नवीन लेखन...

वानप्रस्थाश्रम

मार्केटला जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो, खाली रस्त्यावर आलो आणि रिक्षाही पकडली. सहजच माझं लक्ष रिक्षा चालकाकडे गेलं. आणि मी चपापलोच!
आमच्याच कॉलनीत राहणारे परब रिक्षा चालवत होते!
“साहेब, नमस्कार,” परब आरशातून माझ्याकडे पहात उद्गारले.
“नमस्कार, परब हे काय नवीन? ” मी विचारलं.
“हो, हल्लीच हा एक नवीन उद्योग सुरु केला आहे.”
“चांगलं आहे,” परबांच्या आवाजातल्या मजबूरीच्या सूराला दूर सारण्यासाठी मी म्हणालो.
रिक्षातून उतरत असताना परबांनी त्यांचं रिक्षा पुराण मला सविस्तर ऐकवलं. आपण रिक्षा का चालवतो याचं परबांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून मी हबकूनच गेलो.

“तुम्हाला माहितच आहे साहेब मी रिटायर होऊन घरीच असतो. सकाळच्या वेळी आमच्या घरात नुसती धांदल उडालेली असते. मुलाला आणि सुनेला कामावर जायचं असतं, नातवडांना शाळेत जायचं असतं, बायको किचनमध्ये कामात गर्क असते. या सगळ्या गडबडीत मीच एकटा घरात निरुद्योगी असतो. त्यात आमची वनरुम किचन. सगळे घराबाहेर पडण्याच्या धांदलीत असताना मी तिथे लोळत पडणं म्हणजे इतरांना अडचण. थोडक्यात सकाळच्या वेळी आपल्यामुळे घरच्यांना अडचण भासते हे माझ्या ध्यानात आलं तेव्हाच मी काहीतरी उद्योग करण्याचं ठरवलं.

परबांचं रिक्षापुराण रंगात आलं होतं. मीही कान देऊन ऐकू लागलो. परब आपली कथा विस्तारने पुढे सांगू लागले.

“सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडण्यासाठी मी सरळ रिक्षा चालविण्याचं नक्की केलं. आता घरातले उठण्याआधी सकाळी सहालाच मी घराबाहेर पडतो. सकाळी सहा ते दुपारी अकराबारापर्यंत रिक्षा चालवतो. चार पैसे हातात येतात. दुपारी घरी जाऊन जेवतो आणि ताणून देतो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे तिथून दूर राहिलं की आपल्याही डोक्याला ताप नसतो आणि इतरांच्याही.”

शेवटच्या वाक्याला खदखदून हसत परब रिक्षा घेऊन निघून गेले. मी अवाक् होऊन परबांचं तत्वज्ञान जिरवू लागलो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही ! साध्या भोळ्या परबांनी सहजीवनाचं सार अगदी मार्मिक शब्दात मांडलं होतं. आयुष्यात अनेक वाद निर्माण होतात ते आपल्या अनाठायी वास्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आपल्याला सवयच जडलेली असते. अनेकांना फुकटचे सल्ले देण्यात आपण बाकबगार असतो. पण ते सल्ले दुसऱ्यांना हवे आहेत का, आपण सर्व विषयांवर मत व्यक्त करणं गरजेचं आहे का आणि मुख्य म्हणजे आपण सर्व ठिकाणी उपस्थित राहणंही आवश्यक आहे का याचा विचार करणं खरोखरच गरजेचं असतं. दुसऱ्यांच्या कामात आपल्यामुळे व्यत्यय येत असेल, दुसऱ्यांना आपली अडचण भासत असेल तर तिथून शहाणपणानं वेळीच दूर जाणं उत्तम हे परबांचं तत्वज्ञान मला मनोमन पटलं.

सामाजिक कार्यात वावरतानाही अशी नको असलेली अनेक मंडळी आपल्याला भेटतात. ही मंडळी एखाद्या मिटिंगला अथवा सभेला आली की डोकेदुखी आली असेच भाव अनेकांच्या चेहऱ्यावर उमटतात. स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या उभ्या करुन इतरांना हैराण करणे हा मंडळींचा स्थायिभाव. एकदा एका संस्थेत एका महिलेने सर्वांनाच असं भंडावून सोडलं होतं. दरवेळी संस्थेच्या मिटिंगला हजर राहून नाना प्रकारचे प्रश्न विचारुन ही महिला सर्वांना गोत्यात आणण्याचा उपद्व्याप करी. सर्व काही मलाच समजतं आणि तुम्ही सर्व मुर्ख आहात अशा पवित्र्यानेच ही महिला सभेत वावरे.

