नवीन लेखन...

विज्ञानयुगातील अध्यात्म-वेदान्त

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी या सत्तेतच काम करतात. नियमबद्धतेमुळे व्यावहारिक जगतात नवीन निर्मिती शक्य होते वस्तुस्थिती हे व्यावहारिक सत्तेचे मुख्य लक्षण आहे. भौतिक वास्तवात आज आहे त्यावरून पुढे काय होईल ते आपण सांगू शकतो व जे इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो. भौतिकीचे सर्व नियम व संशोधन हे या व्यावहारिक स्तरावरच घडत असते. अगदी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांतदेखील वास्तविक काय आहे ते सांगतो.

स्ट्रींग उपपत्तीमुळे व नंतरच्या एम् उपपत्तीमुळे असे वाटू लागते की विज्ञान आता कठोर वास्तविकतेची मर्यादा ओलांडून कल्पनेचा आधार घेत आहे. कल्पनेचा आधार घेऊन तर मिथ्यकेही (Myths) पुराणातरी मांडली गेली आहेत. जसे प्रथम प्रजापती निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली. अशी मिथ्यके व वैज्ञानिक उपपत्ती यांत फरक नाही काय? निश्चितपणे आहे. हा मुद्दा हॉकींग यांनी त्यांच्या पुस्तकातील (A Brief History of Time) शेवटच्या प्रकरणात आणला आहे. प्राचीन काळी मनुष्याला सृष्टीविषयक प्रश्न पडले व उत्तर शोधण्यासाठी आजच्या एवढी बुद्धी तत्पर नव्हती. तेव्हा मिथ्यके रचून प्रश्नांची उत्तरे देण्यात येत होती. परंतु ज्याप्रमाणे वैज्ञानिक उपपत्ती हे पौराणिक मिथ्यक नव्हे त्याप्रमाणे वेदात हे देखील मिथ्यक नाही, पुराण नाही. उपपत्ती ही काल्पनिक असली तरी सरतेशेवटी ती वास्तवाशी बांधिल असते.

पृथ्वी ही कासवाच्या पाठीवर किंवा शेषमस्तकावर उभी आहे ही निव्वळ कल्पना आहे. ते कासव अथवा शेष कोणी पाहिला नाही. स्ट्रींग उपपत्तीतील मूळ कोणीही पाहू शकत नाही हेही खरे आहे. मग ही उपपत्ती व वरील कल्पना यांच्यात काय फरक आहे? निश्चितच आहे. शेष जर हालला तर पृथ्वी हालेल व पृथ्वीवरून मनुष्य फेकला जाईल. पण ते वस्तुस्थितीला सोडून आहे. म्हणून ती केवळ पौराणिक कल्पना आहे. वैज्ञानिक उपपत्ती नाही. स्ट्रींग उपपत्तीत कल्पनेचा उपयोग असला तरी ती वास्तवाचा त्याग करणारी नाही.

या गोष्टीचा वेदांताशी काय संबंध? सबध वैचारिक सामान्यता दाखविणारा आहे. वेदांतदर्शन हे पुराण नाही. वेदांताच्या पुढील विस्तारात माया ईश्वर येतात पण त्यांच्यामुळे बुद्धिगम्य वास्तवाचा कोठेही भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या गोष्टी आलेल्या आहेत. सरतेशेवटी ही संपूर्ण सृष्टिरचना आली कोठून, कशासाठी, आपण का अस्तित्वात आहोत असे प्रश्न विचारले तर जुन्या पिढीतील वैज्ञानिक तो आमचा विषय नाही, धर्मशास्त्राचा (theology) आहे असे उत्तर देत. आजच्या काळात काही मोजके वैज्ञानिक या प्रश्नांच्या उत्तरासाठी तत्त्वज्ञानाकडे वळण्याची तत्परता दाखवितात. श्रॉडिंगर हा त्यातील एक आहे. या प्रश्नांची उत्तरे वेदांतात शोधली पाहिजेत असे त्याला वाटत असे. नील्स बोर सारखे श्रेष्ठ वैज्ञानिक विज्ञानाने पुष्कळ ज्ञान निर्मिती केली असे मानतात पण त्या प्रगतीने विज्ञानाच्या मर्यादाही दाखविल्या आहेत असे सांगतात व या मर्यादापलीकडे मनुष्याला नेऊ शकणारा तत्त्वज्ञानाचा व विशेषतः भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रांत दुर्लक्षित करण्यासारखा नाही असे समजतात.

