नवीन लेखन...

वॉशिंग मशीन एक लावणे

“आज धुणारायस का रे कपडे” ?
बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. मी अनेकदा तिला म्हट्लं “अगं वॉशिंग मशीन लावतोयस का ? असं विचार ना”. त्यावर ती लगेच “का ! त्यामुळे काय फरक पडतोय ?” असा प्रतिप्रश्न करते. “आणि कोण आहे घरात मी तुला काय विचारतेय ते ऐकायला ?”. युक्तीवाद सुरू झाले ना की माझ्या बायकोच्या जिभेवर सरस्वती देवी मोरावर बसून अक्षरशः थुई थुई नाचायला लागते , आणि नाचत नाचत (जिभेवर ) ती मूळ मुद्द्यापासून मला इतकी दूर नेते की मध्येच , कुठून सुरू झालं होतं बरं ! असं दोन मिनिटं मला आठवत बसावं लागतं. आणि ती मात्र मला तसाच विचारात सोडून जग जिंकल्याच्या आविर्भावात किचन मध्ये किंवा व्हॉट्सअँप मध्ये निघून जाते. असो , तर कुठून सुरू झालं ? …….. असं होतं. मूळ मुद्दा काय होता ? तर कपडे धुण्याचा , नाही नाही ! मशीन लावण्याचा. घरातलं हे एक काम मी माझ्याकडे घेतलय. तसं बघायला गेलं तर सध्याचं हे तिसरं वॉशिंग मशीन आमच्या घरातलं. अहंहं ! गैरसमज नको ! माझ्यामुळे नाही बिघडली अहो आधीची मशिन्स. पण ही म्हणते “तुच नीट वापरत नाही . आधी मी वापरत होते तेव्हा अगदी सुतासारखं चालायचं. तू काय करतोस कोण जाणे ( सुरू थुई थुई ). मी आपला उगाच वाद नको म्हणून गप्प राहतो झालं. पण गम्मत अशी असते की , समजा मी गप्प राहिलो तर तिला वाटतं की आपण अगदी चपखल युक्तीवाद केलाय , आणि त्यामुळे माझी बोलती बंद झालीय. या गैरसमजातून ती आणखी बोलत जाते, जाते ,जाते ,जाते , जातं रहाते. बघा पुन्हा एकदा आपण भरकटतोय. काय करणार गुण नाही पण वाण लागलाय.

तर सांगत काय होतो वॉशिंग मशीन लावणे हा एक समारंभ असतो आमच्याकडे. आता आम्हाला सेमि ऑटो च आवडतं आणि फुल्ली ऑटो पेक्षा तेच चांगलं असतं (इति बायको).

सर्वप्रथम मी दोन बेडरूम मधल्या एका बेडरूममध्ये विसावलेलं मशीन पुढे ओढून घेतो. हळुवारपणे पाइप जोडून नळाला लावतो. आउटलेट पाइपही अगदी नाजूकपणे जोडतो. आणि , मशीन टबमध्ये पाणी सोडतो. सगळं कसं शिस्तवार !. बायको येता जाता , “नॅपकिन घेतलेस का रे ? बाथरूम मध्ये ओले कपडे आहेत ते विसरशील , टब धुवून घेतलेस का ?” असे सामान्यतः कामवाल्या बाईला विचारले जाणारे प्रश्न मला चटाचट विचारत असते. मी सगळ्यांना एकत्रित “हो !” म्हणतो. पण तो ‘ हो ‘ , तिने ऐकलेला नसतो , त्यामुळे ती पुन्हा तेच सगळं रिपीट करते. त्यावर वैतागून मी “अगं घेतले” ! असं म्हटलं की प्रश्न येतो , “मग मघाशी विचारलं तेव्हा नुसतं हो म्हणायला काय झालं होतं ?”. त्यावर नेटाने मी म्हणतो , ” अगं म्हट्लं होतं हो !”

