवर संपूर्ण पुस्तकाची छपाई झाली असून त्यामुळे आतील चित्रांचे सौंदर्य अधिक खुलले आहे. ‘सौंदर्य पानोपानी’ असेच याचे आपण वर्णन करू शकतो.

प्रीमिअर मासिकाचे संपादक मंदार जोशी यांनी मराठी चरित्रग्रंथाला उपसाहित्यप्रकाराची क्षितिजे रुंदावणारे हे नवे सौंदर्यलेणे बहाल केले आहे यात शंका नाही.

‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक- मंदार जोशी
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
एकूण पृष्ठसंख्या ३३४
किंमत: डिलक्स आवृत्ती रु. १५००; साधी आवृत्ती रु. ५००

— नीतिन आरेकर, कर्जत

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

1 Comment on आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..