विश्वाचे एकत्व दाखविण्याचे आजच्या विज्ञानाचे प्रयत्न वेदांताने स्वत:च्या विचारानुसार फार पूर्वीपासून केलेले आहेत, हा विचार आजच्या वैज्ञानिक युगात लक्षणीय आहे. आतापर्यंत आपण विज्ञान व वेदांत यांच्यातील वैचारिक साम्ये पाहिली. परंतु याचा अर्थ असा नव्हे की दोन्ही एकच आहेत. त्यांच्यातील भेदही महत्त्वाचा आहे. विज्ञानाच्या केद्रस्थानी भौतिक विश्व हा विषय आहे तर वेदांताचा व सर्वच भारतीय दर्शनांचा विचार हा मनुष्य व त्याचे जीवन या मुख्य संदर्भात झालेला आहे.

व्यावहारिक जीवनात इच्छापूर्ती व अनिष्ठ निवारण यासाठी प्रत्यक्षज्ञान व बुद्धी यांचा उपयोग करून प्रयत्न केले पाहिजेत हे वेदांताला मान्य आहे. पण हे जीवनरहाटी पुरते आहे. काही उपचार वगळता इतर प्रमुख वैज्ञानिकांना ते मान्य नाही. ते भौतिकाच्या मुळापर्यंत जात आहेत. विश्वाच्या संपूर्ण अस्तित्वाचा अर्थ बाह्य सृष्टीतच शोधला पाहिजे असा बहिरंगी दृष्टिकोन यामागे आहे. याउलट वेदांताचे म्हणणे असे की विश्वाला एकत्व देणारी शाश्वत सत्ता ब्रह्म व आत्मा ही आहे असा निर्णय स्वानुभवपूर्वक वेदोपनिषदात शद्धबद्ध झालेला आहे. त्यापेक्षा अधिक वा वेगळे काही आम्हाला सांगणे नाही अशी स्वत: आचार्यांची भूमिका आहे. निर्णय झालाच असेल तर वेदांतशास्त्राचा मोठा विस्तार करण्याची गरज काय? गरज अशासाठी की, सर्व खल्विदं ब्रह्म’, तत्त्वमसि, ‘अयमात्मा ब्रह्म’ इत्यादि श्रुतीवचनांचा अपेक्षित बोध आम्हाला होत नाही. आमच्या जाणीवेत बाह्य जगत् व मानसिक स्थित्यंतरे यांचाच प्रवाह वाहत असतो. हे वास्तव वेदांत नाकारत नाही. असे का होते ते सांगून ब्रह्माभिमुख होण्याचा मार्ग बुद्धीला खुला करून देणे एवढेच वेदांतदर्शनाचे काम आहे. ही बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाणारी विवेकयात्रा आहे.

