नवीन लेखन...

वंदे मातरम, मुसलमान आणि आपण सारे देशभक्त नागरिक..!!

‘वंदे मातरम’ने सध्या देशात वादळ उठलं आहे. एकेकाळी स्वातंत्र्याचा मुलमंत्र असलेला हा शब्द आज वादाचं कारण झालाय. ‘वंदे मातरम’चा जयघोष करतच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सर्व जाती-धर्माचे (मुसलमानहा) क्रांतिकारक, स्वातंत्र्य योद्धे हसत हसत सुळावर चढले, तेच ‘वंदे मातरम’ म्हणण्यासाठी आज कायदे करायची वेळ आली आहे, हे काही चांगल्याचं लंक्षण नव्हे..एकेकाळी आणि आजही ज्याचा जयघोष ऐकून नसानसांत जोश भरला जातो, ते ‘वंदे मातरम’ द्वेषाचं कारणं होणं मनाला क्लेश देणारं आहे.. वंदे मातरम म्हणजे मातेसमान असलेल्या भारतमातेला प्रणाम करणं आणि प्रणाम करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. अर्थात हा माझा विचार झाला.

सध्याचं वादळ मुसलमानांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला आहे त्यावरून उठलंय. मुसलमानांनी म्हणजे, जे स्वत:ला मुसलमानांचे पुढारी म्हणवतात असे अबु आझमी आणि ओवेसी अशासारख्यांनी. सामान्य मुसलमानांचे ते सर्वमान्य पुढारी आहेत असं मी मानत नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं सर्वच मुसलमानांना मान्य असेल किंवा त्यांचं म्हणणं हा सर्व मुसलमानांचा आवाज असेल असं मला वाटत नाही. तरीही अशा प्रसंगी देशातील सर्वच मुसलमानांच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं ते कितपत योग्य आहे त्याचा उहापोह मी या लेखातून करणार आहे.

पुढे जाण्यापूर्वी मी माझ्या विचारांची जात ‘उजवी’ आहे, फार तर उजव्यांतला मवाळ म्हणा, हे प्रथम सांगतो, नाही तर मुख्य मुद्दा बाजूला राहून, नको त्या विषयावर चर्चा-आरोप-प्रत्यारोप होतात..ते टाळण्यासाठी मी कोणत्या विचारांचा आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन माझा हा लेख वाचावा ही विनंती.

आता वंदे मातरम आणि मुसलमान यांचा संबंध पाहू. मी लहानपणापासून ज्या शाळेत व नंतर जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेजमधे शिकलो, तिथे माझ्या सहध्यायांमध्ये मुसलमान मुलंही होती. म्हणजे ती मुसलमान होती याची जाणिव आता होते, तेंव्हा ते फक्त नांव वेगळं असणारे मित्रच होते, ते अजुनही मित्रच आहेत.. तेंव्हा ते माझ्यासारखंच मराठी बोलायचे आणि कपडेही चक्क माझ्यासारखेच घालायचे. एकमेकांच्या घरी बिनधास्त येणं-जाणं, खाणं-पिणं असायचं. थोडक्यात ते काही आपल्यापेक्षा वेगळे आहेत, असं चुकून देखील मनात यायचं नाही. शाळेत तर सर्वप्रकारच्या देवांच्या आणि देशाच्याही प्रार्थना आमच्यासोबतच म्हणायचे, गीतेतील ‘ऊध्र्वमूलम्, अधःशाखम्, अश्वत्थम्, प्राहुः,..’ हा श्लोकही आमच्यासोबत पाठ करायचे आणि ‘देवा तुझे किती सुंदर आकाश..” ही कविताही आमच्यासोबत सुरात घोकायचे. त्यांच्या आई-वडिलांनी अशा प्रार्थना-पाठांतरमुळे त्याच्या भावना दुखावल्याची तक्रार शाळेत कधी केलेली मला आठवत नाही.