गंमत म्हणजे त्या सभेचे अध्यक्ष त्या महिलेचा सर्व उच्छाद शांतपणे सहन करीत. अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्या महिलेला कधीच झापण्याचा प्रयत्न केला नाही की दरडावण्याचा. शेवटी भांडून भांडून स्वतःच ती महिला रागाने सभात्याग करुन निघून जाई. एकदा मी त्या महिलेचा त्रास तुम्ही सहन तरी कसा करता असा प्रश्न त्या अध्यक्षांना केला. त्या प्रश्नाला अध्यक्षांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. शांत चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता अध्यक्ष उद्गारले-

‘मी मनातल्या मनात त्या बाईच्या नवऱ्याचं स्मरण करतो आणि शांत राहतो.”

“नवऱ्याचं स्मरण? ते कशासाठी? ” मी आश्चर्याने अध्यक्षांना विचारलं.

‘मी मनात विचार करतो, तो बिचारा नवरा त्या बाईला आयुष्यभर सहन करतो आहे, तर आपण तासदोनतास तिचा धुडगुस सहन करायला काय हरकत आहे? ”

अध्यक्षांच्या त्या उत्तराने मला अनेक गोष्टींचा खुलासा झाला. स्वतःच्या उपस्थितीने इतरांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या मंडळींविषयी इतरांच्या मनात कशाप्रकारचे भाव उमटतात याचा प्रत्यय अध्यक्षमहोदयांनी आपल्या उत्तरातून घडविला होता. आपण कुठे नको आहोत ते समजलं नाही की लोक आपली काय किंमत करतात याचं सुंदर विश्लेषण अध्यक्षांनी केलं होतं.

प्राचीन काळी वानप्रस्थाश्रम असे. इहकर्तव्य बजावून मंडळी वानप्रस्थाला जात म्हणजेच संसारातून निवृत्त होत. सर्व कारभार नव्या पिढीच्या हाती सोपवून निवृत्त होणं या संकल्पनेचा आजही गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत माणसं ठणठणीत असतात आणि अनेक कामांत सक्रीयाही राहू शकतात.

गंमत म्हणजे सर्व जगात आपल्या देशातच युवकांची संख्याही टक्केवारीने सर्वाधिक आहे.

दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशात युवा पिढीची संख्या अधिक आहे. म्हणजेच आयुष्यमान वाढल्याने आधीच्या पिढीची मंडळीही सुखनैव नांदत आहेत आणि कारभार हाती घेण्यासाठी युवा पिढीही मोठया संख्येने पुढे सरसावते आहे.

या विचित्र सामाजिक समस्येवर उपाय म्हणजे आधीच्या पिढीने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारुन पुढच्या पिढीच्या हाती कारभार सोपवणं. प्रत्यक्ष वानप्रस्थात जाणं कालबाह्य झालं असलं तरी संसारात राहूनच निवृत्तीची पथ्ये पाळणं. वयस्कांच्या तब्येतीच्या दृष्टीनेही हे बाजूला होणं लाभदायक असतं. आजकाल बहुतेक आजार उद्भवतात ते मानसिक ताणांमुळे. रोगजंतूंमुळे उद्भवणारे बहुतेक आजार आता अॅन्टीबायोटिक्स औषधांमुळे कह्यात आले आहेत. मात्र मनातल्या किंतूंमुळे उद्भवणाऱ्या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. दुसऱ्याने आपला सल्ला ऐकला नाही की आपलं ब्लडप्रेशर वाढतं आणि त्रास आपल्यालाच होतो. थोडक्यात परबांच्या तत्वज्ञानानुसार आपण कधी आणि कुठे इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही. इतरांच्या डोक्याला होणाऱ्या तापाचा विषय बाजूला ठेवला तरी आपल्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून परबांचं तत्वज्ञान वागणूकीत रुजवणं केव्हाही उत्तम.

-सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..