बहुतेक वेदांतग्रंथ ब्रह्मविचारापासून आरंभ करतात. विषयाच्या सुलभीकरणासाठी आपण नित्यपरिचित जगापासून क्रमाने पुढे जाऊ. सुव्यवस्थित नैसर्गिक जगत् अस्तित्वात आहे याला तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत सर्वत्र मान्यता आहे. जी काही मतभिन्नता आहे ती जगताच्या स्वरूपाबद्दल आहे. तत्त्वत: सर्वमान्य असलेली दुसरी गोष्ट म्हणजे जगत् म्हणून जे काही जे आपण समजून चालतो ते शून्यातून निर्माण झालेले नाही. अरबी कथेतील अल्लाउद्दीनाने त्याचा जादूचा दिवा घासून ‘खुल जा सिम् सिम्’ म्हणताच रत्नभांडाराची गुहा उघडावी तशी जगताची चमत्कारातून निर्मिती झालेली नाही. दुसरे असे की जगताचा लय, अस्त मान्य केला तरी शेवटी शून्य राहील असे नाही. ते तर्कातही बसत नाही. शून्य उरले आहे असे सांगणार कोण, जाणणार कोण? जाणणारा असला तर शून्य उरले आहे हे म्हणणे बाद होते. तात्पर्य,जगताचे अस्तित्व हे प्रारंभी व अंती असलेल्या दोन शून्यांमधील अस्तित्व नव्हे. अभावातून काहीही निर्माण होत नाही. शून्य ही संकल्पना व्यवहारात व गणितात उपयुक्त आहे तसा येथे उपयोग नाही.

जगताची सर्वात सोपी व्याख्या ‘गच्छति इति जगत्’ अशी आहे. प्रतिक्षण बदलून ते पुढे जाते पण जगत् म्हणून कायम राहते. जन्म मृत्यूच्या मर्यादा असणारा जगतातील हर एक जीव,, स्वतः शरीर व मनाने अस्थिर असला तरी स्थिर आश्रयाच्या शोधात असतो. हे आश्रयस्थान जगातच असते. ही नैसर्गिक प्रवृत्ति आहे. ती जीवांच्या व्यवहारात अनादिकाळापासून चालत आलेली आहे. एखादी पर्वताची रांग, मोठी नदी, समुद्र यांच्या आसपास मानवासह सर्व प्राणी निवास करतात. जीवनाची सुरक्षितता व वंशवृद्धी या नैसर्गिक प्रेरणांच्या आधारे चालणारा हा जीवसृष्टीचा व्यवहार आहे. येथपर्यंत अध्यात्माचा काही संबंध नाही. मनुष्याची प्रबळ जिज्ञासा येथे थांबत नाही. विश्वातील विराट दृश्ये पाहून हे सर्व कोठून आले, कसे निर्माण झाले, निर्माण होण्यापूर्वी काय होते असे प्रश्न मनुष्याच्या मनात उद्भवतात. निसर्गात जे काही घडत राहते त्यामागील नियम कोणता असेही कुतुहल त्याला वाटते. ही जिज्ञासू बुद्धी निसर्गाने मनुष्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. विज्ञान व तत्त्वज्ञान ही त्या जिज्ञासेची अपत्ये आहेत. ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वाढून मोठी झाली. पैकी विज्ञान हे धाकटे अपत्य, तत्त्वज्ञानापेक्षा वयाने खूप लहान पण फार पराक्रमी म्हणून पुढे आले.

परिवर्तन वास्तविक असले तरी परावलंबी व सापेक्ष आहे. स्थिर असे काही अस्तित्वात नसेल तर परिवर्तन स्पष्ट करता येणार नाही. त्या स्थिर आधाराचा प्रत्येक वेळी संदर्भ आपण देत नाही व तशी व्यावहारिक जीवनात गरजही नसते, पण तो गृहीत असतो. आपल्या स्वतःच्या अस्तित्वासह संपूर्ण विश्व हे गतिमान असेल तर त्याला आधार कशाचा? याचे उत्तर परिवर्तनशील प्राकृतिक सृष्टीत शोधता येणार नाही, कारण तिचाच शाश्वत आधार आपण शोधत आहोत. दुसरे असे की विश्व हे एक आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा एकत्व म्हणजे अनेकांची बेरीज असा अर्थ नसतो. तेव्हा विश्वाला एकत्व देणारे बेरजेहून वेगळे असे स्थिरतत्त्व असणे आवश्यक आहे. ते नसेल तर विश्वाच्या अस्तित्वाला विस्कळीतपणा येईल. वेदांताचे सांगणे असे की स्वत: असे शाश्वत राहून अस्थिराला आश्रय देणारे सत्य आहे. यासाठी, ब्रह्म, आत्मा, सत् असे शद्ध विषयसंदर्भानुसार उपनिषदात आलेले आहेत.