माझ्या कॉलेजचं ठिकाण जोगेश्वरी आणि कॉलेजचं नांव इस्माईल युसुफ, यावरून कॉलेजमधे मुसलमान मुलांचं बहुसंख्य असणं सहाजिकच होतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. येथे स्वातंत्र्यदिनी वा प्रजासत्ताक दिनाला झेंडा ‘वंदन’ करण्यात त्यांचाच पुढाकार असायचा कारण सीएस किंवा सीआर त्यांच्यापैकीच कुणीतरी असायचं. लक्षात घ्या, तेंव्हा झेडा ‘वंदन’ असायचं, ध्वजारोहण नाही आणि झेंड्याला ‘वंदन’ असा शब्दप्रयोग असुनही कुणाच्या भावना जखमी होऊन विव्हळत वैगेरे नव्हत्या. त्यांचा किंवा आपला किंवा दोघांचाही देव, त्या काळात जागा झाला नव्हता हे त्याचं उत्तर. देव जागृत झाला, की अडचणी निर्माण होतात हे अलिकडे मला पटू लागलंय..त्यामुळे कुठलंही देवस्थान, मग ते मंदीर असो वा दर्गा असो किंवा चर्च असो,जागृत आहे असं म्हटलं, की माझ्या पोटात गोळा येतो.

आपले व त्यांचेही शांत झोपलेले आणि सणांच्या निमित्तानेच जागे होणारे देव पुढे ९०च्य दशकात मात्र निद्रानाश झाल्यासारखे रात्रंदिवस जागे राहू लागले आणि समाजाची घडी विस्कटू लागले. बाबरी मशिद प्रकरणापासून यात त्वरेने बदल घडायला सुरुवात झाली. हिन्दू-मुसलमानातील पूर्वापार तेढ यामुळे वाढली. हिन्दू-मुसलमान दंगे अगदी ब्रिचीश काळापासून देशात होत होते, बाबरीच्या निमित्ताने आणखी एक झाला एवढंच. परंतू पूर्वीच्या दंग्यात आणि बाबरी पतनानंतरचा दंगा यात एक फरक होता. पूर्वीच्या दंग्यात जाणवणाऱ्या उन्मादाला इथून पुढे राजकारणाची साथ मिळाली आणि मग वातावरण गढूळ होतं गेलं ते आतापर्यंत. दोन्ही धर्माच्या जागृत झालेल्या दैवतांच्या दलालांचा सामाजीक जीवनातला हस्तक्षेप वाढायला लागला आणि मग मात्र देशातील सामाजीक वातावरण जास्त दुषित होत गेलं.

इथून पुढे धर्म राजकारणाच्या हातात मिसळून चालू लागला. कधीकधी तप तो राजकारणाला फरफटत घेऊन जाऊ लागला. याचं प्रतिबिंब मुसलमानाच्यात स्पष्ट आणि ठळकपणे दिसतं. आपण मुसलमान आहोत याची जाणीव मुसलमानांना व्हायला लागली आणि ती जाणीव आणखी तीव्र करण्याचं काम, त्यांच्या समाजातील मुल्ला-मौलविनी मोठ्या निष्ठेनं केल. मुल्ला-मौलवींचा पगडा वाढू लागला. त्यामुळे मुस्लीम समाजातील कट्टर पंथीयांना बळ मिळाल आणि त्यांनी संपूर्ण मुसलमान समाजावर कब्जा केला. तो पर्यंत आपल्यालारखाच असणारा-दिसणारा मुसलमान समाज, आता अधिकाधिक धर्मकेंद्रीत होऊ लागला. अरबस्थान या त्यांच्या मुळ भुमीतील त्यांच्या धर्मबांधवांचे अनुकरण करून स्वतःला मुसलमान म्हनवण्यात धन्यता मानू लागला. काल काल पर्यंत माझ्यासारख्याच मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुसलमानांना अचानक त्यांची मातृभाषा उर्दू आणि धर्मभाषा अरबी असल्याची जाणीव होऊ लागली. हल्ली हल्लीपर्यंत आपल्यासारखेच केस-दाढी राखणारा आणि आपल्यासारखेच कपडे घालणारा मुसलमान अगदी लहानपणापासून त्यांच्या अरबी-पारंपारिक वेशात दिसू लागला. स्वतः इतर भारतीयांपासून वेगळ आहोत, हे दाखवण्याचा मुसलमानांचा अट्टाहास तेंव्हापासून दिसू लागला आणि तोच त्यांना इतर भारतीय समाजापासून वेगळं पडण्यास कारणीभूत ठरला. सर्व मुसलमान देशद्रोही नाहीत हे सत्य सर्वांना कळत असुनही वळत नाही ते त्यामुळेच असं मला वाटतं.

