अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग १

USA-Rutuchakra-part 1

पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्‍या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र.

मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी रंग बर्फाच्या आवरणाखालून डोकं वर काढायला लागलेला असतो; पोपडे पडलेल्या भिंतीखालचा जुना रंग दिसावा तसा. जागोजागी वितळलेल्या बर्फाखाली, सुकलेल्या गवताचे पिवळे तुकडे इतस्तत: दिसत असतात. झाडांच्या फांद्या देखील अंगावरचं बर्फ झटकून पुन्हा तरतरीत होत असतात.

हळूहळू पिवळ्या गवतावर हिरव्या छटा चढायला लागतात. झाडांच्या बुंध्यांच्या पायथ्याशी, झुडपांच्या काटक्यांचे जंगल माजलेले असते. या उघड्या, बोडक्या, सुकलेल्या तपकिरी काटक्या, एकाएकी टोकाकडे हिरवट पिवळ्या व्हायला लागतात. काही ठिकाणी जुनाट काटक्यांच्या टोकाला नवीन पिवळ्या पोपटी नाजुक वेलांट्या उमलतात. हा पिवळा रंग अगदी डोळ्यात भरण्याएवढा गर्द असतो. आणि हे रंगायतन इतक्या अचानक होतं की काल परवापर्यंत रुक्ष, तपकिरी, वठल्यासारखी वाटणारी झुडपं, एकाएकी सजीव आणि तजेलदार दिसायला लागतात. अशातच एके दिवशी अचानक, पोपटी रंगाचे शिंतोडे पडल्यासारखी छोटी छोटी पाने अवतरतात.

झाडांच्या टोकांच्या बारीक फांद्या लाल गुलाबी कळ्यांनी (buds) मोहरून जातात. कळ्यांनी लगडलेल्या झाडांच्या दाट गर्दीमुळे, डोंगरांवर गुलाबी छटा दिसायला लागते. गुलाबी रंगाने रंगून गेलेल्या फांद्यांची टोकं आणि झाडांच्या पायतळींच्या झुडपांचा पोपटी रंग यामुळे झाडांनी गुलाबी फेटे आणि पोपटी मोजे असा मजेशीर पोशाख केल्यासारखं वाटायला लागतं. ‘वीपींग विलो’ च्या झाडाचे लोंबणारे झुपके पोपटी होतात. सर्व झाडांमधे या झाडावर वसंताचा स्पर्श प्रथम जाणवतो. वितळलेल्या बर्फामुळे बर्‍याच झाडांचे बुंधे आणि फांद्या, शेवाळाने माखून गेलेल्या असतात.

डोंगरकड्यांच्या दगडांच्या मधून आलेलं गवत देखील हिरवटसर व्हायला लागलेलं असतं. दगडांच्या पुढे आलेल्या टोकांखाली, जिथे थिजलेल्या बर्फाचे लोलक झाले होते, ते वितळून नुसताच पाण्याचा ओलावा राहिलेला असतो आणि त्यात शेवाळाची हिरवट झाक डोकवायला लागलेली असते.

हळू हळू रान रंगू लागतं. रुक्ष करड्या तपकिरी रंगाचा एकसुरीपणा जाऊन, हिरव्या, पोपटी रंगाच्या विविध छटा जागो जागी दिसू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाची झाक गडद होऊन किरमिजी रंगाची होते. वर्षभर हिरवे रहाणारे सूचिपर्ण वृक्ष, आपले गडद हिरवे पिसारे फुलवून, नेहमीच्याच दिमाखात उभे असतात. त्यांच्या आगे मागे, नवीन पालवी फुटणारी पानगळीची झाडं, आपल्या नव्या नवलाईचं कौतुक अंगाखांद्यावर लेवून उभी असतात. झाडांच्या या सरमिसळीकडे पाहून, पिढीजात श्रीमंतांच्या वडिलोपार्जित वाड्यांच्या आसपास, नवीनच हातात पैसे खुळखुळू लागलेल्या चाकरमान्यांनी रंगीबेरंगी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उठवावेत तसं वाटतं. म्हातार्‍या आजी आजोबांचं सुनसान घर एकदम मुला नातवंडांनी भरून जावं, लेकी सुनांनी नव्या कोर्‍या साड्या नेसून लगबग करावी आणि नातवंडांनी घरभर गोंधळ घालावा तसे डोंगर गजबजून जातात.

एप्रिल मे मधे इथे भरपूर पाऊस पडतो. पण पाऊस आपल्या मान्सूनसारखा धुवाधार नाही. मधून मधून सरी तेवढ्या येऊन जातात. या सीझनमधे चेरी ब्लॉसम, क्रॅब अ‍ॅपल, मॅग्नोलिया, डॉगवूड वगैरे झाडांवर फुलांचा बहर येतो. या झाडांवर तोपर्यंत पानांचा मागमूस नसतो. नुसत्या फांद्या, काटक्या आणि फुलांची लयलूट ! पण हा बहर जेमतेम २-३ आठवडे टिकतो. हळू हळू फुलं सुकून पडायला लागतात आणि फुलांच्या भरगच्च संभारात जिथे जिथे मोकळी जागा होईल तिथे तिथे हिरवी पाने दिसायला लागतात. फुलांची आणि पानांची जणू रस्सीखेच सुरू असते. शेवटी हिरवाई वरचढ ठरू लागते. झाडाझुडपात दिमाखात डुलणारी फुले जमिनीवर लोळण घेऊ लागतात. पुढचे काही दिवस झाडांच्या पायतळी ह्या गळून पडलेल्या फुलांचे गालिचे पडून राहिलेले असतात. एकदा हे गालिचे वार्‍यावर उडून गेले किंवा पाचोळ्याचा भाग होऊन मातीत एकजीव होऊन गेले की सारे संपले. त्यानंतर पुढचे ५-६ महिने, नुसत्या हिरव्या पानांचा भार वागवत झाडं उभी रहातात. जणू एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात, मोठ्या माणसांच्या आधी लहान पोराटोरांचे कार्यक्रम उरकून घेतले जावेत, तसे पानांचं साम्राज्य पसरायच्या आधी, फुलांची रंगी बेरंगी होळी उरकून घेतली जाते.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....