ब्रह्म सकल जगताचा मूलाधार आहे. ते एका भौतिक वस्तूचा दुसऱ्या वस्तुला आधार असतो तशा रुढार्थाने म्हटलेले नाही. तसे म्हटले तर ब्रह्म व जगत् असे द्विभाजन होऊन आपली विश्वाच्या एकत्वाची जाणीव संपुष्टात येईल. ती तर खरी आहे. तेव्हा जगत् ब्रह्म यांच्यातील संबंध सांगणे हा वेदांतदर्शनातील मुख्य विषय पुढे येतो. अडचण अशी की या विषयाचा व इतर काही विषयांचा उहापोह करून काढलेले सिद्धांत बुद्धीला सहजासहजी पटत नाहीत. याचे कारण बुद्धीचे विचार करण्याचे काही साचे पक्के झालेले असतात. पुढे आलेला विषय अशा साचात असावा अशी बुद्धीची अपेक्षा असते. या विचारपद्धतीत अनेक प्रकारचे संबंध विणलेले असतात. जसे, आधी, नंतर हा कालसंबंध, लांब, जवळ, सर्वत्र हा अवकाश संबंध, स्थिर, अस्थिर हा गतिसंबंध, कार्यकारण संबंध, बुद्धी त्यांच्याविना विचार करू शकत नाही. ब्रह्माचा जगताशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते समजणे अवघड होते. या अडचणी दूर करण्यासाठी नित्यपरिचित विषयांचे दृष्टांत आधाराला घेऊन बुद्धीला तिच्या चौकटीकडून ब्रह्ममार्गे वळवावे लागते. आचार्यांच्या भाष्यवाङ्मयात असा प्रयत्न सर्वत्र दिसतो. दृष्टांताच्या मूळ उपयोगाची मर्यादा लक्षात घ्यावी लागते. मूळ विषयाची त्याचे आत्यंतिक साम्य नसते. दृष्टांताला प्राबल्य देण्यामुळ सिद्धांतहानी होणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

पलायनवादी नाही

वेदांतमते विज्ञानाचे विषय दृष्टविषय असतात. त्यांचा अभ्यास वैज्ञानिक तटस्थपणे करतो. वेदांत दर्शनात होणारा जगताचा विचार हा मुख्यत्वे मनुष्य व जगत् यांच्यातील संबंधांचा विचार आहे. याचे काण मानवी अस्तित्वाची व व्यक्तीमत्वाची घडण या संबंधांतून झालेली असते. जगत् व जीव हे त्यांच्या ठिकाणी अस्तित्वात आहेतच. त्यांच्यापलीकडील शाश्वत ब्रह्मावर त्यांची कशी भिस्त आहे ते वेदांतदर्शनात दाखविले आहे. त्यासाठी आधी जगताचा विचार करून ब्रह्माकडे व नंतर ब्रह्मसत्तेकडून जगताकडे असे दोन्ही मार्ग योजिले आहेत.