धर्माचा आणि ते राबवणाऱ्या मुल्ला-मौलवींचा पगडा मुसलमान समाजावर असल्याने, त्यांच्यात सुधारणांचे वारे फारसे कधी फिराक्लेतच नाहीत. म्हणजे नाहीत अस नाही, परंतु ते प्रयत्न फार दुबळे होते आणि त्या समाजातील ज्यांनी असा प्रयत्न केला, यांच्या विचारांना आणि त्यांनाही रोखण्याचे यशस्वी प्रयत्न त्यांच्याच सामाज्बंधावांकडून केले गेले. मुस्लिम समाजाला मुख्याप्रवाहात आणण्याचा प्रयत्न श्री. हमीद दलवाई यांनी खुप नेटाने केला परंतू दुर्दैवाने त्याच्या ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ला फारसा वाव मिळाला नाही आणि श्री. दलवाईंनाही खुप कमी आयुष्य मिळालं. त्यांनी मुसलमान समाजाच्या आजच्या स्थितीवर अनेक वर्षांपूर्वीच भाष्य करून ठेवला आहे आणि आजही ते तेवढंच खर आहे.

आधुनिक शिक्षणाचा अभाव, त्यामुळे आलेले दारिद्र्य, दारिद्र्यामुळे मिळेल तो नैतिक अनैतिक व्यवसाय करायचा, धर्माच्या अति पगड्यामुळे आधुनिक जगाबरोबर चालावं अस वाटत जरी असलं, तरी तसं करण्यास मुल्ला-मौलवी आणि त्यांच्याच पुढाऱ्यांकडून तसं करण्यास होणारा विरोध, त्यास मिळालेली त्यांच्याच समाजबांधवांची साथ, धर्म चिकित्सेला किंवा धर्माला काळाबरोबर चालण्यासाठी केलेला मज्जाव आणि मग अश्या परिस्थितीत जे व्हायचं तेच झालं आणि ते भारतियांपासून तुटत गेले.

मुसलमानांनी इथे विचार करण्याची गरज आहे. ज्या देशाच्या ज्या भागात आपण राहतो, तेथं कसले कपडे परिधान करावेत, हे त्या भागाचं हवामान ठरवतं, धर्म नाही. त्या त्या भागाची व्यावहारीक भाषा जशी इतर धर्मिय बोलतात, तशीच मुसलमानांचीही असायला हवी. दाढी केस राखायलाही हरकत नाही परंतू त्याचा आग्रह नसावा. बुरखा, चार विवाह, तलाक, स्त्रीयांचं दुय्यमत्व हे सर्व त्यांनी सोडायला हवं होतं परंतू ते त्यांना हट्टाने करायचंय. असं करून स्वत:चं मुसलमानत्व त्याना अधोरेखीत करायचं आहे हाच अर्थ निघतो. धर्माची ढवळाढवळ सर्वच बाबतीत आणि व्यावहारीक जीवनात नसावी, हे जेवढं इतर धर्मियांनी सहज आत्मसात केलं, तेच नेमकं स्वत:ला वेगळ ठरवण्यासाठी केलं नाही. जग पुढे जात असताना ते मात्र मागे मागे जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि यात फरफट मात्र त्यांचीच होतेय, याचं त्यांना भान नाही. अशाने मुसलमान आणि इतर अश्या दोन उभ्या भागात देश वाटला गेला. जगातही हेच चालताना दिसतं.

आता मुसलमान आणि वंदे मातरम या वादावर मी माझं म्हणणं मांडतो. मला काय म्हणायचंय, हे कळण्यासाठी मी मुसलमानांसंबंधी मी वर केलेलं विवेचन, थोडं मोठं असलं तरी आवश्यक होतं.

वर म्हटल्याप्रमाणे आपल्या देशातील सर्वच मुसलमान देशद्रोही नाहीत. आपल्या एवढंच त्यांचंही या देशावर प्रेम आहे यात माझ्या मनात शंका नाही. सर्वच मुसलमान अबु आझमी, ओवेसी बंधू, हमिद अन्सारी व मुल्ला मौलवींसारखा विचार करत नाहीत असंही मला वाटतं. असं वाचण्याचंही कारण आहे. फेब्रुवारी २०१७ मधे झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत ओवेसींच्या पक्षाने एकूण ५९ उमेदवार उभे केले होते, ते ही मुस्लिमबहुल भागात. त्यापैकी निवडून केवळ तिनच आले. महाराष्ट्रात सोलापूर आणि औरंगाबादेत त्यांना संमिश्र यश मिळालेलं असलं, तरी १०० टक्के मुसलमानांनी ओवेसींच्या पक्षाला मतं दिली असं म्हणता येणार नाही. म्हणजे ओवेसींचा वंदे मातरमला असणारा विरोध हे त्यांचं मत असू शकतं, सर्वच मुसलमान समाजाचं नाही हा माझा निश्कर्ष असेल तर तो चुकू नये.