“मला नाही ऐकू आलं ते ?” म्हणजे ही सुद्धा माझीच चूक. तिचं सुरूच असतं , (थुई थुई) “विचारलं की हो नाही म्हणायला काय होतं कोण जाणे”. तिकडे दुर्लक्ष करून मी बोहारणीसारखी कपड्यांची वर्गवारी सुरू करतो. म्हणजे बाहेरचे कपडे असतील त्यांचा एक गट , टॉवेल नॅपकिन्स चा एक गट , घरातल्या वरच्या कपड्यांचा म्हणजे पैरण , कुर्ता , इ. चा एक गट आणि सलवार, अर्धी , तीन चतुर्थांश विजार इ.इ.इ.‌म्हणजेच कमरेखालच्या कपड्यांचा एक गट असे गटवार कपडे लावून घेतो. मध्येच बायको येऊन एखादा कपडा नेमका चुकीच्याच गटात टाकते. त्यावर शहाण्या पती सारखा काहीही न बोलता उचलून मी तो नेमक्या गटात टाकतो. सगळी तयारी झाल्यावर मी एक ऐटीत कटाक्ष तिच्याकडे टाकतो. ती मात्र कमरेवर हात ठेवून सगळ्या कपड्यांकडे पहात म्हणते , “आता काय देणार या कपड्यांवर सांग ?” ” काय एकेक प्रकार करत असतोस तू” ?. “शेवटी सगळे मशीनमध्ये एकत्रच जाणार ना ?”. याचही उत्तर तिला माहीत असतं तरी ती बोलणं सोडत नाही.

भिंतीपासून मशीन नेमक्या अंतरावरच मी ठेवलेलं असतं. डिटर्जंट योग्य प्रमाणात टाकून मी विमान सुरू केल्यासारखं मशीन सुरू करतो आणि अर्धा मिनिट नुसतं फिरवून मग सर्वप्रथम बाहेरचे कपडे टाकतो. आता धुवून झालेले कपडे एकमेकात इतके पिरगळून बसलेले असतात की ‘आम्ही नाही येणार जा बाहेर एकमेकांना सोडून ‘ असा भाव असतो त्यांच्या चेहऱ्यावर. माझ्या जागी बायको असेल तर त्यांचे हे लाड अजिबात चालत नाहीत. ती सगळ्यांना एकदम उचलून टबात टाकते. बसा तसेच धरून एकमेकांना. मी मात्र प्रत्येकाला प्रेमाने एकमेकांपासून हळुवारपणे सोडवत ड्रायर मध्ये टाकतो. ही उभीच असेल बाजूला तर “हे बघ असा प्रत्येक कपडा वेगळा करून टाकायचा” हा शहाणपणा गरज नसताना तिला सांगून चार शब्द अंगावर ओढवून घेतो. माझ्या या व्यवस्थित कामाला चेहऱ्यावर आणि मनातून जराही किंमत न देता निर्विकारपणे ती म्हणते “वेळच वेळ असला की सुचतात हे धंदे. मला नसतो ही कौतुकं करत बसायला वेळ. तुझं चालुदे”. मी पण कशाला जातो शाईन मारायला कोण जाणे. पण जित्याची खोड…

तर सुकल्या कपड्यांचा पहिला घाणा झाला की एकेक करून टब मध्ये टाकतानाही प्रथम टॉवेल ,त्यावर नॅपकिन , रुमाल इतर लहान कपडे आणि सगळ्यात वर बाहेरचे कपडे असा क्रम असतो. तर अर्धी विजार , तीन चतुर्थांश , लांब पायजमे , परकर आणि त्यावर एकदम आतले इ.इ.इ.

आता यापुढचं काम मात्र बायकोचं असतं , कपडे वाळत घालण्याचं. मी दोऱ्या ओढून खाली आणून ठेवलेल्या असतात , स्टँड सज्ज करून ठेवलेला असतो. व्हॉट्सअँप मधूनच ही विचारते (की ओरडते) “झाला का रे पहिला घाणा?” जशी काही भजीच तळतोय. पुन्हा तेच घडतं. मी हो म्हणतो. तिला ऐकू येत नाही आणि पुन्हा ओरडते. मग पुढे तेच (थुई थुई)सुरू होतं. असो, मी कपडे वाळत घालुच शकत नाही असं काही नाही , पण मला ते नाहीच जमत असा हीचा ठाम समज आहे. अर्थात कुठलही काम मला चांगलं जमत असं हिला वाटतच नाही म्हणा. तर अशा तऱ्हेने कपडे धुवून दोरीवर वाळत पडतात. पण इथे माझं मशीन मिशन संपंत नाही बरं !. पाण्याच्या फोर्स ने मशीन स्वच्छ धुवून आणि आउटलेट पाइपमधलं सगळं पाणी काढून मशीन जागेवर सरकावतो आणि अशा प्रकारे अखेर वॉशिंग मशीन लावण्याचा समारंभ त्या दिवसापुरता तरी संपतो.

प्रासादिक म्हणे

– प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..