ते पाहण्यापूर्वी पुनरुक्तीचा दोष पत्करून एक गोष्ट सांगितली पाहिजे. जगताकडून ब्रह्माकडे जाणे हा पलायनवाद नाही. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ या वचनातील ‘जगन्मिथ्या’ एवढेच कलम काही प्रमाणात पारंपरिक विचारात केंद्रस्थानी आले. त्यामुळे जगताबद्दल उदासीन व उत्साहविहीन असे हे तत्त्वज्ञान आहे असा आक्षेप वारंवार घेतला जातो. वस्तुत: ज्या उपनिषदांवर भाष्य करणारे हे दर्शन आहे. त्यांच्यातील वचने, कथा, वादविवाद, इत्यादी मानवी जीवनाला उत्साहित ठेवून प्रयत्नशील करण्यासाठी आहेत. सर्व क्षमता कायम ठेवून शंभर वर्षे जगण्याची इच्छा ठेवावी असे प्रसिद्ध वचन, जिजिविषेत् शतं समाः’ ईशावास्योपनिषदात आहे. कशासाठी? आमचे आयुष्य, ज्ञान व आनंद यांना मर्यादा असल्यातरी ज्या मूळ स्रोतातून हे झिरपत आलेले आहेत त्या मूळ ब्रह्मसत्तेकडे जाण्यासाठी जीवनेच्छा आहे. जगत् हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून त्यासाठी समजावून घ्यायचे आहे.

नामरूपात्मक जगत्:

वेदांतात जगताला नामरूपात्मक म्हटले आहे हे सर्वज्ञात आहे. रूप ही मूळ वस्तुला प्राप्त झालेली परिवर्तनशील स्थिती मूळ वस्तू असावी लागते याची नित्याची उदाहरणे सुवर्णाचे अलंकार, मातीच्या वस्तु ही आहेत. रूपनिर्मितीसाठी काही साधन, शक्ती आवश्यक असते. मूळ वस्तूची विविध रूपे, व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी नावे योजिली जातात. हा भाषेतील नामवर्ग आहे. मूळ वस्तूला प्राप्त झालेल्या रूपाला अस्तित्व (सत्ता) असते व त्याचा व्यावहारिक उपयोगही असतो. पण हे अस्तित्व परावलंबी म्हणजे मूळ वस्तूवर आधारलेले असते. रूपाच्या परावलंबित्वाच्या तीन अवस्था असतात, निर्मिती, स्थिती म्हणजे कालमर्यादिता व भंग म्हणजे रूपाचा स्वतःच्या मूळ स्वरूपात होणारा लय. दृष्टांतातील सुवर्ण, मृत्तिका व त्यांची रूपे ही जगताच्या रचनेतील अंतर्भाग आहेत. परंतु समग्र जगत् नामरूपात्मक म्हटले तर त्यातील रूपसंख्येला, विस्ताराला व विविधतेला सीमा राहणार नाही. असंख्य, कालमर्यादित रूपरचनांचा प्रवाह असे जगत् आपण अनुभवतो. ते केवळ भौतिक नाही. आयुष्यभर निसर्गाने आखून दिलेल्या जीवनक्रमात कृतीशील राहून सुखदुःख अनुभवणारे अगणित जीव जगताचाच हिस्सा.
आहेत. जगत् हे या सर्वार्थाने नामरूपात्मक आहे.

जन्म, स्थिती व लय हे जगताचे त्रिधा परिवर्तन पराधीन म्हणजे ब्रह्माधीन आहे. जगताचा निर्वाह ब्रह्मामुळे होतो.