सरसकट सर्व मुसलमानांना देशद्रोही का समजलं जातं? याची मला वाटणारी कारणं खालील प्रमाणे आहेत, असं मला वाटतं.

1. त्यांनी मुसमानांचा जो पारंपारीक वेष असतो, तो अट्टाहासाने स्विकारलाय. त्यात पायाकडे तोकडा आणि गुडघ्यापर्यंत लांब पांढऱ्यारंगाचा ड्रेस किंवा अरबी झगा आणि स्त्रीयांचा बुरखा समाविष्ट आहे. हा वेष जगभरातील बहुतेक सर्वच मुसलमान धारण करतात. मुसलमानांच्यातला कट्टरवादाकडे झुकलेले अतिरेकी आणि त्याच समाजातील एखादा सामान्य माणूस, हे सारख्याच वेषात दिसतात आणि म्हणून सामान्य मुसलमान त्या आतंकवाद्याचं अनुकरण करतो ही शंका मुस्लिमेतरांच्या मनात बळावते आणि सर्वच मुसलमान देशद्रोही आहेत असा समज होतो. देशाप्रमाणे वेष असावा ही गोष्ट मुसलमानांना मान्य नसावी याचा त्रास त्यांनाच होतोय.

2. अरबी, उर्दू भाषेचा (उर्दू भारतीय भाषा आहे हे अनेक भारतीयांना माहित नसावं) अतिरेकी आग्रह, धर्माच्या वाढत्या पगड्यामुळ सर्व मुसलमानांच्या निष्ठा अरबस्थानाशी जोडल्या गेल्याचा नकळत समज भारतिय मनांत होतो आणि जे अरबस्थानाशी निष्ठा ठेवतात, ते या मातीशी बेईमान असतात असं साधं सरळ समिकरण बहुसंख्य भारतीयांच्या मनात तयार होतं, जे मुस्लिमांविषयी शंका निर्माण करतं.

3. धर्माचे प्रेषित आणि मुस्लिम धर्म हे सर्वश्रेष्ठ आणि बाकी सर्व दुय्यम असा त्यांचा आग्रह, त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात संदेह निर्माण करतो. उदा. पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र आहे आणि उद्या इस्लामचा हवाला देऊन जर पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं, तर आपल्या देशातील मुसलमानांच्या निष्ठा आपल्यासोबत राहाणार की इस्लामसोबत याची शंका आपण देशवासीयांच्या मनात घर करून आहे.

4. सर्वच जगातील अनैतिक आणि समाजविरोधी कारवायांत गुंतलेल्या व्यक्तींत मुसलमान समाजाच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर दिसतात. शिक्षणाचा अभाव, मुल्ला-मौलविॅचा प्रभाव आणि प्राचिन काळातील धर्माज्ञांप्रमाणे वागण्याचा काळाच्या विपरीत अट्टाहास, या मुळे देशाच्या मुख्य प्रवाहात यांचे येणं, नैसर्गिकरित्याच रोखलं जातं आणि अशावेळी पुन्हा पुन्हा तेच अनैतिक बेकायदेशीर व्यवसाय करण्याशिवाय त्यांना गत्यंतर राहात नाही. सर्वच तसे नसले तरी ते तसेच आहेत असा रास्त संशय इतरांना येतो.

5. उच्च शिक्षित मुसलमान तरूणही समाजविघातक कारवायांमधे गुंतलेले आढळतात. त्या समाजातील तरूण वेगळं जीवन जगण्यालाठी शिक्षण घेत असतील परंतू त्याच समाजातील मुलतत्ववादी त्यांना तसं करण्यापासून रोखत असावेत. इतर समाज स्विकारत नाही आणि स्व-समाजापासून तुटण्याची भितीपोटी त्यांना अतिरेकाची कास धरण्यापलिकडे इलाज उरत नसावा.
मुसलमान समाज इतर भारतीयांपासून तुटण्याची वरील काही कारणं मला दिसतात. कदाचित आणखीही असतील, परंतू माझ्या अभ्यासातीन जी मला पटली ती वर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वंदे मातरम’ न म्हणणं याचा संबंध मुसलमानांच्या देशावरील निष्ठेशी लावला जातो, तो वरील कारणांमुळे असं मला वाटतं.