नामरूपयो: निर्वहिता, ते यदन्तरा तत् ब्रह्म । (छां.उप. भाष्य ८.१४.१) तेच ब्रह्म प्रत्येक जीवाच्या ज्ञान, कर्म व भावनांच्या आधारस्थानी असलेले आत्मसत्य आहे. स्वत:पासून वेगळी वाटणारी जगताची बाह्यता ही अंतिम नाही. एकाच ब्रह्मसत्तेचे ते दोन नामरूपात्मक आविष्कार आहेत. या द्वैतात सारा जीवनव्यवहार चालत राहणार आहे. वेदांतात द्वैताचा धिक्कार आहे हा रूढ झालेला गैरसमज आहे. अद्वैत ब्रह्माकडे नेणारा मार्ग द्वैताच्या पसाऱ्यातच शोधायचा असतो. अल्पकालीन आनंद, सौंदर्यानुभूती, विनाशाच्या व मृत्युच्या भयापासून अचानक जाणवणारी मुक्ती इत्यादी ब्रह्माची दिशा सूचित करणाऱ्या खुणा आहेत. उपनिषदांनी विषयानंदाला ब्रह्मनंदाचा सहोदर असे म्हटले आहे. संगीत, चित्रकला, काव्य इत्यादी ललित कलांची समीक्षा करून त्यांचे अंतिम उद्दीष्ट सांगणारे अनेक सिद्धांत आहेत त्यापैकी एक वेदांततत्त्वज्ञानाला जवळचा आहे. कलास्वादाने मिळणाऱ्या आनंदाने काही क्षण जगताचा विसर पडतो तेव्हा त्यात मूळअद्वैत ब्रह्म सत्याचा अल्पकालीन अनुभव असतो नामरूपात्मक जगत् हे ब्रह्मरूप आहे याचा अर्थ रूपविविधता ब्रह्मामुळे आहे. ब्रह्म त्यांच्यामुळे नाही पाण्यावरील तरंग, लहरी, बुडबुडे इ. पाण्यामुळे आहेत. पाण्याविना त्यांचे अस्तित्व नाही.

अतो नामरूपे सर्वावस्थे ब्रह्मणा एव आत्मवती,
न ब्रह्म तदात्मकम् । ते तत्प्रत्याख्याने न स्तः
एवेति तदात्मके उच्यते । (तैत्ति.उप.भाष्य २.६.१)

मूळ वस्तूपासून वेगळी रूपरचना होण्यासाठी काहीतरी सक्षम कारण असणे क्रमप्राप्त आहे. ते कारण ज्ञात असेल किंवा नसेल. वस्तुला प्राप्त झालेले रूप हे नैसर्गिक प्रक्रियेमुळे घडलेले असू शकते किंवा प्रत्यक्षात काही न घडता केवळ जाणवणारे म्हणजे भ्रमरूप असू शकते. शिंपल्यातील कीटक स्वत:च्या शरीरस्रावातून मौक्तिक रचना करतो ती त्याला प्राप्त असलेल्या नैसर्गिक क्षमतेमुळे होय. पक्षी घरट्यांची रचना याच प्रकारच्या क्षमतेमुळे करतात. मनुष्य स्वप्रयत्नाने अशी रचनाकौशल्ये मिळवू शकतो. नैसर्गिक शक्तींमुळे जसे धरणीकंप, अतिवृष्टी, वादळे यामुळे सृष्टीची रूपे बदलत राहतात हे आपण पाहत असतो त्याचा सखोल अभ्यास करून त्या प्रक्रियाचा तपशील सांगणाऱ्या भूगर्भविज्ञानासारख्या अनेक विज्ञानशाखा विकसित झाल्या आहेत. हा सर्व अभ्यास प्राकृतिक सृष्टीच्या आत राहून चाललेला असतो. प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना हा त्याचा विषय असतो प्रत्यक्षात न घडणारी पण केवळ जाणवणारी नामरूपनिर्मिती हा वेगळा प्रकार आहे. मृगजळ हे त्याचे उदाहरण आहे. याप्रमाणे, रूपनिर्मिती ही वास्तविक अथवा भासमान या दोनपैकी एका प्रकारची असू शकते. आता प्रश्न असा येतो की संपूर्ण जगत् हेच नामरूपात्मक असेल व ते निर्माण झाले असेल तर ती निर्मिती, कोणत्या प्रकारची समजावी? जगत् निर्मितीची उपपत्ती कोणती असू शकेल?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी एका शंकेचे समाधान करावे लागेल. ती अशी की जगताच्या निर्मितीचा प्रश्न हा निरर्थक व जीवनासाठी अनावश्यक आहे. येथे जगत् म्हणजे संपूर्ण विश्व असा अर्थ आहे. विश्व हे अनादि काळापासून अस्तित्वात आहे व पुढे अनंतकाळ राहणार आहे. त्याच्या उत्पत्तीचा प्रश्न येतोच कोठे? ही शंका जीवनव्यवहारात बंदिस्त झालेल्या बुद्धीच्या मर्यादेतून आलेली आहे. ही बुद्धीमर्यादा आज केवळ वेदांताबद्दल प्रश्न उपस्थित करते असे नसून प्रगत विज्ञानाबद्दलही प्रश्न करू शकते. कुठले आले आहे ब्रह्म असा प्रश्न करणारी बुद्धी कुठली आली आईन्स्टाईनची सापेक्षता (Relativity)? कुठले आले कृष्णविवर (Black hole) असे विचारू शकते. पण विज्ञानाची छाप एवढी की तसे विचारण्याचे धैर्य मनुष्य दाखवित नाही बुद्धीची व्यवहारबद्धता बाजूला सारली की, विश्वनिर्मितीचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. फार पूर्वीपासून तो तत्त्वज्ञानात विचारला गेला. ऋग्वेदातील प्रसिद्ध नासदीय सूक्तात (ऋग्वेद-१०.१२९) हे विश्व आले कोठून अशी मानवीय इतिहासातील पहिली पृच्छा आहे. वैज्ञानिक व तत्त्ववेत्ते व विशेषत: पाश्चिमात्त्य तत्तवेत्ते यानी या सूक्ताचा पुष्कळ अभ्यास केलेला आहे. या शतकातील भौतिक विज्ञानात विश्वनिर्मितीच्या प्रश्नाचा सैद्धांतिक पातळीवरून विचार केला आहे त्याचा काही भाग आपण पूर्वी पाहिला डार्विनने सजीवांच्या निर्मितीचा प्रश्न व जीवसृष्टीच्या विकासाचा प्रश्न विचारार्थ घेऊन उत्क्रांतीवाद माडला तात्पर्य, जगनिर्मितीचा प्रश्न हा निरर्थक नाही हे वेदांताप्रमाणे विज्ञानही आज आम्हाला सांगत आहे. वेदांतदर्शनाचा जगदुत्पत्तीचा सिद्धांत विज्ञानाहून निराळा आहे.

जगत्निर्मितीचा अर्थ
प्राकृतिक सृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल जसा सांख्य तत्त्वज्ञानात जसा विस्ताराने व्यवस्थित सिद्धांत मांडला तसा वेदांतदर्शनात नाही. सृष्टीनिर्मितीची वर्णने अधुनमधून उपनिषदात येत असली तरी तो उपनिषदाचा मुख्य विषय नाही असे वेदांतदर्शन मानते

सर्व प्रयत्न परिवर्तनशील नामरूपात्मक जगताला एकत्रित धरून ठेवणाऱ्या शाश्वत तत्त्वाच्या शोधाचा आहे. ती शाश्वत सत्ता म्हणजे ब्रह्म होय. मनुष्याच्या स्थानी ब्रह्म हे बुद्धीच्या संपर्कात येते तेव्हा ती आत्मसत्ता म्हटली जाते. ब्रह्म व आत्मा यात शाब्दीक वेगळेपणा असला तरी तत्त्वत: तसा वेगळेपणा नाही. ब्रह्म ही अंतिम सत्ता असेल तर त्या सत्तेतून नामरूपात्मक जगताची उत्पत्ती सांगता आली पाहिजे कारण जगत् हे सशशृंग, वंध्यापुत्र जसे असत् म्हणजे अस्तित्वशून्य नाही. असत् हे अर्थशून्य कसे असते याचे एका गंमतशीर वर्णनाचे उदाहरण आचार्यांनी दिले आहे.

मृगतृष्णाम्भसि स्नातःखपुष्पकृतशेखरः ।
एष वंध्यासुतो याति शशश्रृंगधनुर्धरः ।।

(तैत्ति.उप. भाष्य २.१) क्रमशः

-प्रा. वसंत पापळकर

(‘संतकृपा’ या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..