वर दिलेली किंवा इतरही काही कारणं असतील, तर त्यांचं निराकारण त्याच समजातील पुढारी, नेते लोकांनी पुढाकार घेऊन केली पाहिजेत. परंतू मुस्लिमांना अशिक्षित, मागासलेलं राहाणं, त्यांचा धंदा चालण्यासाठी आवश्यक असल्याने, ते तसं करणार नाहीत आणि मुसलमान समाजाची कुतरओढं आणि इतरांपासूनचं तुटलेपण संपण्याची काही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. आपल्या देशातच नव्हे तर जगभरात हेच होताना दिसतं.

आता आपण ‘वंदे मातरम’ म्हणणाऱ्या राष्ट्रभक्त नागरिकांविषयी-

‘वंदे मातरम’ म्हणण्याचा संबंधं, देशप्रेमाशी जोडला जातोय, तो कितपत योग्य की अयोग्य या वादात मी पडू इच्छित नाही. परंतू असा संबंध देशप्रेमाशी जे कुणी लावतात, त्यांना मी एक प्रश्न मात्र जरूर विचारू शकतो. अर्थात हा प्रश्न या देशावर प्रेम करणाऱ्या आणि ते तसं आहे हे दाखवणाऱ्या मुसलमानेतरांना, म्हणजे अर्थातच हिन्दूना विचारणार आहे.

तर प्रश्न असा, की आपण फक्त ‘वंदे मातरम’ म्हटलं की आपण देशप्रेमी आहोत हे कसं काय सिद्ध होतं? मग ‘वंदे मातरम’चा मंत्रोच्चार सकाळ संध्याकाळ केल्यावर, टेबला खालून पैसे देणं घेणं नैतिक कसं काय ठरू शकतं. आपल्या सोयीनुसार कायदे पाळणं आणि शक्य तिथे तोडणं असा संधीसाधूपणा वंदे मातरम’चा जयघोष केल्याने चालू शकतो काय? गोपनियतेची आणि देशरक्षणाची शपथ घेऊन पदावर येणाऱ्यांनी पैसे खाऊन देश विकला, तरी ते ‘वंदे मातरम’ म्हणत असल्याने देशाशी प्रामाणीक कसे काय होऊ शकतात? जातीभेद, विषमता, बेरोजगारी हे सर्व प्रश्न वंदेमातरममुळे मिटतात का?

आपण सर्व ‘देशभक्त’ नागरिक वरील यर्व गोष्टी आपापल्या सोयींनुसार करत असतो आणि वर ‘वंदे मातरम’ म्हणून देशभक्त आहोत हे दाखवत असतो. आपण सारेच दुतोंडी आहोत हे आपण कधी मान्य करणार? देशभक्ती, देशप्रेम ह्या केवळ म्हणायच्या गोष्टी नाहीत, तर आचरणात आणायच्या आहेत. देशाचे कायदे, नियम पाळणं म्हणजे देशप्रेम. त्या त्या पदाशी नेतिक प्रामाणिकता म्हणजे देशप्रेम. नेमकं तेच आपल्याला करायचं नसल्याने ‘वंदे मातरम’ म्हणून देशप्रेम सिद्ध करण्याचा सोपा मार्ग आपल्या सर्वांनाच हवासा वाटतो.

जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, देश चालवणारे प्रशासनातील वरीष्ठ आणि नवोदीत सनदी आणि सर्वच पातळ्यावरचे अधिकारी/कर्मचारी, मुलांच्या अॅडमिशनसाठी किंवा आपलं काम दुसऱ्याचा हक्क मारून, काही करून स्वार्थ साधायची तयारी असलेले आपण सामान्य नागरीक, फसवणूक म्हणजेच व्यापार समजणारे व्यापारी, कर्ज बुडवणारे आणि त्यांना तसं करण्यास मदत करण्यास तत्पर असणारे बॅंक अधिकारी, यांचं देश प्रेम ‘वंदे मातरम’ म्हटल्याने कसं काय सिद्ध होतं हा प्रश्न मला पडलाय. तुम्हाला तो तसा पडलाय की नाही मला माहित नाही, परंतू तो तसा पडला नसल्यास, तो स्वत:लाच जरूर विचारावा आणि आपण खरोखर या देशावर प्रेम करतो का उत्तर शोधावं असं आव्हान आणि आवाहनही करतो आणि थांबतो. या उत्तराच्या शेधात एकदा का निघालात, की वंदे मातरम म्हणा अथवा म्हणू नका, तुमच्या देशप्रेमाविषयी कुणालाच शंका येणार नाही.

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..